Thursday, January 26, 2012

वास्तु

Thursday, January 26, 2012

भारतात वास्तुशास्त्राचा विचार १९९० च्या दशकात होऊ लागला. त्यापूर्वी कोणीही वास्तुशास्त्र पाहात नव्हते. काही लोकांनी मग अर्थार्जनाचे साधन म्हणून याचा प्रसार करावयास सुरूवात केली. लोकांना भिती दाखवून पैसे उकळायला सुरूवात केली. १९९० पूर्वी पार आपण ज्ञानेश्वरांच्या काळापर्यंत मागे जाउन पाहिले असता कोणाही संतांच्या अभंगात वास्तुबद्दल उहापोह नाही. मग त्याकाळी वास्तुचे दुष्परिणाम जाणवत होते काय?

कोणताही गड बांधतांना, ताजमहाल बांधतांना, शनिवारवाडा, मंदिरे बांधतांना त्याकाळी वास्तुशास्त्राचा विचार केलेला कोणत्याही दप्तरात उल्लेख आढळत नाही. आजसुद्धां हे तथाकथीत वास्तुशास्त्रज्ञ दावे करतात, त्यामध्ये किती तथ्य आहे हा संशोधनाचाच विषय आहे.

आहे, वास्तुशास्त्रावर मयमतम सार‍खे ग्रंथ आहेत, पण ते नीट समजावून घेऊन कोणीही मार्गदर्शन करीत नाही.

जाणकारांनी मयमतम् ग्रंथ अभासून अवश्य आपल्या वास्तुचा अभ्यास करावा.

 


0 comments

Tuesday, January 24, 2012

कलियुग

Tuesday, January 24, 2012

कजियुगांत  एकंदर सहा शककर्ते होतील असे विद्वान् ऋषींनी लिहून ठेवले आहे. त्या सहातून तीन होऊन गेले आणि तीन अद्यापी व्हावयाचे आहेत. ते शककर्ते खालील प्रमाणे-----

पहिला—इंद्रप्रस्थ म्हणजे दिली येथील युधिष्ठिरशक----३,०४४ वर्षे

दुसरा—उज्जयिनी येथें विक्रमशक संवत्----१३५ वर्षे

तिसरा—पैठन येथें षलिवाहन शक----१८,००० वर्षे‍

चौथा—वैतरणेच्या कांठीं विजयाभिनंदन शक----१०,००० वर्षे

पांचवा—बंगाल देशांत धारातीर्थी नागर्जुन शक----४,००,००० वर्षे

सहावा—कर्नाटकांत करवीरपत्तनी कल्कीशक----८२१ वर्षे

अशी एकंदर कलीयुगांची ४,३२,००० वर्षे होतात.

सांप्रत शालिवाहनाच शक चालू आहे.

हे सर्व असे असतांना २०१२ डिसेंबरमध्ये जगाचा नाश होणार आहे यावर कसा विश्वास ठेवावा?

 


0 comments

Saturday, January 21, 2012

गणेशोत्सव

Saturday, January 21, 2012

पुण्यास सवाई माधवराव रहावयास आल्यानंतर गणेशोत्सव पेशवे सरकारच्या योग्यतेस साजेशा थाटाने साजरा होत असे.
मल्हार बल्लाळी याने पुरंदरवरून ता. २९-८-१७७८ रोजी लिहीलेले पत्र असे-
पुरंदरी श्रीगणपतीचा उत्सव चतुर्थीपासून काल शुक्रवारपर्यंत यथास्थित जाहला. रात्रौ नित्य श्रीमंत कथेस बसत होते. दीड पावणे दोन प्रहरपर्यंत रात्र कथेस होत असे. काल सहा घटिका दिवस शेष राहिला होता, तेव्हां गणपतीचे प्रस्थान जाहले. स्वारी समागमे श्रीमंत गेले होते. पर्जन्याची झड बसली होती, परंतु स्वारी जातेसमयी चांगला पर्जन्य उघडला होता. स्वारीस शोभा फारच चांगली आली होती. राजहंस बच्चा हती याजवर जरीपटका दिला होता व तेजरावा हत्तीण शिवापुरहून आणिली होती. तिजवर नौबत ठेविली होती. श्रीमंतांची मर्जी बहुतच प्रसन्न होती. आज तेजरावा हत्तीण मागती शिवापुरास रवाना केली. स्वारीचा बंदोबस्त राजश्री बळवंतराव पटवर्धन याणी चांगला केला  होता. आपण श्रीमंतांचे पालखीजवळ होते. स्वामीच्या वाड्यापुढील रस्याने थोरल्या तळ्याकडे स्वारी गेली होती. ( पे. द. ४३ )
या उत्सवाचे वेळी सवाई माधवरावांचे वय अवघे पांच वर्षांचे होते. श्रीमंतांची स्वारी गडावर असल्यामुळें गणेशोत्सव अशा रितीने तेथें होत असता पुण्यांत शनिवारवाड्यांत
उत्सवाची तयारी होत असे. याचा वृत्तांत पुरंदराहून सखारामबापू यांनी ता. ५-९-१७७४ रोजी नारो अप्पाजी खासगीवाले यांस लिहीला. ( पे. द. ३२ ता. ५-९-१७७४ )
यावरून असे समजायला हरकत नाही, गणेशोत्सव पेशवेकाळापासून होता, फक्त त्याला समाजात लोकप्रियता आणली ती लोकमान्य टिळकांनी.


0 comments

Friday, January 20, 2012

हिंदूंची नीतिमत्ता

Friday, January 20, 2012

परधर्माची लाट देशावर कित्येक शतकें टिकून ओसरली तरी तिचे दुष्परिणाम खरडून काढून स्वधर्म व खसंस्कृति यांची स्थापना करण्यास किती कष्ट पडतात हें वरील हकीकत वाचून कळण्यासारखे आहे. अर्थात्‍ अशा प्रकारचे झगडे वरचेवर करण्याचे प्रसंग हिंदूवर आल्यामुळें त्यांना आपली घडी मनाजोगी कधींच कधींच बसवितां आली नाहीं. हिंदुसमाजात आगंतुक दोष तसेच कायमचे राहून गेले. तथापि एवढा मोठा हिंदुसमाजात आपली संस्कृति न नीतिमत्ता बर्‍याच प्रमाणात टिकवूं शकला, याचे परकीय राज्यकर्त्यांनाहि आश्चर्य वाटले. ज्या मालकम साहेबाच्या ग्रंथातूनच वरील उतारा घेण्यात आला आहे त्या मालकम साहेबाने या बाबतींते दिलेला अभ्रिप्राय मननीय आहे. तो म्हणतो. ‘हिंदी लोकांत बरेच नैतिक दोष आढळतात. जुलूम व अंदाधुंदीची राज्यपद्धति यांचा तो परिणाम आहे. पण त्यांतून हिंदुस्थान देश आतां बर्‍याच अंशी मुक्त झाला आहे. हिंदुस्थानांत आजवर कित्येक स्थित्यंतरे घडून आली व जुलमी राज्येहि होऊन गेली. इतक्या प्रतिकूल परिस्थितीत हिंदी लोकांतील बर्‍याच मोठया जनसमूहाने इतके सद्‌गुण व नीतिमत्ता कायम राखली, असले उदाहरण जगांत इतरत्र पहावयास सांपडणार नाहीं. त्याचे श्रेय हिंदु लोकांच्य धर्मसंस्थाना, विशेषतः ज्ञातिसंस्थेलाच दिले पाहिजे. ज्या ज्ञातिसंस्थेने त्यांना फार प्राचीन काळीं सांप्रतच्या दर्जास चढविले आहे, त्याच ज्ञातिसंस्थेने त्यांना त्याच ठिकाणीं स्थिर करुन ठेवले हेहि खोटे नव्हे. हिंदूंच्या (धर्म) संस्थापासून त्यांना जे फायदे झाले आहेत त्यांपैकीच चोरी, दारुबाजी व अत्याचार यांचा अभाव हे फायदे असून त्याशिवाय कौटुंबिक बंधने व मायापाश यांचीहि योग्यता कमी नाही. आतां त्यांच्या कांहीं चाली व भोळसरपणा असा आहे कीं, त्याबद्दल कोणीहि खेदच दर्शवील.’
(Instructions by Sir John Malcolm Date 28-8-1821).

दर्भ आणि आभार - पेशवेकालीन महाराष्ट्र, लेखक-वासुदेव कृष्ण भावे, डिसेंबर सन १९३५.


0 comments

Thursday, January 19, 2012

बाजीराव पेशवे यांचे ताकीदपत्र

Thursday, January 19, 2012

धार येथील एका बावीशे ब्राह्मणाचे घरील १६९ वर्षांचे दोन जुने कागद सांपडले. त्यांत श्रीमंत बाळाजी बाजीराव पेशवे यांचे वेळीं एतद्‌देशीय ब्राह्मणांचे आचारांत शास्त्रविरुद्ध प्रचार चालू होते ते बंद करुन शास्त्रोक्त आचार चालू करण्याबद्दल आज्ञा लिहिल्या आहेत. त्या दोन कागदांपैकी एक निषिद्ध आचारांची यादी असून दुसरे यशवंतराव पवार यांनीं वर्तमान भावी कमाविसदारांचे नावें लिहिलेलें ताकीदपत्र आहे. ते संक्षेपानें येणेंप्रमाणें

श्री. यादी धर्मस्थापना शास्त्रप्रमाण वेदपुरुषाज्ञाप्रमाण नाना धर्म प्रवृत्त होत नाना स्थलीं.

१. गोत्र, प्रवर, शास्त्र, सूत्र, देवमंत्रपूर्वक स्नानसंध्यादि आन्हिक कर्म करावें. पूर्वसंप्रदाय टाकावा.

२. ब्राह्मण जातीनें घरी रहाट न ठेवावा. सूत स्त्रियांनी न काढावें. पूर्व वृत्तें टाकावीं.

३. नवरीचे गळ्यांत जवाळी (माळ खारका बदाम पिस्ते इत्यादिकांची) मुचीची (चांभारानें) केलेली न घालावी. आपले घरीं करुन घालावी. ब्राह्मण जातीनें एकादशाह द्वादशाह भोजन न करावे. तेरावे दिवशी. ब्राह्मण सुखरुप भोजनास घालावे.

४. सौभाग्यवती स्त्रीनें लाखेचा व नरोटीची चुडा न धरावा.

५. सौभाग्यवती ब्राह्मण स्त्रींचे पंगतीमध्यें विधवेनें मधी बसोन भोजन न करावें.

६. सौभाग्यवतीनें विधवेचे पंगतीस भोजनास न बसावे.

७. विधवा स्त्रीनें शेंडी धरुन विष्णु पूजा न करतां ते शेंडी सोडावी. निर्मल मुंडन करावे.

८. ब्राह्मणाही विवाहामध्यें नवर्‍या-नवरीचे पाईमोचे घालून वैदिक कर्म न करावे.

९. विवाहामध्यें षोडश संस्कारामध्यें ब्राह्मण जातीहि स्नान करुन अस्पर्श धौत वस्त्र परिधान करुन संध्या, ब्रह्मयज्ञ, तर्पण, नैवेद्य, वैश्वदेव, भोजन, करावें. पूर्व रीत टाकावीं.

१०. ब्राह्मण जातीनें प्रथम मागणी न करावी, तात्काळ विवाह करावा.

११. सौभाग्यवती ब्राह्मण स्त्रीनें चोळी धरावी, काचोळी टाकावी.

१२. सौ. ब्राह्मण स्त्रीनें काशा-पितळेचें बिच्छवे (पायाच्या बोटांतील भूषणें) न धरावें, रुप्याचे धरावे.

१३. ब्राह्मणादि उदक व स्त्रियांनी खांद्यावरीं व कडेवरी आणावें, मस्तकी जळ न आणावें.

१४. ब्राह्मण जातीने आटासाठा न करावा.

१५. ब्राह्मणास ज्यास जेवावयास सांगितलें त्याणें जावें, पोरास समागमे न न्यावें.

१६ ब्राहण भोजन व स्त्रीसवासीण भोजन यांमध्यें विधवा पंगतीस नसावी.

१७. भांड अपशब्दोउच्चारणपूर्वक ब्राह्मण स्त्रीनें मणी न धरावे, वेदमंत्रोच्चारणपूर्वक सकल कर्म करावीं.

१८. समस्त ब्राह्मणाही षोडशकर्म सांगतासिद्धयर्थ ज्या त्या संस्कारी यथासामर्थ्य ब्राह्मण जेवू घालावे.

१९. समस्त ब्राह्मणाही भोजनकर्माचे ठायीं पवित्र होऊन स्वयंपाक करावा, पक्कान्नें पापड लोणचे आदिकरुन.

२०. समस्त ब्राह्मणांहीं विवाहामध्यें नवर्‍यानवरीचे मस्तकीं पुष्पमाला बांधाव्या. मोचीयाचे घरचे घरमोड न बांधावे.

२१. समस्त ब्राह्मण जातीनें मृत प्राण्यांच्या उत्तरक्रिया शास्त्राप्रमाणें कराव्या.

२२. जो ब्राह्मण मरेल त्याचे स्त्रीचे केस प्रथम अथवा दहावे दिवशीं काढावे तेव्हां शुद्ध.

२३. समस्त ब्राह्मण स्त्रिया याणी प्रत्यही स्नान सवस्त्र करुन वस्त्रे नित्य धुवोन परिधान करावी. चोळी व लुगडी सोवळी धुवोन ठेवावी.

२४. गोत्रप्रवर सापिंड निर्णयपूर्वक स्वसूत्रोक्त वेदमंत्रेकरुन विवाहादिक षोडश संस्कार करावे.पूर्व संप्रदाय टाकावा.

२५. ब्राह्मण जातीच्या समस्त विधवा स्त्रीनें प्रथम रजोदर्शन झाल्यानंतर केस मस्तकीं व आभूषण व चोळी काचोळी लहंगा न धरावी. एक वस्त्र सकच्छ धारण करावें.

२६. सौ. ब्राह्मण स्त्रीनें नाडे मस्तकी न बांधावे.

२७. सौ. ब्राह्मण स्त्रीनें गळ्यापासून मस्तकापर्यत यथासामर्थ्य सुवर्ण आभूषण धरावे, रुप्याचे नग मस्तकीं न धरावे.

२८. सर्व ब्राह्मणाही ब्राह्मणापासून वेदमंत्रांचा उपदेश घ्यावा. त्रिदंडी संन्यासी जटिल गोसावी बैरागी मात्मसाद असे पाखंडी आहेत, त्यांचा मंत्र अथव त्यांचे आज्ञेमध्ये न चालावे. त्यांचा त्याग करावा. ब्राह्मण जातीनें ब्राह्मणापासून उपदेश घ्यावा.

२९. यज्ञोपवीत रहाटाचे सुताची न करावी. आपले स्वहस्ते सूत काढून करावा आणि धारण करावे समंत्रक.

३०. ब्राह्मण जातीनें ब्राह्मणोदकेकरुन सर्वदा स्त्रान करावें. समाराधनादिक करावी, तेथें शूद्रोदक नसावें.

३१. सर्व ब्राह्मण स्त्रीनें सव्य लुगडें नेसून कच्छ धरावा, लहंगा टाकावा.

३२. सर्व ब्राह्मणाही जेवतेसमयीं एकास एका स्पर्श न करावा. सौभाग्यवती स्त्रीनेंहि स्पर्श न करावें.

३३. सकल ब्राह्मण जातीनें साता वर्षांनंतर दहा वर्षपर्यत तत्काळ विवाह करावा.

३४. ब्राह्मण जातीनें ज्या गांवी वधू असेल तेथें सहकुटुंब जाऊन तेथें मंडप घालून देवप्रतिष्ठा करुन लग्न संपादावें.

३५. ब्राह्मणाही ब्राह्मविधीनें विवाह करावा.

३६. ब्राह्मण जातीनें आपली कन्या विक्रय करुन विवाह न करावा.

३७. सकल ब्राह्मण यांचे स्त्रीनें स्वयंपाक करतेवेळेस, भोजन करतेवेळेस दर्याईची (रेशमी) चोळी घालावी किंवा धूत वस्त्र सोवळ्यांत घालावें ते चोळी वस्त्रें धारण करावें.

३८. समस्त ब्राह्मणाही समाराधना व पितृकार्य व विवाहकार्याचे स्वयंपाक करणें तो स्वयंपाक करणार यांनीं उपोषण असतां पाक करावा अथवा पीठ भक्षावयस द्यावें, आणखी न सेवावे.

३९. समस्त ब्राह्मण यांचे पुत्रानें वेदाध्ययन करावें.

४०. जो ब्राह्मण अनाचार न सोडी त्यास वाळीत घालावें. यथोक्त प्रायश्चित्त देऊन शुद्ध करुन घ्यावें.

४१. समस्त ब्राह्मणाचे पितृकार्यी वेदपाठी ब्राह्मण सांगावे भोजनास.

४२. समस्त ब्राह्मणाही पितृकार्याचे ठाईं ब्राह्मण बोलावले असतील तितके जेऊं घालावे.

४३. ब्राह्मणाही शूद्राचे घरीं विवाहादिक कर्म शूद्रकमलाकर ग्रंथप्रमाण करावे. वेदप्रमाण न करावें.

श्री भवीनीचरणें तप्तर
आनंदराव सुत यशवंत पवार
निरंतर संवत् १७९२

संदर्भ आणि आभार - पेशवेकालीन महाराष्ट्र, लेखक-वासुदेव कृष्ण भावे, डिसेंबर सन १९३५.


0 comments