मी मराठी माणूस

Mi Marathi!

  • Home
  • VismiT
एका अमेरीकन मित्राने जेवायला घरी बोलवले होते, तो, त्याची "बायको", "बायको" असे लिहिलंय कारण अमेरीकेत तुम्ही सखी किंवा सखा यापैकी कोणाबरोबरही संसार थाटु शकता, असो आणि "त्याची आणि तीची" तीन मुले. अमेरीकेत घरातली मुले त्याच दोघांची असतील अशी हमी कधीच देता येत नाही, येथे सोडचिठ्ठी झालेले मुलांसहित नवा संसार मांडतात. "छोटा परिवार सुखी परिवार". तीघांपैकी जुळी त्यांची पण एक मुलगी ग्वांटामाला य देशातुन दत्तक घेतलेली. अमेरीकन यजमान नेहमीच चांगला म्हणतात. सारे घर दाखवले, राहण्याच्या खोल्या, उठबस करायच्या खोल्या, त्याच्या गोंडस जुळ्या मुलांच्या खोल्या. मी मुलांना गोंडस हा शेरा द्यायला विसरलो नाही, पण बोलताना "आईवर गेली आहेत" अशी पुणेरी धार त्याला होतीच. त्याबरोबर त्याच्या ४ वर्षाच्या मुलीची अप्रतिम सजवलेली खोली बघताना, मन हरखले आणि विचार सुरु झाले....

इथे सगळेच वेगळे, वयाचे काही महीने झाल्यावर तुमच्यासाठी वेगळी खोली असते. वाढदिवसाला किंवा काही महत्वाच्या दिवशी आजी-आजोबा पण दिसतात. तुमचे जीवशास्त्रीय जन्मदाते, जन्मदाते आणि पालनकर्ते यात फरक असु शकतो. कदाचित तुमच्या नशीबाला यापैकी एकच काही तरी असते. माझ्या देशी मात्र हे सगळे एकच असतात. अमेरीकन मुलांना त्यांच्या आयुष्यात फार लवकर "PRIVACY" नावची सखी आलेली असते. जीची त्यांचे पालनकर्ते मुलांपेक्षा जास्त काळजी घेतात. मला अजुन असे काही माहीत नाहीये पण इंग्रजी सिनेमात बघितले आहे की मुले वडलांना "Mind your business" असे काहीतरी म्हणतात. माझे आज २८ वर्षे वय आहे, पण जर असे काही मी माझ्या तीर्थरुपांपाशी म्हटले तर ते आजही कानफाटाखाली गणेशोत्सव साजरा करतील. येथे जर बापाने, बऱ्याच अमेरीकन मुलांना बाप असतात वडिल असण्यासाठी वडलांनी आयुष्यात पुण्य करावे लागते, असो जर बापाने जर तुमच्यावर हात उगारला तर तुम्ही ९११ (म्हणजे भारतातला १००) फिरवु शकता. हे ९११ चे धडे अमेरीकन शाळेत पहील्या दिवशी देतात म्हणे, आणि त्याला "Child Harassment" म्हणतात. मला शाळेत उपासनी नावाचे मास्तर होते, त्यांनी पोरांना बडवले नाही असा एकही दिवस मला आठवत नाही आणि घरी हे सांगायची सोयच नाही. नूमविच्या प्रत्येक विद्यार्थ्याला ते माहीत आहेत, पण आज एकालाही त्यांनी बडवल्याचे वाईट वाटत नाही. ते शिक्षक आमच्यावर पालकांसारखे प्रेम करतात याची आम्हाला खात्री आहे. अमेरीकेत वयाची काही वर्षे झाल्यावर तुम्ही लहान मोठी कमाई करू लागता, तुमचे स्वतःचे पैसे असे काही काही असते. मला फक्त गल्ल्यात साठवलेले पैसे माहीत आहेत, जे कोणी घरी आलेल्याने हातात ठेवलेले असत. गरज नसेल तर भारतीय आईवडील शालेय जीवनात तुम्हाला कमाई करु देत नाहीत, वाईट सवयी लागतात म्हणे. अमेरीकेत तुम्हाला हवे ते कपडे घालायचे स्वातंत्र्य असते, येथे रस्त्यावर काही मुले जे कपडे घालतात ते बघून लहानपणच्या हडळीची आठवण येते. ओठाला काजळी रंग, काळे कपडे, बापरे. हे नसेल तर जास्तीत जास्त अंगप्रदर्शनीय कपडे, आतली अंतर्वस्त्रे दिसवीत अशी फॅशन आहे म्हणे. मग त्यांना अंतर्वस्त्रे का म्हणायची कोण जाणे? माझ्या लेखनात काही चुक नाहिये पुन्हा सांगतो की असे कपडे शाळेतली मुले घालतात म्हणुन. अहो, मी अजुनही पांढरा शर्ट आणि खाकी पॅंट घालत नाही, शाळेत चाललॊय असे वाटते. लहानपणी स्वातंत्र्य म्हणजे जे फक्त देशाला मिळते हे माहीत होते, इथे ते सगळ्यांना असते. वयाची अठरा वर्षे झाल्यावर आईबाप तुम्हाला घराबाहेर काढतात आणि त्यावयानंतर पालकांबरोबर राहणाऱ्याला येथे विचित्र नजरेने बघतात. मीच काय माझे वडील पण अजुन त्यांच्या पालकांबरोबर राहतात, बहुतेक त्यांनापण हे स्वातंत्र्य अजुन माहीतच नाहीये . "आयुष्यातले बरेच निर्णय आई वडीलांच्या संमतीने घेणे याचा अर्थ तुम्ही स्वतंत्र नाही" हे अमेरीकन तत्वज्ञान १०० टक्के चुक आहे.

येथे लोक आपापली लग्ने आपणच ठरवतात आणि उरकतात. हो!!, उरकतात ५० लोकात लग्न करण्याला पुण्यात अजुनही "लग्न घाईत उरकणे" असाच वाक्यप्रचार आहे. फार कमी लोक तीशी अगोदर विवाहबद्ध होऊ शकतात. त्या अगोदर बरेचदा त्यांना मुले पण झालेली असतात. अहो मुले झाल्यावर पण त्यांच्या तोंडी "I am not sure if she or he is the ONE" असे असते. माझ्या बहीणीचे जेव्हा पुण्यात लग्न झाले तेव्हा दोन्ही बाजुची मिळुन जवळपास १००० पाने उठली. हे आता मी अमेरीकेत कॊणाला सांगतच नाही, त्यांचा पहीला प्रश्न, तुम्ही एतक्या लोकांना ओळखता? अरे हो ओळखतो. आईवडील यापेक्षा जास्त लोकांना नावानेच नव्हे तर, पत्ता, शिक्षण, त्यांचे नातेवाईक, त्यांच्या मागच्या कमीत कमी दोन पिढ्यांसहीत ओळखतात. आजी, आजोबा, नात, नातु, नातसुन, नातजावई, पणती, पणतु, काका-काकु, मामा-माम्या, आत्या-मामा, मावशा-काका, त्या सगळ्यांची मुले, त्यांच्या बायका-मुले, त्यांच्या नणदा, दीर, सुना, जावई, व्याही, विहीण, सासु, सासरे, साडु, मेव्हणे, मेव्हण्या, बहीणी, भाऊ, भावजय, शेजारी, परत मानलेले भाऊ-बहीण, मित्रमंडळी, तुम्हीच मोजत बसा, १००० नक्की पार होणार. मला आश्चर्य वाटते, अमेरीकेत तर प्रत्येकाला खुप नातेवाईक असायला हवेत, कारण येथे नात्यात बऱ्याच जणांची एकापेक्षा अधिक लग्ने झालेली असतात, त्यामुळे सगळे गणित "Exponentially" बदलते. तरीसुद्धा इथल्या लग्नात नातेवाईक सोडुन मित्रमंडळीच जास्त असतात कारण जवळचे नातेवाईक कॊण आणि कुठे आहेत हेच माहीत नसते किंवा त्यांना बोलवायची इच्छा नसते म्हणुनच म्हटले उरकतात.

अशी ही अमेरीका जेथे घराला घर पण नाही, माणसाला माणूस नाही, नाते म्हणजे कळत नाही, म्हातारपणी आईवडील वेगळे राहतात त्यांच्या यातना तेच भोगतात, अशात तुम्ही पण म्हातारे होता, आणि तुमच्या यातना तुम्हीच भोगता. हे एक चक्र आहे. तुमचे कायम तुमच्यापाठी येते. तरूणपणी, उमेदीत कोणाचीच गरज लागत नाही, जसजसे वय सरते तसे याची नक्की आठवण येते. चांगल्या आठवणीच्या देशात कुठेतरी बालपण आठवते.. आणि बालपण म्हणताच मी पुण्यात शिरलो...

मी पुण्यातल्या शुक्रवार पेठेत दोन खोल्यांच्या घरात वाढलो, दोन कसल्या दीडच खोल्या त्या. घरात माणसे सात, आईवडील, तीन भावंडे, आजी-आजोबा. कसे राहात होतो हे आम्हालाच माहीत आहे. त्यात आमचे कौतुक असे काही नाही, आमच्याप्रमाणे भारतात अनेक कुटुंबे जगतात. मुंबई-पुण्याच्या मानाने मी अगदी सर्वसामान्य घरात वाढलो कारण या शहरात सरासरी लोक याच आकाराच्या घरात राहतात. आईच्या मायेत, वडलांच्या शिस्तीत, आजोबांच्या लाडात आणि सुगरण आजीच्या हातचे खाऊन आम्ही भाऊ-बहीण मोठे झालो, घरच्या परिस्थितीत जमेल तेवढे शिकलो आणि कामधंद्याला लागलो, देशाबाहेर आलो. चांगल्या पगाराच्या जीवावर घराचा आकार वाढवला. आईवडील आता बऱ्याच मोठ्या घरात राहायला आले, नाना प्रकारच्या सुखसुविधेच्या चीजवस्तु घरात आल्या, आराम वाढला, समाजात स्थान वाढले. दोनवर्षात एकदा पुण्याला जाणारा "माझा मी" परवा "स्वप्नात" पुण्यात गेलो होतो, सुखाची चादर मनावर पांघरून घरच्या मायेची ऊब घेणारे ते स्वप्न. घर दिसले ते शुक्रवार पेठेतले घर, छोटे का असे ना. एक समजले की नवे घर मोठे असले तरी ते माझे कधी झालेच नव्हते, मी अजुन लहानच होतो, जुन्या वाड्याच्या त्या इवल्याशा भाड्याच्या घरातच अजुन माझे सारे सुख अडकले होते. घर म्हटले की मला फक्त तेच घर का दिसते? हा प्रश्न इतिहासाच्या परीक्षेतला "पहील्या महायुद्धाची कारणे सांगा" सारखा अवघड दिसणारा पण पाठांतराने सहज जमणारा नाही. या प्रश्नाला महायुद्धाचे महत्व नाही की पहीला-दुसरा असा क्रमही नाही, ह्याला गुण पण मिळणार नाहीत. पण जर नवीन घर मोठे होते, सोयीचे होते, पण ते माझे झाले नसेल तर वाटते की मी या परीक्षेत नक्की नापास झालो. कारण शोधायची गरजच पडली नाही. नवीन घर घेतले पण त्या घरी मी फक्त महीनाभर राहीलो असेन. सुट्टीवर जातो आणि पाहुण्यासारखा राहतो. जुन्या घराची त्याला सर नाही, आधी शाळेतुन मी परत यायची वाट बघणारी आई आता मला सुटी मिळण्याची वाट पहाते आहे. मला प्रगतीपुस्तकावर झापणारे वडील आता माझ्याशी ईमेलवर/चॅटवर बोलतात. अगदी पाककृतीचे पेटंट घ्यावेत असा स्वयंपाक करणारी आजी आज मला तीच चव मिळावी म्हणुन तीच्या नातसुनेला (माझ्या बायकोला) फोनवर "Tips & Tricks" देते. ते घर आता आहे कुठे? बहुतेक माझ्या मनात, कुठेतरी खुप खोल दडलंय.... त्याला आजी-आजोबांच्या लळ्याचा पाया आहे, त्याला वडलांच्या धाकाच्या भिंती आहेत, आईच्या मायेचे छत आहे, काका-मामा-आत्या-मावशा नावाच्या खिडक्या आहेत, समाजाचे कुंपण आहे, मास्तरांची दारे आहेत, त्यात भावाबहीणींचे झरोके आहेत... प्रत्येक भारतीयाच्या घराची "Recipe" सेम नसली तरी त्याची चव मात्र सेम आहे... आणि जाताजाता अमेरीकन मित्राच्या घराचे कौतुक करत म्हटले,

घर म्हणजे घर असतं,

तुमचं आणि आमचं सेम नसतं....

तुमचं आणि आमचं सेम नसतं ....
लग्नानंतर बदलणाऱ्या सवयींमधली सर्वात महत्वाची म्हणजे दारुची सवय. हवी तेव्हा हवी तशी पिणारे, बरेचदा पासधारक बनतात. काही महिन्याचे असतात, काही आठवड्यावाले होतात, मला अजुन वार लावुन पास मिळवणारे भेटायचे आहेत. ऐकुन आहे की लग्नाला वर्षे उलटल्यावर पासाची मुदत वाढते, आणि बसमध्ये जशी "जेष्ठ नागरीक" सुट मिळते तशी मिळु लागते. कितीही झाले तरी जुन्या मित्रांबरोबर ढाब्यावर बसण्याची (अर्थातच प्यायला) मजा वेगळीच.

"सुखमे पियो, दुःख मे पियो, दोनोभी नही इस लिये पियो" असे असणाऱ्यांना दारुडा/बेवडा/पेताड असे अनेक शब्द आहेत. त्यांच्याविषयी मी बोलत नाहीये.

मला म्हणायची आहे सर्वसामान्य जनता, जी मित्रांबरोबर सामाजीक बांधीलकी अशा आदरजन्य नावासाठी पिते. दारु पिणे वाईट आहे हे माहीत असुनही फक्त मित्रांबरोबर चांगला वेळ घालवताना उर्जाद्रव्य (Energy Drink) म्हणुन पिते. असे लोक दारुच्या आहारी कधीच जात नाहीत. यांना फार कमी गोष्टीची चिंता करावी लागते, आज बील कोण देणार? आणि आज रात्री झोपायची व्यवस्था कोठे आहे? घर वर्ज असते, मग मित्राची गच्ची, रिकामा फ्लॅट, होस्टेलचा बंक असा सारासार विचार करुन प्लान बनायचा. काहीजण असतात जे फक्त सावरकर म्हणुनच जन्माला आलेले असतात, डोलकर होण्यात त्यांना अजिबात रस नसतो. माझे काही मित्र तर असे आहेत की चेहऱ्यावरुन पक्के लावाडी कामगार दिसतात, पण त्यांनी दारु कधीही प्यायलेली नसते. कॊणालाही सांगा ते पीत नाहीत, विश्वास बसणे अशक्य, आरश्यात बघता त्यांचा पण बसत नाही. म्हणजे असे लोक जे जन्मजात काळे ओठ घेऊन आले, आणि विना धुरकांडीचे धुराडे झाले. अशा सर्व बांधवांना साष्टांग दंडवत. ह्यानी फक्त धुंदी ठेवायची आणि वाईट सवयी न लाऊन घेता मजा घ्यायची...

अर्थात जर शिकत असाल तर असे प्लान फक्त होस्टेल मध्येच होतात आणि होस्टेल मध्ये अमलात येतात, बाटलीसाठी वर्गणी असते आणि फुकटे जीव एकदम निषिद्ध असतात. कधीतरी बकरा असेल तर, आमंत्रणे "आईजीच्या जीवावर... " या नियमाने वाटली जातात. पण जर थोडे फार कमवत असाल तर बाहेरची चंगळ असते. कितीही कमवत असला तरी ज्याला वर्गणीची पुर्ण चिंता असते, पुर्ण प्यायल्यावर ज्याला जुनी उधार पण आठवते, ज्याला बारमधुन बाहेर पडताना बील चेक करता येते, असे मित्र जगात फक्त मलाच आहेत का? अगोदर दारु न पिणारे पण मजेसाठी येणारे मित्र यायचे, चकणा खाण्यासाठी सगळ्यात पुढे असायचे, मग नियम आले, शिस्त आली, टेबलावर असणाऱ्या साऱ्यांनी समान वर्गणी द्यावी असे ठरल्यावर नेहमीचे चकणे सुधारले. चीज, शेंगदाणे, किंवा बारमध्ये मिळ्णारे फुकटचा चकणा आता आवडेनासा झाला. मग चीज-पाईनॅपल किंवा शेझवान सॉस-नान असे येऊ लागले. कारण न पिता वर्गणी द्यावी लागत असेल तर चकण्यात वसुली करावी हा भोळाभाबडा विचार हे सावरकर करू लागतात.त्यात भारतात शराबी गाणी न पिता पाजतात. अशी अनेक गाणी आहेत जी दारू बरोबर चकण्यासारखी जातात. महाविद्यालयीन दिवसात मिळेल ते पिणारे लोक हळुहळु "ब्रॅन्ड" धारक होतात. मग रॉयल स्टॅग, जोहनी वोकर परवडु लागते. काहीजण अजुनही बीअरच चाखत असतात. फक्त त्याचे नंबर वाढु लागतात, Cannon 5000, 10000....

जीन, रम, व्हिस्की आणि बीअर यातच लोक अदलाबदल करतात. इतर ग्लासांच्या गर्दीत आपला ग्लास ओळखणे हे पण एक कौशल्य असते. ते फक्त सरावाने जमते. टेबलावरचा एखादा पोटातले पाणी कमी करायला गेला की त्याच्या ग्लासात इतर प्रकारची दारु मिसळली जाते, तुम्हाला काय मी सांगणार की याला कॉकटेल म्हणतात. सराईत असणाऱ्याला ग्लासातला फरक समजतो, पण नवा मात्र मित्रविश्वासावर हे नवे सरबत घशाखाली उतरवतो, आणि भसाभस ओकतो. त्याला सावरकर प्रेमात सांभाळतात. पाठीवरुन हात फिरवताना आपण जगातले सर्वात प्रेमळ पात्र असल्याचा भाव तोंडावर असतो. असे सावरकर ही कथा स्वतःच्या प्रेमकथेपेक्षा जास्त चवीने ओकतात, म्हणजे कथन करतात. जमले तर लिंबु सरबत, कॉफी असे घरगुती उपचार पण होतात. ओकणारा परत कधी पिणार नाही असे ठरवतो. असे कधीच होत नाही, एकंदरीत दारु प्यायल्यावर तुमची स्मरणशक्ती कमी होते, दुसऱ्या दिवशीच तो हा प्रण विसरतो आणि लवकरच अशा स्नेह-संमेलनात हौशी कलाकार म्हणुन सामील होतो.

अमेरीकेत जर आल्यावर तर मात्र सगळे बदलते. बाटलीतल्या पाण्यापेक्षा कुपन लावुन मिळालेली कॅनवाली बीअर स्वस्त असते. नेहमीच्या जेवणाखाण्यातच मदिरा असते, येथे सामाजीक जीवनात दारुचे फार महत्व आहे. अगदी रुळलेली "Pick-up line" म्हणजे, "Can I buy you a Drink?" अशी आहे. शॅम्पेनचे नाव घेताच सुखाची भावना येते.... किंवा तकीला म्हणतात जल्लोष आठवतो कारण येथे दारुला चवीचा अंतरा आहे, निरनिराळ्या ग्लासांचा मुखडा आहे, प्रत्येकीला जन्मगांव आहे, आणि गांवावर तीचे नाव आहे. येथे दारु आणि प्रसंग यांचे नाते आहे, त्यात प्रत्येक प्रकाराची आपली आपली ओळख आहे. बाटलीतुन ग्लासात येण्या अगोदर तीला नटवण्याची प्रथा आहे. त्यात वेगवेगळ्याप्रकारे चढवण्याची लकब आहे. काही ठिकाणी जर ती मनोरंजनाचे साधन असेल तर, काही थंड ठिकाणी ती जीवनावश्यक पण आहे. सर्वात महत्वाचे येथे पिण्याच्या प्रमाणाला पण चवी एवढीच किम्मत आहे आणि येथे दारुच्या आहारी जाणाऱ्याला जगात इतर ठिकाणी मिळते तेवढीच किम्मत आहे.

शॅम्पेन, रम, व्हिस्की, ब्रॅन्डी, तकीला, व्होडका, बीअर अशा अनेक प्रकारच्या दारुंपासुन बनवलेले हजारो कॉकटेलस मिळतात. दारु बरोबर दुध, मध, फळांचे रस, फळे, मलाई, काही मसाले, सोडापाणी, काही फुले अशा नानाप्रकारच्या साधनांपासुन बनवली जातात. ती नुसती प्यायला नव्हे तर दिसयला पण मोहक असावीत यावर भर असतो. त्याशिवाय काही लोकांची आवडती कॉकटेलस, शॉट्स म्हटली जातात. मार्टीनी, यीगर बाम, स्क्रु-ड्रायव्हर अशा अनेक प्रकारांनी अमेरीका वेडी आहे. बरेचदा काय प्यावे हा प्रश्न पडावा अशी मायानगरी म्हणजे बार. अमेरीकेत सलान-हाऊस हा प्रकार कित्येक पिढ्या करत आहेत. Jack-Daniels, Johney Walker, Chiva's Regal अशा अनेक कंपन्या जगप्रसिध्द आहेतच.

सर्वात महत्वाची शौकीन दारू म्हणजे, वाईन, लाल-पांढरी, बनवण्याची पद्धत, चव, रंग, द्राक्षाचे प्रकार, द्राक्षे होणारी जागा, वय आणि बनवणारी वाईनरी अशा अनेक प्रकारे हीचे वर्गीकरण होते. वाईनच्या बाटल्या जमा करणे हा अनेकांचा छंद असतो. लोक वाईन मुरवुन पितात, त्यासाठी त्यांच्या पोटमाळ्यावर साठवण्याची सोय करुन ठेवतात. वाईन-चाखण्याचे वेगळे कार्यक्रम होतात, फक्त वाईनचे बार असतात.

देसी भारतात जाताना प्रियजनांसाठी येथुन दारु अवश्य घेऊन जातात. जमली तर युरोपात खरेदी करतात. पण फार कमी देसी बायकोच्या संमतीने पितात. भारतीय स्त्रीजनांमध्ये दारू शौकीन फार कमी आहेत, पण ते प्रमाण नक्कीच वाढते आहे. त्यांना पण समजते आहे की, "नशा शराब मे होता तो नाचती बोतल!!" अमिताभचा शराबी बघताना हे वाक्य कोणीच विसरु शकणार नाही, जे अगदी खरे आहे, नशा दारुत नसते, मित्रांच्या संगतीत असते, प्रसंगाच्या महत्वात असते, पाजणाऱ्याच्या डोळ्यात असते, पिणाऱ्याच्या मनात असते, चकण्याच्या थाळीत असते, बील देणाऱ्याच्या पाकीटात नसेल तर फुकट पिणाऱ्याच्या समाधानात असते, फक्त टेबलावर बसला म्हणुन बीलाची वर्गणी देणाऱ्या मित्राच्या चिडचिडीत असते. ज्यांना ही आंतरीक नशा कमी पडते ते दारू पिऊन त्याची गोडी चाखतात, धुंद होऊन वेळेची किम्मत राखतात. प्यावी, मी म्हणतो पिण्यात काही गैर नाही, त्याचा अतिरेक वाईट आहे. उगाच न पचेल एव्हढी पिऊन इतरांच्या नशेत कमी आणणारे पेताड/बेवाडे ही धुंदी कधी समजलेच नाहीत .. आणि त्यांना ती कधी समजणारही नाही....
शाळेत गेला होतास का रे? ह्या प्रश्नाला तुम्ही जर सरळ उत्तर दिलेत तर तुम्हाला नक्कीच पुण्याची शब्दावली माहीत नाही. "शाळा = दारुचा गुत्ता", हे पेठेत राहणाऱ्या अगदी सामान्य पुणेकराला नक्की माहीत असते. कर्म-धर्म संयोगाने म्हणा किंवा मागच्या जन्माच्या पुण्याईने म्हणा मी शुक्रवार पेठी. पुण्यनगरीवासी म्हणजे औंधाला किंवा कल्याणीनगर मध्ये राहणारे नाहीत, जर तुमच्या घरचा पत्ता पेठेतला असेल तर. बाकीच्यांना अशा आज्ञावल्या माहीत असणे शक्यच नाही. तुम्ही नुमवि, भावे अथवा न्यु इंग्लिश स्कुल अशा मराठी शाळेत शिकलात तर तुम्हाला असे शब्द माहीत असणे सहाजिक आहे. हे साहीत्य वाचुन अथवा शिकवुन येतच नाही. त्यासाठी तेथे जगावे लागते. त्यासाठी कट्ट्यावर वेळ घालवावा लागतॊ.
काही सदाशिव पेठी (शब्दशः अर्थ घ्यावा, कारण "सदाशिव पेठी = कंजुष") मला माहीत आहेत जे बालशिक्षण वै. मध्ये शिकले. त्यांच्याशी बोलताना मी कधीतरी बोललो, "छान शर्ट आहे खाली एक जीन्स टाक म्हणजे झकास". त्या केशवाला ते समजलेच नाही ("केशव = साधासरळ माणुस, नाका समोर बघून चालणारा"). आता सांगा मी काय चुकीचे बोललो? अशांना सामान (सामान = त्याची प्रेयसी, चिकणी) वै. शब्द निषिद्ध असतात, लोकांना वाईट बोलण्याची पराकाष्ठा म्हणजे "बावळ्या" असे असेल तर तुम्ही डोलकर ("डोलकर = दारु पिवून झिंगणारा") कधीच झाला नाहीत आणि सावरकर ("सावरकर = दारु पिवून झिंगणा-याला सावरणारा") होण्यासाठी पण तसे डोलकर मित्रमंडळ असावे लागते. असे हे दांडेकर (दांडेकर = मुलगा) तर होळकर ("होळकर = मुलगी") कसे त्याचा विचार करा. तरी पण अशा होळकरांपासुन नेत्रसुख घेण्यासाठी नक्की जाणारे पेठकरीच.शुध्द विंग्रजीत "नेत्रसुख = Bird-watching", तरी पण तुम्हाला नेत्रसुख कळले नाही तर तुम्हाला ससुनमध्ये उपचार घ्यायला हवा. पुलंच्या म्हणण्याप्रमाणे कट्टा ही मराठी भाषेची खाण आहे, हे अगदी खरे आहे. असे अनेक शब्द दररोज येथे बनतात. हजारो वेळा वापरले जातात, जर व्यवस्थित जीभेवर रुळले तर कायमचे शब्दकोषात सामील होतात. असे शब्दकोष कोणीच लिहीत नाहीत, त्यांचे व्यावसायीक हक्क (copyrights) कोणी मागत नाहीत. पिढी दर पिढी अशी वाढ होत असते. शब्द जर जबरदस्त (जबरदस्त = अगदी चांगला) असेल तर तो बोली भाषेत जमा होतो. असे किती शब्द सांगु मी, बत्ता टाकणे (दोन नंबरला जाणे), कावकाव करणे, मनमिळाऊ आणि मोठ्या मनाची, मामा बनवणे, बाळु असणे, श्रीमुखात गणपती काढणे.

भांडारकरांच्या शब्दभांडाराला आणि विक्षनरीला नक्की भेट द्या. जीभेला अवघड होणारे पण इंग्रजी शब्दांना समांतर शब्द येथे सापडतात. पण तरीसुध्दा हे अजुन काही शब्द तुमच्या वापरासाठी. तुम्हाला अजुन काही आठवले तर नक्की कळवा.


केशव - साधासरळ माणुस, नाका समोर बघून चालणारा

सामान - त्याची प्रेयसी

खडकी - एकदम टुकार

झक्कास - एकदम चांगले

काशी होणे - गोची होणे

लई वेळा - नक्की, खात्रीने

चल हवा - येवू देनिघून जा

मस्त रे कांबळे - छान, शाब्बास

पडीक - बेकार

मंदार - मंद बुध्दीचा

चालू - शहाणा

पोपट होणे - फजिती होणे

दत्तू -एखाद्याचा हुज~या

बॅटरी - चश्मेवाला / चश्मेवाली

पुडी - माणिकचंद व दुसरा गुटखा

राष्ट्रगीत वाजणे - संपणे / बंद पडणे

पुडी सोडणे - थाप मारणे

खंबा - दारुची / बीयरची बाटली

पावट्या - एकदम मुर्ख

खडकी दापोडी - हलक्या प्रतीचे

टिणपाट - काहीच कामाचा नसलेला

पेताड / बेवडा - खुप दारु पिणारा

डोलकर - दारु पिवून झिंगणारा

सावरकर - दारु पिवून झिंगणा-याला सावरणारा

वखार युनूस - दारु पिवून ओकारी करणारा

सोपान - गांवढंळ माणुस

श्यामची आई - लैंगीक सिनेमा (B.F.)

सांडणे - पडणे

जिवात जिव येणे - गरोदर रहाणे

पाट्या टाकणे - रोज तेच तेच काम करुन वेळ घालवणे

भागवत - दुस-याच्या जिवावर जगणारा

पत्ता कट होणे - शर्यतीतुन बाहेर होणे

फणस लावणे - नाही त्या शंका काढणे

फिरंगी - कोकाटे इंग्लीश फाडणारा

पेटला - रागावला

बसायचे का? - दारु प्यायची का?

चड्डी - एखाद्याच्या खुप जवळचा

हुकलेला - वाया गेलेला

डोळस - चष्मेवाला/ली

यंत्रणा - जाड मुलगी

दांडी यात्रा - ऑफीसला बुट्टी मारणे/खाडा

चैतन्य कांडी - सिगारेट/बिडी

चैतन्य चुर्ण - तंबाखु

चेपणे - पोट भरुन खाणे

कल्ला - मज्जा

सदाशिव पेठी - कंजुष

बुंगाट - अती वेगाने

टांगा पल्टी - दारुच्या नशेत `आउट' झालेला

थुक्का लावणे - गंडवणे

एल एल टी टी - तिरळा, लुकिंग लंडन टॉकिंग टोकियो

घ्या श्रीफळ - जा आता घरी

कर्नल - थापा थापाड्या

सत्संग - ओली पार्टी

काटा काकु - चांगली दिसणारी पण वयाने ज्यास्त
ही म्हण मला फार खरी वाटते, जगात कोठेही जा, पंजाबी आणि बटाटा जगात सगळीकडे सापडतात. आपण भारतीय पोटापायी आपला देश सोडुन कोठेही जाण्यासाठी तयार असतो. बायकोने कोठेतरी वाचले, आजकाल काय तर म्हणे भारतीय पोटासाठी भारतातपण (परत?) जात आहेत. अहो आम्हाला पैसा पाणी ठिक मिळत असेल तर, का नाही? नेहमी आम्ही या पोट-स्थलांतराला गोडगोड नाव देतो, आधी काय तर "Brain Drain"... याला मराठीत काय म्हणतात, मला पण सांगा. आता काय तर म्हणे, "Brain Gain", बायकोला म्हटलं, "तु पण भारतात जाऊन ये, तुला पण थोडासा वाढवुन मिळतोय का ते बघ". काही नाही हो, याचा आणि मेंदुचा काही संबंध नाही. लवकरात लवकर कोठेही कमवता येते त्यावर सगळे ठरते आहे. आजकाल अमेरीकेतील बहुतेक सारे काम भारतात जात आहे त्यामुळे भारतात पगार वाढले आहेत, अमेरीकेपेक्षा भारतातच सुखसुविधा चांगली मिळते आहे. यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे अमेरीकेत आजकाल वीसा, GC, आणि चांगला पगार मिळणे फार अवघड झाले आहे.


आजकाल अंतराळात पण पर्यटन शक्य आहे, मला हे नक्की माहीत आहे की जर वृद्धीला जागा असेल तर आम्ही तेथे नक्की असु. नुसते असणार नाही, खुप असणार. बऱ्याच आफ्रिकन देशातली अर्थव्यवस्था भारतीय लोकांच्याहाती आहे. भारतावर दिडशे वर्षे राज्य करणाऱ्या ब्रिटनच्या राष्ट्रीय जेवण-खाण्यात "Chicken Tikka Masala" आला आहे. शिकागो, न्यु जर्सी सारख्या ठिकाणी भारतीय स्वातंत्र्यदिनी देशप्रेमाची मिरवणूक निघते. अमेरीकन Party मध्ये भारतीय जेवण येते आहे. अमेरीकन माणुस Infosys, TCS सारख्या देशी कंपन्यांमध्ये नोकरी करत आहे, काहीजण तर बंगळुरात नोकरी पण करायला तयार आहेत. अशा लहान सहान गोष्टी जर जवळून निरखल्या तर मला सांगा या brain drain आणि brain gain च्या बोलण्यात काय अर्थ आहे? मला असे म्हणायचे नाहिये की आम्ही डोक्यासाठी काम करत नाही, पण हे नक्की आहे की अशा गोष्टी नुसत्या दिखाव्याच्या आहेत. लोक कोणाला समजावत आहेत की मी भारतात "Brain Gain" साठी जात आहेत. असे काही नाहीये. भारतीय अर्थव्यवस्था सुधारत आहे, लोकांच्या अपेक्षा लवकर आता भारतात पण पुर्ण होत आहेत. सगळा पोटाचा खेळ आहे. भारतीय कंपन्या आता अमेरीकन/युरोपीयन कंपन्यासाठी सेवा उद्योग करणार असतील तर त्यांना परदेशी स्थाईक/शिक्षित भारतीय हवे आहेत, त्या लठ्ठ पगार द्यायला तयार आहेत, जो घ्यायला तरूण तंत्रज्ञपण तयार आहेत, मग हा Brain Gain झाला कसा?
Newer Posts Older Posts Home

Popular Posts

  • आत्मा
    आत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा ...
  • १२ जुलै १९६१
    १२ जुलै १९६१, आम्ही ११ वर्षांचे होतो, त्या वेळेची आठवण ठेऊन ’सकाळ’ने आठवणी जाग्या केल्या त्याबद्दल धन्यवाद. खरोखर त्या भयानक पुरापेक्षाही,...
  • The Fame of the Clock
    Recently a Muslim kid named Ahmed Mohamed from Texas was arrested and suspended from school when he showed his home built "clock&qu...
  • अवतार
    विश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...
  • पाणी वाचवा
    पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...
  • एका रात्रीची गोष्ट
    कोणत्यातरी कामासाठी मी बायकोला घेऊन मोटरसायकलने बाहेरगावी गेलो होतो. परतायला रात्र झाली, पण सकाळी तातडीचे काम असल्यामुळे घाईने निघालो. मध्ये...
  • कन्यादान
    नुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , "चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी"...
  • कूणी तरी पोस्त चोरलं आणि मराठी जगाची बोंबाबोंब
    ************CLARIFICATION******************* बरेच विरोप आल्याने मला हे स्पष्ट करावेसे वाटत आहे की.... मी लिहिल्याप्रमाणे, मी चोराची बाजु अज...
  • आपण भारतात का जातो?
    काही दिवसांपुर्वी एका गोर्‍या मित्राने विचारले की आता तु कायम इथेच राहणार का? मन बावचळले आणि काही वर्षांनी कायमचा परत फिरण्याच्या माझ्या प्र...
  • गंमत
    १ ते ९९ या अंकांच्या स्पेलिंगमध्ये कुठेही ‘A', `B'. `C', अणि ‘D' हे अक्षरे आढळत नाहीत. १०० या अंकाच्या स्पेलिंगमध्ये सर्वप्र...

Labels

मी मराठी अनमोल विचार भारत TV

Blog Archive

  • ►  2016 (1)
    • ►  February (1)
  • ►  2015 (2)
    • ►  July (1)
    • ►  January (1)
  • ►  2014 (2)
    • ►  January (2)
  • ►  2013 (1)
    • ►  October (1)
  • ►  2012 (22)
    • ►  November (4)
    • ►  July (1)
    • ►  June (1)
    • ►  February (2)
    • ►  January (14)
  • ►  2011 (15)
    • ►  December (2)
    • ►  November (5)
    • ►  October (8)
  • ►  2010 (64)
    • ►  July (1)
    • ►  June (6)
    • ►  May (6)
    • ►  April (8)
    • ►  March (5)
    • ►  February (13)
    • ►  January (25)
  • ►  2009 (66)
    • ►  October (13)
    • ►  September (4)
    • ►  August (3)
    • ►  July (1)
    • ►  May (3)
    • ►  April (10)
    • ►  February (16)
    • ►  January (16)
  • ►  2008 (63)
    • ►  November (1)
    • ►  October (12)
    • ►  September (2)
    • ►  August (16)
    • ►  July (11)
    • ►  June (13)
    • ►  March (2)
    • ►  February (2)
    • ►  January (4)
  • ►  2007 (52)
    • ►  December (4)
    • ►  September (1)
    • ►  August (6)
    • ►  July (22)
    • ►  June (12)
    • ►  May (5)
    • ►  April (1)
    • ►  March (1)
  • ▼  2006 (30)
    • ►  December (2)
    • ►  November (2)
    • ►  October (10)
    • ▼  September (4)
      • घर म्हणजे घर असतं, तुमचं आणि आमचं सेम नसतं !!
      • नशा शराब मे होता तो नाचती बोतल!!
      • मी नुसता पुणेकर नाही तर पेठेतला, तुम्ही?
      • Punjabi and Potato can be found any where in the W...
    • ►  August (5)
    • ►  July (1)
    • ►  June (6)

Popular Posts

  • पाणी वाचवा
    पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...
  • The Fame of the Clock
    Recently a Muslim kid named Ahmed Mohamed from Texas was arrested and suspended from school when he showed his home built "clock&qu...
  • कन्यादान
    नुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , "चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी"...
  • अवतार
    विश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...
  • मकर संक्रांत
    आज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्‍या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...

Follow us at FB

Tweets by @tlf_org
Copyright © 2015 मी मराठी माणूस

Created By ThemeXpose