मी मराठी माणूस

Mi Marathi!

  • Home
  • VismiT

सकाळ्च्व सहा वाजले, पेपेर हातात आला, आणि त्याच त्याच रोजच्या बातम्या वाचून कंटाळा  आला होता त्यात प्रसन्न अशी बातमी आली, आणि सकाळ कशी प्रसन्न वाटू लागली, कानात " इंद्रायणी काठी, देवाचिया आळंदी" चे स्वर घुमू लागले, ती बातमी होती

http://www.esakal.com/esakal/11052008/Specialnews8389ECDFBE.htm

पंडित भीमसेन जोशी यांना भारतरत्न

अभिनंदन, अभिनंदन अभिनंदन.

त्यांच्या चाहत्यांच्या, शिष्यांच्या घोळक्यात माझ्या सारख्या सामान्य रसिकाला जागा मिळणार नाही, म्हणून असे अभिनंदन.

हा पुण्याचाही गौरव आहे.

उद्या २२ ऑक्टोबर २००८ रोजी भारताचा ’चांद्रयान १’ हा उपग्रह जेव्हा अवकाशात, पृथ्वीच्या वातावरणाच्या कक्षा भेदून झेपावेल तेव्हा भारताच्या अवकाशपर्वाच्या नवीन सुर्योदयाची पहाट होईल. आम्हासर्व भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून येईल. चार दशकांपूर्वी केरळमधील तुंबा या अवकाशस्थळावरून ’रोहिणी ७५’ या अग्निबाणाने झेप घेतलेला दिवस आणि ’चांद्रयान १’ झेपावणारा उद्याचा दिवस अविस्मरणीय आहेत.  

’चांद्रयान१’ हे मुख्यतः दूरसंवेदक उपग्रह असून, त्याचे वजन १३०४ किलो आहे. तो चंद्राभोवती दोन वर्षे फिरत राहणार असून, चंद्राच्या पृष्ठभागाचे सर्वेक्षण करून त्रिमिती चित्रण पाठवणार आहे.

ही चांद्रयानाची मोहीम यशस्वी होवो, ही ईश्वरचरणी प्रार्थना. सर्व शास्त्रज्ञांचे परिश्रम फळाला येवोत. भारतसरकारची या दिवाळीसाठी ही सर्वात मोठी भेट असेल.

’चांद्रयान १’ मोहीम यशस्वीरित्या राबवणार्‍या भारत सरकारला, सर्व शास्त्रज्ञांना, अधिकारी वर्गाला, एवढेच काय अगदी चतुर्थश्रेणी कामगाराला, प्युन, स्वच्छता कर्मचार्‍याला, अगदी प्रत्येक घटकाला, ज्यांच्या सहभागाशिवाय हे अग्निदिव्य पूर्णा होऊच शकत नाही, अशा सर्व भारतीयांना, आम्हा सर्व भारतवासीयांच्या हार्दिक शुभेच्छा.

आताच्या या बेभरंवशाच्या जगात चोर, दरोडेखोरांपासून आपल्याला कोण वाचवू शकेल, परमेश्वर नाही तर, फक्त पोलीसच. पण का कोणास ठाऊक पोलीस मात्र सामान्य माणसाला मित्र वाटत नाही. आता याला पोलीस जबाबदार असू शकत नाही, नाही का?

जगात अनेक प्रकारची लोकं आहेत, त्यांच्याकडे पाहून तरी हे समजत नाहीना की, हा सज्जन की चोर? जगात चोर्‍या होतात, ज्यांचा माल चोरीस जातो त्यालाच दुःख होते ना? मग त्याला माल मिळवून देण्यासाठी कोण मदत करणार? अशा वेळेस जर पोलीसांशिवाय कोणाकडे मदत मागितली तर मिळू शकेल काय? पण पोलीस रात्रंदिवस मागे लागून चोराला शोधण्याचा प्रयत्न करतो, अशा वेळेस कोणी सापडले तर तो कबूल करेल काय? मग पोलीसांना धाक दाखवावाच लागतो. कोणीही सहजासहजी कबूल करणार नाही? खूनाच्या केस मध्ये जर पोलीस म्हणू लागले, अरे सर्वजण खरेच बोलतात, तर कोणी आपण होऊन कबूल करणार नाही. कोणीही गुन्हेगार प्रेमाणे कबूल होत नाही. जर अशी वागणूक पोलीस देऊ लागले तर, ज्याच्यावर अन्याय झालाय त्याचे काय?

गणेशोत्सव, नवरात्र, मोहरम, जैनांची मिरवणूक, शोभायात्रा, अशा कितीतरी बाबतीत पोलीसांना संरक्षणासाठी बदोबस्ताला जावे लागते, तेव्हा वेळेचे बंधन रहात नाही. पुण्यात गणपती विसर्जनाच्या वेळी तर पोलीस चाळीस चाळीस तास ड्युटी बजावतात. सगळेजण आपापल्य नादात असतात, पण त्यांच्ताकडे कोणाचेच लक्ष नसते. सणवर तर त्यांना माहितच नसतो. अरे, ते जर सणवार करू लागले  तर आपले संरक्षण कोण करणार.रोजच शिमगा होणार. आज पोलीस खाते आहे, म्हणून आपण रात्री शांत झोपू शकतो.

कल्पना करा, पोलीस खाते बंदच करून टाकले तर? कोणीही सबल दुर्बलांना त्रास देईल. स्त्रीया मुलींची अब्रू राहील काय? दिवसा ढवळ्या लोकांवर अत्याचार होतील. आता पोलीस आहेत तरी राजरोस खून होताहेत, दंगली भडकताहेत, लूटालूट होत आहे. मग दाद मागायला जागा नसेल तर? एखादा माणूस तक्रार द्यायला चौकीत जातो, तेव्हा त्याला माहित आहे की त्याची बाजू खरी आहे, पण हे त्यावेळेच्या पोलीसाला कसे समजणार? त्याला चौकशी करावीच लागणार? तक्रारदाराच्या सांगण्यावरून कारवाई होत नाही. जर तक्रार करणाराच खून करून कोणा दुसर्‍याचे नाव घेत नसेल कशावरून? मग त्या माणसावर अन्याय नाही का?

वाहतूक पोलीस नसेल तरची कल्पना करा. चौकात काय हाल होतील, कोणीही वेळेवर घरी पोहोचू शकणार  नाही. लोकांना राग असतो, उगीचच थांबवून परवाना विचारतात, पण विना परवाना वाहन चालक असतातच ना? अपघात करून पळून गेलेल्याला पोलीस शोधून आणतात, तेव्हाच अपघातग्रस्ताला न्याय मिळतो ना?

जो पिडीत आहे त्याला विचारा पोलीसाचे महत्व. ज्याच्यासाठी पोलीस साक्ष द्यायला कोर्टात उभारतात, त्याला विचारा, बलात्कारीत स्त्रीला विचारा, अशिक्षीतांना विचारा पोलीस किती मित्र आहे ते.

स्त्री आणि पुरूष या दोन जाती देवाने निर्माण केल्या, आणि त्यांना नवीन संतती उत्पन्न करण्याची क्षमता दिली, जशी मानवाला तशीच प्राण्यांना देखील. खरं तर आपणही प्राणीच, फक्त प्रगत. आदिमानवाच्या काळी मनुष्य जंगलात प्राण्यांप्रमाणेच रहात होता ना! नंतर मानवाने प्रगती केली, तरी पण काही जणात अजूनही प्राण्यांचे रानटी गुण दिसतात, तो भाग वेगळा.

मानवाने व्यभिचाराची व्याख्या बनवली. विवाह संस्थेला मान्यता दिली, हे सत्कार्य आपल्या पूर्वजांनी, ऋषीमुनींनी केले, अगदी रामायण महाभारताच्या काळातही विवाहसंस्थेला मान्यता होती, एवढेच काय राम एकपत्नीव्रती होता. नंतर विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यात आली, भले समाज, जात, धर्माप्रमाणे रिती वेगवेगळ्या असतील.संतती औरस ही अनौरस हे ठरण्याच्या दृष्टीने विवाहाच्या वैधतेला मान्यता असणे जरूरीचे ठरते. पूर्वी विवाहविधी, समारंभ फारच किचकट होते पण आता खूप सुटसुटीत झाले आहेत. आणि हेही नको असतील तर अवघड आहे. कायद्याने विशिष्ट विधीचेही बंधन नाही, कायदा त्यात्या धर्माप्रमाणे केलेल्या विधीला मान्यता देते, एवढेच काय, नोंदणीविवाहही कायदेशीर असतो. लग्नसोहोळ्याच्या प्रथा जात, धर्म, जमात, स्थळ, कुटुंब प्रमाणे बदलतात, तरीही त्याला कायद्याने मान्याता आहे. आदिवासी समाजात फक्त मुलाने स्पर्श केला तरी बस्स‌‍! बौद्ध धर्मात बुद्ध प्रतिमेसमोर फक्त त्यांचा मंत्र म्हणतात. काही जमातीत फक्त हार घालण्याला, तर काहीत सात फेर्‍यांनाच महत्व आहे.

समजा स्त्री-पुरूष दीर्घकाल पती-पत्नीप्रमाणे एकत्र रहात आले, आणि त्यांना संतती झाली तर अडचण उत्पन्न होणार कारण त्यांच्या चारित्र्याबद्दल काय हमी. विवाह समाजाला जाहीर होणार नाही, कायदेशीर बाबी उत्पन्न झाल्या तर न्याय कसा होणार.

कायदेशीर नोंदणी आवश्यक आहे, कारण पुरूषाने स्त्रीवर अन्याय केला तर तिला न्याय कसा मिळणार, मालमत्तेचे वाटप कसे होणार.

कायदा असे मानतो की, सहसा कोणीही खोटे बोलत नाही, म्हणून शपथपत्राला, न्यायालयात गीतेवर हात ठेऊन घेतलेल्या शपथेला महत्व आहे, तो साक्षीदार खरेच बोलतो असे कायदा मानतो. कायद्याचा माणसातल्या माणुसकीवर सद्‌सद‌विवेकबुद्दीवर विश्वास आहे.

महागाई वाढली, आकाशा भिडली

दात अन्‌ अन्नातील दरी वासली

माझ्यातील वाघाची मेंढी झाली

आणि, सरकारी देवासमोर कापली

मुलं झाली, निसर्गानं वाढवली

डोनेशननं शिक्षणा गाडी अडली

खाल मानेनं लाचारीत नोकरी केली

मालकानं उठताबसता लाथ घातली

निसर्ग कोपला, आजारानं हाय खाल्ली

डाक्टरनं नखानं कातडी सोलली

माझ्यातील माणसाची मेंढी झाली

अन्‌ सरकारी इस्पितळात कापली

पोरगी घोर लाऊन वयात आली

काय करू, कसायाच्या गळ्यात बांधली

जावया मुखी लाख लाखोली

लेकीची रोजच लावतो बोली

सासर्‍याची जावयाने केली मेंढी

रगात नाय, पण पुरती कापली

नदी नाले विहीर आटली

पण डोळीस धार लागली

आकाशी नजर भिरू लागली

कुठलं ढग, नुसतीच काहिली

दुष्काळानं, किती बांगडी फुटली

लहानग्यांची सावली तुटली

शेतकर्‍याची बघ मेंढी झाली

मेंढीनं जरासी आत्महत्या केली

राजानं मदत जाहीर केली

उपाशी पोटी रांग लावली

शंभराची नोट दिसाया लागली

पदरी दहाची पवित्र झाली

मधली गळती, कुरतडली

काय करणार? नसती मिळाली

पोटाच्या आगीने मेंढी केली

दहाची खाल्ली,शंभराची ढेकर दिली

शेवटी देवाची आणा भाकली

त्याला फुरसत नाय गावली

वैतागून मोप भगती केली

रडतखडत देवाची पावलं आली

म्हणाला माणसांनी, माझीच मेंढी केली

राजकारण्यांनी निर्दयतेने कापली.

माणसातील वाघावी मेंढी झाली

उरली सुरली आशा संपली

मानेच्या कण्याची ताकद नुरली

स्वतःहून कापाया तयार झाली

कापून कापून, कापाया काय उरली?

आयुर्वेदात कोजागिरीला विशेष महत्व आहे, कारण कोजागिरीच्या चंद्राचा आकार नेहमीच्या पौर्णिमेच्या चंद्राच्या आकारापेक्षा मोठा असतो. या दिवशी चंद्र विशेष आवुर्वेदिक शक्तीचा वर्षाव करीत असतो. यादिवशी दुधाची खीर अथवा मसाल्याचे दूध साधारण रात्री आठ ते बारा वाजेपर्यंत चांदण्यात उघडे ठेऊन पितात. असं म्हणतात , हे दूध दम्याला गुणकारी असते.

तसं पाहिलं तर चंद्राचं नातं आपल्याला फार जवळचे आहे. भाऊबीजेला ज्या स्त्रीयांना, मुलींना भाऊ नसतो, त्या चंद्राला भाऊ म्हणून ओवाळतात. म्हणून लहान मुले चंद्राला "वांदोमामा" म्हणतात, आणि या मामावर अनेक बालगीते आहेत. तरूण, तरूणी तर या चंद्राला साक्षी ठेऊन प्रीतीच्या आणाभाका घेतात. चित्रपटात पूर्वी चंद्राच्या उपस्थितीतच प्रेम गाणी पूर्ण होत. तसं पाहिलं तर प्रत्येक पौर्णिमेला विशेष महत्व आहे.

वैत्र - हनुमान जयंती, वैशाख - बौद्ध पौर्णिमा, ज्येष्ठ - वट पौर्णिमा, आषाढ - गुरू पौर्णिमा, श्रावण - राखी पौर्णिमा, भाद्रपद - प्रोष्ठपदी पौर्णिमा, आश्विन - कोजागिरी पौर्णिमा, कार्तिक - त्रिपुरी पौर्णिमा, मार्गशीर्ष - दत्त जयंती, पौष - शाकंभरी पौर्णिमा, माघ - माघी पौर्णिमा, फाल्गुन - होळी.

केव्हाही अनुभव घ्या, चंद्राच्या चांदण्यात शीतल, प्रसन्न, आल्हाददायक  वाटते. त्याच्या प्रकाशात फुले उमलतात, नव्हे तो हळूवारपणे त्यांना उमलण्यास मदत करतो. चंद्राला पाहून तर पृथ्वीवरील सागरालाही भरती येते तर मनुष्यप्राणी किंवा वनस्पतींची काय कथा.

कोजागिरीचा कुलधर्म फार महत्वाचा असतो. या दिवशी कोजागिरी व्रत करतात. आल्हाददायक वातावरणात  आकाशातून लक्ष्मी या रात्री पृथ्वीवर येते आणि कोण जागलेले आहे हे पाहून त्याला सुख समृद्धी बहाल करते. म्हणून या रात्री जागे राहून घर उघडे ठेवतात. या रात्री लक्ष्मीची प्रतिक्षा करताना जागे राहून मनोरंजनाचे कार्यक्रम करतात, व्रतस्थ राहतात. रोजच्या धकाधकीच्या, चिंतेच्या वातावरणात कोजागिरी एक नवचैतन्य निर्माण करते.

कोजागिरीच्या चांदण्याचा  दुधाळ प्रकाश, त्याची शीतलता मनाची प्रसन्नता वाढविते, आणि आपणा निसर्गाच्या अधिकाधिक जवळ जातो.

काल एका मंदिरात जाण्याचा प्रसंग आला. मंदिर फारच प्रसन्न होते. भारतात हिंदूंच्या मंदिरात त्या देवतेच्या समोरील बाजूस त्या देवतेच्या परम भक्ताची अथवा वाहनाची मूर्ती असते. उदा. रामा समोर हनुमान, विष्णुसमोर गरूड, देवी समोर सिंह, महादेवासमोर नंदी वगैरे.

अषीच चर्चा चालली असता, असे जाणवले की या व्यतिरिक्त देवळाच्या गाभार्‍यात पितळेचे अथवा संगमरवरी दगडाचे कासव असते. प्रश्न पडला की कासवाचे प्रयोजन काय? ते काही कुठल्या देवाचे वाहन नाही. शिवाय सर्व प्रकारच्या देवळांतून कासव असतेच.

कोणी म्हणाले, अमृतमंथनासाठी कासवाने टेकूचे काम केले म्हणून त्याला इथे स्थान दिले गेले. कोणी म्हणाले, तो अत्यंत गरीब प्राणी आहे म्हणून. अजिबात काही पटेना. मग काही अर्थ लावता येईना. कारण जे कारण देले जाईल ते पटले पाहिजे ना! मग एकाच्या डोक्यात आले, तिथे एक आजोबा बसले होते त्यांना विचारू यात. त्यांनी सांगितले -

सर्व प्राणी आपल्या पिल्लांची काळजी घेतात, ती लहान असतात तेव्हा त्यांना हालचाल करता येत नाही. शिवाय त्यांना प्रेमाने वाढवावे लागते. संकटकाळी पिल्लांना सुरक्षित स्थळी हलवावे लागते. त्यांना माया द्यावी लागते. माणूस काय करतो, बाळाला जवळा घेतो. कोंबडी पिलांना पंखाखाली घेते. बाळ बिलगून बसते आणि प्रेमाने वाढते. कासवाच्या बाबतीत मात्र तसे काहीही घडत नाही, कासव पिल्लांना कशी माया देते माहित आहे, ते पिल्लांकडे फक्त पाहते, आणि पिल्लांची मायेने वाढ होते. कासवाला पिल्लांना जवळ घ्यावे लागत नाही.  म्हणून जे कासव देवळाच्या गाभार्‍यात असते. त्याला तुम्ही हात नाही लावला तरी, ते तुमच्याकडे पाहिल्यावर, देवाची माया तुम्हाला मिळते. बघा त्याच्या नजरेत एवढी शक्ती आहे.

खरोखर देवाची कमाल आहे, काय त्याने जग बनवलंय. मांजर पिलांच गळा दातात पकडून उचलते, पण पिलांना दात लागत नाही. मगर तोंडात पिले भरते, आणि हलवते, पण पिले गुदमरत नाहीत. अजब आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबईचे कमिशनर म्हणाले, मुंबई काय कोणाच्या बापाची नाही. असं बोलायचं काही काम होतं का? पण नाही एवढ्या मोठ्या जागेवरून अशी खळबळजनक विधाने करायची नसतात, हे त्यांना कोणी सांगावं. म्हणजे महाराष्ट्रात, मुंबईत बसून असं विधान म्हणजे आहे की नाही गंमत. पेटले रान. बोलणारे बाजूला झाले, बाकीच्यांच्यात जुंपली. दसर्‍याला उद्धव ठाकरेंचे, अफाट जनसमुदायासमोर भाषण झाले, ते म्हणाले होय मुंबई आमच्या बापाचीच आहे. आज नारायण राणे काय म्हणतात ते पाहू या

http://www.esakal.com/esakal/10112008/Maharashtra94D466BB90.htm

मुंबई "यांच्या' बापाची कशी? - नारायण राणे
मुंबई, ता. १० - "उद्धव ठाकरे म्हणतात, मुंबई आमच्या बापाची आहे. म्हणून मी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून विचारले, तर कळले सातबाराच्या उताऱ्यावर त्यांची कुठे नोंद नाही, मग मुंबई यांच्या बापाची कशी?'
अशा शब्दांत महसूल मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील वक्तव्याची खिल्ली उडविली आहे. शिवसेना आता बाळासाहेब चालवित नाहीत; तर दुसरेच कोणी तरी चालविते, अशी टीकाही राणे यांनी केली आहे.

किती बालीशपणा. मुंबईचे नाव सातबारा उतार्‍यावर असायला ती काय खाजगी मालमत्ता आहे काय? जेव्हा ’ भारत माझा देश आहे’ असे आपण म्हणतो, तेव्हा भारताचा सातबारा उतारा शोधायची गरज नाही. ठाकरे म्हणाले, याचा गर्भितार्थ असा की, महाराष्ट्रात जन्म घेतलेल्यांची मुंबई आहे.

जर आपल्या घरात चोर घुसला तर त्याला पेकाटात लाथ मारून हाकलून देतात, त्याला सातबारा उतारा दाखवत नाहीत. शनिवार वाडा, ताजमहाल, कुतुबमिनार, सर्व गड किल्ले, संसद अशा सर्वाचे सातबारा उतारे तयार करावे लागतील.

होय मुंबई आमच्या बापाचीच आहे, संयुक्त मुंबईचा लढा देतानाचा इतिहास मागे जाऊन पहावा.

  • संयुक्त महाराष्ट्राबद्दल CIIL येथील लेख
  • महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळातील संयुक्त महाराष्ट्र लढ्याविषयीची माहिती
  • ही संकेतस्थळे पहा, आणि ही पहा नावे हुताम्यांची

    हुतात्म्यांची नावे

    २१ नोव्हेंबर १९५५ चे हुतात्मे[१] १) सीताराम बनाजी पवार २)जोसेफ डेव्हिड पेजारकर ३)चिमनलाल डी.सेठ ४) भास्कर नारायण ५)रामचंद्र सेवाराम ६)शंकर खोटे ७)मीनाक्ष मोरेश्वर ८)धर्माजी नागवेकर ९)चंद्रकांत लक्ष्मण १०)के.जे.झेवियर ११)पी.एस.जॊन १२शरद जी. वाणी १३)वेदीसिंग १४)रामचंद्र भाटिया १५)गंगाराम गुणाजी

    मुंबईच्या वरिष्ठ न्यायालयासमोर फ्लोरा फाउंटनवर मुंबई सरकारने मिरवणुकीवर केलेल्या गोळीबारात वरील १५ जणांनी हौतात्मे पत्करले.

    जानेवारी १९५६ चे हुतात्मे १६) बंडू गोखले १७)निवृत्ती विठोबा मोरे १८)आत्माराम रावजी पालवणकरण १९)बालप्पा सुनप्पा कामाठी २०)धोंडू लक्ष्मण पारडूले २१)भाऊ सखाराम कदम २२) यशवंत बाबाजी भगत २३) गोविंद बाबूराव जोगल २४) भाऊ सखाराम कदम २५) पांडुरंग धोंडु धाडवे २६)गोपाळ चिमाजी कोरडे २७) पांडुरंग बाबाजी जाधव २८) बाबू हरु काते २९) अनुप महावीर ३०) विनायक पांचाळ ३१) सीताराम गणपत म्हात्रे ३२)सुभाष भिवा बोरकर ३३)गणपत रामा तानकर ३४)सीताराम गयादीन ३५) गोरखनाथ रावजी जगताप ३६) महंमद अली ३७) तुळशीराम पुंजाजी बेलसरे ३८) देवाजी सखाराम पाटील ३९) शामलाल जेठानंद ४०) सदाशिव महादेव भोसले ४१) भिकाजी पांडुरंग रंगाटे ४२) बासुदेव सूर्याजी मांजरेकर ४३) भिकाजी बाबू बाबरकर ४४)सखाराम श्रीपत ढमाले ४५) नरेंद्र प्रधान ४६) शंकर गोपाळ कुष्टे ४७)दत्ताराम कृष्णा सावंत ४८)बबन बापू बरगुडे ४९) विष्णु सखाराम बने ५०)सीताराम धोंडु राडे ५१) तुकाराम धोंडु शिंदे ५२)विठ्ठल गंगाराम मोरे ५३)रामा लखन विंदा ५४)एडवीन आमरोझ साळ्वी ५५)बाब महादू सावंत ५६)वसंत द्वारकानाथ कन्याळकर ५७)विट्ठल दौलत साळुंके ५८)रामनाथ पांडुरंग अमृते ५९)परशुराम अंबाजी देसाई ६०)घनशाम बाबू कोलार ६१)धोंडू रामकृष्ण सुतार ६२)मुनीमजी बलदेव पांडे ६३)मारुती विठोबा मस्के ६४)भाऊ कोंडीबा भास्कर ६५)धोंडो राघो पुजारी ६६)-दयसिंग दारजेसिंग ६७) पांडू महादू अवरीरकर ६८) शंकर विठोबा राणे ६९)विजयकुमार सदाशिव बेडेकर ७०)कृष्णाजी गणू शिंदे ७१)रामचंद्र विठ्ठल चौगुले ७२)धोडु भागु जाधव ७३)रघुनाथ सखाराम बेनगुडे ७४)काशीनाथ गोविंद चिंदरकर ७५) करपैया किरमल देवेंद्र ७६)चुलाराम मुंबराज ७७)बालमोहन ७८) अनंता ७९)गंगाराम विष्णु गुरव ८०)रत्नु गोंदिवरे ८१) सय्यद कासम ८२)भिकाजी दाजी ८३)अनंत गोळतकर ८४)किसन वीरकर ८५)सुखलाल रामलाल बंसकर ८६)पांडुरंग विष्णु वाळके ८७)फुलवरु मगरु ८८)गुलाब कृष्णा खवळे ८९)बाबूराव देवदास पाटील ९०) लक्ष्मण नरहरी थोरात ९१)ठमाबाई विठ्ठल सूर्यभान ९२) गणपत रामा भुते ९३)मुनशी वझीर अली ९४)दौलतराम मथुरादास ९५) विठ्ठ्ल नारायण चव्हाण ९६) सीताराम घाडीगावकर ९७) अनोळखी ९८)अनोळखी बेळगाव ९९) मारुती बेन्नाळकर १००)मधुकर बापू वांदेकर १०१)लक्ष्मण गोविंद गावडे १०२) महादेव बारीगडी १०३)सौ. कमळाबाई मोरे ( निपाणी) १०४) व १०५) नावे मिळत नाही

    एवढ्या आमच्या महाराष्ट्रीयांनी हौताम्य पत्करल्यावर आम्ही ठासून म्हणणारच "होय मुंबई आमच्या बापाचीच आहे" 

    भारत माझ्या बापाचा आहे, कारण स्वातंत्र्यलढ्याला नंदुरबारच्या शिरीषकुमार पासून जालीयनवालाबाग पर्यंतचा इतिहास आहे. हे आमचे दुर्दैव की आम्ही त्यावेळेस जन्मलेलो  नव्हतो, नाहीतर कोणी सांगावं आम्हीही शहीद झालो असतो.

    आपापसातले तार्किक वाद बाजूला ठेऊन सर्व राजकारण्यांनी आपल्या जन्मभूमी, मातृभूमीसा साठी हातात हात घालून सामना द्यायला पाहिजे.

    कायदेशीररीत्या विवाह न करता पत्नी म्हणून पुरुषासमवेत एकत्र राहणाऱ्या कोणत्याही महिलेला यापुढे पत्नीचा दर्जा देण्याच्या भारतीय दंड संहितेतील प्रस्तावित तरतुदीस बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने हा कायदा करुन संपुर्ण भारतीय विवाह संस्थेला मोडकळीत आणले आहे.

    1. भारतीय समाज आणि संस्कॄती वैवाहिक नात्यांवर अवलंबुन आहे. यामुळे विवाहबाह्य संबंध समाजाला मान्य करावे लागतील. यावरुन आपले कायदे चांगल्या-वाईटाचा विचार न करता फक्त निवडणुकीतील मतांसाठी केले जातात हे लक्षात येत आहे. असे कायदे देशाच्या मुळावर आघात करत आहेत.
    2. सरकारने "पत्नी" या शब्दाची व्याख्या बदलली आणि सगळ्या विवाहबाह्य संबंधांना कायदेशीर करुन टाकले आहे. कोणतिही स्त्री आता विवाह बंधनात न अडकता पत्नीचे फायदे मिळवु शकते. स्त्री-पुरुषांनी विवाहबाह्य संबंध ठेवणे हा त्यांचा व्यक्तीगत प्रश्न आहे. पण त्या नात्याला विवाहाचा दर्जा देणे हे अतिशय चूक आहे.
    3. सरकारने हा कायदा करताना सर्व द्वि-भार्या कयद्याचाही विचार करु नये हे अगदी चुकिचे आहे. आता जर कोणी विवहित पुरुष अन्य स्त्री बरोबर राहत असेल तर तो द्वि-भार्या कायद्यात अडकेल का?
    4. पण या कायद्याने सर्वात जास्त अडकला तो पुरुष, असे संबंध जर स्त्री-पुरुषाच्या परस्पर संमतीने घडत असतील तर फक्त स्त्री पोटगीला लायक कशी. आपल्या मुर्ख सरकारला "पती" या शब्दाची व्याख्या का बदलाविशी वाटत नाही? जर स्त्री आणि पुरुष कायद्यासमोर समान असतील तर त्यांना यात भेदभाव का? पुरुषाला पण पोटगीचा अधिकार का नसावा? सरकारच्या अशा व्यवहारामुळे, आपण अजुनही मानतो की स्त्री पुरूषापेक्षा जास्त कमत नाही.
    5. असे विवाहबाह्य संबंधाचे लोण "सुशिक्षीत-असंस्कॄत" उच्च-मध्यम वर्गीयांचे देणे आहे. विवाहबाह्य संबंधाचे खुळ भारतात पाश्चात्य प्रभावाने सुरु झाले आहे. जगातील व्यक्तीगत स्वातंत्र्याचा झेंडा मिरवणा‍‍‍‍‍र्‍या अमेरिकेतही विवाहबाह्य संबंधानी पोटगी मिळत नाही. असे संबंध जगभरात तात्पुरते मानले जातात, ज्यामुळे स्त्री-पुरुषाला एकमेकांना समजण्याची संधी मिळते, आणि त्याचे रुपांतर विवाह व्हावे अशी सर्व सामान्य अपेक्षा असते.

    असे कायदे करणारे भारतात असतील तर भारतीय संस्कॄतीची वाट लागायला वेळ लागणार नाही. त्यात महत्वाचा वाटा "सेवानिवृत्त न्या. मल्लीमथ, एस. वर्धाचार्य, आयएएस अमिताभ गुप्ता, आयपीएस डॉ. माधव मेनन, पी. व्ही. सुब्बाराव आणि महाराष्ट्र सरकार" या मुर्खांचा नक्की असेल.

    http://www.esakal.com/esakal/10092008/Specialnews20416194EE.htm

    आमच्यावर कायद्याचा उलटा आसूड का उगारला जातो आहे?

    मी एक सामान्य स्त्री. समाजातल्या कोणत्याही सामान्य, मध्यमवर्गीय घरात आढळणारी. माझं घर, संसार, शिक्षण इतर कोणत्याही सामान्य स्त्रीप्रमाणेच. परवा मी आयुष्याच्या वेगळ्या वळणावर येऊन उभी राहिले. एका अनपेक्षित, दुर्दैवी घटनेने माझं घर हादरलं. आमचा नीतिमूल्यांवरचा विश्‍वास उडाला. आमच्या घरातल्या अलीकडेच कामाला लागलेल्या मुलीने समोर आलेल्या वडिलांच्या- पोलिसांच्या भीतीने थेट आत्महत्या केली... वरच्या मजल्यावरून उडी मारल्यामुळे ती निधन पावली. आम्ही सारे जण नखशिखांत हादरलो. गांगरून गेलो... काय करावं हे कळेना. थोड्याच वेळात पुढचे सोपस्कार सुरू झाले. पोलिस, वकील, हितचिंतक जमा झाले

    दैनिक सकाळ मधील अगतिकता. असे अनुभव अनेकांना येतात, पण कोणी पुढे येत नाही. कारण आजूबाजूची मंडळी खरे खोटे न पाहता, इतक्या दिवसांचा सहवास विसरून, यांनीच काहीतरी केले नसेल ना? अशा अविश्वासाच्या नजरेने पाहतात. आता हे कुटुंब अडकले, पैसापरी पैसा जाईल, शिवाय मानहानी वेगळी. यांना खूपच आर्थिक व्यवहार करावे लागतील. वकील मंडळी तर ताणून धरतात, म्हणतात काही काळजी करू नका मी आहे ना? जुळवून घ्यायच्या ऐवजी लावून देतात. खरं तर पोलीसांना कळत असते, पण ते तरी काय करणार, तक्रार आल्यावर. आता कोर्ट बाजी आली, पैसा आला. ह्या कुटंबाचे दुर्दैव बाकी काय?

    माणसानं मध्यमवर्गीय नसावं. कोणीही उठतं आणि पेकाटात लाथ घालतं.मग आपण कुत्र्यासारखं केकाटत बसायचं. सरकारचे कर भरायचे, भिऊन रहायचे. झोपडपट्टीत  राहणारा सुखी. राजकारणी सुखी. मी तर म्हणतो भिकारी अत्यंत सुखी, त्याचा शर्ट मागून घ्यावा.

    हा लेख वाचा, आणि जर कोणाजवळ उपाय असेल तर सुचवा.

    गेला अखेर ’सिंगूर’ बंगाल मधून टाटाचा ’नॅनो’ मोटारीचा प्रकल्प राज्याबाहेर गेला. राज्यकर्त्यांना यातून काय मिळाले. तरूणांनी किती मोठमोठी स्वप्ने पाहिली असतील. कित्येकांनी सुटे भाग पुरविण्यासाठी  कर्ज काढून कारखानदारी करण्याचे ठरवले असेल, त्यांचे पुढे काय? त्या कर्जाचे काय करायचे. याचा विचार राजकारण्यांनी केला आहे काय? आता देश परदेशातील उद्योग बंगालचा विचार का करतील? जे परदेशी गुंतवणुकदार असतील ते भारताताचा हजार वेळा विचार करतील.  कित्येकांची फसवणूक झालेली आहे, कामगारांची, छोट्या कारखानदारांची, शेतकर्‍यांची, पुरवठादारांची. याला जबाबदार कोण. नाहितरी टाटाचेही नुकसान झालेच असेल ना? बाकीची राज्ये त्यांना आमंत्रण देताहेत, मग बंगाल सरकारला कळू नये काय? नुकसान सहन करण्याची ताकद टाटात आहे, पण त्यांच्याशी संलग्न घटकात नाही. कंपनीला जेव्हा नुकसान होते तेव्हा त्याचे परिणाम भोगावे लागले तरी ते भविष्यात पण सामान्य माणसाला भोग लगेचच भोगावे लागतात, शिवाय मोठ्या कंपन्यांच्या मागे मोठ्या बॅंका उभारतात, सामान्य माणसाला नातेवाईक सुद्धा लांब करतात.राजकारणावर अर्थकारण अवलंबून असते, आणि त्यावरच विकास अवलंबून असतो. विरोध करणार्‍या राजकारण्यांचं काय गेलं? ते परत दुसरा मुद्दा घेऊन आंदोलन करायला मोकळे.

    ज्यांच्या  घरात चूल पेटणार होती, त्यांच्या घरात अंधार. जिथे कारखाने लोकांची पोटे भरणार होती, तिथे नुसत्या भिंती उभ्या असतील. कल्पना करवत नाही, त्यावर अवलंबून असणार्‍या लोकांचे काय हाल असतील. शिक्षण आणि रोजगाराच्या संधी ज्या चालून आल्या होत्या, त्या या राजकारण्यांनी हिरावून घेतल्या. विकासाला खीळ बसली. खरं आहे हे उद्योग सरकारकडून अल्प किमतीत जागा घेतात, कर सवलत घेतात, नफा कमावतात, पण लोकांची पोटे भरली जातात ना.

    आता बाकीच्या राज्यांनी विचार करायची वेळ आलेली आहे, जे उद्योग सध्या चालू आहेत त्याना टिकवून धरावे, नाहीतर?  

    आम्हांला हे कळत नाही की, भारतात जे काही चाललंय ते जगापासून लपून रहात नाही, आपल्या वृत्तवाहिन्या हे काम चोख बजावतात. हे सर्व असे असेल तर परदेशी कंपन्या ज्या आता भारतात गुंतवणूक करून धंदा करताहेत त्यांनी वेगळा विचार करू नये.

    भारतात एक कायदा पास झाला, सुप्रीम कोर्टाने, शिक्कामोर्तब केले, सार्वजनिक ठिकाणी सिगारेट प्यायला बंदी. भारतात जनता पान तंबाखू खाऊन पचापचा थुंकते, रस्ते लालीलाल करते, बसमध्ये बसून लोकांचे कपडे रंगपंचमीसारखे रंगवते त्यांना काही कायदा नाही. सिगारेट शौकिन सिगारेट ओढताना धूर काढतात, तो हवेत विरून जातो, पण या रंगार्‍यांचे काय? दारूच्य दुकानात बिअरची कॅन विद्यार्थी पीत उभारतात, त्यांच्या कडे कुणाचेही लक्ष नाही. आणि बिचारे सिगारेटवाले बरे सापडले.

    गुटखा तर राजमान्यच झालेला आहे, त्याचे दुष्परिणाम तरूण पिढी भोगती आहे. तरूण पिढी तर सिगारेटला हात लावत नाही, हे फार हलके व्यसन झाले, त्यांना पाहिजे गुटखा, दारू ( अजून भरपूर काही).

    भारतात कोर्ट कोणत्या कामात लक्ष घालेल, पत्ता नाही. एवढे खटले प्रलंबीत आहेत, एवढे साधे कैदी तुरूंगात सडताहेत, त्याचे काही नाही, कोणताही विषय घ्यायचा, ( जनहितार्थ याचिका दाखल करायला काय लागतंय) आणि त्यावर गुर्‍हाळ लावायचे. खरं तर आता जनहितार्थ याचिका दाखल करण्याची रूपरेखा ठरवण्याची वेळ आलेली आहे.अरे एवढी लोकसंख्या भराभर वाढती आहे, होऊ द्या की कमी.

    बंदीच आणायची तर, सायबर कॅफे मध्ये विद्यार्थी नको त्या साईट बघतात त्यावर आणा.

    काल धुळ्यात हिंसाचार झाला, बातमी आहे. त्यात शब्द असतात,’विशिष्ट जमात’ आणि हे सर्व बातमीदार स्वतः अनुभवलेले क्षण लिहीतो. असा उल्लेख करण्यापेक्षा सरळ सरळ लिहाना, कोणती विशिष्ट जमात होती ते. बातम्या फारच मजेदार असतात. एखाद्या भागात दंगल झाली तर लिहीतील, त्या भागातील निवडून आलेला राजकीय पुढारी, हे उघड सत्य असताना, शब्दांचे खेळ कशासाठी? पुण्यात तुकाराम महाराजांचे देऊळ, जिथे पालखी वर्षानुवर्षे थांबत असे, ते हलवले गेले, पण काही विशीष्ट, समाजाची प्रार्थनास्थळे, भर रस्ता अडवून उभी आहेत, त्यांचे काय? आडून आडून लिहीण्यापेक्षा सरळ नावालाच हात घालावाना.

    B.R.T. चा एवढा खेळ खंडोबा चाललेला असताना वर्तमानपत्राचे अग्रलेख झोपलेत काय? त्यांच्या तलवारीची धार बोथट झाली काय? खरे तर पत्रकारांनी निर्भिडपणे आपली मते मांडावीत.

    औद्योगिक जगतातील सर्वात शक्तीशाली महिलांमध्ये भारतीय वंशाच्या इंद्रा कॄष्णमुर्थी नूयी या प्रथम क्रमांकावर आहेत. त्या पेप्सीच्या प्रमुख कार्यकारी संचालिका व अध्यक्षा आहेत.

    REF: CNN MONEY

    आपणा सर्व भारतीयांना या गोष्टीचा अभिमान असावा की वैयक्तिक स्वातंत्र्याचा डंका वाजवणा‍र्‍या अमेरिकेत अजुनही एकही स्त्री राष्ट्रपती होऊ शकली नाही, पण आपल्या रंजल्या-गांजल्यांनी "इंदिरा" दिल्लीत बसवली. तुमच्या माहीतीसाठी, अमेरीकन स्वतंत्रतेला आता २०० पेक्षा अधिक वर्षे झाली आहेत. सर्व समानतेचा कायद्यासाठी लढा देणार्‍या आणि काळ्या जनतेला समानतेचा प्रकाश दाखवणारे मार्टिन किंग ज्यु. यांच्या गुरुला आपण अजुनही आपल्या नोटांवर आणि देशाच्या पित्याचे स्थान दिले आहे.

    नारीला दुय्यम समजण्यात आपण जगभरात कुप्रसिद्ध आहोत. हजारो वर्षे नारीला तळपायाखाली ठेवणार्‍या भारतात फुले, कर्वे आणिक कित्येक पुढारी होऊन गेले. भारत सरकारला विशेष आरक्षणे बनवावी लागली. तरीसुद्धा आपण आजही नारीला समान अधिकार नाहीत म्हणुन ओरडतोय. अशा देशातील ही इंद्रा, अजुनही नारी शक्तीवर विश्वास नसणार्‍या अमेरिकेत‍ इतकी वर गेली कशी?  मेहनत म्हणा, नशीब म्हणा, पुण्याई म्हणा पण मला त्यांचा खुप अभिमान आहे की त्या भारतीय आहेत. त्यांच्या या यशात त्याच्या भारतीयत्वाचा काहीही हात आहे का नाही, ते त्या सांगतीलच.

    पण आज हे मात्र नक्की की, आरक्षणाने कोणतीही असमानता नाहीशी होत नसते.

    जया बच्चन म्हणाल्या, "हम तो यूपी के है, हिंदीमेंही बोलेंगे. महाराष्ट्रके लोग हमें माफ करना...'

    असं सहा तारखेला जया बच्चन म्हणाल्या आणि झाले राज ठाकरेंनी हा मुद्दा उचलून धरला. बरोबर आहे. काय गरज आहे असे भडक शब्द उच्चारण्याचे. आपण महाराष्ट्रात राहतो, रोजी रोटी इथली आहे. हिंदीतच बोलायचे आहे ना, मग त्यावर ही फोडणी कशासाठी.  आणि यांची जीभ रेटते कशी हे बोलायला. याला मराठी राजकारणीच जबाबदार आहेत. एका तरी आमदार खासदाराने यावर साधा निषेध नोंदवला काय? मराठी माणूस म्हणे रागाने पेटून उठला तर कोणाच्या बापाला ऐकणार नाही, अरे पण त्याला कधी रागच येत नाही त्याचे काय. सर्वांना एक गोष्ट ठणकावून सांगावी, महाराष्ट्रात राहायचे आहे, तर मराठी आलीच पाहिजे, तुम्ही आमच्या दारात आलात तर आमचा कायदा चालणार, बस्स‌. घरी आलेला पाहुणा जर जास्त आगाऊपणा करू लागला तर त्याला आपण बाहेरचा रस्ता दाखवतो, आणि जास्तच करू लागला तर, पेकाटात लाथ घालतो ना? तुमच्या राज्यात दुष्काळ आहे, रोजगार नाही, त्याला मराठी माणूस काय करणार? एका इमारतीत २८ कुटुंबे आहेत, त्यापैकी काही सधन आहेत, तर काही गरीब आहेत, म्हणून काय बाकीच्यांनी या सधन घरात घुसखोरी करावी? मदत मागावी पण अदबीने, आर्जवाने, मस्ती केली तर हाकलून लावण्यात येईल. एका मराठी कुटुंबाकडे जर हिंदी कुटुंबीय मदत मागत असेल तर त्याने मराठीतच मागावी ना? भीक मागणार्‍याने भीक देणार्‍याच्या भाषेत मागावी, नाहितर भीक मिळणार नाही.

    जया बच्चन महाराष्ट्रात राहतात, त्यांचा विकास इथेच झाला, मग ही अरेरावी का? बरे यावर अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, किंवा ऐश्वर्या राय यांचे काहीच वक्तव्य नाही हे कसे काय? त्यांची ही मूक संमती असणार, हे म्हणणे धाडसाचे होणार नाही काय?

    काय न्याय आहे, राज ठाकरे आपल्या भाषेबद्दल बोलतात तर त्यांच्यावर भाषणबंदी येते, आणि बाकी मनसोक्तपणे विधाने करतात. जया बच्चन यांनी विधान केले म्हणून राज ठाकरे आंदोलन करतात, म्हणजे पर्यायाने याला जबाबदार जया बच्चनच आहेत. राज ठाकरेंच्या रूपाने मराठी भाषेला वाली मिळाला, हीच परमेश्वराची कृपा म्हणायची.

    आठ तारखेला जयाबच्चन यांनी माफी मागीतली, मागणारच, महाराष्ट्रात बच्चन कुटुंबीयांचे चित्रपट बंद पडू लागले ना? नाक दाबल्यावर तोंड उघडले.

    http://www.esakal.com/esakal/08192008/SpecialnewsC35FDA4908.htm

    नारायण धारप यांचे निधन

    पुणे, ता. १८ - प्रसिद्ध भयकथा आणि विज्ञानकथालेखक नारायण धारप (वय ८२) यांचे सोमवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.
    तीन वर्षांपासून धारप यांना फुफ्फुसाचा विकार होता. त्यातच त्यांना न्यूमोनिया झाला. विकार बळावल्याने रात्री दहाच्या सुमारास त्यांचे निधन झाले. धारप यांच्या पार्थिवावर उद्या (ता. १९) वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
    धारप यांचा जन्म २७ ऑगस्ट १९२५ रोजी झाला. मुंबई विद्यापीठातून बी. एस्सी. टेक ही रसायनशास्त्र विषयातील पदवी त्यांनी संपादन केली. त्यानंतर त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्याच सुमारास "अनोळखी दिशा' हा त्यांचा पहिला भयकथासंग्रह प्रकाशित झाला. "समर्थ' ही त्यांची व्यक्तिरेखा आणि समर्थकथा गाजल्या. "चंद्राची सावली', "गोग्रॅमचा चितार', "नेनचिम' यासह त्यांच्या कथा आणि कादंबऱ्यांची संख्या सव्वाशेच्या जवळपास आहे. मार्चअखेरपर्यंत त्यांचे लेखन सुरू होते.

    ही बातमी वाचली, आणि अक्षरशः नातेवाईक गेल्याचे दुःख झाले. १९७० पासून त्याचे साहित्य वाचतोय. पहिली कादंबरी वाचली, चंद्राचे सावली. खरोखर मूर्तिमंत भय. ती कल्पना, काही औरच. नंतर वाचली "ऐसी रत्ने मेळवीन" अशी कल्पना कोणीतरी करू शकतं, यावर विश्वासच बसू शकत नाही. एवढ्या मुलांमधून काही असामान्य, प्रगल्भ, मुलांचा शोध लावून त्यांच्यातील शक्तीचा परलोकी वापर करून करून घेण्याची कल्पना, बस तिथे नारयण धारपच पाहिजेत. बाबूराव अर्नाळकरांनी काही व्यक्तीरेखा अजरामर केल्या, काळापहाड, झुंजार वगैरे, त्याच प्रमाणे ’समर्थ’ व्यक्तीरेखा समर्थपणे नारायण धारपांनीच पेलली. रसायनशास्त्राचा पदवीधर असं काही लिखाण करू शकतो? पण सर्व रसायन अगदी जमून गेलं.

    त्यानंतर अनेक लेखकांनी हा भयकथा, गूढकथा प्रकार पुढे नेला, पण नारायण धारप एकमेवच.  

    १९८०च्या सुमारास आमचा असा एक ग्रुपच होता, त्यांच्या कादंबर्‍य़ा, कथासंग्रह वाचणार्‍यांचा. पुस्तक आले रे आले की, ते केव्हा वाचतो असे होणार. मग सर्वांनी वाचल्यावर, चर्चा होणार.त्यासाठी शासकीय विभागीय ग्रंथालयावर रोज हजेरी. झालं नारायण धारप गेले आणि भयकथा, गूढकथा हा विषयच संपला.  

    http://www.esakal.com/esakal/08182008/SpecialnewsD07255B4F3.htm

    ही तर ध्येयपूर्तीची सुरवात - मायकेल फेल्प्स
    बीजिंग - ऑलिंपिक स्पर्धेत आठ सुवर्णपदके मिळविण्याचे उराशी बाळगलेले स्वप्न मायकेल फेल्प्सने आपल्या दुसऱ्याच स्पर्धेत बीजिंगमध्ये सत्यात उतरवले. पण एवढ्यावर तो समाधानी नाही.
    तो म्हणाला, ""आयुष्यात बाळगलेल्या उद्दिष्टांपर्यंत पोचण्याची ही तर सुरवात आहे. मला अजून खूप काही मिळवायचे आहे.''
    स्पिट्‌झच्या सात सुवर्णपदकांचा विक्रम मोडल्यावर झालेल्या पत्रकार परिषदेत फेल्प्स आपल्या कारकिर्दीविषयी, उद्दिष्टांविषयी भरभरून बोलला. त्याच्या बोलण्यात कमालीचा आत्मविश्‍वास आणि दुर्दम्य इच्छाशक्ती दिसून येत होती.

    http://www.esakal.com/esakal/08182008/TajyabatmyaSportsPune03EB088032.htm

    भारतीय फलंदाजांचा "खेळखंडोबा'
    डम्बुल्ला - श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात फलंदाजांच्या गचाळ कामगिरीमुळे भारत अडचणीत आला आहे.

    या दोन बातम्यांपैकी दुसरी बातमी वाचली की, संताप येतो, आणि कीवही करावीशी वाटते. एक जो आठ सुवर्णपदके मिळवतो, तरीही विनयाने म्हणतो, मला अजून खूप करावयाचे आहे. या क्रिकेटपटूंना आपणच डोक्यावर घेतले आहे, आणि ते बेशरमपणे हारतात. World Cup ला काय झाले, दुसरा कसा हारतो, यावर आपण डोळा लावून बसलो होतो.

    हे जे क्रिकेट बोर्ड आणि खेळाडू आहेत, यांना कायमचे घरी बसवा  आणि तो पैसा पुढील चार वर्षांनी येणार्‍या ऑलिंपिक मध्ये खेळाडू तयार करण्यासाठी वापरा. बास या क्रिकेटपटूंचे लाड. कोणीही भरंवशाचे नाहीत. बरेचसे खेळाडू म्हातारे झालेत, ते म्हातार्‍या घोड्याप्रमाणे  रेस जिंकू शकणार नाहीत.

    असं कुठलं कारण आहे की, भारतात जन्म घेतल्याचा अभिमान वाटावा.


    *********************

    दुरुस्ती केलेली



    *********************



    ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा, प्राण तळमळला ॥धृ.॥

    भूमातेच्या चरणतला तुज धूता, मी नित्य पाहीला होता


    मज वदलासी अन्य देशी चल जाऊ, सृष्टिची विविधता पाहू


    तइं जननीहृद् विरहशंकीतहि झाले, परि तुवां वचन तिज दिधले


    मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन, त्वरि तया परत आणीन


    विश्र्वसलो या तव वचनी मी, जगद्नुभवयोगे बनुनी मी


    तव अधिक शक्त उद्धरणी मी, येईन त्वरे, कथुन सोडीले तिजला


    सागरा, प्राण तळमळला ... ॥१॥





    शुक पंजरी वा हिरण शिरावा पाशी, ही फसगत झाली तैसी


    भूविरह कसा सतत साहू या पुढती, दश दिशा तमोमय होती


    गुणसुमने मी वेचियली या भावे, की तिने सुगंधा घ्यावे


    जरि उद्धरणी, व्यय न तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा


    ती आम्रवृक्षवत्सलता रे, नवकुसुमयुता त्या सुलता रे


    तो बाल गुलाब ही आता रे, फुलबाग मला, हाय, पारखा झाला


    सागरा, प्राण तळमळला ...





    नभि नक्षत्रे बहुत, एक परी प्यारा मज भरत भूमिचा तारा


    प्रसाद इथे भव्य, परी मज भारी आईची झोपडी प्यारी


    तिजवीण नको राज्य, मज प्रियसाचा वनवास तिच्या जरि वनीचा


    भुलविणे व्यर्थ हे आता रे, बहुजिवलग गमते चित्ता रे


    तुज सरित्पते जी सरिता रे, तद्विरहाची शपथ घालितो तुजला


    सागरा, प्राण तळमळला ...





    या फेनमिषें हससि निर्दया कैसा, का वचन भंगिसी ऐसा ?


    त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते, भिऊनि का आंग्लभूमीते


    मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी, मज विवासनाते देती


    तरि आंग्लभूमि भयभीता रे, अबला न माझी ही माता रे


    कथिल हे अगस्तिस आता रे, जो आचमनी एक क्षणी तुज प्याला


    सागरा, प्राण तळमळला ...





    गीतकार :स्वातंत्र्यवीर सावरकर



    http://marathi.webdunia.com/miscellaneous/special08/iday/0808/12/1080812022_1.htm


     


    झी मराठी वाहिनी. वेळ रात्री ९-३० ची. कार्यक्रम "एका पेक्षा एक". कलाकार भार्गवी चिरमुले. गाणं ’लव लव करी पातं’. आता यात विशेष काय? हो यात विशेष आहेच. एवढे नृत्याचे  रियालिटी शो पाहिले पण या गाण्यातील कल्पना अगदी हृदयाला स्पर्श करून गेली. कार्यक्रमातील, T.V. समोरील सर्वांचे डोळे भरून आले. दुःखाने नाही पण माहीत नाही ती भावना काय होती, पण डोळ्यात भार्गवीने पाणी आणले.

    थोडक्यात थीम अशी, एक अपंग मुलगी अल्फा मराठी वरील एका पेक्षा एक कार्यक्रम पहात असते आणि त्यात आदेश बांदेकर नवीन ऑडिशनचे निवेदन करताना ती ऐकते, आणि तिच्याही मनात या ऑडिशनला जाण्याची इच्छा होते, आणि  त्त्यातच ती नाचायला सुरूवात करते, आणि भार्गवीने हा नाच एका पायावर केला,कारण ती मुलगी एका पायाने अधू असते, शिवाय नृत्यात चेहरा इतका बोलका होता बस्.  डोळे भरून आले. खरोखर अप्रतीम. नृत्य पाहताना भार्गवीला दुसरा पाय आहे याचा विसर पडला होता.

    अपंग आहे म्हणून काय झाले, एक पाय नसेल पण जिद्द आहे ना! ती गरूडासारखी आकाशात झेप घ्यायला लावते. अल्फा वाहिनीने अपंग कलाकारांना संधी देऊन त्याचे कौतुक करावे. लहान मुलांचा, प्रौढांचा, तरुणांचा, मुलींचा, सिनेमातील कलाकारांचा सर्वांचे कार्यक्रम झाले, पण अपंगांना, अंधांना सहभागी करून घेऊन त्यांच्याही कलेचे चीज करावे, हीच अल्फा मराठीला विनंती.

    असे झाल्यास भार्गवीच्या प्रयत्नांना यश येईल, कदाचित तिचा उद्देश सफल होईल. हा विचार सचिनने सुद्धा करावा.

    खूप वाटले या दिवसाची कल्पना करून मी काही लिहू शकेन म्हणून, पण विचार केला तर फारच भायानक चित्र डोळ्यासमोर उभे राहते.

    मागील पाच वर्षात computer ने जी प्रगती केली, ती गती पाहिली असता २०२७ साली काय होईल देवच जाणे. कोणी ऑफिसातच जाणार नाहीत. आताच अमेरिकेत घरी बसून काम करण्याची सोय आहे. त्यावेळेस picnic ला गेलेले असताना सुद्धा काम करता येईल. मुले e-school मध्ये शिकतील. शाळेचा प्रश्नच राहणार नाही. घरीच computer शाळेचे काम करील. मुले एवढी बिझी होतील, त्यांना आईवडिलांशी बोलायला वेळ नसणार, की ते कुठेतरी लहानपणातच पायावर उभारतील. मानवी क्लोनचीप्रगती झाली तर आई कोण आणि बाप कोण? भारतात लोकसंख्येचा स्फोट होणार. राहण्यासाठी शेती नष्ट होणार मग काय? असे खूप विचार आले, त्यात १५ ऑगस्ट चे काय होणार, हा तर विचारच विरून गेला. जर कोणाला १५ ऑगस्ट २०२७ या दिवसाची कल्पना करता येईल तर मला जरूर कळवा.

    या वर्षी १५ ऑगस्ट शुक्रवारी आलाय, १६ तारखेला चवथा शनिवार सुट्टी, १७ तारखेला रविवार, १९ तारीख मंगळवारी पतिताची सुट्टी, अशा पर्वणीच्या काळात भारतीयांच्या मनातील विचार समजले तर -

    सरकारी ऑफीस मधील क्लार्क - चला एक बरं झालं, वर्षाच्या सुरवातीलाच कॅलेंडर बघून तयारी केली ते. पाच दिवसांचा कोकणात जाण्याचा बेत आखला. आधीच लॉज बुक करून ठेवले. १४ तारखेला संध्याकाळी निघायचे, १८ परत, १९ ला आराम करून २० ला ऑफिसला हजर. १८ चा casual leaveचा टाकलाय झाला पास तर ठीक, नाहितर पगार कट्‍. कोणी येणार नाही १८ ला तेव्हा मी तरी येउन काय करूना? फक्त अडचण आहे ती बंड्याची, त्याच्या शाळेत कंपलसरी झेंडावंदन आहे, काय हे? घरी केले तर चालत नाही काय? पाहिजे तर डिजीटल फोटो दाखवता आला असता. उघीच सगळ्यांनाच त्रास नाही का! बरं झालं ऑफीसमध्ये झेंडावंदन करत नाहीत ते? चला तयारीला लागलं पाहिजे.

    क्लार्कची पत्नी - कित्ती छान! चार दिवस कोकणात. मजा आहे. बरं झालं बाई यांनी दूरदर्शीपणा दाखवला आणि लॉज आधीच बुक करून ठेवले. तसे हे भारी हुशार हं! १५ ऑगस्टला म्हणे महिला महिलामंडळात झेंडावंदन करणार. आम्ही जाणार ट्रिपला, तर बाकी जणी नाराज. मी म्हणते आल्यावर झेंडावंदन केले तर चालणार नाही का? मिळालंय ना स्वातंत्र्य मग त्याचे प्रदर्शन कशासाठी? इंग्रजांशी काय काअर केला होता का, की आम्ही दरवर्षी साजरा करणार म्हणून. उलट त्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या कडू आठवणी नकोत. कसा आनंदाने लोकांना हा दिवस साजरा करू द्यावा. सरकारने आनंदाप्रित्यर्थ गाड्या फुकट ठेवाव्यात. बंड्या म्हणतोय शाळेत जायाचे, पण मग बुकींगचे काय? शाळेत काहीतरी सांगता येईल. १५ ऑगस्ट काय नेहमीच येतो, कोकनात कधी जाणार?

    बंड्या - शाळेत जायची खूप इच्छा आहे पण आईबाबा नको म्हणतात. गेलं पाहिजेना? बाइंनी धमकी दिलीय सहामाहीला १० मार्क कापण्याची. कंटाळा येतो. पाऊस असेल तर चिकचिक. मैदानावर उभे करतात, आणि पाऊस असेल तर सर मात्र छत्री घेतात. आमचे काय? सरांचे भाषण ऐकायला कंटाळा येतो, पुन्हा तेच तेच सांगतात, इतिहासाचे सर याच विषयावर बोअर करतात. बाबांनी छान ट्रीप अरेंज केली आहे, मजा आहे. मी तर बाबा ट्रीपलाच जाणारच.

    नेता - यावर्षी माझा पहिला झेंडावंदन. घरच्यांना सांगीतलंय चांगलं आवरून घ्या. जायचंय. तर म्हणतात डबे बांधून घ्यायचे का? आता काय कपाळ? खादीचे कपडे चांगले स्टार्च घालून कडक इस्त्री केलेत, टोपी पण कडक केलीय. खादीत कसं एकदम प्रामाणिक असल्यासारखं वाटतं. खादी म्हणजे खा दिवसभर. फोटोवाल्याला सांगीतलंय आपले सगळ्या पोजमधले फोटो घ्यायला. आमच्या ५ वर्षात फक्त पाचच टायमाला १५ ओगस्ट येतो, हे काही बरोबर नाही. धा वीस वेळा तरी पायजेल.

    सफाई कर्मचारी - पंधरा अगस्त आला की बास, अजीबात फुरसत नसतीया. मंडळावाले हात धुवून मागं लागत्याय, साफसफाई करायसाठी. एकट्यानं जमत न्हाय म्हणूनशान पोरांलाबी सोबत घेतूया. ते शाळंत जाऊन तरी काय करणार हायेत? मंडळवाले निस्त्या पावडरी मारा म्हणत्यात. मुकादम काय कोटा देत न्हाय? ते आपलं दवाखान्यास्नी कायबाही घिवून पाठवून देत्यात. मागल्या टायमाला लय बोंबाबोंब झालती, म्हणून या वर्षी गिरणीवाल्याला दादा बाबा करून खाली पडलेलं पीठ आणलंया, तेच टाकणार, कोणास्नी काळतंय. सम्दीजणं मजेत मिरवत्यात आनी आमी आपली काढतूया घान. कार्यकरम संपल्यावरबी, खाल्ल्याली घान काढावी लागतीच ना. एक बाकी बरं, दुसर्‍यादिसी झाडताना प्लास्टिकचे झेंडे मिळत्यात ते इकून चार पैसं तरी मिळत्यात.

    मंडळाचा कार्यकर्ता - चला लवकर बाकीच्यांना गोळा करायला पाहिजे, वर्गणी काढायची ना! दहीहंडीची पण आत्ताच मागावी, नंतर देत नाहीत. मागच्या वेळेस स्पीकरवाल्यानी कमिशन द्यायला नखरा केला होता आता तो बदलला पाहिजे. स्वातंत्र्यदिनाचा एक फायदा, वर्गणीसाठी एक जादा निमीत्त. या दिवशी खादी कपडे, वर कडक गांधी टोपी घालून इंप्रेशन पाडायला बरे वाटते. गल्लीत जाऊन सर्वांना दम देऊन आलोय. सर्वांनी झेंडावंदनाला हजर राहायचे. फोटो कसा भरलेला आला पाहिजे ना! चला आता मागच्या वर्षीचा झेंडा शोधला पाहिजे, धुवून इस्त्री केला पाहिजे. झेंडा खूप वर लावतात मग फोटोत झेंडा येत नाही, जरा खाली डोक्याजवळ लावा म्हणलं तर चालत नाही म्हणतात. झेंडा असला म्हणजे कसं इंप्रेशन पडतं.

    लॉज मालक - वा छान! या वेळेस सगळ्या खोल्या ओव्हरफुल्ल झाल्यात. सगळ्या नोकरांची सुट्टी कॅन्सल. बरं झालं गांधीबाबांनी, १५ तारीख पावसाळ्यात करून घेतली ते. लोकं अगदी गर्दी करतात, पाऊस अनुभवायला.झेंडावंदन करायचं काम पोलीस, मिलीटरीवाल्यांचं बाकीच्यांचं काय! भारतात सुट्ट्या खूप, आमचा धंदा खूप.

    स्वातंत्र्यदेवता - या लोकांना काय सांगणार, अरे मला पारतंत्र्यातून सोडवायला, किती लोकांनी प्राण गमावले, आणि मला स्वतंत्र केलं. जर स्वातंत्र मिळालं नसतं तर हा दिवस साजरा करता आला असता काय? रस्त्यावर फिरता आले नसते. अतोनात अन्याय झाला असता. इंग्रज गब्बर झाले असते. १५ ऑगस्ट हा त्यांना आठवण करण्याचा दिवस आहे, पण सहलीच्या आनंदात कोणाला वेळ आहे. स्वातंत्र्याचा स्वैराचार झालेला आहे. असेच चालू राहिले तर मी पुन्हा एकदा पारतंत्र्यात पडणार, मग सुप्रीम कोर्टाने सांगीतल्याप्रमाणे देव सुद्धा मला वाचवू शकणार नाही. असा भारत पाहून गांधी पुन्हा अवतार घेणार नाहीत. साध्या सज्जन मुलाच्या हातात सर्व इस्टेट दिल्यावर, त्याला माज आल्यास त्या इस्टेटीची काय धुळधाण होते ते पाहणेच फक्त बापाच्या नशिबी असते, असे स्वातंत्र्यसैनिकांचे झाले आहे. देव यांना सुबुद्धी देवो.

    १५ ऑगस्ट १९६० सालचा. या दिवसाची तयारी शांळांमधून आठ दिवस अगोदरच सुरू व्हायची. त्या साठी कमिटी नेमली जाणार, एक शिक्षकांची आणि एक विद्यार्थ्यांची. प्रत्येकाला कामे नेमून दिली जाणार. कोणाची घाई प्रमुख पाहुणे ठरवून आणण्याची, तर कोणाची बक्षिसे आणण्याची. मुले ज्या उंच  नळीवर  झेंडा  फडकणार आहे तिला रंग लावणार, चौथर्‍याला रंग लावणार, भोवताली शेणाचा सडा घालणार. रांगोळी कुणी काढायची यात चुरस असायची. या दिवशी सकाळी लवकर येऊन फळ्यावर सुंदर झेंड्याचे चित्र काढण्याची स्पर्धा असायची.

    आदल्या दिवशीच गणवेश धुवून इस्त्री केला जाणार, शक्यतो मागील वर्षी खरेदी केलेला झेंडाच छातीवर लावला जायचा. मी तर सात आठ वर्षे एकच झेंडा वापरत होतो. सकाळी लवकर उठून शाळेला जायची घाई. अगदी टापटीप. पालक जोडीने मुलांना शाळेत सोडायला येत. शाळा जवळच असायची. आतासारखी चांगली वाईट शाळा नसायची, शक्यतो मुले जवळच्या म्युनिसिपालिटी शाळेतच जात. खाजगी शाळांना अजीबात महत्व नव्हते. शाळेतील वातावरण तर अगदी पवित्र, होय पवित्रच. जिथे झेंडावंदन होणार तेथे सडा घालून रांगोळी काढलेली, सुगंधी उदबत्त्या दरवळणार, सभोवार दोन टेबले चार खुर्च्या. टेबलावर स्वच्छ टेबलक्लॉथ, चकचकीत पितळेचा तांब्या पेला, फुलदाणीत टवटवीत टपोरे बुलाब, गुलाबच कारण ते जवाहरलाल नेहरूंना आवडत, आणि चाचा नेहरूंना मुले अतिशय प्रिय. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झेंडावंदन झाल्यावर, गुणी हुषार विद्यार्थ्यांना बक्षिसाचे वाटप होई. नंतर प्रमुख पाहुण्यांचे भाषण असे, ते तर विद्यार्थी शिक्षक कान देऊन ऐकत, एवढेच काय पालकही भाषण ऐकण्यासाठी गर्दी करत, शिवाय येणारे जाणारेही थांबत.सर्व शिक्षकांचा पांढरा शुभ्र पोशाख, डोक्यावर कडक घडीची गांधी टोपी. विद्यार्थ्यांचा ड्रेस खाकी अर्धी चड्डी, पांढरा हाफ शर्ट, डोक्यावर गांधी टोपी. जर टोपी घातली नाहीतर गुरूजी, त्यावेळी सर नव्हते, बोटातील खास खड्याची लोखंडाची अंगठी मारत, ती अशी लागे की, काय बिशाद आहे, तो मुलगा बिना टोपीने शाळेत येईल, पालक तर अजिबात विचारत नसत, अगदी वेताच्या छडीने मारले तरी. गुरूजी तेवढे प्रेमही करत, आता सारखा व्यवहार नव्हता. मुलींचा ड्रेस हिरवा स्कर्ट, पांढरा झंपर, दोन वेण्या त्यांना लाल रिबन, मुख्य म्हणजे केसांना तेल लावलेले पाहिजेच, अगदी मुलांनी सुद्धा. भाषण झाल्यावर राष्ट्रगीत शाळेचे बॅंडपथक वाजवीत असे, राष्ट्रगीत चालू असताना सर्वांनी जागेवरच सावधान उभे राहायचे, अगदी मान देऊन. मग विद्यार्थ्यांना चॉकलेट आणि पाटीवरच्या रंगीत पेन्सिलचे वाटप होई, मुले अगदी कौतुकाने त्या वस्तू घरी नेत.

    घरी श्रीमंत लोक झेंडा उभारत. सर्वांच्या घरी अगदी दिवाळीप्रमाणे पुरणपोळीचा बेत असे.  दुपारी बेत झाल्यावर संध्याकाळी एकमेकांच्या घरी शुभेच्छा द्यायला जात. सांगायचे राहिलेच १४ ऑगस्टला पूर्वसंध्येचे राष्ट्रपतींचे भाषण रेडियोजवळ बसून घोळक्याने कान देऊन ऐकत, नंतर त्यावर चर्चा होत.  मुलेही ऐकत कारण त्यांना त्यावर निबंध लिहावा लागे.

    चौकाचौकात झेंडा वंदन होई, स्पीकर अजिबात नाही. गल्लीतले सर्वजण आवर्जून उपस्थित रहात. सबंध गावातले वातावरण अगदी मंगलमय.

    परिटाला खूप काम, गांधीटोपी कशी कडक पाहिजे, मग परिट पुन्हा पुन्हा प्रेमाने इस्त्री फिरवे, मग गिर्‍हाईकाने मान डोलावल्यावर त्याची छाती अभिमानाने भरून येई.

    उद्या - १५ ऑगस्ट २००८ सालचा स्वगत.

    नंतर - १५ ऑगस्ट २०२७ सालचा कल्पनेतील.

    दिनांक ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी दूरदर्शनवर ’ झूठा कही का ’ सिरीयल होती, त्यात नायक १५ ओगस्टचे झेंडावंदन करतो पण त्यातील झेंड्याचे रंग विचीत्र होते, म्हणजे वर भगवा रंग नसून dark maroon रंग होता. जे राष्ट्रगीत गायले त्याची चाल तर ऐकवत नव्हती. ज्या पताका लावल्या होत्या त्याही तशाच.

    दुसरी एक सिरीयल ’चार दिवस सासूचे’ त्यात पार्थ दुसरे लग्न करतो, असे दाखवले, भले ते स्वप्न असेल पण हे चूकच ना. द्विभार्याप्रतिबंधक कायदा नाही काय? हिन्दी सिरीयलमध्ये तर अनेक लग्ने दाखवतात, अनेक लफडी दाखवतात, का मुलांनी मग रेव्ह पार्टी करू नये? वहिनीसाहेबनी तर वैताग आणलाय, कसले जादुटोणा करतात, शिवाय एकामागून एक खून, पोलीस काय झोपलेत काय? वास्तव अजिबात नाही. असे कितीतरी कार्यक्रम सांगता येतील, पानेच्यापाने भरतील. ’सास भी कभी बहू थी’ मध्ये किती नवर्‍यांच्या किती बायका आणि कितीकांचे नवरे, आणि सगळे बेशरम, कोणालाच लाज लज्जा नाही. मुलांनी काय आदर्श घ्यावा. एका इंग्रजाने जेव्हा शिवाजी महाराजांचे चरित्र वाचले तेव्हा तो एवढा भारावून गेला कि, तो म्हणाला असा शिवाजी इंग्लंडमध्ये पैदा झाला असत्ता तर आम्ही दुसर्‍या कोणावर साहित्यच लिहीले नसते, इतके असामान्य व्यक्तिमत्व भारतात होऊन गेले आहे. पण त्यांच्यावर एकही सिरीयल कोणी काढू नये, हे त्या शिवाजीमहाराजांचे दुर्दैव. टिपू सुलतानवर, बहादूरशाह जफरवर सिरीयल निघतात, पण स्वातंत्र्यवीरांवर नाही.

    आता ह्या सर्वांचा गांभीर्याने विचार करून, दूरदर्शनवरील कार्यक्रमांसाठी सेन्सॉर बोर्डाची जरूरी आहे, म्हणजे या सर्वांना् खीळ बसेल. सिनेमात न होणारी हौस इथे भागवली जाते, कारण सगळं  रानच मोकळं आहे ना? कोणत्याही चॅनेलवर देशहितावर, समाज प्रबोधनवर जाहिरात अथवा कार्यक्रम नसतो.

    सेन्सॉर बोर्डाची खूप आवश्यकता आहे. ओंगळ गाणी व प्रसंग, बेकायदेशीर कृत्याची चित्रणे, भडक बातम्या हे प्रकार बंद होतील.

    अभिनव बिंद्रा अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन. आम्हांला तू सुवर्णपदकांच्या यादीत नेऊन बसवलंस, तुझे किती अभार मानावेत. खरे तर नेमबाजी ही आपली रामायण महाभारतापासूनची परंपरा, पण काही जणांनी क्रिकेटला नावारूपाला आणले, आणि घरच्या खेळाला मागे टाकले. बाहेरच्या मुलाला पदरात घेतले आणि घरच्याला उकिरड्यावर टाकले. बाबा, आता तुझ्यामुळे तरी या क्रिकेटच्या कॅन्सरमधून आम्ही बरे होऊ.

    जास्त काय लिहीणार, आजच्या "सकाळ" मधील चिंटू सार्‍या भारताचे प्रतिनीधीत्व करतो आहे. होऊ दे मुलांचा असा गोड गोंधळ.

    जास्त लिहीत नाही, कारण नजरेपुढे फक्त सुवर्ण पदकच दिसते आहे, त्यामुळे काही सुचत नाहिये.

    श्री. व सौ. मॅगसेसे २००८
    डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांना यंदाचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे. भामरागडसारख्या अतिदुर्गम भागात महाराष्ट्रातील  मागास  माडिया आदिवासींच्या जीवनात प्रकाश निर्माण करणारा लोकबिरादरी प्रकल्प या जगावेगळ्या दांपत्याने चालविला. भामरागड म्हणजे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि छत्तीसगड यांना जोडणारा दंडकारण्यातील अती दुर्गम भाग. माडियाचे मन तर शतकानुशतके प्रगत जगापासून "कट ऑफ'च झालेले होते. रेड्या-बोकडांचाच नव्हे; तर प्रसंगी नरबळीही इथे दिला जाई. ९८ टक्के भागात वीज पोचली नव्हती.

    अशा या दुर्गम भागात बाबा आमटे यांनी लोकबिरादरी प्रकल्पाचे स्वप्न साकार केले. सुखवस्तू शहरी जीवन सोडून; अनेक जण बायकोमुलांना बरोबर घेऊन  ध्येयासक्तीने आणि धीरोदात्तपणे बाबांच्या लोकबिरादरीच्या कामात सामील झाले. बाबा अक्षरशः प्रवाहाविरूद्ध पोहोले. माडियांना दवाखाना शब्दच माहित नव्हता, त्यांचा आधार म्हणजे पुजारी.त्यांनी बाबांना विरोध केला, कारण त्यांच्या पोटावर पाय आला असता. अशा परिस्थितीत बाबांनी आरोग्यसेवा आणि शेती करून त्यांच्या विश्वास निर्माण केला. जेव्हा पुजार्‍याच्या मुलाला बाबांनी सेरेब्रल मलेरियातून वाचवले, तेव्हा तोच पुजारी बाबांचा प्रमुख बनला. बाबांनी महान ईश्वर सेवा केली. खरे तर हा पुरस्कार बाबांना जिवंत असतांना मिळाला असता तर त्या पुरस्काराचा सन्मान झाला असता.

    कोठे लाखो रूपयांच्या सिंहासनावर बसून दूरदर्शनवर प्रवचन कराणारे बाबा  आणि कोठे सेवेत मग्न  झालेले बाबा आमटे. मुळात लोकबिरादरीला प्रारंभापासून आधार लाभला तो आनंदवनातील कुष्टरुग्णांच्या कष्टांचा. एका प्रकल्पातील लाभार्थींनी स्वतःचे पुनर्वसन झाल्यावर दुसरा प्रकल्प उभारावा आणि इतरांचे पुनर्वसन करावे या किमयेला जगात कुठे तोड नसेल! याचे रहस्य म्हणजे बाबा आमट्यांनी कुष्ठरुग्णांच्या मनात केवळ आत्मसन्मानाची प्रेरणाच नाही; तर अन्य पीडितांबद्दलची करुणाही जागवली.

    पित्याच्या स्वप्नपूर्तीसाठी...
    ५६ वर्षांच्या बाबांची लोकबिरादरी प्रकल्पाची साहसी इच्छा ऐकून त्यांचा २३ वर्षांचा मुलगा डॉ. प्रकाश प्रेरित झाला आणि बाबांना त्याने वाढदिवसाची एक जगावेगळी भेट दिली. (योगायोगाने बाबा आणि प्रकाश या दोघांचाही वाढदिवस २६ डिसेंबर हाच!) वाढदिवसाची ही भेट म्हणजे डॉ. प्रकाश स्वतःच! पित्याच्या स्वप्नपूर्तीसाठी पुत्राने हसत हसत वनवास स्वीकारला.

    अशा या थोर महात्म्याला सलाम!

    http://www.esakal.com/esakal/08102008/SpecialnewsE8C7D53C0C.htm

    आसारामबापूंच्या मुलावर एका तरुणीचे गंभीर आरोप
    सकाळ न्यूज नेटवर्क
    अहमदाबाद, ता. ९ - संत आसारामबापू यांचे पुत्र नारायणसाई यांच्यावर मुंबईतील एका तरुणीने आज येथे पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केले आहेत.
    पदवीधर असलेली ही तरुणी विरारमधील नारायणसाई आश्रमात मन:शांतीसाठी दाखल झाली होती, असे तिने सांगितले. ती विरारमधीलच रहिवासी असून, नारायणसाई यांचे शिष्यत्व पत्करल्यानंतर आसारामबापू व नारायणसाई यांच्या देशातील विविध आश्रमांना तिने भेट दिली. गुजरातमधील साबरकंठा जिल्ह्यातील गणभोई गावात नारायणसाईंचा हिंमतनगर महिला आश्रम आहे. या आश्रमालाही आपण भेट दिल्याचे तिने सांगितले.
    अविन असे त्या तरुणीचे नाव असून, नारायणसाई महिलांना हिप्नॉटिझम करतात. आश्रमातील तरुणी गर्भवती झाल्यास एखाद्या साधकाबरोबर तिचा जबरदस्तीने विवाह लावण्यात येतो किंवा अशा महिला व तरुणी अचानक गायब होतात. नारायणसाईंचा अंगरक्षक आश्रमात तरुणींचा पुरवठा करतो, असे तिने सांगितले. यापेक्षाही अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप अविनने भरगच्च पत्रकार परिषदेत केले आहेत.
    दरम्यान, अहमदाबादमधील आसारामबापू गुरुकुलात मृत्यू झालेल्या मुलांच्या पालकांनी या प्रकरणाची चौकशी केंद्रीय गुप्तचर विभागाकडून करण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल केली आहे.

    बोला, असारामबापू आता तरी बोला, अहो आम्ही तुमचे हजारो शिष्य तुमच्या तीन शब्दांची वाट पाहतो आहोत. बोला,   "हे खोटे आहे". पहिल्यांदा खुनाचे प्रकरण, नंतर पुण्यातील मतिमंदाचे प्रकरण, आता तर काय सरळ सरळ प्रत्रकार परिषदेतील आरोप.  तुमचा देव तुम्हांला बुद्धी देवो हीच प्रार्थना. या शिवाय अजून किती गूढ प्रकरणे असतील देव जाणे. तुम्ही गप्प राहिलात तर आमच्या शंका बळावत जातील. म्हणून म्हणतो, बापू मौन सोडा आणि हे सर्व खोटे आहे असे जाहीर करा. मला माहित आहे, जर हे खरे असेल तर आपण प्रायश्चित्त घेताल, आणि जगासमोर एक आदर्श निर्माण करताल. तुम्हाला आठवते बाबा रामदेव महाराजांवर, त्यांच्या औषधांमध्ये हाडांची भुकटी असते असे आरोप झाले होते पण त्यांनी ते आरोप जाहीरपणे खोडून, आरोप करणार्‍यांचे नाक कापले. पाहिजे तर त्यांना विचारा. बापू, काहीही करा पण त्या मातीतील " बापूं"चे नाव लावून ते नाव आणि त्यांना बदनाम करू नका, ही कळकळीची विनंती. पुन्हा एकदा ’ बोला बापू बोला "

    http://www.esakal.com/esakal/08062008/SpecialnewsCA26C46156.htm

    साक्षात परमेश्वरही या देशाला वाचवू शकत नाही
    नवी दिल्ली, ता. ५ - या देशाला आता साक्षात परमेश्वरही वाचवू शकत नाही, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने आपला संताप व्यक्त केला.
    सरकारी निवासस्थानात बेकायदा राहणाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्यास सरकारने नकार दिल्याने न्यायालय संतप्त झाले आहे. या प्रकरणी कायद्यात दुरुस्ती न करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असल्याचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अमरिंदर शरण यांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर ""कारकुनाने दिलेल्या मताला आव्हान देण्याचीही धमक या सरकारमध्ये नाही. आम्ही या सरकारला कंटाळलो आहोत'' अशा शब्दांत न्यायमूर्ती बी. एन. आगरवाल व जी. एस. सिंघवी यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, ""साक्षात परमेश्वर जरी या देशात अवतरला, तरी तो या देशाला बदलू शकत नाही. आपल्या देशाचे चारित्र्य संपुष्टात आले आहे. आम्ही आता निराश झालो आहोत. विविध मुद्‌द्‌यांवर सरकारच्या भूमिकेला कंटाळल्यानेच नागरिक जनहितार्थ याचिका दाखल करतात. जेव्हा तुम्ही सत्तेवर असतात, त्या वेळी तुम्ही "न्यायालयीन सक्रियतेची' तक्रार करता. जेव्हा तुम्ही सत्तेवर नसता, त्या वेळी मात्र तुम्ही आमच्याकडे धाव घेता.''
    सरकारी निवासस्थानात बेकायदा राहणाऱ्या नागरिकांना हुसकावण्यासाठी सध्याचा कायदा पुरेसा आहे. ९९ हजार १०० सरकारी घरांपैकी केवळ ३०० घरांमध्ये लोक बेकायदा राहत आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे शरण यांनी सांगितले. मात्र न्यायालयाचे त्याने समाधान झाले नाही. गुन्हे करणाऱ्यांना शासन करण्याची धमक सरकारमध्ये नाही, असेही न्यायालयाने फटकारले.

    होय, खरंच आहे, साक्षात परमेश्वरही या भारत देशाला वाचवू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायधीशांनी संताप व्यक्त करावा, याबद्दल सरकारला कधी काळी काय वाटेल, शक्यच नाही. सर्वजण आपाआपली घरे भरण्याच्या मागे लागलेली आहेत. सरकारी निवासस्थाने एकदा अधिकार्‍यांनी, मंत्र्यांनी रहाण्यास घेतली  तर त्यांनी ती बळकावलीच समजायची. त्याचे भाडे सुद्धा न भरणारे मंत्री आहेत. या देशाचे जे चारित्र्य महात्मा गांधीं सारख्यांनी घडवले, त्याचा बाजार या राजकारणी लोकांनी भरवला. अगदी वस्त्रहरण करून टाकले. भ्रष्टाचार, बेशिस्त विचारसरणी यांनी देशाचे स्वास्थ्य बिघडवून टाकले. इंग्रजांविरूद्ध लढलो, पण आता कोणाबरोबर लढणार. या अशा राजकारण्यांपासून कसे स्वतंत्र होणार. निवडणूकीत दुसरे कोणीतरी येणारच ना? शिक्षणाचा खेळखंडोबा करून टाकलाय. न्यायधीशांना संताप यावा, तर सामान्य नागरीक जे स्वतः याचा अनुभव घेत आहेत, त्यांच्या संतापाचे काय?

    सरकारी निवासस्थाने ही संकल्पनाच काढून टाकली पाहिजे, ती जागा खाली करून तिथे आश्रमशाळा, गुरांचे गोठे बांधावेत. अधिकार्‍यांचा ठेका आता सरकारने घेऊ नये. देशातले वातावरण एवढे नासलेले आहे की, आता इंग्रज बरे होते अशी म्हणण्याची पाळी आलेली आहे.

    ’वेटलिफ्टर मोनिकादेवी उत्तेजक चाचणीत दोषी ठरली’ ही बातमी आहे, अजून ऑलिंपीक लांब आहे तर आतापासूनच सुरूवात, सांगा कोण वाचवणार या देशाला.

    देव सुद्धा आता एवढा कंटाळला आहे की, त्याने पण आता हा सुधरवण्याचा धंदा बंद केला आहे, कारण त्याला दुसरे कामच उरले नव्हते. बहुतेक तो आता दुसर्‍या ग्रहावर आपला नवा संसार थाटेल. भारतीयांच्या देवाधर्मा्चा आधीच त्याला उबग आला आहे. बघा आता आपण पर्यावरणाचा नाश करायचा आणि पाउस पडला नाही म्हणून त्याला पाण्यात बसवायचे, यज्ञ करून त्याच्या डोळ्यात धूर सोडायचा. आता लवकरच गणपती बाप्पा पण कोठेतरी अज्ञातवासात जातील कारण गणेशोत्सवातील राजकारण, आवाज त्यांना सहन होणे शक्य नाही.

    झी मराठी चॅनेलवर एक सुरेख कार्यक्रम प्रसारीत होतो आहे, ’एका पेक्षा एक’, ज्यात महागुरू आहेत प्रसिद्ध अभिनेते ’ सचिन पिळगावकर ’. खरंच पाहण्यासारखा आहे. नाच झाल्यावर ’ आदेश बांदेकर ’ ज्या प्रकारे त्या नाचणार्‍या हिर्‍याचा श्रमपिहार करतात, त्यात प्रेक्षकांना सुद्धा रिलॅक्स वाटते. नंतर ज्युरी मत नोंदवतात, आणि त्यावर महागुरू मत सांगतात, त्यात त्या नृत्यातील बारकावे अगदी स्पष्टपणे कलावंताला न दुखावता सांगतात, हेच त्यांचे कौशल्य आहे. पण आपल्या मराठी माणसांना ओरडण्याची सवयच आहे ना!

    ३१ तारखेला किशोरी गोडबोलेंनी ’ चला जेजुरीला जाऊ ’ लावणी सादर केली. त्यात घोड्यांच्या टापांचा आवाज आहे. पहिल्या अंत‍र्‍यात तिने त्या टापांवर नाच केला पण दुस‌र्‌या कडव्यात टापांचा आवाज नसताना सुद्ध तिने नाच केला, तर हे महागुरूंनी दाखवून दिले.

    दुसर्‍या दिवशी पेपर मध्ये लावणीसम्राट कै. ज्ञानोबा उत्पात यांचे पुत्र श्री. प्रसाद यांनी ही लावणी सचिनने चोरून त्यांच्या ’ नवरा माझा नवसाचा ’ या चित्रपटात घेतली असा दावा केला, परंतु सचिन यानी हि लावणी अकलूज येथील लावणी महोत्सवात ऐकली आणि ती लावणी पारंपारिक असल्याची इतर लावणी सम्राटांकडून खात्री केल्यावरच चित्रपटात घेतली असल्याचे सांगितले. मग प्रश्न असा येतो की, हि लावणी कुणालाच माहिती नव्हती काय? बरं ठीक आहे घेतली, पण त्या चित्रपटामुळे तरी लोकांना समजली ना? नाहितर अकलूज सारख्या लावणी पंढरीत तरी कोणाला माहिती होती काय?

    सचिनचे पिता शरद पिळगावकर यांची लावणी ’ या रावजी बसा भावजी ’ गाऊन सुरेखा पुणेकर  यांनी उभ्या महाराष्ट्रात नाव कमावले, पण एका अक्षराने पिळगावकरांचे आभार मानले नाहीत, पण सचिनने फक्त ’ एका पेक्षा एक ’ कार्यक्रमातच हा उल्लेख केला, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा. अरे असा मोठेपण दाखवा ना? कशाला पाहिजे मी मी पणा. कुणीतरी आपल्या रचनेला न्याय देतात ना? बस झाले तर?  

    का बाबा, महाराष्ट्रातील संत मंडळींना copy right नसते का करता आले? गाडगे महाराज, तुकडोजी महाराज यांनी त्यांच्या रचना copy right केल्यात काय? श्रीशंकराचार्यांनी आपली स्तोत्रे copy right केलीत काय? असे झाले असते तर? जरा विचार करा. इंग्रजांनी त्याचे सगळे कायदे copy right केले असते तर? त्याची royalty परवडली असती काय?

    आपली रचना जी लोकांना माहित नव्हती ती कोणीतरी लोकांपर्यंत पोचवली, त्यात आनंद मानायला मनाचा मोठेपणा दाखवा.  त्यात आनंद मिळवा. परंतु एक मात्र आहे, ती रचना हेतुपुरस्सर तर घेतली नाही ना, हे पाहिले पाहिजे, आणि घेणार्‍याने रचनाकाराचा उल्लेख करून त्याचे आभार मानले पाहिजेत.

    http://www.esakal.com/esakal/08032008/Saptarang811169578F.htm

    कॉफीशॉप - खेळ नव्हे; खूळ!

    ऑलिंपिक जवळ आलं, की आपण दोन गोष्टी करून टाकतो. एक तर आपल्यात खिलाडू वृत्ती नाही, हे (खिलाडू वृत्तीनं) मान्य करतो आणि दुसरी, भारताला या स्पर्धेत पदक का मिळत नाही, याची चर्चा करतो. पदक मिळविण्यापेक्षा चर्चा करणं हे खूपच सोपं काम आहे. पण भारत ऑलिंपिकमध्ये मागं का, याचं उत्तर आम्हास नुकतंच मिळालं आहे. .......
    भारताची वाढती ताकद, महत्त्वाकांक्षा आणि जागतिक महासत्ता होण्याचं जवळपास पूर्ण होत आलेलं स्वप्न याचा जगातल्या इतर देशांना दुस्वास वाटतो. त्यामुळंच त्यांनी ऑलिंपिकमध्ये लंगडी, चमचा-लिंबू, आंधळी कोशिंबीर, डबडा ऐसपैस आणि क्रिकेट हे खेळ न ठेवता, शंभर मीटर धावणे, चारशे मीटर धावणे, शंभर बाय शंभर, चारशे बाय चारशे मीटर धावणे, जिम्नॅस्टिक्‍स, गोळाफेक, हातोडाफेक, थाळीफेक, भालाफेक, लांब उडी, उंच उडी, पोल व्हॉल्ट, जलतरण, डायव्हिंग, घोडेस्वारी, टेबल- टेनिस, भारोत्तोलन, मुष्टियुद्ध, मॅरेथॉन, हेप्टॅथलॉन (हा तर खेळ नसून, खेचरांना होणारा आजार असावा, अशी एक आपली आमची शंका आहे!) आणि असेच काहीबाही निव्वळ निरर्थक प्रकार "खेळ' म्हणून ऑलिंपिकमध्ये घुसवले आहेत. आता तुम्हीच सांगा, गोळा, हातोडा किंवा थाळ्या या काय फेकायच्या वस्तू आहेत का? उंच उडी, लांब उडी, पोल व्हॉल्ट हे तर डोंबारीकाम. उड्या मारून काय साध्य होतं? जलतरण म्हणजे तर निव्वळ फसवणूक आहे. अरे, मोठमोठ्या पुरांत पुलांवरून बिनदिक्कत उड्या मारणारे मर्द आमच्याकडे आहेत. त्यांना त्या टॅंकरूपी निळ्या डबक्‍यात दोनशे आणि दीडशे मीटरमध्ये बुचकळ्या मारायला सांगता? केवढा घोर अपमान त्या मर्दानगीचा! थॉर्प आणि फेल्प्स वगैरेंचं काही कौतुक सांगू नका. आमच्या मुठेतून वारजे ते खराडी हे अंतर नाक न दाबता पोहून दाखवा म्हणावं. तेच धावण्याचं. जीव खाऊन जोरात पळून दाखवणं यात सोन्याचं पदक देण्यासारखं काय आहे, हेच खरोखर कळत नाही. मुंबईत येऊन पाहा. लोकं आणि लोकल सतत पळतच असतात. तीच गोष्ट डायव्हिंगची! उंचावर टांगलेल्या फळकुटावरून अंग वेडंवाकडं करून पाण्यात उडी मारली, तर त्यात टाळ्या वाजवण्यासारखं काय आहे? जिम्नॅस्टिक्‍सचं केवढं कौतुक! पण खरं सांगू का, घरचं चांगलंचुंगलं असताना उगाच देहाची काडी करायची आणि ती त्या दांडीवरून गरागरा फिरवून दाख
    वायची, यात त्या घराण्याची काय अब्रू राहिली? हॉकीत आम्ही ख्रिस्तपूर्व काळात सुवर्णपदकं मिळविली, तर ते सहन न होऊन यांनी आमचा संघ पात्रताफेरीतच गारद केला. भारताविषयीचा दुस्वास! दुसरं काय? मुष्टियुद्ध, भारोत्तोलन (हा शब्दच पेलवत नाहीय; वजन लांबच राहिलं...) किंवा कुस्ती हे तसे जिवावरच बेतणारे प्रकार. गरज नसताना अव्वाच्या सव्वा वजन आधी छाताडावर आणि मग दोन्ही पाय लटपटवत उंच हातांवर उचलून काय मिळतं कुणास ठाऊक! कदाचित पदक वगैरे मिळत असेल; पण चुकून वजन छातीवर पडलं तर केवढ्याला पडायचं? मुष्टियुद्ध म्हणजे तर स्वतःहून मार खाण्याला आमंत्रण देणं. याटिंग, रोईंग, कयाकिंग वगैरे गोष्टींचं नावच काढू नका! पाण्यात पडून मरायचंय का? छे! छे! छे! "डर के आगे जीत है' हे खरं असेल; पण आम्हाला "जीत'चीच "डर' आहे, त्याचं काय?

    - मामू

    मामू काय हे? आम्हा भारतीय खेळाडूंना कमी लेखता काय? तुम्ही म्हणता चर्चा करणं सोपं आहे, पण ती चर्चा लांबवणं किती अवघड आहे माहित आहे काय? चर्चा पुरी होऊन ’ निकाल’ ( माझ्या मनात तसं नाही ) लागेपर्यंत स्पर्धा संपून जातात तो काय त्यांचा दोष? तुमच्या अशा लेखामुळेच आमचा हिरमोड होतो आणि आमचा मूड ऑफ होतो, आणि पदके आमच्या हातातून अशी भराभरा निसटतात. अहो तुम्ही म्हणता ते तरी खेळ आमच्या साठी ठेवलेत काय? धावण्याचे सर्व खेळ चोर पोलीसांनी केव्हाच ताब्यात घेतलेत. हतोडाफेक थाळीफेक हे तर संसदेत नेहमीच चालतात. जिम्नॅस्टिक्‍स तर रोजच सिनेमातल्या गाण्यात पहायला मिळतं. आता वेटलिफ्टींग, परवाच संसदेत करोडो रूपयांचा भार उचलावा लागलाच ना? जास्त पाल्हाळ लावत नाही.

    अहो आमचं कौतुकच राहिलेले नाही! लक्षात ठेवा, आमचे तुम्ही पूर्णपणे खच्चीकरण केलेले आहे, जर पदकं मिळाली नाहीत तर आम्हाला बोलू नका. हा लेख वाचल्यापासून आम्हाला भयानक मरगळ आलेली आहे, सरावात सुद्धा मन लागत नाहीये. घोड्याच्या एका नालेमुळे राज्य गेले म्हणतात. तुमच्या एका लेखामुळे देशाचे किती नुकसान होणार आहे माहीत आहे काय? खेळाडूंची मने नाराज झाली, त्यांच्याकडून सराव होत नाहीये, तसेच ते चीनला जाणार, मन था‌‌‍र्‍यावर नसल्याने आम्ही हॉटेलातच बसून राहणार, मग कशी पदके मिळणार? ह्या वेळेस आम्ही ठरवले होते की, रजत आणि कांस्य पदकांना हातच लावायचा नाही, फक्त पिवळीधमक सुवर्णपदकेच घ्यायची, पहाण्यार्‍यांना काविळ झाल्या सारखं वाटलं पाहिजे, पण कसचे काय,तुम्ही करोडो भारतीयांच्या आशेची वाट लावलीत.  कुठे फेडणार ही पापे? बस, आता मला बोलवतही नाही, घरच्या सर्वांसाठी चीनची तिकीटे आणायला जायचंय, तसं मंडळाने कबूल केलेय ना? काही झाले तरी आम्ही जाणारच कारण कुणी म्हणायला नको, तुम्ही का गेला नाहीत, कदाचित चीन वगैरे देशातही असे ’मामू’ असतील तर आपले काम सोपे होऊन, भराभर पदके मिळतील. खरंतर मामू, तुम्ही सर्व देशांचा दौरा करून तिथल्या वर्तमानपत्रातून असे लेख लिहून तिथल्या खेळाडूंचे खच्चीकरण केले असते  तर आमचे काम किती सोपे झाले असते, नाही का?

    http://www.esakal.com/esakal/08032008/SpecialnewsFD9693BDC1.htm

    आसारामबापूंच्या आश्रमाला सील
    भोपाळ, ता. २ - छिंदवाड्यातील आश्रमात गेल्या काही दिवसांत झालेल्या दोन मुलांच्या मृत्यूनंतर पोलिसांनी आज आसारामबापूंच्या इंदुवती विद्यानिकेतन या आश्रमाला सील ठोकले.
    मृत्यू झालेल्या दोन मुलांतील एक पुण्याचा आहे.
    या आश्रमात राहणारा वेदांत मानमोडे (वय ५) या मुलाचा गुरुवारी मृत्यू झाला. वसतिगृहाच्या स्वच्छतागृहातील पाण्याने भरलेल्या बादलीत त्याचे डोके बुडाले होते. हा मुलगा पुण्याचा होता. वेदांतचा मृत्यू अनैसर्गिक असल्याचे मत त्याचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्‍टरांनी व्यक्त केले आहे. तत्पूर्वी, मंगळवारी रामकृष्ण यादव हा मुलगा स्वच्छतागृहाच्या फरशीवर मृतावस्थेत आढळला होता; मात्र त्याच्या मृत्यूबद्दल प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले नव्हते. फरशीवरून घसरून पडल्याने गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज छिंदवाड्याचे पोलिस अधीक्षक आर. के. शिवहरे यांनी व्यक्त केला होता. मुलाचा मृत्यू म्हणजे नशिबाचा भाग असल्याचे मान्य करून रामकृष्णची आई मनोरमा आणि वडील मोहनलाल यांनी मुलाच्या मृत्यूचे दुःख स्वीकारले होते.
    मात्र, आश्रमात दोन मुलांचा लागोपाठ गूढ मृत्यू झाल्यामुळे लोकक्षोभ निर्माण झाला व तो शमविण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने एक विशेष चौकशी समिती नियुक्त केली. या समितीने आज आश्रमाला सील ठोकले. आश्रमाच्या शाळेतील एक शिक्षक मनोहर जयस्वाल आणि वसतिगृहाचे वॉर्डन ओमप्रकाश प्रजापती यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एकाच जागी दोन मृतदेह आढळल्याने या प्रकरणी संशय निर्माण झाल्याचे राज्याचे पोलिस महासंचालक एस. के. राऊत यांनी नमूद केले. या मुलांच्या पार्थिवांच्या आणखी तपासणीसाठी भोपाळहून विशेष तज्ज्ञांचे पथकही येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
    अहमदाबादमध्ये असलेल्या "गुरुकुल' या आसारामबापूंच्या आश्रमात दीपेश आणि अभिषेक वाघेला या चुलतभावांचा नुकताच मृत्यू झाला होता. त्यामुळे संतप्त जमावाने जोरदार निदर्शने केली होती. लाठीमार करून पोलिसांनी स्थिती नियंत्रणात आणली होती. त्या पाठोपाठ छिंदवाड्यात दोन मुलांचा मृत्यू झाला आहे.

    बापू, काय हे! रोज रोज तुमचे दूरदर्शन वरील प्रवचन ऐकून आमव्या जीवनमानात फार फरक पडला हो, शिवाय तुमच्या प्रवचनाच्या c.d.चे आम्ही तर पारायण केले. तुमच्या फोटोंचे लॉकेट आम्ही कित्येकांना भेट दिले, पण तुमच्याच आश्रमात हे घडावे. सांगा आम्ही आता लोकांना काय सांगणार. आम्ही दिलेले लॉकेट परत येऊ लागले. आपल्या औषध दुकानातून घेतलेले आणि रोज घेत असलेले चूर्ण आता कडू लागायला लागले हो! झाले तर झाले पण तुमच्या अमोघ वाणीतून काहीच प्रसवत नाहीये. बोला काहीतरी बोला, आम्हालाही कळू द्यात, नक्की काय झाले आहे ते. महात्मा गांधींच्या पवित्र भूमीतील आपण, ज्यांनी जगाला अहिंसेचा मंत्र सांगितला, त्या तुमच्या आश्रमातच अशी घटना घडावी, काय वाटले असेल त्या महात्म्याच्या आत्म्याला. आधीच त्यांनी लोकसभेतील नोटांची पुडकी पाहून, स्वर्गात देवाला सांगितले असेल, बाबारे स्वातंत्र्यासाठी लढून माझी चूक झाली, पुन्हा मला भारतात जन्म नको. ज्या नोटांवर माझे चित्र छापले आहे, त्याच्याच साक्षीने व्यवहार करतात, आणि मला निमूटपणे पहावे लागते. त्या माझ्या जन्मभूमीत हे नवीन काय? बापू या नावाबद्दल लोक काय काय गैरसमज करून घेतील.

    आसारामजी आपल्या नावापुढेही आपण बापू नाव लावलेत, त्याचा तरी मान राखून काहीतरी बोला. परवा गुरूपौर्णिमा झाली, आपण पुण्यात किती छान कार्यक्रम केलात, हाच आपला संदेश समजायचा काय? आपल्याकडून जाहीरपणे वरील प्रकारावर प्रवचन अपेक्षित आहे.

    काल १ तारखेला सूर्य ग्रहण होते. काळ्या काचेतून पाहिले, मुलांना तर अजिबात अप्रूप वाटले नाही. सर्वांचे व्यवहार अगदी बरोबर चालले होते तेव्हा माझ्या लहानपणीच्या ग्रहणकाळातील आठवणी जाग्या झाल्या.

    ग्रहण कधी लागणार त्याचा वेध कधी सुरू होणार याच्या चर्चा सर्वजण चवीने करत असत. ग्रहण लागले की पहिली तयारी असायची दिव्यावर काच काळी करण्याची, चांगला टेंभा पेटवायचा, त्यावर गल्लीतील सर्वांच्या काचा काळ्या होत. स्त्रीयांची लगबग देव पाण्यात ठेवण्याची. प्रत्येकाच्या दारात त्या काळी तुळस असायची, त्याची पाने आधीच तोडून ठेवली जायची, ती मग धान्यात टाकणार. ग्रहण म्हणजे त्या काळी अशुभ घटना समजली जायची, वातावरण अशुद्ध होते असा समज असायचा, शिवाय हा काळ अभद्र समजला जायचा. तुळसी मुळे धान्य अदृश्य शक्तींपासून सुरक्षित रहात असे.

    ग्रहण लागल्यावर लोक चौकाचौकात, घराच्या गच्चीवर जाऊन घोळक्याने काळ्या काचेतून ग्रहण पहात, त्याची काजळी लागून तोंड काळे झाले तरी बेहत्तर.

    जर कोणा बाईला दिवस गेले असतील तर, तिची धडगत नाही, तिच्यावर मोठ्या बायका काळजीपूर्वक लक्ष ठेवत, तिने एकाच ठिकाणी, शक्यतो अंधार्‍या खोलीत बसून रहायचे, काहीही करायचे नाही. जर तिने काही विळीवर काही कापले तर म्हणे होणार्‍या बाळाचे ओठावर चीर येणार, सुईत दोरा ओवला तर बाळाच्या ओठावर भोके पडत वगैरे वगैरे. ह्या अंधश्रद्धा आहेत पण विषाची परीक्षा कोण घेणार. मग ग्रहण सुटल्यावर घरातील मोठया बाईने प्रथम आंघोळ करायची मग बाकीच्यांनी, ती बाई नंतरच्या सर्वांना आंघोळीला प्रथम दोन तांबे पाणी घालत असे.

    लहान मुलांची आंघोळीला अगदी घाई असायची. कारण त्यानंतरचा कार्यक्रम मुलांच्या आवडीचा असायचा. आंघोळ झाल्यावर मुले मग भांड्यात धान्य घेऊन दाराबाहेर बसत, जवळ जुने वापरलेले कपडे असत, शिवाय भोक पाडलेले पैसे जवळ ठेवत, कारण भोक पाडलेले पैसे दान केले तर पीडा नष्ट होते, असा समज होता. ( त्याकाळी भोक पाडलेला पैसा चलनात होता, त्या सोबत ढब्बू पैसा ही होता. ) दारोदार मांग जमातीचे लोक ’ दे दान सुटे गिराण ’ ओरडत मागायला येत, त्यांना धान्य द्यायचे, कपडे द्यायचे, आणि एक पैसा द्यायचा, म्हणजे घराची दरिद्री संपून जाणार आणि ग्रहणाचे पाप नष्ट होणार असा समज होता. घरातील सर्व स्त्रिया स्वयंपाकाला लागत, कारण ग्रहण काळातील अन्न खात नसत ते फेकून देणार कारण ते अशुद्ध समजले जाई. आंघोळीला सर्वाच्या दारात बंब पेटवला जायचा, त्याचा धूर आसमंतात पसरला जाणार. ग्रहण सुटल्यावर बंब दारातच पेटवायचा, घरात नाही.

    खरं खोट माहीत नाही, पण म्हणत जादूगार लोक, मंत्र तंत्र करणारे म्हणे पाण्यात पाण्या जाऊन उभारत, अगदी ग्रहण सुटे पर्यंत. कारण असे केले नाहीतर त्यांच्या समव्यवसायिकांकडून त्यांना धोका असे. त्यावेळी म्हणे ते मंत्र सिद्ध करत.

    आता वाटते त्याकाळी किती अंधश्रद्धा होत्या, पण जगण्यात, प्रसंग अनुभवण्यात वेगळीच मजा असायची. आता ’अंनिस’ वाले चळवळ उभी करतात पण त्यांच्या सोईने, ते ठरवणार कोणती अंधश्रद्धा आहे ते.

    दैनिक सकाळच्या अग्रलेखातील हा भाग आहे. आज सारा देश वीजटंचाईने ग्रस्त असताना हा प्रकार होत असावा, हे महाराष्ट्रातील जनतेचे दुर्दैव.

    http://www.esakal.com/esakal/07252008/Sampadakiya83E73329AB.htm

    संकट पाण्याचे अन्‌ विजेचे

    केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे हजारो मेगावॉटची आश्‍वासने देत असले, तरी ते प्रत्यक्षात आलेले नाही. विजेचे अतिरिक्त उत्पादन करीत असलेल्या राज्यांकडून वीज घेण्यासाठीही धोरणात्मक पातळीवर प्रयत्न होताना दिसत नाहीत. दाभोळच्या प्रकल्पाची क्षमता असली, तरी पुरेसा वायुपुरवठा होत नसल्याने उत्पादनावर मर्यादा येत आहेत. वायूबरोबरच कोळशाचाही तुटवडा या समस्येची तीव्रता वाढविणारा आहे. वीजउत्पादन कमी असल्याने भारनियमन करणाऱ्या आणि जनतेला वीजबचतीचे आवाहन करणाऱ्या राज्य सरकारचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या "वर्षा' या निवासस्थानी गेल्या तीन वर्षांत १६ लाख युनिट वीज वापरल्याचे वृत्त धक्कादायक आहे. वीजबिलाची रक्कमही २५ लाख रुपयांवर जाणे संतापजनक आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानापेक्षा हे प्रमाण दुप्पट आहे. विजेच्या उत्पादनापासून त्याच्या वापरापर्यंत राजकीय नेतृत्वाचे उत्तरदायित्व किती, हे यावरून स्पष्ट होते.

    असा परखड अग्रलेख लिहील्याबद्दल दैनिक 'सकाळ' चे आभार. पण यावर उपाययोजना काय? जर १६ लाख युनिटचा ३ वर्षांसाठी हिशोब केलातर रोज सरासरी १५०० युनिट वीज वापरली गेली, म्हणजे महाराष्ट्रात अंधार आणि 'वर्षा' वर रोज दिवाळी.

    हे शीर्षक आहे साधारण दहा बारा वर्षांपूर्वी गाजलेल्या लावणीचे, आणि ही लावणी गायली होती सुप्रसिद्ध अदाकारा सुरेखा पुणेकर यांनी. खरेतर या लावणी मुळेच त्यांचे नाव सार्‍या महाराष्ट्रभर झाले. ही आठवण येण्याचे कारण असे झाले,

    काल झी मराठी वर ’ एका पेक्षा एक ’ कार्यक्रम चालला होता आणि त्यात सुप्रसिद्ध कलाकार सचिन पिळगावकर महागुरू होते, म्हणजे तसे ते या प्रत्येक कार्यक्रमात आहेत, आणि ते अशाच काही जुन्या आठवणी सांगत असतात. याच कार्यक्रमात ही लावणी ’ या रावजी बसा भावजी ’ एका कलाकाराने सादर केली, लावणी खूपच सुरेख झाली, आणि सुरेखा पुणेकर यांची आठवण झाली पण त्यानंतर महागुरू सचिन यांनी या लावणीबद्दल एक आठवण सांगितली,

    आठवण कसली सत्य सांगितले.

    ही लावणी त्यांचे वडील शरद पिळगावकर यांनी ’ नाव मोठं लक्षण खोटं ’ या जुन्या गाजलेल्या मराठी चित्रपटात सादर केली होती. 

    अगदी कालपर्यंत शरद पिळगावकर यांचा साधा उल्लेखही कोणी केला नाही. किंवा नंतर कुणीही एका अक्षरानेही यांचे साधे आभार मानले नाहीत. कितीतरी कार्यक्रमात ही लावणी सादर करून कलाकार वाहवा मिळवतात, तर त्यांनी शरद पिळगावकर यांचा किमानपक्षी उल्लेख तरी करावा.

    हा आहे अकरावीच्या प्रवेशाचा घोळ. ७०-३० चा गोंधळ न्यायालयानेच रद्दबादल ठरवला, हे एक बरे झाले. हे सर्व निर्णय आधी होत नाहीत तर अगदी ऐनवेळी घेतले जातात, आणि गोंधळाचे वातावरण तयार केले जाते.

    http://www.esakal.com/esakal/07192008/Pune22E2D65DCA.htm

    अकरावी प्रवेश - "पर्सेंटाईल' सूत्रानुसारच; सोमवारी यादी
    पुणे, ता. १८ - अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी सोमवारी (ता. २१) जाहीर होणार आहे. राज्य सरकारने या वर्षीपासून लागू केलेल्या "पर्सेंटाईल' सूत्रानुसार ही यादी जाहीर करण्यात येणार आहे.
    "सीबीएसई' परीक्षा मंडळामार्फत परीक्षा दिलेले पंधराशे आणि "आयसीएसई' मंडळामार्फत परीक्षा दिलेल्या आठशे विद्यार्थ्यांनी अकरावीसाठी अर्ज केले आहेत. दोन्ही मंडळांचे एक हजार ३०० विद्यार्थी आहेत. या वर्षी प्रवेशासाठी ५० हजार २१५ जागा उपलब्ध असून, प्रत्यक्षात ४९ हजार ६०५ अर्ज आले आहेत. प्रवेशक्षमतेपेक्षा एकूण अर्ज कमी असले, तरी विज्ञान आणि वाणिज्य मराठी व इंग्रजी अभ्यासक्रमाचे अर्ज उपलब्ध जागांपेक्षा अधिक आहेत. याउलट कला शाखेच्या दोन्ही माध्यमांच्या सुमारे सत्तर टक्के जागा रिक्त राहणार आहेत. काही विद्यार्थ्यांनी दोन अभ्यासक्रमांना अर्ज केल्याचे गृहीत धरले तरी पुण्याबाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या तुकड्या वाढवाव्या लागणार आहेत.
    या अभ्यासक्रमांच्या सध्या उपलब्ध जागा आणि कंसात प्रवेशासाठीचे अर्ज असे- कला (मराठी) : ६९८० (१,८२५), कला (इंग्रजी) : २,७०० (७३९), वाणिज्य (मराठी) : ८,९०० (१०,१४७), वाणिज्य (इंग्रजी) : ११,७४० (१३,१४६), विज्ञान : १७,२७० (२३,३३८).
    पुण्यात केवळ उच्च शिक्षणासाठीच देशातून विद्यार्थी येतात असे नाही. राज्याच्या इतर भागांतून; तसेच परराज्यातून अकरावीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे कला शाखेच्या जागा रिक्त राहणार असल्या, तरी वाणिज्य व विज्ञान शाखेच्या जागांची कमतरता भासणार आहे. गरजेनुसार तुकड्या वाढविण्यात येतील. त्यामुळे विद्यार्थिसंख्या वाढली तरी सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल, असे विभागीय उपसंचालक जी. के. म्हमाणे यांनी स्पष्ट केले.
    ---------------
    पर्सेंटाईल म्हणजे?
    "पर्सेंटाईल' हे संख्याशास्त्रातील सूत्र आहे. या सूत्रानुसार प्रवेश द्यावेत, असा निर्णय राज्य पातळीवर घेण्यात आला आहे. या सूत्रानुसार "सीबीएसई' व "आयसीएसई'च्या पहिल्या दहा विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी काढण्यात येईल. त्यास शंभरने भागून येणाऱ्या आकड्यावरील गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी लावण्यात येणार आहे.

    पर्सेंटाइल पद्धत म्हणजे विनोदच आहे. मुळात भारतात अशी वेगवेगळी बोर्ड का ठेवावीत, कळत नाही. सर्व भारतभर एकच अभ्यासक्रम ठेवला तर, सबंध देशातून कोणीही कोठेही प्रवेश घेऊ शकेल. महाराष्ट्र बोर्डातून पास झालेला, CBSE, ICSC बोर्डातून पास झालेला अकरावीला एकाच वर्गात बसतो ना? पण त्यांच्या मनात कुठेतरी तुलना सुरू असते. खरे तर भारतभर एकच अभ्यासक्रम असावा. फक्त त्या त्या राज्याची भाषा शिकवली जावी, एवढेच काय तर भाषासुद्धा ऐच्छिक ठेवावी. आता हा किती वैताग आहे ना? एवढ्या वर्षे बरोबर चालले, पण आता मात्र problem आला. नाहितरी भारतातील विद्यार्थ्यांना कोणीच वाली राहिलेला नाही. शिक्षणमंत्र्यांना तर या गोष्टी पहायला वेळच नाही, विद्यार्थ्यांच्या हिता पेक्षा त्यांच्याकडे इतर कामे भरपूर आहेत.

    एका मित्राने हे चित्र पाठवले आणि बघुन फार मजा वाटली.

    पण आश्चर्य हे की या बयेकडे ही पिशवी आली कशी?

    pic27753 [640x480]

    १२ जुलै १९६१, आम्ही ११ वर्षांचे होतो, त्या वेळेची आठवण ठेऊन ’सकाळ’ने आठवणी जाग्या केल्या त्याबद्दल धन्यवाद. खरोखर त्या भयानक पुरापेक्षाही, ज्यांनी ज्यांनी मदतीचा पूर लोटला, त्यापुढे या पुरानेही लाजेने मान खाली घातली.

    http://www.esakal.com/esakal/07122008/SpecialnewsB6BC46A2F9.htm

    तडाखा आणि उभारी

    पानशेत धरण फुटून मुठेला आलेल्या महापुरात पुण्याची वाताहत झाली. या महाप्रलयाला आज ४७ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त "सकाळ'चे वाचक भास्कर दाते यांनी कळविलेला अनुभव.

    व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा

    मल्टिमीडिया विभागामध्ये आणखी व्हिडीओ
    बारा जुलैचा तो दिवस माझ्या अजून स्मरणात आहे. "सकाळ'च्या पहिल्याच पानावर "पानशेत धरणाच्या एका भिंतीचा भाग खचत चालला आहे. दुरुस्तीचे काम तेथील कर्मचारी जीव तोडून करीत आहेत,' ही छायाचित्रासह बातमी आली होती. परंतु येणाऱ्या गंभीर प्रसंगाची कल्पना त्या वेळी पुणेकरांना आली नसावी.
    सकाळी वर्गमित्राबरोबर गरवारे महाविद्यालयात जाताना संभाजी पुलावर बरीच गर्दी दिसली. सर्व जण पुलाखालून वाहणाऱ्या पुराचे लोंढे बघत होते. हा पूर नेहमीपेक्षा वेगळा वाटत होता. पाण्याचा रंग गढूळ पाण्यासारखा काळा- प्रवाहाबरोबर मोठी झाडेझुडपे वाहत होती. पाणी पुलाच्या खाली पाच फुटांवर होते. कर्वे रस्त्याला जाईपर्यंत पाणी रस्त्याला लागले होते. मी माघारी फिरलो.
    अलका टॉकीज चौकापर्यंत पाणी येऊ लागले होते. थोड्याच वेळात ते पुलावरून वाहू लागले, तेव्हा पानशेत धरण फुटल्याची कल्पना लोकांना आली. सर्वांची धावपळ सुरू झाली. दुपारी बाराच्या सुमारास नदीजवळील रस्त्यांवर पाणी जोरात घुसले. बायकामुलांना घेऊन लोक सुरक्षित जागी पळू लागले. पाण्याच्या तडाख्याने मातीची घरे धडाधड कोसळत होती. घरातील चीजवस्तू, मुकी जनावरे लोकांच्या डोळ्यासमोर वाहून जात होती. दुपारी चारपर्यंत पुण्यातील नदीजवळचा सखल भाग दीड मजला पाण्याखाली होता. शनिवार, नारायण, कसबा, शिवाजीनगर, सोमवार, रास्ता आणि मंगळवार या पेठा पाण्याखाली होत्या. अलका, डेक्कन, हिंदविजय, विजय, भानुविलास ही सिनेमागृहे पाण्यात होती. खडकी, पिंपरी, चिंचवड भागात गेलेली कामगार मंडळी नदीच्या एका बाजूस अडकली. संध्याकाळनंतर पाणी ओसरू लागले.
    दुसऱ्या दिवशी पिण्याचे पाणी नाही, वीज नाही. त्यामुळे पुणेकरांचे हाल झाले. त्या वेळी मदतीसाठी सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्ते धावून आले. अनेक शाळा, मंगल कार्यालयांमध्ये पूरग्रस्तांना दोन-तीन आठवडे आसरा दिला. त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली. पुराने नव्या-जुन्या अनेक घरांना तडाखा बसला. संभाजी पुलाच्या फक्त कमानी शिल्लक राहिल्या होत्या. सगळीकडे दलदल आणि कुजलेल्या धान्याचा वास.
    यातून पुण्याची घडी बसण्यास सहा महिने लागले. त्या वेळचे पंतप्रधान पंडित नेहरूंनी पुण्याला धावती भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. महाराष्ट्राच्या अनेक भागांतून मदतीचा ओघ येऊ लागला. पुण्याने फिनिक्‍स पक्ष्याप्रमाणे भरारी घेतली. देवाची एवढीच कृपा म्हणायची, की हा महाप्रलय रात्री न येता दिवसा येऊन गेला.

    पण त्यातसुद्धा काही लुटारू होतेच, ती आठवण सुद्धा ताजी आहे.

    १२ जुलैला पूर आला, लोक कसे सावरणार, रात्री पुणं नीट झोपलं सुद्धा नाही, सकाळी १३ जुलैला बाहेर सगळा आरडाओरडा सुरू झाला, खडकवासला धरण फुटल्याबद्दल. लोक आधीच घाबरलेले त्यात ही बातमी, सगळेजण जे हातात मिळेल ते घेऊन पळू लागले, कोणी पर्वतीवर गेले, कोणी लहान मुलांना घेऊन उंच इमारतीवर गेले, घराला कुलूप सुद्धा लावण्यासाठी लोक थांबले नाहीत. त्यावेळेस फोनची इतकी सुविधा नव्हती, म्हणून काही कळत नसे. सर्वजण आपला जीव वाचविण्यासाठी सैरावैरा धावत होता. पण जसजसा वेळ जाऊ लागला, पाणी कोठे दिसेना, कारण लोकांत चर्चा असे इथपर्यंत पाणी आलंय, तिथपर्यंत पाणी आलंय, पण दुपार झाली तरी पाणी  कोठे दिसेना, हळूहळू लक्षात यायला लागले की, ही अफवा होती, म्हणून लोक घरी परतू लागले, तर काय पाहतात. त्यांची घरे चोर, दरोडेखोरांनी लुटली होती, पुरापेक्षाही हा महाभयंकर हाहाःकार होता, लोकांच्या भावनांशी चोरांनी अफवा उठवून खेळ केला होता.

    ही आठवण आली की वाटते, माणसातल्या माणूसकीचा असाही पैलू परमेश्वरानी का निर्माण केला असावा कळत नाही.

    अजून एक आठवण, त्याच वेळेस राजकपूरचा ’जिस देशमे गंगा बहती है’ हा चित्रपट श्रीकृष्ण टॉकीज मध्ये लागला होता, लोक नंतर म्हणू लागले, या सिनेमामुळेच पुण्यात गंगा वाहिली.

    राग यमन मधील काही रचना -

    यमन रागातील प्रार्थना, मराठी, हिंदी चित्रपटगीते, भावगीते या विषयीची सूची-

    मराठी चित्रपटगीते -

    १) ब्रह्मा विष्णू आणि महेश्‍वर
    (आशा भोगले - आम्ही जातो आमुच्या गावा)

    २) मागे उभा मंगेश
    (आशा भोगले - महानंदा)

    ३) प्रथम तुला वंदितो
    (वसंतराव देशपांडे - अष्टविनायक)

    ४) मला इश्काची इंगळी डसली
    (उषा मंगेशकर - पिंजरा )

    ५) एकवार पंखावरुनी फिरो तुझा हात
    (सुधीर फडके - वरदक्षिणा )

    ६) मंदिरात अंतरात तोच नांदताहे
    (सुधीर फडके , उत्तरा केळकर - धाकटी सून)

    ७) देवा दया तुझी ही
    (सुमन कल्याणपूर - बोलकी बाहुली )

    ८) जिथे सागरा धरणी मिळते
    (सुमन कल्याणपूर - पुत्र व्हावा ऐसा)

    ९) पिकल्या पानाचा देठ की हो
    (शोभा गुर्टू - कलावंतीण )

    १०) टाळ बोले चिपळीला
    (भीमसेन जोशी)

    ११) धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना
    (आशा भोसले व सुधीर फडके - धाकटी बहीण)

    १२) लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई
    (सुमन कल्याणपूर - बाळा गाऊ कशी अंगाई )

    १३) एकमुखाने बोला जयजय हनुमान
    (महेंद्र कपूर)

    १४) कबिराचे विणतो शेले
    (माणिक वर्मा - देव पावला )

    १५) जीवनात ही घडी अशीच राहू दे
    (लता मंगेशकर - कामापुरता मामा )

    मराठी भावगीते -

    १) इथेच आणि या बांधावर
    (माणिक वर्मा)

    २) अजून या झुडुपांच्या मागे
    (दशरथ पुजारी )

    ३) वार्‍यावरती घेत
    (सुमन कल्याणपूर)

    ४) तोच चंद्रमा नभात
    (सुधीर फडके)

    ५) शुक्र तारा मंद वारा
    (अरुण दाते आणि सुधा मल्होत्रा)

    ६) तिन्ही सांजा सखे मिळाल्या
    (लता मंगेशकर)

    ७) घाल घाल पिंगा वारा
    (सुमन कल्याणपूर)

    टीप - यमन रागात ’म’ तीव्र असतो, परंतु काही वेळेला शुद्ध ’म’ वापरला जातो.
    तसेच काही गाण्यात यमन आहे, परंतु कडव्यात दुसरा राग येण्याची शक्यता असते
    (मिश्र राग शुद्ध कल्याण, यमन कल्याण इ. ) उदा.

    १) लपविलास तू हिरवा चाफा -
    (मालती पांडे )

    २) शाळा सुटली पाटी फुटली आई मला भूक लागली
    (कुंदा बोकील)

    ३) का रे दुरावा का रे अबोला
    (मुंबईचा जावई)

    ४) जिवलगा कधी रे येशील तू
    (लता मंगेशकर-सुवासिनी )
    यात यमन-केदार-मल्हार परत यमन.

    ५)नाच रे मोरा आंब्याच्या वनात
    (आशा भोसले - देवबाप्पा)

    ६) किलबिल किलबिल पक्षी बोलती
    (सुषमा श्रेष्ठ)

    हिंदी चित्रपटगीते -

    १) भुली हुई यादे

    २) आसू भरी है
    (परवरीश-मुकेश)

    ३) सारंगा तेरी याद में
    (मुकेश)

    ४) चंदन सा बदन
    (सरस्वती चंद्र - मुकेश)

    ५) कभी कभी ....खयाल आता है
    (कभी कभी)

    ६) आपके हसीन रुखपे...
    (महंमद रफी)

    ७)आपके अनुरोध पे
    (अनुरोध-किशोरकुमार)

    ८) जिंदगी भर नहीं भूलेंगी
    (बरसात की रात - महंमद रफी)

    ९) इन्हीं लोगों ने
    (पाकिजा)

    १०) तुम आशा विश्‍वास

    ११) वो जब याद आए

    १२) जिया ले गयो जी मोरा सावरियां
    (अनपढ-लता मंगेशकर)

    १३) पान खाये सैय्या
    (तिसरी मंजिल)

    १४) अभी ना जाओ छोडकर के दिल अभी भरा नहीं
    (हम दोनो)
    १५) इस मोडसे जाते है
    (आँधी)

    १६) कही ये वो तो नहीं
    (हकिगत)

    १७) तुम ना जाने किस जहा मैं खो गयी

    १८) मन रे तू काहे

    १९) रे मन सूर में गा

    २०) मेरी आवाज ही  पहचान है, गर याद रहे,  नाम गुम जाएगा
    (लता मंगेशकर)

    २१) जा रे बदरा

    २२) जब दिल जले शाम

    २३) सलामे इश्क मेरी जा
    (मुकद्दर का सिकंदर)
    २४) मौसम है आशिकाना

    २५) कुहू कुहू बोले
    (स्वर्ण सुंदरी)
    २६) गर तुम भुला न पाएंगे

    सौजन्य - वरील सूची दि.६ जुलै २००८ च्या, लोकसत्ताच्या, लोकप्रभा पुरवणीत छापून आलेली असून, सुनीती जोशी, डोंबिवली, मुंबई यांनी ती पाठविली आहे.

    पुण्याजवळ एका खेडेगावी साधारण पस्तीस वर्षांपूर्वी एका गरीब कुटुंबात एक मुलगा रहात होता. घरची गरिबी असल्याने शिक्षणापेक्षा कामाला जास्त महत्व दिले जायाचे, कारण तो काळच तसा होता, आताच्या सारखी कोणी फुकट पुस्तके वगैरे वाटत नव्हते. त्याकाळी खेडेगावात शाळेची सोय सुद्धा नव्हती, मुलांना तालुक्याला पुढील शिक्षणाला जावे लागायचे, आणि आई वडिल काय म्हणत, शिकून कुठे कुणाचे भले झाले आहे, त्यापेक्षा शेतात काम केल्यास चार पैसे तरी मिळतील. तशाही परिस्थितीत त्याने चवथी पर्यंत शिक्षण पूर्ण केले, आता तालुक्याला पाचवी नंतर शिकायला जाणे म्हणजे अवघडच, मग त्याच्या मित्राच्या घरच्यांनी त्याची जबाबदारी घेतली, कारण त्याची मदत त्यांच्या मुलाला अभ्यासात होत असे, शिवाय सोबत ही होई. अशा प्रकारे तो अकरावी ( त्या काळी दहावी नव्हती, अकरावी नंतर साइड निवडावी लागे ) पहिल्या वर्गात पास झाला. परत गावी, आता काय करणार?  गावात सरपंचाच्या हस्ते सत्कार झाला. त्यावेळी भाषणात त्याने पुढील शिक्षणाची इच्छा व्यक्त केली, सर्वांना त्याची घरची परिस्थिती माहित होती. त्याला डॉक्टर व्हायचे होते, कारण त्या गावात डॉक्टर नव्हता, म्हणून आजारी झाल्यास उपचाराविना लोक मृत्यु पावत.लोकांनी मग ग्रामपंचायतीची सभा बोलावून त्याला पुढील शिक्षणासाठी मदत करण्याचे ठरवले, आणि त्याप्रमाणे सर्व गावकर्‍यांनी यथाशक्ती मदत केली, आणि तो खूप मेहनत घेऊन डॉक्टर झाला. गावात पहिला डॉक्टर म्हणून त्याचा सत्कार केला, तेव्हा त्याने गावाला वचन दिले, गावकरी लोकांची सेवा तो मोफत करील. आणि तो त्याप्रमाणे सेवा करू लागला.

    पुढे त्याने पुण्याला रहायला जाऊन घरातच  दवाखाना उघडला, पण इथे आठवडाभर दवाखाना चालवून तो दर रविवारी आपल्या गावी जाऊन मोफत औषधपाणी करू लागला.

    त्यांना आपण आता डॉक्टर माने म्हणू यात. मान्यांच्या हाताला गुण फार म्हणून लांबलांबून रुग्ण येऊ लागले, खूप गर्दी होऊ लागली, जवळपासचे सर्व दवाखाने बंद झाले. रात्री दोन तीन वाजेपर्यंत रुग्ण येऊ लागले. चांगल्यापैकी पैसा मिळू लागला, पण रविवारी गावाला जाणे चुकत नव्हते. नंतर घरापासून साधारण २५ कि.मी. वर जागा घेऊन मान्यांनी मोठे  hospital चालू केले, आणि ते तिकडेच रहायला गेले, इकदे दवाखाना ठेवला, तिकडे hospital चालू केले. आता त्यांचा दिनक्रम पहा - सकाळी तिकडे hospital मध्ये सकाळी ११ ते १ दवाखाना चालवायचा. तेव्हाच hospital मध्ये लक्ष द्यायचे. संध्याकाळी ५ वाजता निघून गणपतीचे दर्शन घेऊन पुण्यातील दवाखान्यात ७ वाजता हजर. तो पर्यंत पन्नासएक पेशंट वाट बघत बसलेले असतात. ते तरी काय करणार, हमखास गुण ना. फार लांबून लांबून पेशंट येतात.आणि फी पण कमी, तीन दिवसांच्या गोळ्या आणि इंजेक्शन मिळून फक्त ५० रूपये. त्यामुळे गर्दी फार. पार रात्री कधीकधी तीन वाजणार. मग दवाखाना बंद करून २५ कि.मी.घरी जायला चार वाजणार. पुन्हा सकाळी ११ वाजता बाबा दवाखान्यात हजर. मागील जवळजवळ २५ वर्षे मी पाहतोय, त्यांनी  कोणत्याही दिवशी सुट्टी घेतली नाही, कोणत्याही सणाला, अगदी दिवाळीलाही नाही. त्यात पण आजपर्यंत दर रविवारी गावाला जाण्याचा नेम चुकला नाही, नंतर त्यांनी मोठी गाडी विकत घेतली, रविवारी गावाला जा्णे आणि पेशंट गाडीत घालून आणणे, त्यांच्यावर उपचार करून गावाला परत नेउन सोडणे, हे कार्य अजूनही चालू आहे, ते गाववाल्यांचे उपकार अजूनही  विसरले नाहीत. कोणत्याही परिस्थितीत पुण्यात ते रविवारी नसतात, गावालाच जाणार. कारण त्यांच्या मदतीशिवाय शिक्षण शक्य नव्हते.

    पेशंटच्या घरून visit साठी  call आल्यास ते कोणाच्याही घरी जात नाहीत, पेशंटला दवाखान्यात आणा म्हणतात, त्यांचे म्हणणे  नंबराला बसलेल्यांचा न्याय कोण करणार? ते सुद्धा तासन्‌तास बसलेले असतात ना? मग कोणी कितीही पैसे देऊ देत, घरी जाणे नाही. दवाखान्यात एवढी गर्दी असते तीन तीन तीस नंबर लागत नाही. सतत पेशंट तपासणे, फक्त रात्री १० वाजता १५ मिनीटांच्या विश्रांतीत ग्लासभर दूध घेणे.

    एवढे काम, एवढी गाववाल्यांबद्दल कृतज्ञता हे आजकाल पहायला मिळत नाही. कित्येक कुटुंबे त्यांच्यावर आजारपणाआठी अवलंबून आहेत.  एक विचार मनात आला की भिती वाटते, त्यांच्या नंतर आमचे कसे होणार?

    ही मनगढंत कथा नाही, सत्य आहे. आजपर्यंत दवाखान्याला आणि दर रविवारी गावाला जाण्याला, सणवार सुद्धा आडवा आलेला नाही. सतत ३५-४० वर्षे ही साधना, हे कार्य सोपे नाही, पण चालू आहे.

    धडाधड घोषणा करायच्या, परिणामांची पर्वा करायची नाही, योजना नाही, बस फक्त श्रेय लाटायचे, हा तर आपल्या राजकारणी आणि अधिकारी लोकांचा हातचा मळ आहे. आता काय सामान्य गणित, कारण काय तर ज्या विद्यार्थ्यांना गणित घेऊन करियर करायचे नाही त्यांच्यासाठी. मग जर दहावीनंतर इतिहास भूगोलाची सुद्धा गरज लागत नसेल तर त्या विषयांचा अभ्यास करण्यात, आणि त्यावर वेळ वाया घालवण्यात काय अर्थ आहे. ते विषयच पाचवी पासून कमी करावेत. याहि पेक्षा सातवीनंतर विद्यार्थ्यांच्या आवडीप्रमाणे विषय निवडू द्यावेत, कारण त्यांना काय करियर करायचे आहे ते त्यांना ठरवू देत. हा निर्णय ज्यांना माय मराठी बद्दल अभिमान आहे आणि ज्यांना फक्त शेतीच करायची आहे किंवा ज्यांना भविष्यात इंग्रजीचा काहिही उपयोग नाही, त्यांना इंग्रजी शिवाय दहावीला बसण्याची परवानगी असावी, त्यामुळे शाळांचे निकालही सुधारतील. बघा, भूगोलात शिकवतात, टुंड्रा प्रदेशातील लोकजीवन, याचा कधी आयुष्यात संदर्भ आला आहे काय, पण शाळेत नाही समजले तर मार्क नाही मिळणार.

    http://www.esakal.com/esakal/07052008/MaharashtraDD1BF5F0A5.htm

    सामान्य गणिताबाबत गोंधळात गोंधळ
    मुंबई, ता. ४ - माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदापासून नववीसाठी सुरू केलेल्या सामान्य गणित विषयाची अंमलबजावणी कशी करावी, याबाबत अद्याप शाळांमध्ये संभ्रम आहे.
    या संदर्भात अनेक शाळांनी पालक व विद्यार्थ्यांना दहावीनंतर करियरच्या दृष्टीने होणाऱ्या परिणामांची माहितीही दिलेली नाही. बहुसंख्य दुकानांमध्ये या विषयाच्या पुस्तकांचाही पत्ता नाही.
    बऱ्याच विद्यार्थ्यांना गणिताची भीती वाटते आणि दहावीच्या परीक्षेत ते नापास होतात. त्यामुळे दहावीनंतर ज्या विद्यार्थ्यांना पुढे गणित विषय घेऊन करियर करावयाचे नाही, त्यांना बीजगणित व भूमितीऐवजी सामान्य गणित हा पर्याय यंदा नववीपासून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्याबाबतचे परिपत्रक सर्व शाळांना पाठविण्यात आले आहे. सामान्य गणित घेतल्यास दहावीला पुन्हा बीजगणित व भूमिती घेता येणार नाही. त्यामुळे दहावीनंतर करियरच्या दृष्टीने कोणते अभ्यासक्रम शिकता येणार नाहीत, याची कल्पना विद्यार्थी व त्यांच्या पालकांना शाळांनी देणे अपेक्षित आहे. त्यावर विचार करण्यास थोडा कालावधी देऊन सामान्य गणिताविषयी त्यांची संमतीपत्रे भरून घ्यावयाची आहेत. त्यासाठी अनेक शाळांनी अजून पालक व विद्यार्थ्यांच्या बैठका आयोजित करण्यास सुरुवात केलेली नाही.
    या विषयाची पुस्तके अद्याप उपलब्ध न झाल्याने तो विषय कसा आहे, बीजगणित व भूमितीच्या तुलनेत सामान्य गणित अभ्यासक्रमाची काठिण्यपातळी किती आहे, याची माहिती शिक्षक, विद्यार्थी व पालकांना नाही. शाळा सुरू होऊन दोन आठवडे उलटले. सामान्य गणिताचा पर्याय स्वीकारण्यास अजून किती वेळ जाईल आणि त्यानंतर अभ्यासक्रम शिकवून होईल का, याबाबत प्रश्‍नचिन्ह आहे. सामान्य गणितासाठी शाळांनी फारसा रस घेतल्याचे चित्र सध्या तरी नाही. सामान्य गणित घेणे, हे विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक आहे, सक्तीचे नाही. ज्या शाळांचे बरेच विद्यार्थी गणितात अनुत्तीर्ण होतात, अशा शाळा दहावी निकालाची टक्केवारी वाढविण्यासाठी सामान्य गणिताची सक्ती विद्यार्थ्यांवर करण्याची शक्‍यताही वर्तविण्यात येत आहे.

    जर एखाद्या मुलीला लग्नानंतर नोकरी करायची नसेल तर तिने एवढे अवजड शिक्षण का घ्यावे. दहावीनंतर ज्याला जे करियर करायचे आहे त्याच प्रमाणे विषय निवडायचा अधिकार या लोकशाहीत असायला हवा, त्याने सरकारने ठरवलेल्या विषयांप्रमाणे अभ्यास करून मनस्ताप का करून घ्यावा, ही त्याच्या विचारस्वातंत्रावर गदा आहे. एखाद्याला पुढे डॉक्टर व्हायचे आहे, आणि केवळ दहावी पास होण्यासाठी पुढे गरज नसलेले विषय असल्यामुळे जर तो दहावी पास होत नसेल, आणि त्याचे करियर होत नसेल तर याला शिक्षणपद्धतीच जबाबदार आहे. शिक्षणमंडळाने ठरवलेले विषयच घ्यावेत, आणि गरज नसताना डोकेफोड करावी, हे लोकशाही राष्ट्रात घडू नये, आणि विद्यार्थांना निवडस्वातंत्र असावे.

    मी एवढ्या शाळांतील भिंतीवरील सुविचार वाचले, पण कोठेही रहदारीचे नियम पाळावेत, रस्त्यावर पचापच थुंकू नये, पर्यावरण वाचवावे, असे सुविचारच लिहीलेले नाहीत.

    सर्वसाधारणपणे परदेशातील मुलांबद्दल किंवा त्यांच्या आईवडिलांबद्दल बोलताना भारतीय लोक एकच पालुपद लावतात, गळा काढतात- संस्कारांबद्दल. म्हणे परदेशात राहून भारतीय लोक
    भारतातील संस्कार विसरता, आणि त्यांना हे  सल्ला देतात मुलांना भारतात परत पाठवा नाहीतर ते भारतीय संस्कार विसरतील पण संस्कार संस्कार म्हणून जे थोडे भारतीय टाहो फोडतात त्यांना तरी संस्कार समजलेत काय? कशाला संस्कार म्हणायचे? आईवडिल मुलांना शिकवतात आणि त्यांच्याकडून म्हातारपणी सांभाळतील म्हणून आशा बाळगतात, म्हणून तर प्रत्येकाला एक तरी मुलगा हवा असतोच, भले मग कितीही मुली होऊ देत. म्हातारपणाची काठी म्हणून मुलाकडे बघतात. ह्यालाच संस्कार म्हणायचे काय? आजही भारतात आपण ऐकतो कि मुलगा सुनेला घेऊन वेगळा झाला किंवा सुन मुलगा त्रास देतात. अगदी इस्टेटीसाठी भाऊ भावाला, मुलगा आईबापाला किंवा वेळप्रसंगी कोणी कोणाचाच विचार करत नाही आणि कोर्टाची दारे ठोठावतात. हेच संस्कार काय?
    नुसते रस्त्यावर पाहा, अजिबात रहदारीचे नियम पाळत नाहीत चांगले सुशिक्षित लोक सिग्नल तोडतात, पादचार्‍यांना कुचलतात हेच काय संस्कार? रस्त्यात कुठेही पचापच थुंकायचे हेच संस्कार काय? ही सर्व मंडळी शाळेत नव्हती गेली काय? काय त्यांना शिक्षकांनी शिकवले नसेल काय? पण कोण हे लक्षात ठेवतो. शाळा संपली शाळेतील शिस्त संपली. कॉलेजच्या मुली मुले मिळून रेव्ह पार्टी करतात. आणि घाऊकपणे पोलिसांच्या हाती दारुच्या नशेत सापडतात मग पोलीस मुलींना सोडून देऊन मुलांवर खटले दाखल करतात. हेच संस्कार त्यांना कॉलेज शाळेत शिकवलेत काय?
    मग संस्कार संस्कार असे बोजड शब्दांच्या कुबड्या का मिरवायच्या.
    गणेश उत्सवाला वर्गणी साठी सक्ती करताना कुठलेच संस्कार बाळगले जात नाहीत. मोठे मोठे स्पीकर लावून, ३०-३० तास मिरवणूक काढून कोणते संस्कार प्रदर्शित केले जातात.
    महात्मा गांधीच्या फोटोच्या साक्षीने जेव्हा भ्रष्टाचार चालतो तेव्हा खरोखरच संस्कारांच्या ओझ्याने, गांधी परत जन्माला येणार नाहीत.
    शाळेत असताना थोर पुरुषांचे धडे वाचले जातात, सुविचार पाठ केले जातात. ते काय फक्त शाळेतच त्यावेळचे संस्कार व्यवहारात सोईस्करपणे विसरले जातात. हेच संस्कार मिरवण्यासाठी भारतात राहायचे काय? किंबहुना परदेशात गेलेला भारतीय संस्कारांचा बाउ करता, कायद्याच्या, नियमांच्या चौकटीत राहून नीट पद्धतशीर आणि शांत जीवन जगत असतो.इथे संस्कारांच्या रगाड्यात, संस्कारी माणूस सुद्धा शांत जीवन जगू शकत नाही. कारण पाण्यात राहून कोरडे राहता येत नाही.
    दुसर्‍याला वेळप्रसंगी मदत करावी, हे संस्कार आहेत, पण आम्हाला विचारा, रस्त्यावर अपघातात सापडलेल्याला दवाखान्यात पोहोचवल्यावर डॉक्टर आणि पोलीस याछ्यापासून काय त्रास होतो ते,
    मदत करणारा पुन्हा आयुष्यात कोणाला मदत करणार नाही.
    बेभानपणे बिघडलेल्या वाहतुकीत आपण एकटेच वाहतुकीचे नियम पाळून वाहन चालवू शकत नाही, त्याच प्रमाणे असल्या संस्कारात, संस्कारीत जीवन जगूच शकत नाही.
    स्त्रिया आपली दारे झाडतात आणि कचरा शेजार्‍याच्या दारात लावतात, बसमध्ये जागा असूनही बस थांबवत नाहीत, मत मागायला येणारे पुढारी पुढील निवडणुकीपर्यंत तोंड दाखवत नाहीत, सुवर्ण पदकामध्ये भेसळ केली जाते, वाहन चालक आणि पोलीस यांच्यात आर्थिक संबंध येतात, सर्व सरकारी कार्यालयांमध्ये माजलेला भ्रष्टाचार, हे सर्वजण शाळा कॉलेजची पायई चढलेत ना?यांच्यावर त्यांच्या आईवडिलांनी शिक्षकांनी काहीच संस्कार केले नसतील काय? एवढे सणवार कामधाम सोडून आपण ते अंगिकारिले आहेत? हे सर्व संस्कार धार्मिकतेचा आव आणून पार पाडायचे. हेच काय संस्कार?
    बरोबर आहे परदेशात मुले आईवडिलांना संभाळत नाहीत, पण हे तिथे गृहित असते आणि त्याप्रमाणे आईवडिल स्वतःची व्यवस्था करतात, आणि मुलांनाही तशा पायावर उभे करतात, म्हणजे
    अपेक्षा नाहीत आणि अपेक्षाभंगाचे दुःख नाही. देवाधर्माचे नाहीत पण मेहनतीचे संस्कार आहेत. श्रीमंतीचे नाहीत पण प्रामाणिकपणाचे संस्कार आहेत. परदेशात मुले मुली एकदम मोकळेपणाने राहतात, म्हणून त्यांना संस्कार नाहीत, इकडे मुले मुली तेच, फक्त आडोशाला करतात.
    आता संस्कारांची व्याख्या आहे, मला वाटेल तसे मी वागणार, पैशांचा माज करणार, आणि संस्कार कवडीमोलाने विकत घेणार.
    संस्कार, भारतीयता, आपली माती, मराठीतील जन्म हे सर्व गोंडस शब्द आहेत, पण जर परदेशात राहण्यार्‍या भारतीयांची, परत भारतात येण्याच्या इच्छेविषयी टक्केवारी काढा, मला नाही वाटत कुणी इकडे परत येण्याचा विचार करेल.

    सर्व भारतीय साहित्यीकांचा विरोध पत्करून अमेरिकेत संमेलन घ्यायचा ज्या मंडळींचा हट्ट होता त्यांना अमेरिकेतून चपराक मिळाली हे एक प्रकारे बरेच झाले. नाहितर हे एक पेवच फुटले असते. अगदी हळदीकुंकूसाठी सुद्धा आमंत्रणे येतील आणि इकडे  लगीनघाई उडणार. खरे तर त्या परदेशी लोकांना असले उद्योग सुचत नसतात. ज्यातून काहीच फायदा नाही, असले धम्दे ते लोक करत नाहीत. आपल्या लोकांना भरपूर वेळ असतो. आठवत असेल, काही वर्षांपूर्वी T.V. वर "रामायण" मालिका प्रसारित होत असे, तेव्हा सबंध भारतात रस्ते ओस पडत, लोक कामावर उशीरा जात म्हणून कामाच्या वेळा बदललेल्या होत्या.

     

    http://www.esakal.com/esakal/07032008/SpecialnewsD5DFD586A8.htm

    मराठी साहित्य संमेलनास अमेरिकेतूनच विरोध
    पुणे, ता. २ - मराठी साहित्य अमेरिकेत रुजवण्याचा, साहित्यिक चळवळ उभी करण्याचा शाश्‍वत प्रयत्न अमेरिकेतील कोणत्याही मराठी मंडळाने केलेला नाही.
    साहित्यिक कार्यक्रमांना संख्यात्मकदृष्ट्याही यापूर्वी अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे, हे मान्य करत अमेरिकेतील "कॅलिफोर्निया आर्टस फाउंडेशन'ने साहित्य महामंडळास आपल्या निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती केली आहे.
    ८२ वे साहित्य संमेलन अमेरिकेत सॅन होजे येथे आयोजित करण्याचा निर्णय साहित्य महामंडळाने घेतल्यानंतर उलट-सुलट प्रतिक्रिया सातत्याने व्यक्त होत आहेत. अमेरिकेतील बे एरियामध्ये गेली सात वर्षे कार्यरत असलेल्या "कॅलिफोर्निया आर्टस असोसिएशन' संस्थेतर्फे अध्यक्ष मुकुंद मराठे यांनी वरील आवाहन केले आहे.
    ""संमेलन अमेरिकेत घेतल्यास नेमके काय साध्य होईल, याचा बारकाईने विचार होणे गरजेचे आहे,'' असे सांगून बहुतांश मराठी साहित्यप्रेमींना संमेलनास हजर राहता येणार नसल्याचे स्पष्ट आहे, असेही मराठे यांनी म्हटले आहे. ""संमेलनाचा जिवंत अनुभव टेलिकास्ट वा इंटरनेटवरून पोचू शकणार नाही. संमेलनासारखा मोठा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी साहित्यिक लेखनाची, आस्वादाची सशक्‍त परंपरा महत्त्वाची असते. अशी परंपरा घडवण्याचा प्रयत्न कोणत्याही महाराष्ट्र मंडळाने येथे केलेला नाही. आस्वाद घेऊ शकणाऱ्या, स्वयंसेवक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींची संख्या बे एरियामध्ये अत्यल्प आहे. विखुरलेली मंडळी असल्याने हे अवघड आहे. केवळ संमेलने भरवून स्टॅनफर्ड किंवा बर्कलीतील प्राध्यापकांना; तसेच मराठी जनांना पुढच्या पिढ्यांना मराठी साहित्याची ओळख करून देणे अशक्‍य आहे. त्यासाठी व्यासंग, संस्कृतीची जाण या अत्यावश्‍यक गोष्टी आहेत. तीन दिवसांच्या संमेलनाने मराठी एकदम जागतिक पातळीवर पोचेल, ही अपेक्षा हास्यास्पद आहे. अशा संमेलनासाठीची योग्यता कमविण्यासाठी प्रदीर्घ काळ योजनाबद्ध प्रयत्न करणे आवश्‍यक आहे; अन्यथा संमेलन म्हणजे केवळ मनोरंजनाचा एक खेळ होईल,'' असे मराठे यांनी म्हटले आहे.

    हे संमेलन भारतात होते, तर त्याची काय फलनिष्पत्ती होते, हा संशोधनाचाच विषय व्हावा. खरा फायदा होतो तो प्रकाशकांचा आणि तिथे खाद्यपदार्थांचे स्टॉल लावणा‍र्‍यांचा.

    आजपर्यंत व्यापारी मालात भेसळ करतात, असे ऐकले होते पण सरकार सुद्धा! १९८४ पासून हे सत्र चालू आहे आणि त्या दोषी लोकांवर कारवाई नाही, आश्चर्य आहे. आता त्यांना त्या वजनाच्या सोन्याचे बाजारभावाप्रमाणे पैसे देणार म्हणे. पण आता त्याचा काय उपयोग. आता सर्व प्रकारच्या पदकांबद्दल शंका येते. खरे तर हा  त्या व्यक्तींच्या भावनांशी  खेळ आहे. जर सरकारक्स्डून असे होत असेल तर विश्वास कोणावर ठेवायचा? सरकार "सुवर्ण कमळ" म्हणून एक पुरस्कार देते, ते तरी खरे असेल काय? आधीच १४ कॅरेट, २४ नाही आणि त्यात ही भेसळ. आपल्या भारतीयांना एवढे सुद्धा समजत नाही काय, कि ह्या इंटरनेट वर्तमानपत्राद्वारे सर्व जगात या बातम्या वाचल्या जातात, तेव्हा परदेशी लोक काय म्हणत असतील, त्यांचे भारतीयांबद्धल काय मत होत असणार?

    http://www.esakal.com/esakal/06282008/SpecialnewsAC5737F20C.htm

    सरकारच्या सुवर्णपदकांमध्ये खोट; १९८४ पासून भेसळ
    गजानन ताजने - सकाळ वृत्तसेवा
    चंद्रपूर, ता. २७ - राज्यातील कृषिक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या संस्था आणि व्यक्‍तींना १९८४ पासून देण्यात आलेल्या सुवर्णपदकांमध्ये किमान दीड ते कमाल साडेनऊ ग्रॅम सोने कमी असल्याचे राज्य शासनाने अखेर कबूल केले आहे.
    आता या पुरस्कारप्राप्त व्यक्‍ती आणि संस्थांना देण्यात आलेल्या सुवर्णपदकांत जेवढे सोने कमी असेल, तेवढ्या सोन्याच्या रकमेची बाजारभावाप्रमाणे भरपाई आणि जुन्या पदकासारखे नवे स्मृतिचिन्ह देऊन राज्य शासन चुकीची दुरुस्ती करणार आहे.
    कृषी आणि पशुसंवर्धन विकास मंत्रालयाकडून कृषी क्षेत्रासाठी दरवर्षी देण्यात येणाऱ्या पुरस्कारात रोख रक्कम, १४ कॅरेट सोन्याचे ५० ग्रॅम किंवा २५ ग्रॅमचे पदक आणि सन्मानपत्र दिले जाते. मात्र, सुवर्णपदक काळे पडत असून, सोन्याचा मुलामाही निघत असल्याचे अनेक पुरस्कारप्राप्त व्यक्‍तींना आढळून आले. हा प्रकार चव्हाट्यावर आल्यानंतर वर्षभरापूर्वी अनेक कृषितज्ज्ञ, प्रगतिशील शेतकरी व संस्थांनी निषेध करीत पुरस्कार परत केले. शासन प्रगतिशील शेतकऱ्यांची फसवणूक करीत असल्याचा आरोपही विधानसभेत झाला. त्यामुळे कृषी विभागाने सुवर्णपदकांची प्रयोगशाळेत चाचणी घेतली. त्यात सर्व निकष धाब्यावर बसवून संबंधित संस्थेने सुवर्णपदकांची निर्मिती केली असून, त्यात धातूची भेसळ झाल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिला. सुरवातीला २००५ मध्ये दिलेल्या पदकांत भेसळ असल्याचा आरोप झाला होता.
    मात्र, त्यानंतर त्यापूर्वीच्याही सुवर्णपदकांत फसवणूक झाल्याच्या तक्रारी झाल्याने शासनाने १९८४ पासूनच्या पदकांची तपासणी केली. यात १९८४ ते २००४ पर्यंत देण्यात आलेल्या ५० ग्रॅमच्या पदकांत सरासरी ४.८३ ग्रॅम, तर २५ ग्रॅमच्या पदकांत १.८८ ग्रॅम सोने कमी असल्याचे आढळून आले. याशिवाय २००५ मध्ये देण्यात आलेल्या ५० ग्रॅमच्या पदकांत सरासरी ९.२० ग्रॅम, तर २५ ग्रॅमच्या पदकांत ३.०८ ग्रॅम सोने कमी असल्याचे आढळून आले.
    कृषी विभागाने पुरस्कारप्राप्त व्यक्‍ती आणि संस्थांना त्यांच्या पदकांत सरासरी जेवढे सोने कमी आढळले, तेवढ्या सोन्याच्या रकमेची बाजारभावाप्रमाणे रक्कम धनादेशाद्वारे थेट घरपोच देण्याचे ठरविले आहे.
    -------------------
    ताम्रपदकांबाबत मौन
    कृषिक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या संस्था, व्यक्‍तीसोबतच स्वातंत्र्यसैनिकांचाही सुवर्ण महोत्सवी वर्षात ताम्रपदक देऊन सरकारने सत्कार केला होता. या पदकांतील धातूतही भेसळ असून, पदके काळी पडली असल्याच्या तक्रारी करण्यात आहेत. मात्र, या तक्रारींबाबत सरकारने अद्यापही मौन बाळगले आहे.

    पण नाही याची आम्हाला पर्वाच नाही, आपल्या झोळीत कसे जास्तीतजास्त पडेल याचाच विचार सर्वजण करतात. आता कुठेतरी हे बदलले पाहिजे. गुन्हेगारांना शासन झले तरच पुधील अनर्थ टळतील.

    आमंत्रक - श्री. संदीप देवकुळे, अध्यक्ष - महाराष्ट्र मंडळ बे एरिया, सॅनफ्रॅन्सिस्को, अमेरिका.

    विषय - ८२वे साहित्य संमेलन अमेरिकेत भरवावे.

    हे आमंत्रण अखिल भारतीय मराठी साहित्य साहित्य महामंडळाचे श्री.कौतिकराव ठाले-पाटलांनी स्विकारले, आणि २३ जून रोजी अति उत्साहात अमेरिकेचे आमंत्रण स्विकारून जाहीर करून टाकले, यापुढील ८२ वे साहित्य संमेलान अमेरिकेत होणार. साहित्य विश्वात काय प्रचंड धुराळा उडाला, बाप रे!

    प्रकाशक खडबडून जागे झाले, तिथे अमेरिकेत कोण जाणार स्टॉल लावायला, इथे भारतात काय, मस्त पुस्तक विक्रीतून प्राप्ती होते. त्याचा वाटा मात्र महामंडळाला द्यायला नको. मराठी पुस्तकांची किंमत पाहिली तर डोळे पांढरे होतात. दिल्ली, बनारस मधील प्रकाशकांना स्वस्तात जमते तर यांना का जमू नये?

    हे बरोबर आहे की, मूठभर अमेरिकेतील मराठी माणसांच्या सोईसाठी तिकडे संमेलन घ्यावे काय? आता बघा ८१ संमेलने भारतात झाली, त्यापासून साहित्य क्षेत्रात काय क्रांती झाली? अध्यक्षपदाच्या निवडणूकीचे राजकारण ही साहित्यीक, सरस्वतीचे पुत्र खेळतात. अध्यक्ष महाशय काय भाषण करतात? त्यांना फक्त याच संमेलनात interest असतो, पुढील वेळी हजेरी लावत नाहीत.  ह्या निमीत्ताने का होईना मागा ना सरकारला अमेरिका वारीला अनुदान. आपले मायबाप सरकार तर काय पैसेच वाटायला बसलेय? नाहीतरी मंत्री लोक करत नाहीत परदेश दौरे? शेतकरी दादाने नाही का कर्जे माफ करून घेतली. हे जे आता विरोध करतात ना त्यांना फुकट वारीला नेतो म्हणा. मग बघा कसे समर्थन करतील ते.

    मी अमेरिका, ऑस्ट्रेलिया फिरून आलो, तिथे सहा सहा महिने राहून आलो, तिथे सर्व सण वार, उत्सव हिंदू, महाराष्ट्रीयन उस्ताहाने साजरे करतात. जर तेथून संक्रांतीला हळदीकुंकूवाचे आमंत्रण आले, तर येथील महिलामंडळांनी जायची तयारी ठेवावी. तिथे परदेशात गणपती बसवतात, त्या उत्सवाला आरती म्हणायला आमंत्रण आल्यास गणपती मंडळांनी परदेश दौर्‍यासाठी जास्तीची वर्गणी वसूल करावी, म्हणजे कार्यकर्ते परदेश वारी करतील, आणि तिथे मिरवणुकीचे धडे देतील.परदेशात गरबा खेळातात, तेव्हा आमंरेअण आल्यास अष्टमीचा होम करण्यास येथील गरबा मंडळांनी तयारी करावी.

    बघा एका ठाले पाटलांसारख्या गुणी अध्यक्षाने हे संमेलनाचे आमंत्रण स्विकारल्यामुळे आपण आपली संस्कृती किती सातासमुद्रापार नेत आहोत.

    करा करा ठाम निर्धार करा, ठाले पाटील, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, अहो आम्हालाही परदेशात मराठी पुस्तके, खरेदी करण्याचा योग केव्हा येणार.

    Newer Posts Older Posts Home

    Popular Posts

    • आत्मा
      आत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा ...
    • १२ जुलै १९६१
      १२ जुलै १९६१, आम्ही ११ वर्षांचे होतो, त्या वेळेची आठवण ठेऊन ’सकाळ’ने आठवणी जाग्या केल्या त्याबद्दल धन्यवाद. खरोखर त्या भयानक पुरापेक्षाही,...
    • कन्यादान
      नुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , "चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी"...
    • The Fame of the Clock
      Recently a Muslim kid named Ahmed Mohamed from Texas was arrested and suspended from school when he showed his home built "clock&qu...
    • वास्तुपुरुष
      मानवाच्या मूलभूत गरजा काय तर अन्न, वस्त्र, आणि निवारा. निवार्‍यासाठी माणूस घर बांधु लागला. त्या घराने त्याला सुख, शांती, समाधान मिळते. दिवस ...
    • अवतार
      विश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...
    • अतिथी देवो भव
      पूर्वीच्या काळी दुपारी म्हणजेच वैश्वदेवाच्या समयी कोणी घरी आले, मग ते परिचित असोत वा नसोत, जाति-धर्माचे असोत वा नसोत, नातलग असोत वा नसोत त्य...
    • पाणी वाचवा
      पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...
    • जात
      भारतात पहिली जनगणना १८७१ इंग्रजांच्या राजवटीत झाली. त्या जनगणनेत सर्व जातींची गणना करुन मुस्लिमांच्या पोट जातींचीही, पंथांचीही गणना करण्यात ...
    • दहावीचा अभ्यास कसा करावा - १
      दहावीच्या परिक्षा ४ मार्च पासून सुरू होणार आहेत. वर्षभर मुलांनी अभ्यास केला असेल, कोणी क्लासला जात असतील, कोणी होम ट्युशन लावली असेल, पणा सर...

    Labels

    मी मराठी अनमोल विचार भारत TV

    Blog Archive

    • ►  2016 (1)
      • ►  February (1)
    • ►  2015 (2)
      • ►  July (1)
      • ►  January (1)
    • ►  2014 (2)
      • ►  January (2)
    • ►  2013 (1)
      • ►  October (1)
    • ►  2012 (22)
      • ►  November (4)
      • ►  July (1)
      • ►  June (1)
      • ►  February (2)
      • ►  January (14)
    • ►  2011 (15)
      • ►  December (2)
      • ►  November (5)
      • ►  October (8)
    • ►  2010 (64)
      • ►  July (1)
      • ►  June (6)
      • ►  May (6)
      • ►  April (8)
      • ►  March (5)
      • ►  February (13)
      • ►  January (25)
    • ►  2009 (66)
      • ►  October (13)
      • ►  September (4)
      • ►  August (3)
      • ►  July (1)
      • ►  May (3)
      • ►  April (10)
      • ►  February (16)
      • ►  January (16)
    • ▼  2008 (63)
      • ▼  November (1)
        • भिमसेन जोशी
      • ►  October (12)
        • चांद्रयान १
        • पोलीस मित्र
        • विवाह संस्था
        • मेंढी
        • कोजागिरी
        • कासवाची माया
        • मुंबई आमचीच
        • मुर्ख सरकार, विवाहबाह्य संबंध आणि पुरुषांवर अन्याय
        • अगतिकता
        • सिंगूरचा धडा
        • सिगारेट बंदी
        • विशिष्ट समाज
      • ►  September (2)
        • औद्योगिक जगतातील सर्वात शक्तीशाली महिला
        • मराठी बाणा
      • ►  August (16)
        • नारायण धारप
        • संताप
        • हे माझ्या भारत देशा! जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
        • शाबास भार्गवी
        • १५ ऑगस्ट २०२७ सालचा
        • १५ ऑगस्ट २००८ सालचा
        • १५ ऑगस्ट १९६० सालचा
        • दूरदर्शन व सेन्सॉर बोर्ड
        • अभिनव अभिनंदन,
        • बाबा आमटे
        • आसारामबापू, आता तरी बोला!
        • होय खरं आहे -
        • चला जेजुरीला जाऊ
        • खेळाडूंचे खच्चीकरण
        • बापूंच्या आश्रमात-
        • ग्रहण
      • ►  July (11)
        • रोज १५०० युनिट वीज
        • या रावजी बसा भावजी
        • अकरावीचा घोळ
        • बीडी जलाइले ... U.K. मे पिया....
        • १२ जुलै १९६१
        • राग यमन
        • विश्वास बसणार नाही
        • सोपे शिक्षण
        • संस्कार आणि संस्कार
        • परदेशातून नकार
        • सरकारी भेसळ
      • ►  June (13)
        • परदेशातील साहित्य संमेलन
      • ►  March (2)
      • ►  February (2)
      • ►  January (4)
    • ►  2007 (52)
      • ►  December (4)
      • ►  September (1)
      • ►  August (6)
      • ►  July (22)
      • ►  June (12)
      • ►  May (5)
      • ►  April (1)
      • ►  March (1)
    • ►  2006 (30)
      • ►  December (2)
      • ►  November (2)
      • ►  October (10)
      • ►  September (4)
      • ►  August (5)
      • ►  July (1)
      • ►  June (6)

    Popular Posts

    • पाणी वाचवा
      पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...
    • The Fame of the Clock
      Recently a Muslim kid named Ahmed Mohamed from Texas was arrested and suspended from school when he showed his home built "clock&qu...
    • कन्यादान
      नुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , "चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी"...
    • अवतार
      विश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...
    • मकर संक्रांत
      आज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्‍या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...

    Follow us at FB

    Tweets by @tlf_org
    Copyright © 2015 मी मराठी माणूस

    Created By ThemeXpose