मुंबईची रेल्वे

आता मी इथे ओ‘स्ट्रेलियात रेल्वे प्रवास करताना माझ्या नातेवाईकाने सांगितले की, या ऑस्ट्रेलियातील रेल्वे अधिकारी भारतातील, मुंबईतील उपनगरी रेल्वे प्रसाशनाला भेट देण्यास गेले होते, कारण काय तर मुंबईतील लोकल वेळेवर आणि लवकर कशा धावतात. कारण इथल्या गाड्या वेळेवर न धावता शक्यतो उशिराच धावतात. या अधिकारी वर्गाने अहवाल दिला की, अशी सुधारणा ऑस्ट्रेलियात शक्य नाही.

त्याची कारणे त्यांना नाही समजली, अहो कशी समजणार, मुंबईच्या लोकलचे दार बंद होतच नाही, अगदी भरभरून लोक चढतात, लटकतात, इथे असे नाही दरवाजे गाडी सुटण्या अगोदर बंद होतात, पुन्हा स्टेशन आल्यावर उघडतात, त्यात वेळ जातो.असे मुंबईत शक्य आहे काय? इथे प्लॅटफोर्मवर गार्ड उभा असतो आणि तो सर्व प्रवासी चढल्यावर शिट्टी देतो. असे मुंबईत घडेल काय?  आपली लोकसंख्याच एवढी आहे की, कोणाकोणाला रोकणार. असे म्हणतात की हे अधिकारी तेथील गर्दी बघूनच वेळेआधी परत आले आणि त्यांनी अहवाल दिला की, गाड्या वेळेवर धावण्यासाठी लोकसंख्या वाढली पाहिजे, म्हणजेच आपण भारतीयांनी लोकसंख्या वाढीचे महत्व कसे पटवून दिले पहा.

लोकसंख्या जास्त असल्यामुळे पेट्रोलचा खप जास्त आहे, त्यामुळे जागतीक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव वाढले, तेल विहीरीवाल्यांना किती फायदा आहे नाही का?

लोकसंख्या जास्त असल्यामुळे नोकर्‍या मिळत नाहीत, म्हणून लोक बाहेरील देशात जातात, प्रगत होतात, आई वडिलांना बोलावून घेतात,त्यांना जग बघायला मिळते, हा काय कमी फायदा आहे काय, लोकसंख्या वाढीचा?

लोकसंख्या वाढीमुळे खाणारी तोंडे वाढली, घरांच्यासाठी शेत जमिनी शेतकर्‍यांनी विकल्या, अन्न उत्पादन कमी झाले, म्हणून धान्य आयात करण्याने बाहेरील देशातील शेतकर्‍यांना किती काम मिळाले नाही का? शिवाय त्याची वाहतूक करणार्‍यांना रोजगार मिळाला, हे काय पुण्याचे काम नाही?

शेत जमिनी विकल्याने शेतकर्‍यांना बिल्डरांनी अमाप पैसा दिला, तेव्हा त्या गरीब बिचार्‍या शेतकर्‍यांनी प्लाझ्मा टि.व्ही. घेतले, कार दारात उभ्या केल्या, मोबाईल वापरू लागले, त्या छोट्याशा घरातून मोठ्या फ्लॅट मध्ये आले, त्यांना सुंदर जग कोणी दाखवले, बिल्डरांनी नाही, लोकसंख्येने, यात त्या बिल्डरांची काय चूक आहे, त्यांनी तर लोकांना घरे बांधून दिली.

लोकसंख्यावाढीमुळे मुला मुलींची संख्या वाढली, म्हणजे त्यांना लग्न करणे आले, आता बघा कोणाकोणाची सोय झाली, भटजी, मांडववाले, केटरर्स, कपडेवाले, अहो रुखवत आला म्हणजे भांड्यावाले, घोड्यावाला, छपाईवाले, अजून कितीतरी लोकांची पोटे भरली जातात. लग्नानंतर प्रसूतीगृहांचा धंदा काय वाढला नाही का?

लोकसंख्यावाढी मुळे मुलांची शिक्षणाची सोय करण्यासाठी शिक्षणसम्राट असे मागे राहतील?

मग आपण लोकसंख्या वाढ का रोखावी, उलट कुटुंबनियोजनाचे तीन तेरा वाजवावेत.

Unknown

No comments: