माझा विमान प्रवास - ५

Passport, visa झाला, आता विमानाचे तिकीट पाहिजे. सिझन प्रमाणे, एअरलाइन्स प्रमाणे तिकीटांची किंमत कमी जास्त होते तेव्हा सगळीकडे चौकशी करावी, घाई करू नये. काही प्रवास थेट Direct असतो तर काही थांबून विमान बदलून करण्याचा असतो. उदा. ऑस्ट्रेलियाला जायचे असेल Delta airlines थेट नेते, साधारण बारा तासांचा प्रवास असतो. पण जर Singapore Airlines चे तिकीट घेतले तर विमान सिंगापूरला बदलावे लागते. तेथे खूप  लांब चालावे लागते. दुसर्‍या गेटला जावे लागते. जर ते शक्य नसेल, मुलेबाळे सोबत असतील, वय जास्त असेल, किंवा अन्य काही अडचण असेल तर Direct तिकीट घ्यावे. तिकीट आल्यावर तारीख वेळ तपासून घ्यावी.

परदेशात जाताना काय काय वस्तू बरोबर न्यावयाच्या आहेत, त्यांची प्रथम यादी तयार करावी. खराब होणारे पदार्थ शेवटी आणावेत. प्रत्येक माणसाला ठरावीक वजन न्यायला परवानगी असते. तसे त्या Airlines च्या कार्यालयात विचारून घ्यावे. कोणाचेही ऐकू नये. खूप वेगवेगळे सल्ले मिळतात. सल्ले देणारे इथेच राहतात, पुढे विमानतळावर आपल्यालाच भोगावे लागते. प्रत्येकाला दोन बॅगा, हातात साधारण आठ किलोची एक हॅंडबॅग, शिवाय स्त्रीयांना पर्स बाळगता येते. कॅमेर्‍याच्या बॅगेचे वजन होत नाही. परदेशात खाद्य पदार्थ, पातळ द्रव पदार्थ, धारदार वस्तू जसे चाकू, सुई, पिन, टाचण्या वगैरे, अंमली पदार्थ न्यायला बंदी आहे. त्या वस्तू टाळाव्यातच. लॅपटॉपचे वजन होत नाही.

सर्व सामान भरताना प्रत्येक वस्तू नीट पॅक करावी. Spring balance (वजनाचा ताणकाटा आणावा, तसा स्वस्त मिळतो, म्हणजे घरीच वजन करता येते.) वजन जास्त असेल तर विमानतळावर काढायला लावतात. तिथे फेकून द्यावे लागते. उगीचच धावपळ होते. मानसिक त्रास होतो, काय फेकावे कळत नाही.

आता बॅगा नीट भरल्यावर प्रत्येक बॅगेत काय भरलेय याची यादी तयार करा. ती पुढे उपयोगी पडते. एखादी शाल वर बरोबर ठेवावी, कदाचित विमानात थंडी वाजते. विमानतळावरही उपयोगी पडते. लगेच लागणारी औषधे, चष्मा, सुपारी, जवळ बाळगावी.

महत्वाचे- परदेशात जाताना आरोग्य विमा करणे फार महत्वाचे असते. विमा घेताना त्यांच्या अटी नीट पाहून घ्याव्यात. नियमात बारीक अक्षरात काय लिहीलय ते नीट वाचून घ्यावे. ICICI prudential, New India Assurance, Bajaj वगैरे कंपन्या आहेत. जाण्याच्या आदल्या दिवशी घ्यावा. तारीख, वेळ, नाव, नावाचे spelling, passport नंबर, देश नीट तपासून घ्यावे. आपण निरोगी असाल तरी पॉलिसी घ्या, कारण परदेशात डॉक्टरचा खर्च परवडत नाही. मुख्य म्हणजे आपण निर्धास्त राहू शकतो, मानसिकदृष्ट्या. 

ज्या देशात जायचे आहे त्या देशातील चलनात पैसे घ्यावेत. काही रक्कम बाळगायला परवानगी असते, कारण मध्ये फोन करणे, तिकडे उतरल्यावर घरी जाण्यासाठी, विमानतळावर काही खाण्यासाठी पैसे लागतात.

आता बॅगा भरल्या, याद्या तयार झाल्या, हातात नेण्याच्या बॅगा तयार झाल्या. Passport, Air ticket ठेवण्याची छोटी पर्स आणावी, आणि त्यात पासपोर्ट, तिकीट ठेउन सतत जवळ बाळगावे. लक्षात ठेवा, सर्व काहिही हरवले तरी चालेल, पण passport अतिशय महत्वाचा आहे, कारण तीच तुमची ओळख आहे. सर्व ठिकाणी तो दाखवावा लागतो. विमानतळावर किंवा कोठेही, कोणालाही Passport, अधिकृत माणसाशिवाय इतरांना  दाखवू नये. बॅगांना कुलूप लाऊ नये. बॅगेच्या हॅंडलला ओळखीसाठी एकाच रंगाचा रूमाल अथवा रिबन बांधावी, परदेशात विमानतळावर बॅगा ओळखताना मदत होते कारण सर्व बॅगा सारख्याच दिसतात. बॅगा बदलल्यास खूप घोटाळा होतो.

घरची सर्व तयारी झाली, पुढील भागात विमानतळापासूनचा प्रवास पाहू यात.   

Unknown

No comments: