असे शिक्षण हवे कशाला ?

भारतात कित्येक लाख मुले मुली शाळेत जातात. त्यातील कित्येक पास होतात. आता फक्त बारावी पर्यंतचाच विचार करू यात.

दहावीला सात विषय असतात. स्पर्धेच्या युगात विद्यार्थी खूप मेहनत घेऊन अभ्यास करतात.खरे तर पहिलीपासूनच मुलांना कठोर परिश्रम करावे लागतात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत अभ्यास आणि अभ्यास.

अभ्यास तरी काय, इतिहास पाहू यात. मुलांना शिकवतात- मोगल(बाबर पासून औरंगजेब पर्यंत), इंग्रजांचा भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत, गुप्त घराणी, कार्ल मार्क्स, सॉक्रेटीस वगैरे वगैरे. मुले खूप कष्ट करून पाठ करतात.

या सर्वांचा पुढील जीवनात काय उपयोग आहे?

भूगोलात काय शिकवतात, तर सुदानचा प्रदेश, टुंड्रा प्रदेश, गवताळ प्रदेश, ब्राझिल, आफ्रिका वगैरे येथील लोकांचे राहणीमान, हवामान, धंदे याचा कितपत उपयोग? कधीतरी टुंड्रा प्रदेशात जाण्याची शक्यता आहे काय? मुले हे सर्व धडाधड पाठ करतात, पण त्यांना विचारा, आळंदीला कसे जायचे तर त्यांना सांगता येणार नाही. सर्व देशांचे अक्षांश रेखांश माहित करून घ्यायचे कशाला तर परिक्षेत १० मार्कांचा प्रश्न असतो. बघू बरं आपण नागपूरचे अक्षांश रेखांश घेऊन नागपूरला पोहोचू शकतो काय? मग

या सर्वांचा पुढील जीवनात काय उपयोग आहे?

भाषेत काय शिकवतात, तर कोणीतरी लेखिका पाडावरचा चहा प्यायला जाते, ते वर्णन. खूप पूर्वी शाहू महाराजांनी लिहीलेले पत्र, जुन्या भाषेतील नल-दमयंती स्वयंवर, कविता, प्रवास वर्णने(त्या काळातील स्थळे आज त्याच अवस्थेत असतील काय?), भरपूर व्याकरण(रोज बोलण्यासाठी व्याकरण जरूरी आहे काय? शाळेत न जाणारी मुले भाषा बोलत नाहीत का? त्यांना व्याकरण पाहिजे?) न अनुभवलेल्या विषयावर निबंध लिहायचा, खोटा खोटा. मग

या सर्वांचा पुढील जीवनात काय उपयोग आहे?

विज्ञानात काय शिकवतात, प्रयोगशाळेत वायू कसे तयार करायचे, त्यांचा रंग, चव, गुणधर्म, उपयोग सांगा? पावसाचे, नायट्रोजचे,ऑक्सिजनचे चक्र उपयोग सांगा? पेशींची रचना मुले शिकतात आणि परीक्षा  झाल्यावर विसरतात, त्यांचे काय अडते? बेडकाच्या पेशीची रचना. तारेतून विजेचा प्रवाह कसा वाहतो. सर्व वस्तू जमिनीवरच का पडतात? मग

या सर्वांचा पुढील जीवनात काय उपयोग आहे? 

नागरिकशास्त्र काय शिकवते, सर्व संस्थांची कार्ये, भारताची राज्याघटना, संविधान, कर वगैरे. आणि जर विद्यार्थ्यांना रहदारीचे नियम माहित नसतील तर

या सर्वांचा पुढील जीवनात काय उपयोग आहे?

गणितात काय शिकवतात, त्रिकोणामिती, पायथागोरस,आलेख, वारंवारता, भूमितीचे प्रमेय,रचना खूप काही. पण जर फायदा तोटा कळत नसेल तर

या सर्वांचा पुढील जीवनात काय उपयोग आहे?

पुढील लेखात आपण सविस्तर चर्चा करू यात. त्यासाठी आपण उदाहरणे पाहू.

Unknown

No comments: