कनेक्शन

भारतातील एका खेडेगावात वीज नव्हती, तेव्हा तेथील पुढारी लोकांनी सरकारकडे अर्ज केला, गावाचा विकास होण्यासाठी वीज पाहिजे, तेव्हा सरकारने तेथील सर्व्हे केला आणि वीजेसाठी परवानगी दिली. वीजेचे खांब टाकण्याचे कंत्राट एकाला, रस्ते खोदाई एकाला, तारा टाकण्याचे एकाला कंत्राट दिले गेले. झाले दोन महिन्यात वीज गावात आली. पण लवकरच खांब जमीन सोडू लागले, तारा तुटू लागल्या, आणि चौकशी समिती नेमली गेली. त्या समितीने अहवालात कोनाचीच चूक नसल्याचे दाखवून दिले. नंतर लोकांना कळले की, सर्व ठिकाणी कनेक्शन जुळालेले होते, आणि त्यातून वीज वहात नव्हती तर आर्थिक वीज वहात होती. अशी खूप प्रकारची आर्थिक कनेक्शन्स आपल्या भारतात आहेत. अगदी पाच व्होल्ट पासून चारशे चाळीस व्होल्ट पर्यंत.

मोठा राजकारणी असतो त्याचे भाई लोकांशी, कमिशनर साहेबाचे मोठ्या गुंडांशी, न्यायालयात अगदी वरच्या स्तरावर, जिथे सामान्य जनता पोहोचू शकत नाही, अशी कनेक्शन्स मोठा झटका देणारी.

साधारण थोडा झटका देणारी कनेक्शन म्हणजे नवीन वीज कनेक्शन पाहिजे, महानगरपालिकेत कॉंट्रॅक्ट पाहिजे, फंडाचा चेक पास करावयाचा असल्यास, ट्रकचे लायसेन्स पाहिजे असल्यास,  घराचा प्लॅन पास करावयाचा असल्यास, वगैरे वगैरे.

छोटा झटका देणारी कनेक्शन म्हणजे बिगर लायसेन्स पकडल्यास, दोन चाकी गाड्यांचे लायसेन्स पाहिजे असल्यास, कोर्टात नकला पाहिजे असल्यास, रेशनिंग कार्डाचे काम असल्यास, सात बारा उतारा पाहिजे असल्यास, शाळेत प्रवेश पाहिजे असल्यास, रोग्याचे खोटे सर्टिफिकेट असल्यास, या प्रकारच्या सर्व कनेक्शनस्‍चा झटका मात्र प्रत्येकाला पदोपदी बसत असतोच, त्यामुळे भारतातील जनता अगदी shockproof झालेली आहे.

Unknown

No comments: