मी नुसता पुणेकर नाही तर पेठेतला, तुम्ही?

शाळेत गेला होतास का रे? ह्या प्रश्नाला तुम्ही जर सरळ उत्तर दिलेत तर तुम्हाला नक्कीच पुण्याची शब्दावली माहीत नाही. "शाळा = दारुचा गुत्ता", हे पेठेत राहणाऱ्या अगदी सामान्य पुणेकराला नक्की माहीत असते. कर्म-धर्म संयोगाने म्हणा किंवा मागच्या जन्माच्या पुण्याईने म्हणा मी शुक्रवार पेठी. पुण्यनगरीवासी म्हणजे औंधाला किंवा कल्याणीनगर मध्ये राहणारे नाहीत, जर तुमच्या घरचा पत्ता पेठेतला असेल तर. बाकीच्यांना अशा आज्ञावल्या माहीत असणे शक्यच नाही. तुम्ही नुमवि, भावे अथवा न्यु इंग्लिश स्कुल अशा मराठी शाळेत शिकलात तर तुम्हाला असे शब्द माहीत असणे सहाजिक आहे. हे साहीत्य वाचुन अथवा शिकवुन येतच नाही. त्यासाठी तेथे जगावे लागते. त्यासाठी कट्ट्यावर वेळ घालवावा लागतॊ.
काही सदाशिव पेठी (शब्दशः अर्थ घ्यावा, कारण "सदाशिव पेठी = कंजुष") मला माहीत आहेत जे बालशिक्षण वै. मध्ये शिकले. त्यांच्याशी बोलताना मी कधीतरी बोललो, "छान शर्ट आहे खाली एक जीन्स टाक म्हणजे झकास". त्या केशवाला ते समजलेच नाही ("केशव = साधासरळ माणुस, नाका समोर बघून चालणारा"). आता सांगा मी काय चुकीचे बोललो? अशांना सामान (सामान = त्याची प्रेयसी, चिकणी) वै. शब्द निषिद्ध असतात, लोकांना वाईट बोलण्याची पराकाष्ठा म्हणजे "बावळ्या" असे असेल तर तुम्ही डोलकर ("डोलकर = दारु पिवून झिंगणारा") कधीच झाला नाहीत आणि सावरकर ("सावरकर = दारु पिवून झिंगणा-याला सावरणारा") होण्यासाठी पण तसे डोलकर मित्रमंडळ असावे लागते. असे हे दांडेकर (दांडेकर = मुलगा) तर होळकर ("होळकर = मुलगी") कसे त्याचा विचार करा. तरी पण अशा होळकरांपासुन नेत्रसुख घेण्यासाठी नक्की जाणारे पेठकरीच.शुध्द विंग्रजीत "नेत्रसुख = Bird-watching", तरी पण तुम्हाला नेत्रसुख कळले नाही तर तुम्हाला ससुनमध्ये उपचार घ्यायला हवा. पुलंच्या म्हणण्याप्रमाणे कट्टा ही मराठी भाषेची खाण आहे, हे अगदी खरे आहे. असे अनेक शब्द दररोज येथे बनतात. हजारो वेळा वापरले जातात, जर व्यवस्थित जीभेवर रुळले तर कायमचे शब्दकोषात सामील होतात. असे शब्दकोष कोणीच लिहीत नाहीत, त्यांचे व्यावसायीक हक्क (copyrights) कोणी मागत नाहीत. पिढी दर पिढी अशी वाढ होत असते. शब्द जर जबरदस्त (जबरदस्त = अगदी चांगला) असेल तर तो बोली भाषेत जमा होतो. असे किती शब्द सांगु मी, बत्ता टाकणे (दोन नंबरला जाणे), कावकाव करणे, मनमिळाऊ आणि मोठ्या मनाची, मामा बनवणे, बाळु असणे, श्रीमुखात गणपती काढणे.

भांडारकरांच्या शब्दभांडाराला आणि विक्षनरीला नक्की भेट द्या. जीभेला अवघड होणारे पण इंग्रजी शब्दांना समांतर शब्द येथे सापडतात. पण तरीसुध्दा हे अजुन काही शब्द तुमच्या वापरासाठी. तुम्हाला अजुन काही आठवले तर नक्की कळवा.


केशव - साधासरळ माणुस, नाका समोर बघून चालणारा

सामान - त्याची प्रेयसी

खडकी - एकदम टुकार

झक्कास - एकदम चांगले

काशी होणे - गोची होणे

लई वेळा - नक्की, खात्रीने

चल हवा - येवू देनिघून जा

मस्त रे कांबळे - छान, शाब्बास

पडीक - बेकार

मंदार - मंद बुध्दीचा

चालू - शहाणा

पोपट होणे - फजिती होणे

दत्तू -एखाद्याचा हुज~या

बॅटरी - चश्मेवाला / चश्मेवाली

पुडी - माणिकचंद व दुसरा गुटखा

राष्ट्रगीत वाजणे - संपणे / बंद पडणे

पुडी सोडणे - थाप मारणे

खंबा - दारुची / बीयरची बाटली

पावट्या - एकदम मुर्ख

खडकी दापोडी - हलक्या प्रतीचे

टिणपाट - काहीच कामाचा नसलेला

पेताड / बेवडा - खुप दारु पिणारा

डोलकर - दारु पिवून झिंगणारा

सावरकर - दारु पिवून झिंगणा-याला सावरणारा

वखार युनूस - दारु पिवून ओकारी करणारा

सोपान - गांवढंळ माणुस

श्यामची आई - लैंगीक सिनेमा (B.F.)

सांडणे - पडणे

जिवात जिव येणे - गरोदर रहाणे

पाट्या टाकणे - रोज तेच तेच काम करुन वेळ घालवणे

भागवत - दुस-याच्या जिवावर जगणारा

पत्ता कट होणे - शर्यतीतुन बाहेर होणे

फणस लावणे - नाही त्या शंका काढणे

फिरंगी - कोकाटे इंग्लीश फाडणारा

पेटला - रागावला

बसायचे का? - दारु प्यायची का?

चड्डी - एखाद्याच्या खुप जवळचा

हुकलेला - वाया गेलेला

डोळस - चष्मेवाला/ली

यंत्रणा - जाड मुलगी

दांडी यात्रा - ऑफीसला बुट्टी मारणे/खाडा

चैतन्य कांडी - सिगारेट/बिडी

चैतन्य चुर्ण - तंबाखु

चेपणे - पोट भरुन खाणे

कल्ला - मज्जा

सदाशिव पेठी - कंजुष

बुंगाट - अती वेगाने

टांगा पल्टी - दारुच्या नशेत `आउट' झालेला

थुक्का लावणे - गंडवणे

एल एल टी टी - तिरळा, लुकिंग लंडन टॉकिंग टोकियो

घ्या श्रीफळ - जा आता घरी

कर्नल - थापा थापाड्या

सत्संग - ओली पार्टी

काटा काकु - चांगली दिसणारी पण वयाने ज्यास्त

Vishal Khapre

3 comments:

VishaL KHAPRE said...

डोक्याची मंडई करणे - नुसती वायफळ बडबड करुन डोके खाणे

SB said...

आपला लेख आवडला, पण एक गोष्ट आवडली नाही.
सावरकर- दारू पिऊन झिंगणार्‍याला सावरणारा...ही "व्याख्या"

हे टाळता आले नसते का ?

SB said...

लेख आवडला, पण एक गोष्ट आवडली नाही.

सावरकर- दारु पिऊन झिंगणार्‍याला सावरणारा.......

हे टाळता आले नसते का ?