मी मराठी माणूस

Mi Marathi!

  • Home
  • VismiT

मागे आपण सगळी तयारी पाहिली. आता आपण परदेशात जाईपर्यंतचा प्रवास पाहू यात.

विमानतळावर शक्यतो तीन तास आधी पोचावे. तिकीटावरची तारीख आणि वेळ नीट पाहाबी. कारण वेळ सलग चोवीस तासांची असते म्हणजे, 23 June 2007 रोजी 0100 वाजता म्हणजे 22 व 23 तारखेच्या रात्री एक वाजता. पण 23 June 2007 रोजी 1300 वाजता म्हणजे 23 June 2007 ला दुपारी एक वाजता.

गेल्यावर ट्रॉली घ्यावी, त्यावर सामान ठेवावे, आपणच ढकलावी, कारण पुढे आपल्यालाच ढकलावी लागते. passport, Air ticket ची पर्स जवळ बाहेर ठेवावी. दारात तिकीट दाखवून आत जावे. सर्व सामान X-Ray मशीन मध्ये द्यावे, पलीकडच्या बाजूने बाहेर आल्यावर कर्मचारी बॅगांना सिल करतात. तेथून Boarding pass च्या रांगेत उभे रहावे. तिथे तिकीट पाहून, सामानाचे वजन करतात, जास्तीचे काढायला लावतात, कोठे टाकायचे पंचाईत होते, म्हणून एखाद्या माणसाला आत तिकीट काढून न्यावे म्हणजे त्याच्याकडे परत देता येते. तेथील कर्मचारी पूर्ण सहकार्य करतात. हातातील बॅगांचे वजन सुद्धा चेक होते. तो अधिकारी , परदेशात आपण कोठे जानार आहोत, तिथला पत्ता विचारतो, तेव्हा आधीच एका कागदावर लिहून जवळ ठेवावा, कारण परदेशातील पत्ता आठवत नाही, पुढे पदेशातही तो कागद उपयोगी पडतो, कारण त्यावर फोन नंबरही असतो.नंतर आपल्याला Boarding Pass मिळतो, त्यावर Seat No., Flight No. असतो. नंतर Custom chech असते तिथे Camera दाखवावा. म्हणजे येताना त्यावर Duty पडत नाही. पुढे Immigration check मध्ये X-Ray हातातील सामान आणि आपल्याला सुद्धा त्यातून जावे लागते. त्या Metal Detector खाली महिलांना त्रास होतो, कारण बांगड्या, हेअर पिन वाजतात. अशावेळेस त्यांना बाजूला घेउन महिला पोलीस Hand detector ने चेक करतात. आत गेल्यावर आता मात्र कोणत्याही  परीस्थितीत बाहेर येता येत नाही.

आता विमानात प्रवेश. तिथे प्रथम First class, नंतर अपंगांना, नंतर मुलेबाळे असणार्‍यांना सोडतात. नंतर मागील नंबराप्रमाणे सोडतात, तेव्हा नीट ऐकून जावे. घाई करू नये.

विमानात गेल्यावर सीट नंबर पाहून बॅग वर ठेवावी, जवळ ठेवू नये. सर्व सूवना पाळाव्यात. विमानात सर्व मिळते, तेव्हा लाजू नये, जेवणात काय पाहिजे ते मागून घ्यावे. जेवढे पाहिजे तेवढे मिळते, त्यामुळे उपाशी राहू नये. एअर होस्टेस इंग्रजी बोलतात, पण न समजल्यास समजावून सांगतात. आपल्याला मिळेल याची वाट न पाहता, मागून घ्यावे. Cold-drink, चहा कॉफी, पाणी पाहिजे तेवढे मिळते. औषधे, गोळ्या सुद्धा मिळतात. शांतपणे, आनंदात प्रवास करावा.

विमान वर जाताना आणि खाली येताना पट्टा बांधावा. विमान थांबल्यावर घाई करू नये, नीट शिस्तीत बाहेर यावे. सामान घ्यायला विसरू नये.

बाहेर आल्यावर Immigration ला रांग लावावी. तिथे Passport दाखवावा लागतो, त्यावर शिक्का मारतात. Passport मात्र आठवणीने परत घ्यावा, नीट ठेवावा, यानंतर लागत नाही.

आता सामान घ्यायला जावे. जाताना ट्रॉली बरोबर घ्यावी. तिथे फिरत्या Conveyor वरून बॅगा येतात, जर गर्दीत बॅगा घ्यायला जमले नाही अणि पुढे गेली तर काळ्जी करण्याचे कारण नाही, गोल फिरून ती परत येते. नाहीतरी आपण खुणेला रूमाल बांधलेला असतोच. त्या बॅगा आणि हातातील सामान पुन्हा Custom मध्ये X-Ray साठी टाकावे लागते, तिथे आक्षेपार्ह वस्तू सापडल्यास बॅगा उघडायला लावतात, त्यावेळेस शांतपणे उघडायच्या, वाद करायचा नाही. जे फेकतात ते फेकू द्यायचे, मोह करायचा नाही. परदेशात सर्व नियमाप्रमाणे वागतात, भावनेला जागा नाही. तिथे आपले काहिही ऐकत नाहीत. नाहीतर सरकारी प्रक्रिया चालू होतात, ते आपल्याला जमत नाही. यानंतर सर्व पूर्ण होते, आपण बाहेर यायला हरकत नाही. बाहेर आपल्याला आपली माणसे भेटतात. मग खरा आनंद होतो, आपल्याला आणि आपल्या माणसांना. परदेशातील सुख विमानतळापासून सुरू होते. साहजीकच भारताच्या वतावरणाची तुलना सुरू होते.

पण जर कोणी भेटले नाहीतर घाबरून जावू नये, फोन करावा. जर जमत नसेल तर कोणालाही एखादा डॉलर दिल्यास तो फोन लावून देतो. न जमल्यास विमानतळावरच टॅक्सी बुक करून जावे. परदेशात अजिबात फसवणूक होत नाही, हि गोष्ट कायम लक्षात ठेवा.

सातव्या भागात- परदेशात कसे रहावे, आणि येतानाचा प्रवास. परदेशात आनंद घ्या, भरपूर फोटो काढा.

Passport, visa झाला, आता विमानाचे तिकीट पाहिजे. सिझन प्रमाणे, एअरलाइन्स प्रमाणे तिकीटांची किंमत कमी जास्त होते तेव्हा सगळीकडे चौकशी करावी, घाई करू नये. काही प्रवास थेट Direct असतो तर काही थांबून विमान बदलून करण्याचा असतो. उदा. ऑस्ट्रेलियाला जायचे असेल Delta airlines थेट नेते, साधारण बारा तासांचा प्रवास असतो. पण जर Singapore Airlines चे तिकीट घेतले तर विमान सिंगापूरला बदलावे लागते. तेथे खूप  लांब चालावे लागते. दुसर्‍या गेटला जावे लागते. जर ते शक्य नसेल, मुलेबाळे सोबत असतील, वय जास्त असेल, किंवा अन्य काही अडचण असेल तर Direct तिकीट घ्यावे. तिकीट आल्यावर तारीख वेळ तपासून घ्यावी.

परदेशात जाताना काय काय वस्तू बरोबर न्यावयाच्या आहेत, त्यांची प्रथम यादी तयार करावी. खराब होणारे पदार्थ शेवटी आणावेत. प्रत्येक माणसाला ठरावीक वजन न्यायला परवानगी असते. तसे त्या Airlines च्या कार्यालयात विचारून घ्यावे. कोणाचेही ऐकू नये. खूप वेगवेगळे सल्ले मिळतात. सल्ले देणारे इथेच राहतात, पुढे विमानतळावर आपल्यालाच भोगावे लागते. प्रत्येकाला दोन बॅगा, हातात साधारण आठ किलोची एक हॅंडबॅग, शिवाय स्त्रीयांना पर्स बाळगता येते. कॅमेर्‍याच्या बॅगेचे वजन होत नाही. परदेशात खाद्य पदार्थ, पातळ द्रव पदार्थ, धारदार वस्तू जसे चाकू, सुई, पिन, टाचण्या वगैरे, अंमली पदार्थ न्यायला बंदी आहे. त्या वस्तू टाळाव्यातच. लॅपटॉपचे वजन होत नाही.

सर्व सामान भरताना प्रत्येक वस्तू नीट पॅक करावी. Spring balance (वजनाचा ताणकाटा आणावा, तसा स्वस्त मिळतो, म्हणजे घरीच वजन करता येते.) वजन जास्त असेल तर विमानतळावर काढायला लावतात. तिथे फेकून द्यावे लागते. उगीचच धावपळ होते. मानसिक त्रास होतो, काय फेकावे कळत नाही.

आता बॅगा नीट भरल्यावर प्रत्येक बॅगेत काय भरलेय याची यादी तयार करा. ती पुढे उपयोगी पडते. एखादी शाल वर बरोबर ठेवावी, कदाचित विमानात थंडी वाजते. विमानतळावरही उपयोगी पडते. लगेच लागणारी औषधे, चष्मा, सुपारी, जवळ बाळगावी.

महत्वाचे- परदेशात जाताना आरोग्य विमा करणे फार महत्वाचे असते. विमा घेताना त्यांच्या अटी नीट पाहून घ्याव्यात. नियमात बारीक अक्षरात काय लिहीलय ते नीट वाचून घ्यावे. ICICI prudential, New India Assurance, Bajaj वगैरे कंपन्या आहेत. जाण्याच्या आदल्या दिवशी घ्यावा. तारीख, वेळ, नाव, नावाचे spelling, passport नंबर, देश नीट तपासून घ्यावे. आपण निरोगी असाल तरी पॉलिसी घ्या, कारण परदेशात डॉक्टरचा खर्च परवडत नाही. मुख्य म्हणजे आपण निर्धास्त राहू शकतो, मानसिकदृष्ट्या. 

ज्या देशात जायचे आहे त्या देशातील चलनात पैसे घ्यावेत. काही रक्कम बाळगायला परवानगी असते, कारण मध्ये फोन करणे, तिकडे उतरल्यावर घरी जाण्यासाठी, विमानतळावर काही खाण्यासाठी पैसे लागतात.

आता बॅगा भरल्या, याद्या तयार झाल्या, हातात नेण्याच्या बॅगा तयार झाल्या. Passport, Air ticket ठेवण्याची छोटी पर्स आणावी, आणि त्यात पासपोर्ट, तिकीट ठेउन सतत जवळ बाळगावे. लक्षात ठेवा, सर्व काहिही हरवले तरी चालेल, पण passport अतिशय महत्वाचा आहे, कारण तीच तुमची ओळख आहे. सर्व ठिकाणी तो दाखवावा लागतो. विमानतळावर किंवा कोठेही, कोणालाही Passport, अधिकृत माणसाशिवाय इतरांना  दाखवू नये. बॅगांना कुलूप लाऊ नये. बॅगेच्या हॅंडलला ओळखीसाठी एकाच रंगाचा रूमाल अथवा रिबन बांधावी, परदेशात विमानतळावर बॅगा ओळखताना मदत होते कारण सर्व बॅगा सारख्याच दिसतात. बॅगा बदलल्यास खूप घोटाळा होतो.

घरची सर्व तयारी झाली, पुढील भागात विमानतळापासूनचा प्रवास पाहू यात.   

Passport हातात आल्यानंतर परदेशी जाण्यासाठी त्या देशाचा Visa मिळवावा लागतो. प्रत्येक देशाची पद्धत, नियम, कालावधी वेगवेगळा असतो. प्रथम त्या देशाचा नकाशा पाहून माहिती करून घ्यावी. Internet वर सर्व माहिती मिळते. आता आपण "अमेरिका" देशाच्या व्हिसाबद्धल माहिती घेऊ यात.

अमेरिकन व्हिसासाठी त्यांची वेब साइट आहे" VFS USA" ती उघडली असता त्यात सर्व नियम पहायला मिळतात. सर्व online भरून printout काढाव्यात. अमेरिकेत ज्यांच्याकडे जायाचे आहे, त्यांचा पत्ता आणि त्यांचे Invitation letter, Bank statements, नोकरीची कागदपत्रं, सरकारी नोकरीत असल्यास त्यांचे NOC लागते. धंदा असेल तर Income-Tax return जरूरी आहे. त्यांच्या साईट वरच Interview ची तारीख मिळते. त्यात वेळ सुद्धा असते. जमल्यास सर्व नियमांची printout काढून जवळ ठेवावी. सर्वात महत्वाचे- दोन्ही हातांच्या तर्जनीच्या (अंगठ्या जवळील बोटे) बोटांचे ठसे Finger print घेतात. जर बोटाला काही जखम झाली असल्यास परत घरी पाठवतात, आणि  अमेरिकन विमानतळावर Imimgration च्या वेळेस पुन्हा ठसे पाहतात म्हणून मधल्या काळात बोटे फार सांभाळावीत.

महत्वाचे नियम-

  1. Visa ची फी HDFC बॅंकेत भरावी. तेथे गुलाबी आणि लाल रंगाच्या पावत्या मिळतात त्या जपून ठेवाव्या.
  2. सर्व कागदपत्रांची फाईल बनवावी. त्यात क्रमाने कागदपत्रे लावावीत.
  3. Net वरून ज्या अर्जांची Printout काढल्यात त्यांच्या, passport च्या, वर सांगितलेल्या कागदपत्रांच्या तीन xerox काढून ठेवाव्यात.
  4. मुंबईची appointment असेल तर पाच दिवस आधी, फक्त कामाचे दिवस धरून, लक्षात ठेवा, त्यांच्या कार्यालयात कागदपत्रे नेउन द्यावी लागतात. तेव्हा पाच दिवसांची वाट न पाहता लगेचच सादर करावीत.
  5. स्थानिक कार्यालयातून मुंबईचा पत्ता बरोबर घ्यावा. तिथे सर्व स्वछ विचारावे, ते सर्व आनंदाने महिती देतात.
  6. मुंबईला वेळेआधी एक तास पोहोचावे. २०० रु. भरल्यास त्यांच्याकडून व्यवस्था केली जाते. त्याच्या गेस्ट हाउस वरून नेतात आणि आणून सोडतात. मुंबईला जवळच parking ची व्यवस्था आहे. तिथेच हॉटेल आहेत. एस.टी. रेल्वेने गेल्यास टॅक्सीने जाता येते.
  7. कार्यालयात मोबाईल फोन, धारदार वस्तू, खाण्यापिण्याचे सामान सोडत नाहीत, आणि तिथे ठेवण्याची सोय नसते फेकून द्यावे लागते, तेव्हा बरोबर नेऊ नये. आत गेल्यावर परत बाहेर कोणत्याही कारणास्तव सोडत नाहीत तेव्हा सगळी कागदपत्रे बरोबर न्यावीत. B.P. डायबेटिसचा वगैरे त्रास असल्यास गोळ्या बरोबर ठेवाव्यात. एवढे होऊनही काही अडचण आल्यास तेथील माणसाला न लाजता सांगावे’
  8. आत गेल्यावर भाषा विचारतात तेव्हा आपल्याला समजेल ती भाषा सांगावी, त्या भाषेचा दुभाषी देतात. इंग्रजी येण्याची अजिबात आवश्यकता नाही. कारण आपल्या भाषेत आपण उत्तरे बरोबर देउ शकतो. आपल्या भाषेतीलच दुभाषी घ्यावा. उत्तरे देतान गडबड झाल्यास व्हिसा नाकारला जातो.
  9. आत नंबरप्रमाणे बोलावत नाहीत तेव्हा रांगेत गडबड करू नये. चार पाच तास थांबण्याची तयारी करून जावे.
  10. आत मुलाखत देताना जेवढे विचारतील तेवढ्याच प्रश्नांची थोडक्यात उत्तरे द्यावीत, अजिबात जास्त, अवास्तव बोलू नये. अनावश्यक माहिती देऊ नये. विचारतील तेवढीच कागदपत्रे दाखवावीत, म्हणून कागदपत्रे नीट लावून घ्यावीत तेथे शोधत बसू नये. न विचारलेली कागदपत्रे दाखवू नयेत.
  11. मुलाखत झाल्यावर visa मिळाला असल्यास लगेच सांगतात, मग तीन दिवसात कुरीयरने visa घरी येतो. जर नाकारल्यास तेथेच passport परत देतात.

तीन दिवसांनंतर घरी पासपोर्ट येतो, तेव्हा HDFC ची पावती दाखवावी लागते, नाहीतर कुरीयरवाला कुरीयर देत नाही. visa आल्यावर  नीट तपासून पहावा. चूक असल्यास स्थानिक कार्यालयात लगेच तक्रार करावी, नाहीतर परदेशात फार त्रास होतो, आपण कल्पना करू शकत नाही.

Travel agency मध्ये सुद्धा visa, तिकीट काढून देतात.

सर्वसाधारण सर्व देशांच्या पद्धती सारख्याच असतात, प्रत्येक देशांची Web site असते, त्यावर पूर्ण माहिती मिळते.

Visa मिळाल्यावर पुढे काय तयारी असते ते पुढील भागात पाहू.

मित्रांनो आपण काल थोडक्यात काय काय करावे लागते ते पाहिले. आत या ठिकाणी आपण पासपोर्ट कसा काढायचा ते पाहू.

पारपत्र(passport) म्हणजे आपल्या देशातून बाहेर (अन्य कुठल्याही देशात) जाण्यासाठी मिळालेली परवानगी. हि परवानगी काही अटींवर मिळते. यासाठी भारताच्या विदेश मंत्रालया कडे अर्ज करावा लागतो. सर्व मोठ्या शहरांमध्ये कार्यालये असतात.

कोणत्याही भारतीय नागरिकास पारपत्र(passport) मिळतो.

पारपत्र मिळण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे-

  1. पासपोर्ट साईज फोटोग्राफ-४ प्रती
  2. रेशन कार्ड (तीन झेरॉक्स प्रती, नोटरी एटेस्टेड)
  3. फोटो आयडेंटिटी- निवडणूक कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स (झेरॉक्स प्रती वरीलप्रमाणे)
  4. शाळा सोडल्याचा दाखला, जन्म तारखेच्या पुराव्यासाठी (झेरॉक्स प्रती वरीलप्रमाणे)
  5. लग्न झाले असल्यास महिलांच्या बाबतीत मॅरेज सर्टिफिकेट आणि जर लग्नात नाव बदलले असल्यास पारपत्राच्या  

     अर्जात दिलेल्या प्रमाणे एफेडेव्हिट (प्रतिज्ञापत्र) करून घ्यावे.

passportसाठी अर्ज पोस्टात किंवा पारपत्र ऑफिसात फक्त रु.१० ला मिळतात. यात सर्व माहिती असते.

अर्ज भरतांना काळ्या शाईने भरावेत. अर्जातील सर्व स्पेलिंग अगदी तंतोतंत जोडणार्‍या कागदपत्रांप्रमाणेच पाहिजे. उदा. जर शाळा सोडल्याच्या दाखल्यात DILIP चे स्पेलिंग DILEEP असेल तर तसेच पाहिजे. सर्व अर्ज स्वच्छ अक्ष्ररात भरावा. जर अर्ज भरताना अडचण येत असल्यास पारपत्र कार्यालयाच्या बाहेर अगदी थोड्या पैशात मदत करतात त्यांचेकडून भरून घ्यावे म्हणजे चुकत नाही. पारपत्र काढून देणारे एजंट सुद्धा असतात.

सर्व अर्ज पूर्ण भरून पोष्टात किंवा पारपत्र कार्यालयात दोन प्रतीत सादर करून त्याची पावती मिळते.

महत्वाचे-ही पावती पारपत्र घरी य्रेईपर्यंत जपून ठेवावी या पावतीवरील नंबरप्रमाणेच पुढे सर्व विचार होतो.

          passportसाठी लागणारे शुल्क-साधे- रु.१०००/-  तात्काळ-रु.१५००/-

passportमिळण्यासाठी साधारण ४५ दिवस तर तात्काळ पारपत्र ७ दिवसात मिळते.

passportबद्धलच्या सर्व कारवाईची माहिती इंटरनेटवर उपलब्ध असते.

या पुढील पायरी म्हणजे पोलीस चौकशी. यानंतर अर्ज साधारण १५ दिवसांपर्यंत आपल्या भागातल्या पोलीस स्टेशनला येतो.पोलीस फोन करून घरी चौकशीला येतात तरी पण आपण इंटरनेटवर पाहून आपणच पोलीस स्टेशनला जाऊन चौकशी करावी. पोलीस चौकशीच्या वेळेस पुन्हा सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती आणि दोन फोटो(म्हणून प्रथमच जास्त फोटो काढून ठेवावेत) द्यावे लागतात. इथेही एक फॉर्म भरावा लागतो.

आता जर आपण या वेळेस हजर नसू आणि अर्ज पोलीसांनी परत पाठविला तर पुन्हा passport कार्यालयात जाऊन एक अर्ज भरावा लागतो म्हणजे पुन्हा पोलीस चौकशीला अर्ज येतो.

पोलीस चौकशीत साधारणपणे खालील प्रश्न विचारले जातात.

  1. आपण या ठिकाणी किती दिवसांपासून राहता?
  2. हे घर स्वतःचे कि भाड्याचे?
  3. घरी कोण कोण असते?
  4. आपले शिक्षण किती पर्यंत झाले आहे?
  5. तुम्ही कुठे जाणार आहात?

सर्व प्रश्नांची उत्तरे काळजीपूर्वक द्यावीत. साधारण आठ ते दहा दिवसात अर्ज पोलीसांच्या शिफारशीने passport office ला परत जातो

Passport पोस्टाने येतो. आल्यावर सर्व नीट तपासून पाहावे. नावातील spelling नीट तपासून पाहावे. काही चूक असल्यास ताबडतोब passport office ला कळवावे. नाहीतर प्रवासात फार त्रास होतो. 

या पूर्वी आपण मराठी विषय पाहिला आता आपण बाकी पाहू.

इतिहासात स्वातंत्र्य संग्राम, स्वातंत्र्यासाठी कोणी कसे बलिदान दिले ते शिकवतात. बाबर भारतात कधी आला. कार्ल मार्क्स, सॉक्रेटीस, मंडेला, बहामनी, सुल्तान, त्यांच्या सनावळ्या, आई वडिलांची नावे. अरे काय चाललंय, या सर्वांचा पुढील आयुष्यातील व्यवहारावर काय परिणाम होणार आहे. दहावी झाली, बस सगळे विसरले तरी काहीही बिघडत नाही. मुले सर्व पाठ करतात, पण त्यांना स्वतःच्या मागील दोन पिढ्यांचा इतिहास माहीत नसतो. मुलाला पुढे काय करायचे आहे, त्याचा विचार नाहीच, बस शिका, निरूपयोगी शिका. मला सांगा पुढे नोकरी, धंद्यात, संसारात याचा काय फायदा?

भूगोलात काय तर अजून वेगळेच. टुंड्रा प्रदेशातील, आफ्रिकेतील लोकांचे राहणीमान, त्याची वेशभूषा, त्यांची घरे हे शिकायचे. विद्यार्थी कधीतरी तिकडे जाणार आहे काय? आणि जायचे असेल तर या माहितीवर तो तिथे राहू शकतो काय? आता तिथे तीच परिस्थीती असेल काय? अक्षांश रेखांश, द्या बघू बर एखाद्याला अक्षांश रेखांशात पत्ता, आणि त्याला जायला सांगा, काय होते? जगातील सगळ्या देशांच्या राजधान्या पाठ करा, त्याचे नकाशे भरा, नद्या दाखवा, शहरे दाखवा, कशासाठी. जग एवढे पुढे गेलेले आहे हे सर्व इंटरनेट वर मिळत असताना, घोकंपट्टी का? तोच वेळ जरूरीचे शिकवा. मुलगा जगाचा अभ्यास करतो पण त्याला शाळेच्या रस्त्याव्यतिरीक्त रस्ता चुकला तर घरी कसे यायचे ते माहित नसते, ते कोण शिकवणार?

गणितात मुले नापास होतात आणि त्यांचे आयुष्य बरबाद होते. आता दहावीची कित्येक मुले गणितात नापास होतात, म्हणून पुढचे शिक्षण नाही, चांगली नोकरी नाही, म्हणून मनासारखी पत्नी नाही, सगळं आयुष्याचे गणित चुकते. कशापायी तर एका गणित विषयापायी. गणितात काय शिकतो पायथागोरस, बीजगणितातील सूत्रे, भूमितीचे प्रमेय, त्रिकोणमिती, आलेख, रचना, वेगवेगळ्या अकाराचे क्षेत्रफळ, घनफळ, ज्याचा आयुष्यात काहिही उपयोग नाही, त्या गणितासाठी मात्र आयुष्य बरबाद करून घ्यायचे. गणितात १०० पैकी १०० मार्क घेतलेल्याने काय उपयोग करून घ्रेतलाय? फक्त कॉलेज मध्ये प्रवेश घेण्यासाठी. परिक्षेवरून घरी आल्या आल्या तो हे सर्व विसरलेला असतो. हा गणितात पाढे आले पाहिजेत, पण ते तरी कशासाठी, मुले मजेत कॅलक्युलेटर वापरतात. विचार करा, दुकानात हिशोबात वेळ घालवायचा की, कॅलक्युलेटर वापरायचा. जागा विकत घेताना फक्त फुटाचा विचार होतो. अजब शिक्षण आहे.

विज्ञानात शिका प्रयोगशाळेत कार्बन डाय ऑक्साईड, सल्फर, ऑक्सिजन, हायड्रोजन वायु कसा तयार करतात. काय घरी तयार करून श्वासोच्छवास करायचा आहे? की पाहुण्यांना आहेर करायचा आहे? ऑक्सिजची नळकांडी तयार करणार्‍यालाही याचा काही उपयोग नाही. तुरटी, मोरचूद, चुनखडीचे रासायनिक विश्लेषण शिका आणि दुकानात काय त्र सांगून विकत आणा? मुळात मोरचूदचा काही उपयोग होतो काय? झाडांच्या पानांची रचना, त्याच्या पेशी शिका. काय करणार जाणून? पावसाचे चक्र, कार्बनचे चक्र, नायट्रोजनवे चक्र सांगा या चक्रांचा नोकरी धंद्यासाठी उपयोग?

आता नवीन फॅड निघालय फ्रेंच, स्पॅनिश, जर्मन भाषा विषयाचे, त्याला डोंबलं कधी त्या देशात जायचा प्रसंग येणार नाही पण काय करणार, शिकतोय बिचारा. भले शेजारच्या राज्यातील भाषा नका का येईना. परिक्षेवरून घरी आला कि विसरतो, कारणा त्याचे त्या वाचून काहिही  अडत नाही.

 

उत्तरार्ध अपूर्ण - कसे शिक्षण पाहिजे ते पुढील भागात.     

मध्यंतरी मला एक पत्ता शोधून कार्यक्रमाला जायचे होते म्हणून रस्त्यात एका सुशिक्षीत माणसाला विचारले, तर त्याने बाजूला नेउन मला कसे जायचे ते सांगितले. आता त्याच्याच भाषेत त्याने मला कसे माझ्या पत्त्यावर पोहोचवले ते पहा.

" इथून पंधरा नंबरची बस पकडा. या मार्गाचे नाव आहे, जोशी मार्ग. हे जोशी म्हणजे या गावातील खूप मोठे प्रस्थ. त्यांचे चार बंगले होते, त्यांची मोठी शेती होती. ते रोज सकाळी मंदिरात मोठा दानधर्म करत. हा रस्ता आधी खूप छोटा होता. या रस्त्यावर नेहमी अतिक्रमण होत होते. लोकांना फार त्रास होतो. मग आम्ही मोर्चे काढले. ता शहराचा हजार वर्षांचा इतिहास आहे. येथे मोगलांनी राज्य केले. आताच्या नगरपालिकेत भ्रष्टाचार आहे." वगैरे वगैरे. एवढे होईपर्यंत अजून चार जण जमले. त्यांनी पत्ता सांगण्यात अजून गोंधळ करून ठेवला, पण आता हे सर्व ऐकण्यात खूप वेळ गेला.  ते काय सोडायला तयार होत नव्हते, बरं मी नवीन असल्यामुळे ऐकणे भाग पडले पण याचा परिणाम कय झाला. एवढे ऐकताना पुढचं विसरलो, उशीर झाल्याने कार्यक्रम संपला होता. माझा उद्देश होता पत्त्यावर पोहोचणे, पण यालोकांनी बाकी शिकवण्यातच मला माझ्या ध्येयापासून दूर केले. आत्ताचे शिक्षण असेच आहे, जगात कशाची गरज आहे, जग कुठे चालले आहे, याचा विचार सोडून आपण वेगळाच अभ्यास करत आहोत. आयुष्याची महत्वाची पंचवीस वर्षे वाया घालवत आहोत, जिथे सरासरी आयुष्यच पन्नास वर्षांचे आहे.

असाच एकदा रस्त्यात अपघात झाला होता, खूप गर्दी जमली होती, सर्वजण एकमेकाला शिकवत होते, शिवाय त्याला गाडी कशी चालवावी, नियम कसे पळावेत, सांगत होते पण त्याला कोणीही दवाखान्यात नेत नव्हते, तो बिचारा तडफडत होता. त्याला काय पाहिजे याचा कोणीही विचार करत नव्हते. त्याला उपचारांची जरूरी आहे, तेव्हा मात्र सर्वजण निघून जातात. असेच शिक्षणाचे झाले आहे, सर्वजण शिकवून मोकळे होतात, पुढे कोणीही मदतीला येत नाहीत, विद्यार्थ्याला वार्‍यावर सोडून देतात. शिक्षकाला विचारा मला त्रिकोणाच्या रचना शिकवल्या संसारात काय उपयोग आहे? मी जे वाण्याचे दुकान चालवतो तेथे काय उपयोग?

असेच आताचे शिक्षण झाले आहे. मुलाला पुढे काय करायचे आहे तो विचार नाही, या ज्ञानाचा भविष्यात उपयोग आहे काय? बस शिका. मूल अडीच वर्षांचे झाले की शाळा, त्याचा खेळण्याचा कोणीही विचार करत नाही. त्याला काहिही कळत नसते, कोण शिवाजी, झाडे कसे अन्न तयार करतात, पाउस कसा पडतो वगैरे. त्याला खेळू द्या. आनंद घेऊ द्या.

 नंतर अभ्यास सुरू होतो. पाहु यात एकेक-

मातृभाषा व्याकरण- समास, अलंकार, काळ, कर्तरी, कर्मणी प्रयोग खूप काही, याचा रोजच्या बोलण्यात काय उपयोग आहे काय?नवीन मूल बोलायला शिकते त्याला काय आई व्याकरण शिकवते काय? मूल व्याकरणात बोलते काय? मला व्याकरणा अजिबात येत नाही सांगा मला बोलता येणार नाही? काय अडतंय. इंग्रजीचे व्याकरण मुलगा रात्र रात्र जागून पाठ करतो, पण त्याला नी्ट बोलता ययेत नाही. भाषेच्या पुस्तकातील धडे काय तर लेखिकेला पाडावरचा चहा कसा आवडला, कोणत्या तरी अगम्य भाषेत लिहीलेली नल दमयंतीची कथा,  लेखकाने बालपणी काढलेले कष्ट, प्रवास वर्णने, ती तर आता जुनी झालेली असतात, तेथील आता सर्व बदललेले असते, त्याचा काय उपयोग, विद्यार्थी ते घेउन जाऊ शकतो काय? मुलांना निबंध लिहायला सांगतात, मी पक्षी असतो तर विनोदच आहे ना? तो पक्षी असून काय करणार आहे? उन्हाळ्यात परीक्षा देताना निबंध असतो पावसाळ्यातील एक दिवस आहे ना गंमत. काना मात्रा लक्षात ठेवा, बघा मि असा लिहीला काय आणि मी असा. शेवती मी मीच ना? आणि मधला णि पहिला काय आणि दुसराअ काय? अर्थात फरक पडतो काय? एका शब्दाला अनेक शब्द सुर्याची अनेक नावे रोजच्या जीवनात एवढ्या वेगवेगळ्या नावानी आपण सुर्य म्हणतो काय? मग कशाला एवढा खटाटोप. आता मी एवढ्या वेळेला सु ‍र्‍ह्स्व काढलाय, सूर्य बदलला की तुम्हाला अर्थ नाही कळला? पत्रलेखन असते, काकाने घड्याळ पाठवले आभार माना. अरे ज्याला काकाच नाही किंवा त्या काकाची परीस्थिती नाही हे ज्या विद्यार्थ्याला माहित असते, तो काय निबंध लिहीणार, खोटा खोटाच ना? शिकवा त्याला खोटी कल्पना करायला.

उत्तरार्ध अपूर्ण- यापुढील भागात दुसर्‍या विषयाचं बघू.

''आषाढी कार्तिकी विसरु नका मज । सांगतसे गूज पांडुरंग ॥''

एक भक्तीरसपूर्ण, परमेश्वर भक्तीच्या अतीव आनंदाचा सोहळा अनुभवायचा असेल तर आळंदी, देहूहून दरवर्षी पंढरपूर कडॆ निघणा‌र्‍या पालख्यांसोबत चला. पांडुरंगाने नामदेवांना सांगितले, "आषाढी कार्तिकी विसरु नका मज । सांगतसे गूज पांडुरंग ॥'' आळंदीपासून श्री ज्ञानदेवांची तर देहूहून संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरला पायी नेली जाते. यात अनेकजण सामील होतात. ज्येष्ठ वद्य नवमीला माउली आणि तुकारामांच्या पालख्या पंढरपुराकडे मार्गस्थ होतात. या वारीत महाराष्ट्रातील तसेच आजूबाजूच्या राज्यातूनही भाविक येतात.  एवढेच नव्हे तर भारताच्या विविध प्रांतांतून भिन्न भिन्न भाषा बोलणारे, विविध चालिरीतीचे श्रीविठ्ठलाच्या भक्तिप्रेमाने आपले भिन्नत्व विसरुन एकत्र येतात, उच्चनीचता, श्रीमंत-गरीब, जातिभेद, भाषाभेद, प्रांतभेद विसरुन आपण सर्व एक श्रीविठ्ठलाचे वारकरी, 'विष्णुदास' आहोत ही भावना मनीमानसी दृढ धरुन येतात. वारकरी संप्रदाय समता, एकता, अभेदता शिकविणारा आहे, कारण त्याला माहीत आहे, ''उच्च नीच काही नेणे भगवंत । तिष्ठे भावभक्ती देखुनिया ॥'' यामुळेच यात्रेत विषमता संपते, भेद-भाव नाहीसा होतो. परदेशी अभ्यासू पर्यटकही हा सोहळा पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी सहभागी होतात.

ज्ञानेश्वर माउलींची पालखी आळंदीहून, मंदिरातून ज्येष्ठ वद्य नवमीला निघते, आसमंत 'ग्यानबा (ज्ञानोबा) तुकाराम', 'पुडलिक वरदा हरि विठ्ठल' या नामघोषाने, टाळ-मृदुंगाच्या नादघोषाने दुमदुमत असतो, आणि मार्गक्रमण करीत दशमीला पुणे मुक्कामी येते. वारीत लहान मुले, म्हातारी माणसे, तरूण, सुशिक्षीत, अशिक्षीत सर्व प्रकारचे वारकरी असतात. साधारणत: हा काळ वर्षाॠतूचा काळ. शेतकरी वर्ग शेतात पेरण्या करुन श्रीविठ्ठलदर्शनाची आस मनी घेऊन वारीत येतो. सोबत फुले विकणारे असतात. स्त्रिया डोक्यावर तुळसी वृंदावन घेतात आणि हातात पाण्याची कळशी असती तहानलेल्याला पाणी देण्यासाठी. लोक पालखीच्या मागे पुढे चालतात. त्यांच्या दिंड्या असतात. दिंडी म्हणजे साधारण पंचवीस ते शंभर वारकर्‍यांचा समुदाय. पंधरा दिवस चालायचे असल्याने त्यांच्यासोबत पुढील रहाण्याची जेवण्याची सोय असते. दिंडीत दिंडीप्रमुख, विणेकरी, टाळकरी असतात. प्रत्येक मुक्कामी त्या त्या गावाचे गावकरी त्यांना जेवणाची मोफत सोय करतात. श्रीज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदी ( जि. पुणे) यांनी श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळयामध्ये पालखीबरोबर असणा-या दिंडया व त्यांची नावे 1948 साली निश्चित केली आहेत. त्याप्रमाणेच पालखीसमवेत पुढे व मागे दिंडया चालत असतात

पुण्याला संत ज्ञानेश्वराची पालखी पालखी विठोबा मंदिरात तर तुकाराम महाराजांची पालखी निवडुंग्या विठोबा मंदिरात उतरते. पालख्यांचा मुक्काम दोन दिवस असतो एकादशीला पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. पालखी मार्गावर काही दिंड्या पालखीच्या पुढे तर काही पालखीच्या मागे असतात. हा क्रम कधीही चुकत नाही.

सर्व कार्य शिस्तबद्ध चाललेले असते. पोलीसांचा धाक नाही, स्वयंसेवक नाहीत तरीही एवढा मोठा लाखोंचा समुदाय अडीचशे कि.मी. चा प्रवास करून पंढरपूरला पोहोचतो, म्हणजे चेष्टा नव्हे. कोणाचेही नियंत्रण नाही फक्त विठ्ठल भेटीची आस. डोळे पंढरीकडे, तोंडात हरिनाम, कानात हरीगजर, पाय पंढरीच्या वाटेवर. ''दिंडया पताका वैष्णव नाचती । पंढरीचा महिमा वर्णावा किती ॥'' संत नामदेवाच्या या अभंगानुसार लाखो वारकरी 'माझे जीवीची आवडी । पंढरपुरा नेईन गुढी ॥'' हा भाव अंतरी ठेवून खांद्यावर पताका, मुखाने हरिनाम आणि टाळ-मुदुंगाच्या गजरात पंढरीकडे मार्गस्थ असतात.

पालखी मार्गावरील रोजचा कार्यक्रम अगदी ठरलेला असतो. आज वर्षानुवर्षे यात काहीही बदल नाही. सकाळी सहावाजता आरती होते. त्याआधी सर्व वारकरी जमतात. पुढील दिंड्या निघतात. पालखी निघते. मागून मागच्या दिंड्या निघतात, अगदी क्रमाने.दुपारची विश्रांती ठरलेली. जेवण झाल्यावर पुढील मुक्कामासाठी निघणार. मुक्कामी तळावर सर्व समुदाय एकत्र जमतो. पालखीसोबतचा चोपदार हातातील चांदीचा दंड वर करतो, आणि काय आश्चर्य एकदम शांतता. अजिबात आवाज नाही. आपण दहा माणसांना एक मिनीट शांत करू शकत नाही इथे तर लाखो वरकरी पण एक शब्द नाही. तो चोपदार दुसर्‍या दिवसाचा कार्यक्रम सांगतो, लाउड स्पिकर नाही, पण त्याचा आवाज शेवटपर्यंत जातो. हा प्रसंग अनुभवण्याचा, ऐकण्याचा नाही. नंतर आरती होते आणि पालखी विश्रांतीसाठी जाते. वारकरी विश्रांतीसाठी जातात. जेवण होते. रोज रात्री जागोजागी कीर्तन होते, नामाचा गजर होतो, अभंग म्हणतात आणि विश्रांती घेतात. कारण सकाळी पुन्हा माउलींची सोबत करायची असते. 

मार्गात फक्त भजन, ’ग्यानबा तुकाराम’ गजर. रस्त्यावर आजूबाजूला खाण्याच्या वस्तू वाटत असतात पण मार्ग सोडून कोणीही घेत नाहीत, हे तर काहीच नाही, मार्गावर पायाखाली पैसे जरी दिसतील तरी वाकून उचलणार नाहीत, मुळात खाली लक्ष नसतेच. ध्यान फक्त विठ्ठलाकडे. ''आषाढी कार्तिकी विसरु नका मज । सांगतसे गूज पांडुरंग ॥''

उत्तरार्ध उद्या---

भारतात कित्येक लाख मुले मुली शाळेत जातात. त्यातील कित्येक पास होतात. आता फक्त बारावी पर्यंतचाच विचार करू यात.

दहावीला सात विषय असतात. स्पर्धेच्या युगात विद्यार्थी खूप मेहनत घेऊन अभ्यास करतात.खरे तर पहिलीपासूनच मुलांना कठोर परिश्रम करावे लागतात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत अभ्यास आणि अभ्यास.

अभ्यास तरी काय, इतिहास पाहू यात. मुलांना शिकवतात- मोगल(बाबर पासून औरंगजेब पर्यंत), इंग्रजांचा भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत, गुप्त घराणी, कार्ल मार्क्स, सॉक्रेटीस वगैरे वगैरे. मुले खूप कष्ट करून पाठ करतात.

या सर्वांचा पुढील जीवनात काय उपयोग आहे?

भूगोलात काय शिकवतात, तर सुदानचा प्रदेश, टुंड्रा प्रदेश, गवताळ प्रदेश, ब्राझिल, आफ्रिका वगैरे येथील लोकांचे राहणीमान, हवामान, धंदे याचा कितपत उपयोग? कधीतरी टुंड्रा प्रदेशात जाण्याची शक्यता आहे काय? मुले हे सर्व धडाधड पाठ करतात, पण त्यांना विचारा, आळंदीला कसे जायचे तर त्यांना सांगता येणार नाही. सर्व देशांचे अक्षांश रेखांश माहित करून घ्यायचे कशाला तर परिक्षेत १० मार्कांचा प्रश्न असतो. बघू बरं आपण नागपूरचे अक्षांश रेखांश घेऊन नागपूरला पोहोचू शकतो काय? मग

या सर्वांचा पुढील जीवनात काय उपयोग आहे?

भाषेत काय शिकवतात, तर कोणीतरी लेखिका पाडावरचा चहा प्यायला जाते, ते वर्णन. खूप पूर्वी शाहू महाराजांनी लिहीलेले पत्र, जुन्या भाषेतील नल-दमयंती स्वयंवर, कविता, प्रवास वर्णने(त्या काळातील स्थळे आज त्याच अवस्थेत असतील काय?), भरपूर व्याकरण(रोज बोलण्यासाठी व्याकरण जरूरी आहे काय? शाळेत न जाणारी मुले भाषा बोलत नाहीत का? त्यांना व्याकरण पाहिजे?) न अनुभवलेल्या विषयावर निबंध लिहायचा, खोटा खोटा. मग

या सर्वांचा पुढील जीवनात काय उपयोग आहे?

विज्ञानात काय शिकवतात, प्रयोगशाळेत वायू कसे तयार करायचे, त्यांचा रंग, चव, गुणधर्म, उपयोग सांगा? पावसाचे, नायट्रोजचे,ऑक्सिजनचे चक्र उपयोग सांगा? पेशींची रचना मुले शिकतात आणि परीक्षा  झाल्यावर विसरतात, त्यांचे काय अडते? बेडकाच्या पेशीची रचना. तारेतून विजेचा प्रवाह कसा वाहतो. सर्व वस्तू जमिनीवरच का पडतात? मग

या सर्वांचा पुढील जीवनात काय उपयोग आहे? 

नागरिकशास्त्र काय शिकवते, सर्व संस्थांची कार्ये, भारताची राज्याघटना, संविधान, कर वगैरे. आणि जर विद्यार्थ्यांना रहदारीचे नियम माहित नसतील तर

या सर्वांचा पुढील जीवनात काय उपयोग आहे?

गणितात काय शिकवतात, त्रिकोणामिती, पायथागोरस,आलेख, वारंवारता, भूमितीचे प्रमेय,रचना खूप काही. पण जर फायदा तोटा कळत नसेल तर

या सर्वांचा पुढील जीवनात काय उपयोग आहे?

पुढील लेखात आपण सविस्तर चर्चा करू यात. त्यासाठी आपण उदाहरणे पाहू.

आजच सर्व वृत्तपत्रांमध्ये, दूरदर्शनवर एक बातमी पहायला मिळाली, आणि खरोखर असे वाटू लागले कि, भारतातील मुलांच्या शिक्षणासाठी सरकार किती काळजी घेते. भारतातील मुलांत स्वाभिमान नाही, म्हणून प्रसिद्ध अभिनेता "अमिताभ बच्चन" यांच्या दिवार चित्रपटावर आधारीत धडा N.C.E.R.T. च्या समाजशास्त्र विषयाच्या पुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे. त्या सोबत त्या चित्रपटातील दृश्यही आहे.

सरकारने हे बरोबर ओळखले आहे कि, कोण्ताही विषय चित्रपट माध्यमातून शिकवल्यास मुलांना लवकर समजतो. यात सरकारने किती पक्षी मारलेत पहा. धडा समजला नाही तर C.D. आणली तर घरी बसून अभ्यास करता येईल, क्लास लावायला नको. आई वडील सुद्धा समजाउन घेतील. C.D. विकणार्‍यांचा धंदा होईल. एवढा  स्वाभिमान जागृत होईल कि,मुले काहिही फेकलेले उचलणार नाहीत.मुले आई वडिलांना विचारतील, आई मी पण एकदा बूट पालिशवाला होउन पाहू का? म्हणजे वास्तविकता कळेल. मग मुलांचा आदर्श अमिताभ बच्चन स्वभिमानी. हा चित्रपट पाहून मुलांना बिडी ओढणे स्वभिमानी वाटू लागेल. स्वाभिमानाची कल्पना स्वातंत्र्यवीरांकडे पाहून, त्यांची चरित्रे वाचून येत नाही. 

आता मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी चित्रपट माध्यम किती प्रभावशाली आहे पहा-

  1.  आईबद्दल प्रेम  दिवार,मा,
  2.  देशाबद्दल प्रेम   उपकार, L.O.C.कारगील, हकीकत,
  3.  मित्रता           दोस्ती, शोले,
  4.  माणुसकी        जिस देशमे, दो आखे बारह हाथ,
  5.  शत्रूवर मात     शोले,

वरील सर्व गुण मुलांच्या अंगी उतरवायचे असतील तर शाळेत फक्त सिनेमावरच धडे पाहिजेत.

नृत्यकलेसाठी मल्लिका शेरावत, राखी सावंत यांचे तास ठेवावेत.

फळा, खडूची गरज नाही, वर्गात मोठा पडदा लावायचा, सिनेमा दाखवायचा बस्‌.

मुलांनाही दप्तराचे ओझे नको, विषयवार C.D. नेल्या तर भागेल.

कविता काढून टाकाव्यात आणि चित्रपटातील गाणी ठेवावीत. गाणी किती प्रकारची आहेत- आईवर, देशावर, मित्रावर, जीवनातील तत्वज्ञानावर, निसर्गावर, प्राणीमात्रांवर, ईश्वरावर, कितीतरी विषयांवर. शिवाय चाली किती छान पाठांतराचा त्रासच नाही. 

हिंदू धर्मात अनेक सण आहेत. अनेक देव देवता आहेत. परंपरा आहेत. थोर धर्मगुरू, संत, विचारवंत होउन गेले. अनेक प्रकारच्या पूजा होतात. तसेच इतर धर्मात सुद्धा त्यांच्या प्रमाणे सण वार वगैरे असतात.

आता सर्व धर्मातील तत्व एकच आहे कि, परमेश्वर एकच आहे. कोणत्याही धर्मातील माणसाने केलेली प्रार्थना त्या एकाच परमेश्वराला पोहोचते. परमेश्वराने हे जग निर्माण केले, सर्व प्रकारचे प्राणी निर्माण केले, अगदी आई वडिल आणि त्यांची मुले याप्रमाणेच ना. या जगात धर्म कोणी जन्मास घातला,तर या मानवानेच ना? जो कोणी प्रथम मानव या पृथ्वीवर जन्माला आला त्याचा कोणताच धर्म नव्हता. कित्येक लाख वर्षांपर्यंत तर त्याला अन्न मिळविण्यासाठीच धडपड करावी लागत होती, तो कुठला धर्माचा विचार करतो. नंतर जेव्हा मानव वसाहती करून राहू लागला तेव्हा त्याला काही नियमांची आवश्यकता भासली आणि त्याने नियम, आचारसंहिता, कायदे बनविले आणि त्या त्या समाजाला नाव दिले आणि धर्माचा उदय झाला. प्रत्येक धर्माने आपआपले सणवार, पू्जा पद्धती, उपासतापास, परमेश्वराची संकल्पना आपापल्या प्रमाणे बनवली. प्रत्येकाने तारीख, वार, तिथी ठरवली. सगळ्या जगात, सर्व धर्मात एकच वार, तारीख असते. हे तारीख, वार, तिथी आपण आपल्या सोयीसाठी बनवली आहे. सूर्य, चंद्र यांच्या भ्रमणात काहीच बदल होत नाहीत. वर्षानुवर्षे झालेला नाही. ग्रह तार्‍यांत सुद्धा काहीही बदल केलेला नाही. माणसांच्या जन्म मृत्युत काहिही बदल नाही कोणीही अमर नाही.

आता असा विचार करू यात,जेव्हा हिंदू लोक दिवाळी करत असतात,तेव्हा मुस्लीम लोक रमजान ईद करतात. जेव्हा एका धर्माचे लोक पवित्र उपवास करतात त्याच वेळेस अन्य धर्मीय बकरी ईद निमीत्त बकर्‍यांचा बळी देत असतात. जर मानवधर्म एकच आणि सर्वांच परमेश्वर एकच, फक्त नावे वेगवेगळी तर काही लोकांचा उपास तर काही मांसभक्षण करतात, हे कसे काय? दिवस उजाडल्यावर (नेहमीप्रमाणेच) काहींना तो पवित्र (रमजानचा उपवास),तर काहींना तो शोकमय (गुड फ्रायडे) असे का? हिंदूंना गाय पवित्र तिची पूजा करतात, कारण तिच्या पोटात ३३ कोटी देव आहेत, पण तिच गाय अन्य धर्मियांत कापून खातात, मग हे परमेश्वर पहात नाही काय? धर्मगुरूंनी लोकांना सांगितले का नाही?

आता दुसरा विचार असा, माणसाच्या मृत्युनंतर सर्वजण एकाच ठिकाणी (आत्मा) जातात. कघीही कोणीही परत आलेला नाही. हिंदू धर्मात दहा दिवस आत्मा घरी असतो असे मानतात, मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्मात चाळीस दिवस मानतात, काही जण तर अजिबात मानत नाहीत, वेगवेगळ्या धर्माचे आत्मे वेगवेगळ्या वेळेस पृथ्वी कशी काय सोडतात? महत्वाचा मुद्दा असा कि, हे सर्व होणार नाही जर धर्म एकच असेल तर. म्हणून नवीन धर्म निर्माण करण्यापेक्षा त्याच धर्माचे पालन केले असते तर?

येशु ख्रिस्ताने ख्रिश्चन धर्म स्थापन केला, मोहम्मद पैगंबराने मुस्लीम धर्म, ज्यू लोकांचा वेगळा धर्म आहे, त्या त्या धर्मातील पुढील अनुयायांनी नवीन धर्माचा विचार न करता तोच ध्रर्म कसा वाढेल, त्याचा प्रसार कसा होईल, धर्माची शिकवण लोकांपर्यंत कशी पोहोचेल हे पाहिले, पण नवीन ध्रर्म स्थापन केला नाही, कारण त्यांना तशी गरज भासली नाही. मग हिंदू धर्मातच असे का व्हावे?

डॉ.आंबेडकरांचे बालपण,  शिक्षण ते हिंदू असतांना झाले. ते बॅरिस्टर झाले. कायदेपंडित झाले. नंतर त्यांनी भारताची घटना लिहिली. मग असे काय घडले कि त्यांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्विकारावा? बरे एवढेच नाही तर त्यांच्या सोबत अनेक हिंदू धर्मीय बौद्ध झाले. त्या सर्वांचा नंतर काही विशेष फायदा झाला काय? फक्त राहणीमान आणि जीवनपद्धती बदलली. मग धर्म का बदलावा. मूळ हिंदू धर्माची शक्ति कमी झाली नाही काय?

हे फक्त एक विचार आहेत यात कोणाचाही अपमान, कोणालाही दुखावण्याचा हेतु नाही, असे काही कोणाला जाणवल्यास त्याबाद्दल आम्ही दिलगीर आहोत.

देशभक्ती म्हणजे देशाबद्दल असलेला अभिमान, हे तर सर्वांनाच माहित आहे. त्यात विशेष काय? स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेकांनी म्हणे प्राण वेचले ती देशभक्ती असेल तर त्यावेळेस आम्ही जन्मलो नव्हतो, तो काय आमचा दोष?  आम्हीहि स्वातंत्र्ययुद्धात भाग घेतला असता.

चांगल्या, हुशार, निरोगी माणसाला जबरदस्तीने जेव्हा त्याला वेडा ठरवण्यासाठी रोज थोडे थोडे औषध देतात, मग तो कालांतराने वेडा होतो, असाच प्रकार शालेय जीवनापसून सुरु असतो, देशभक्त बनवण्याचा. मग काय देशभक्तीच्या व्याख्या सुरु होतात. क्रिकेटची मॅच चालू झाली कि शाळा, ऑफिस, कामधाम सोडून बस मॅचच. खेळाडू जिंकले कि, आनंद नाहीतर त्यांच्या घरावर दगडफेक.(तरी बरे क्रिकेट आपला खेळ नाही). 

देशभक्तीची व्याख्या प्रत्येकजण आपापल्याप्रमाणे करतो. देशभक्तीत देशातील सर्व बांधव येतात ना? मग पाणी तंटा, सीमा वाद, नोकर्‍या या मुद्द्यांवरून लोकांची डोकी का फुटतात?

अफजल गुरुने संसदेवर हल्ला केला, म्हणून त्याला फाशीची शिक्षा झाली, ते प्रकरण राष्ट्रपतींकडे भिजत पडलय, तिथे निर्णय होत नाही. ती कोणत्याप्रकारची देशभक्ती. पंधरा ऑगष्ट, सव्वीस जानेवारीला, झेंड्यासमोर कडक इस्त्रीचा गणवेश घालून, त्यावर मिळालेली पदके अडकवून सलामी द्यायची, नंतर आहेच भ्रष्टाचार. उरलेले दिवस भक्तीपूर्व देशभक्ती.

देशभक्तीचा एक अभूतपूर्व प्रकार म्हणजे, सरकारी सुट्ट्या. थोर पुरूषांच्या नावाने, भरपूर सुट्ट्या घेणारे खरे देशभक्त. रोग्यांची सेवा करण्याची शपथ घेणारे  डॉक्टर  जेव्हा धंदेवाईक होतात तेव्हा देशभक्तीची कल्पना येते. जेव्हा बोफोर्स तोफांचे प्रकरण बाहेर येते तेव्हा आपल्यात देशभक्ती किती आहे हे त्याच तोफा धडाडून सांगतात.

खरे देशभक्त तर सिनेमावालेच, कमीतकमी सिनेमा संपेपर्यंत तरी देशभक्तीत आकंठ बुडवतात. आठवा जरा--उपकार, बॉर्डर, मंगल पांडे वगैरे.पंधरा ऑगष्ट, सव्वीस जानेवारीला गरीब मुले रस्त्यावर झेंडे विकतात, लोक विकत घेतात, मिरवतात पण दुसर्‍या दिवशी रस्त्यावर लोळताना दिसतात, देशभक्ती. याच दिवशी रस्ते अडवून, मोठमोठ्याने स्पीकर लावतात,झाली देशभक्ती. 

देशाची मालमत्ता, संपत्ती सांभाळणे, त्याला नुकसान पोहोचू न देणे, ही देशभक्ती होउच शकत नाही. संप बंदच्या वेळेस जमावाकडून जे नुकसान होते ते काय?

 भारत पाकिस्तानची जेव्हा क्रिकेटची मॅच होते तेव्हा अगदी स्फुरण चढते, पण दुसर्‍या देशाबरोबर खेळताना होत नाही, ही मात्र देशभक्ती. देशभक्तीला कोणत्या तराजूने तोलायचे याला काहीही नियम नाहीत, प्रत्येकजण आपापला तराजू वापरतो.

म्हणून म्हणतो देशभक्ती म्हणजे काय या विषयावर पिएचडी करायला हरकत नाही. पण एक आहे तो पिएचडी करणारा देशभक्तच पाहिजे, नाहितर?

अशी कल्पना करू यात कि, या पृथ्वीवरून भारतातून एक शहर एकदम गायब झाले आहे. सकाळी त्या ठिकाणी काहीही नाही फक्त मोकळी जमीन आहे. तेथील माणसे, पशु, पक्षी, घरे, सर्व सर्व काही एका रात्रीत गायब झाले. कोणालाच माहित नाही. कोठे गेले कोणालाच माहीत नाही. अगदी त्या ठिकाणी वाळवंट. थोडी कल्पना करा दिवाळीत मुले किल्ला करत्तात,  आपण  संध्याकाळी तो पाहून, त्याचा फोटो घ्यावा,अगदी एक शहरच मुले बनवतात ना. सकाळी  उठून पहावे तर त्या ठिकाणी काहीही नाही फक्त मोकळी जमीन. कसे वाटेल. मग पळत जाउन कालचा फोटो पहावा तर त्या फोटोतूनही तो किल्ला गायब. तसेच या शहराबद्धल झाले. खूप चर्चा झाली, तर्कवितर्क झाले, शोधाशोध झाली काही समजले नाही.

लोक हे विसरले परत काही दिवसानंतर दुसर्‍या देशातील चार पाच शहरे अशीच गायब झाली. आता मात्र काय करावे कळेना, कुठे शोधणार ती काही छोटीशी वस्तू आहे का? अहो,आख्खी गावेच ना? काही उपयोग नाही. जगाचे व्यवहार थांबत नाहीत. रोजच्याप्रमाणे समुद्रावर कोळी लोक मासे पकडण्यासाठी गेले त्यांनी जाळे टाकले, पण मासेच आले नाहीत, म्हणून त्यांनी समुद्रात पाहिले तर काय आश्चर्य समुद्रात कोणतेही जीव नाहीत, मासे नाहीत, वनस्पती नाहीत काही नाही. ते पळत पळ्त गावात आले. तर गावात गडबड चालली होती, कारण गावातील तळ्यातून, विहीरीतून, नदीतून सर्व पाण्यातून सर्व जीव गायब झाले होते, मेले नाहीत तर गायब. मग अशी बातमी आली कि, सार्‍या जगातून पाण्यातील सजीव,वनस्पतींसहीत गायब झालेत. शास्त्रज्ञ विचार करू लागले, पण काय उपयोग? गायब होउन कोठे जातात काही समजत नव्हते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कसे लक्ष ठेवणार. बरं भविष्यात काय नष्ट होणार याचा अंदाजच येईना.

असेच काही दिवस गेले, हळूहळू लोकांच्या लक्षात येऊ लागले कि आकशात ढगच येत नाहीत. भारतात पावसाळा येणार म्हणून लोक वाट पाहतात तर काय दूरवर समुद्रावर सुद्धा धग नाहीत जणू ढग तयार होणेच बंद झाले आहे. ढगच नाही तर पाऊस नाही, पीक नाही,जगणार कसे. सर्व जगभरात कृत्रिम ढग कसे निर्माण करणार. आता मात्र जगात खळबळ माजली, लोक घाबरले. चर्चा सुरू झाल्या. होम हवन सुरू झाले. लोक मस्जिद, चर्च, मंदिर, गुरुद्वार, जिथे जमेल तिथे प्रार्थना करू लागले.

आज पौर्णिमा आकाशात पूर्ण चंद्र  असणार, पण कोणाच्या तरी लक्षात आले कि आकाशात चंद्रच आला नाही, उगवलाच नाही, एवढेच काय तर चांदण्या सुद्धा दिसत नाहीत. काय करणार? जे कोणी शास्त्रज्ञ आकाशनिरीक्षण करीत होते त्यांना ग्रह,चांदण्या काही न दिसता फक्त काळे आभाळच दिसत होते. मग त्यांनी मानवाने सोडलेले उपग्रह पाहीले तर ते होते, त्यामुळे जगाचे कामकाज चालू होते, शास्त्रज्ञांना हायसे वाटले.

कोणाला काय करावे काही कळत नव्हते,सुचत नव्हते. जगभरातील सर्व शास्त्रज्ञ एकत्र बसून विचार करू लागले. कल्पनाच करवत नव्हती कि,या अवकाशाच्या पोकळीत फक्त पृथ्वी आणि सूर्यच आहे, बाकी काहिहीनाही.

आता बातमी आली कि,आता तर पूर्ण आफ्रिका खंडच गायब,जणू समुद्रात बुडाले,कि आकाशात उडाले. हळूहळू एकएक खंड गायब होउ लागले. अगदी शास्त्रज्ञ बसले होते ते शहर सोडून बाकी पृथ्वीवरील सर्व गायब झाले आहे. कल्पना येते काय?

आजूबाजूला सर्व वाळवंट आणि समुद्र. हे सुद्धा केव्हा गायब होईल सांगता येत नाही. त्या गावात चार शास्त्रज्ञ आणि तीस लोकच उरले, म्हणजे आता पृथ्वीवर फक्त एवढेच जीव. त्या तीस लोकात विस महिला, सहा पुरूष आणि चार मुले होती.

यांना कल्पनाच नाही कि, आतापर्यंत उरलेला समुद्रही गायब झालेला आहे. वर मोकळे आकाश, आकाशात सूर्य थांबलेला(दिवस रात्र नाही),खाली पृथ्वी आणि या ठिकाणी चौतीस मनुष्यप्राणी(आता भेदभाव कसला).गावात एक मंदिर होते तेथे एक  जण ध्यानस्थ बसला होता.

आता काय करणार, जेवढे गाव होते तेवढे सोडून बाकी सर्व गायब झाले म्हणजे तेवढी जमीन सोढून बाकी सर्व पृथ्वी नाहीच.एखाद्या धूलीकणावर जंतू असतात ना ते वातावरणात तरंगत असतात. फक्त तो धूलीकण(बाकी धूळ नाही) आणि आकाश.

आता सूर्य गायब झाला तर? झाला तर काय,झालाच. छोटासा जमिनीचा तुकडा(पातळसा),तरंगता,त्यावर चौतीस प्राणी, बाही कोणतेही जीव जंतू नाहीत, आणि वर काळे आकाश. काही दिसेना, काही कळेना, कुठे आहोत, दिशा नाहीत.

परमेश्वर कोठे आहे माहीत नाही. उरलेले आकाश गायब झाले पण या जीवांना काय कल्पना, कारण त्यांच्यातीलच एकेकजण गायब होत होते. प्रथम शास्त्रज्ञ, मग सर्व पुरूष (मंदिरातील एक सोडून), स्त्रिया, मुले खालील जमीनीसकट गायब. फक्त आता मंदिर आणि त्यातील एक पुरूष.

झाले संपले ते मंदिर गेले,फक्त तो एक जीवच.

फक्त एक जीव सोडून बाकी काही नाही अगदी आकाश आणि अवकाश सुद्धा. हि कल्पना शब्दात मांडता येईल? काहीच नाही तर काय आहे? देव कोठे आहे? जर काहीच नाही, आकाश, अवकाश नाही, तर ब्रम्हा,विष्णू,महेश,देवलोक, स्वर्ग, नरक, ही नाही तर काय असेल? काय असेल?

कल्पना करून कोणी शब्दात मांडू शकेल काय?

Newer Posts Older Posts Home

Popular Posts

  • आत्मा
    आत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा ...
  • १२ जुलै १९६१
    १२ जुलै १९६१, आम्ही ११ वर्षांचे होतो, त्या वेळेची आठवण ठेऊन ’सकाळ’ने आठवणी जाग्या केल्या त्याबद्दल धन्यवाद. खरोखर त्या भयानक पुरापेक्षाही,...
  • The Fame of the Clock
    Recently a Muslim kid named Ahmed Mohamed from Texas was arrested and suspended from school when he showed his home built "clock&qu...
  • अवतार
    विश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...
  • पाणी वाचवा
    पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...
  • एका रात्रीची गोष्ट
    कोणत्यातरी कामासाठी मी बायकोला घेऊन मोटरसायकलने बाहेरगावी गेलो होतो. परतायला रात्र झाली, पण सकाळी तातडीचे काम असल्यामुळे घाईने निघालो. मध्ये...
  • कन्यादान
    नुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , "चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी"...
  • कूणी तरी पोस्त चोरलं आणि मराठी जगाची बोंबाबोंब
    ************CLARIFICATION******************* बरेच विरोप आल्याने मला हे स्पष्ट करावेसे वाटत आहे की.... मी लिहिल्याप्रमाणे, मी चोराची बाजु अज...
  • आपण भारतात का जातो?
    काही दिवसांपुर्वी एका गोर्‍या मित्राने विचारले की आता तु कायम इथेच राहणार का? मन बावचळले आणि काही वर्षांनी कायमचा परत फिरण्याच्या माझ्या प्र...
  • गंमत
    १ ते ९९ या अंकांच्या स्पेलिंगमध्ये कुठेही ‘A', `B'. `C', अणि ‘D' हे अक्षरे आढळत नाहीत. १०० या अंकाच्या स्पेलिंगमध्ये सर्वप्र...

Labels

मी मराठी अनमोल विचार भारत TV

Blog Archive

  • ►  2016 (1)
    • ►  February (1)
  • ►  2015 (2)
    • ►  July (1)
    • ►  January (1)
  • ►  2014 (2)
    • ►  January (2)
  • ►  2013 (1)
    • ►  October (1)
  • ►  2012 (22)
    • ►  November (4)
    • ►  July (1)
    • ►  June (1)
    • ►  February (2)
    • ►  January (14)
  • ►  2011 (15)
    • ►  December (2)
    • ►  November (5)
    • ►  October (8)
  • ►  2010 (64)
    • ►  July (1)
    • ►  June (6)
    • ►  May (6)
    • ►  April (8)
    • ►  March (5)
    • ►  February (13)
    • ►  January (25)
  • ►  2009 (66)
    • ►  October (13)
    • ►  September (4)
    • ►  August (3)
    • ►  July (1)
    • ►  May (3)
    • ►  April (10)
    • ►  February (16)
    • ►  January (16)
  • ►  2008 (63)
    • ►  November (1)
    • ►  October (12)
    • ►  September (2)
    • ►  August (16)
    • ►  July (11)
    • ►  June (13)
    • ►  March (2)
    • ►  February (2)
    • ►  January (4)
  • ▼  2007 (52)
    • ►  December (4)
    • ►  September (1)
    • ►  August (6)
    • ►  July (22)
    • ▼  June (12)
      • माझा विमान प्रवास - ६
      • माझा विमान प्रवास - ५
      • माझा विमान प्रवास-४
      • माझा विमान प्रवास-३
      • असे शिक्षण हवे कशाला? उत्तरार्ध - २
      • असे शिक्षण हवे कशाला ? उत्तरार्ध - १
      • पालखी सोहळा - पूर्वार्ध
      • असे शिक्षण हवे कशाला ?
      • भारतातील शैक्षणिक क्रांती
      • एक धार्मिक चिंतन-३
      • देशभक्ती म्हणजे काय हो?
      • विचीत्र कल्पना
    • ►  May (5)
    • ►  April (1)
    • ►  March (1)
  • ►  2006 (30)
    • ►  December (2)
    • ►  November (2)
    • ►  October (10)
    • ►  September (4)
    • ►  August (5)
    • ►  July (1)
    • ►  June (6)

Popular Posts

  • पाणी वाचवा
    पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...
  • The Fame of the Clock
    Recently a Muslim kid named Ahmed Mohamed from Texas was arrested and suspended from school when he showed his home built "clock&qu...
  • कन्यादान
    नुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , "चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी"...
  • अवतार
    विश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...
  • मकर संक्रांत
    आज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्‍या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...

Follow us at FB

Tweets by @tlf_org
Copyright © 2015 मी मराठी माणूस

Created By ThemeXpose