मी मराठी माणूस

Mi Marathi!

  • Home
  • VismiT

http://www.esakal.com/esakal/08192008/SpecialnewsC35FDA4908.htm

नारायण धारप यांचे निधन

पुणे, ता. १८ - प्रसिद्ध भयकथा आणि विज्ञानकथालेखक नारायण धारप (वय ८२) यांचे सोमवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.
तीन वर्षांपासून धारप यांना फुफ्फुसाचा विकार होता. त्यातच त्यांना न्यूमोनिया झाला. विकार बळावल्याने रात्री दहाच्या सुमारास त्यांचे निधन झाले. धारप यांच्या पार्थिवावर उद्या (ता. १९) वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
धारप यांचा जन्म २७ ऑगस्ट १९२५ रोजी झाला. मुंबई विद्यापीठातून बी. एस्सी. टेक ही रसायनशास्त्र विषयातील पदवी त्यांनी संपादन केली. त्यानंतर त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्याच सुमारास "अनोळखी दिशा' हा त्यांचा पहिला भयकथासंग्रह प्रकाशित झाला. "समर्थ' ही त्यांची व्यक्तिरेखा आणि समर्थकथा गाजल्या. "चंद्राची सावली', "गोग्रॅमचा चितार', "नेनचिम' यासह त्यांच्या कथा आणि कादंबऱ्यांची संख्या सव्वाशेच्या जवळपास आहे. मार्चअखेरपर्यंत त्यांचे लेखन सुरू होते.

ही बातमी वाचली, आणि अक्षरशः नातेवाईक गेल्याचे दुःख झाले. १९७० पासून त्याचे साहित्य वाचतोय. पहिली कादंबरी वाचली, चंद्राचे सावली. खरोखर मूर्तिमंत भय. ती कल्पना, काही औरच. नंतर वाचली "ऐसी रत्ने मेळवीन" अशी कल्पना कोणीतरी करू शकतं, यावर विश्वासच बसू शकत नाही. एवढ्या मुलांमधून काही असामान्य, प्रगल्भ, मुलांचा शोध लावून त्यांच्यातील शक्तीचा परलोकी वापर करून करून घेण्याची कल्पना, बस तिथे नारयण धारपच पाहिजेत. बाबूराव अर्नाळकरांनी काही व्यक्तीरेखा अजरामर केल्या, काळापहाड, झुंजार वगैरे, त्याच प्रमाणे ’समर्थ’ व्यक्तीरेखा समर्थपणे नारायण धारपांनीच पेलली. रसायनशास्त्राचा पदवीधर असं काही लिखाण करू शकतो? पण सर्व रसायन अगदी जमून गेलं.

त्यानंतर अनेक लेखकांनी हा भयकथा, गूढकथा प्रकार पुढे नेला, पण नारायण धारप एकमेवच.  

१९८०च्या सुमारास आमचा असा एक ग्रुपच होता, त्यांच्या कादंबर्‍य़ा, कथासंग्रह वाचणार्‍यांचा. पुस्तक आले रे आले की, ते केव्हा वाचतो असे होणार. मग सर्वांनी वाचल्यावर, चर्चा होणार.त्यासाठी शासकीय विभागीय ग्रंथालयावर रोज हजेरी. झालं नारायण धारप गेले आणि भयकथा, गूढकथा हा विषयच संपला.  

http://www.esakal.com/esakal/08182008/SpecialnewsD07255B4F3.htm

ही तर ध्येयपूर्तीची सुरवात - मायकेल फेल्प्स
बीजिंग - ऑलिंपिक स्पर्धेत आठ सुवर्णपदके मिळविण्याचे उराशी बाळगलेले स्वप्न मायकेल फेल्प्सने आपल्या दुसऱ्याच स्पर्धेत बीजिंगमध्ये सत्यात उतरवले. पण एवढ्यावर तो समाधानी नाही.
तो म्हणाला, ""आयुष्यात बाळगलेल्या उद्दिष्टांपर्यंत पोचण्याची ही तर सुरवात आहे. मला अजून खूप काही मिळवायचे आहे.''
स्पिट्‌झच्या सात सुवर्णपदकांचा विक्रम मोडल्यावर झालेल्या पत्रकार परिषदेत फेल्प्स आपल्या कारकिर्दीविषयी, उद्दिष्टांविषयी भरभरून बोलला. त्याच्या बोलण्यात कमालीचा आत्मविश्‍वास आणि दुर्दम्य इच्छाशक्ती दिसून येत होती.

http://www.esakal.com/esakal/08182008/TajyabatmyaSportsPune03EB088032.htm

भारतीय फलंदाजांचा "खेळखंडोबा'
डम्बुल्ला - श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात फलंदाजांच्या गचाळ कामगिरीमुळे भारत अडचणीत आला आहे.

या दोन बातम्यांपैकी दुसरी बातमी वाचली की, संताप येतो, आणि कीवही करावीशी वाटते. एक जो आठ सुवर्णपदके मिळवतो, तरीही विनयाने म्हणतो, मला अजून खूप करावयाचे आहे. या क्रिकेटपटूंना आपणच डोक्यावर घेतले आहे, आणि ते बेशरमपणे हारतात. World Cup ला काय झाले, दुसरा कसा हारतो, यावर आपण डोळा लावून बसलो होतो.

हे जे क्रिकेट बोर्ड आणि खेळाडू आहेत, यांना कायमचे घरी बसवा  आणि तो पैसा पुढील चार वर्षांनी येणार्‍या ऑलिंपिक मध्ये खेळाडू तयार करण्यासाठी वापरा. बास या क्रिकेटपटूंचे लाड. कोणीही भरंवशाचे नाहीत. बरेचसे खेळाडू म्हातारे झालेत, ते म्हातार्‍या घोड्याप्रमाणे  रेस जिंकू शकणार नाहीत.

असं कुठलं कारण आहे की, भारतात जन्म घेतल्याचा अभिमान वाटावा.


*********************

दुरुस्ती केलेली



*********************



ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा, प्राण तळमळला ॥धृ.॥

भूमातेच्या चरणतला तुज धूता, मी नित्य पाहीला होता


मज वदलासी अन्य देशी चल जाऊ, सृष्टिची विविधता पाहू


तइं जननीहृद् विरहशंकीतहि झाले, परि तुवां वचन तिज दिधले


मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन, त्वरि तया परत आणीन


विश्र्वसलो या तव वचनी मी, जगद्नुभवयोगे बनुनी मी


तव अधिक शक्त उद्धरणी मी, येईन त्वरे, कथुन सोडीले तिजला


सागरा, प्राण तळमळला ... ॥१॥





शुक पंजरी वा हिरण शिरावा पाशी, ही फसगत झाली तैसी


भूविरह कसा सतत साहू या पुढती, दश दिशा तमोमय होती


गुणसुमने मी वेचियली या भावे, की तिने सुगंधा घ्यावे


जरि उद्धरणी, व्यय न तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा


ती आम्रवृक्षवत्सलता रे, नवकुसुमयुता त्या सुलता रे


तो बाल गुलाब ही आता रे, फुलबाग मला, हाय, पारखा झाला


सागरा, प्राण तळमळला ...





नभि नक्षत्रे बहुत, एक परी प्यारा मज भरत भूमिचा तारा


प्रसाद इथे भव्य, परी मज भारी आईची झोपडी प्यारी


तिजवीण नको राज्य, मज प्रियसाचा वनवास तिच्या जरि वनीचा


भुलविणे व्यर्थ हे आता रे, बहुजिवलग गमते चित्ता रे


तुज सरित्पते जी सरिता रे, तद्विरहाची शपथ घालितो तुजला


सागरा, प्राण तळमळला ...





या फेनमिषें हससि निर्दया कैसा, का वचन भंगिसी ऐसा ?


त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते, भिऊनि का आंग्लभूमीते


मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी, मज विवासनाते देती


तरि आंग्लभूमि भयभीता रे, अबला न माझी ही माता रे


कथिल हे अगस्तिस आता रे, जो आचमनी एक क्षणी तुज प्याला


सागरा, प्राण तळमळला ...





गीतकार :स्वातंत्र्यवीर सावरकर



http://marathi.webdunia.com/miscellaneous/special08/iday/0808/12/1080812022_1.htm


 


झी मराठी वाहिनी. वेळ रात्री ९-३० ची. कार्यक्रम "एका पेक्षा एक". कलाकार भार्गवी चिरमुले. गाणं ’लव लव करी पातं’. आता यात विशेष काय? हो यात विशेष आहेच. एवढे नृत्याचे  रियालिटी शो पाहिले पण या गाण्यातील कल्पना अगदी हृदयाला स्पर्श करून गेली. कार्यक्रमातील, T.V. समोरील सर्वांचे डोळे भरून आले. दुःखाने नाही पण माहीत नाही ती भावना काय होती, पण डोळ्यात भार्गवीने पाणी आणले.

थोडक्यात थीम अशी, एक अपंग मुलगी अल्फा मराठी वरील एका पेक्षा एक कार्यक्रम पहात असते आणि त्यात आदेश बांदेकर नवीन ऑडिशनचे निवेदन करताना ती ऐकते, आणि तिच्याही मनात या ऑडिशनला जाण्याची इच्छा होते, आणि  त्त्यातच ती नाचायला सुरूवात करते, आणि भार्गवीने हा नाच एका पायावर केला,कारण ती मुलगी एका पायाने अधू असते, शिवाय नृत्यात चेहरा इतका बोलका होता बस्.  डोळे भरून आले. खरोखर अप्रतीम. नृत्य पाहताना भार्गवीला दुसरा पाय आहे याचा विसर पडला होता.

अपंग आहे म्हणून काय झाले, एक पाय नसेल पण जिद्द आहे ना! ती गरूडासारखी आकाशात झेप घ्यायला लावते. अल्फा वाहिनीने अपंग कलाकारांना संधी देऊन त्याचे कौतुक करावे. लहान मुलांचा, प्रौढांचा, तरुणांचा, मुलींचा, सिनेमातील कलाकारांचा सर्वांचे कार्यक्रम झाले, पण अपंगांना, अंधांना सहभागी करून घेऊन त्यांच्याही कलेचे चीज करावे, हीच अल्फा मराठीला विनंती.

असे झाल्यास भार्गवीच्या प्रयत्नांना यश येईल, कदाचित तिचा उद्देश सफल होईल. हा विचार सचिनने सुद्धा करावा.

खूप वाटले या दिवसाची कल्पना करून मी काही लिहू शकेन म्हणून, पण विचार केला तर फारच भायानक चित्र डोळ्यासमोर उभे राहते.

मागील पाच वर्षात computer ने जी प्रगती केली, ती गती पाहिली असता २०२७ साली काय होईल देवच जाणे. कोणी ऑफिसातच जाणार नाहीत. आताच अमेरिकेत घरी बसून काम करण्याची सोय आहे. त्यावेळेस picnic ला गेलेले असताना सुद्धा काम करता येईल. मुले e-school मध्ये शिकतील. शाळेचा प्रश्नच राहणार नाही. घरीच computer शाळेचे काम करील. मुले एवढी बिझी होतील, त्यांना आईवडिलांशी बोलायला वेळ नसणार, की ते कुठेतरी लहानपणातच पायावर उभारतील. मानवी क्लोनचीप्रगती झाली तर आई कोण आणि बाप कोण? भारतात लोकसंख्येचा स्फोट होणार. राहण्यासाठी शेती नष्ट होणार मग काय? असे खूप विचार आले, त्यात १५ ऑगस्ट चे काय होणार, हा तर विचारच विरून गेला. जर कोणाला १५ ऑगस्ट २०२७ या दिवसाची कल्पना करता येईल तर मला जरूर कळवा.

या वर्षी १५ ऑगस्ट शुक्रवारी आलाय, १६ तारखेला चवथा शनिवार सुट्टी, १७ तारखेला रविवार, १९ तारीख मंगळवारी पतिताची सुट्टी, अशा पर्वणीच्या काळात भारतीयांच्या मनातील विचार समजले तर -

सरकारी ऑफीस मधील क्लार्क - चला एक बरं झालं, वर्षाच्या सुरवातीलाच कॅलेंडर बघून तयारी केली ते. पाच दिवसांचा कोकणात जाण्याचा बेत आखला. आधीच लॉज बुक करून ठेवले. १४ तारखेला संध्याकाळी निघायचे, १८ परत, १९ ला आराम करून २० ला ऑफिसला हजर. १८ चा casual leaveचा टाकलाय झाला पास तर ठीक, नाहितर पगार कट्‍. कोणी येणार नाही १८ ला तेव्हा मी तरी येउन काय करूना? फक्त अडचण आहे ती बंड्याची, त्याच्या शाळेत कंपलसरी झेंडावंदन आहे, काय हे? घरी केले तर चालत नाही काय? पाहिजे तर डिजीटल फोटो दाखवता आला असता. उघीच सगळ्यांनाच त्रास नाही का! बरं झालं ऑफीसमध्ये झेंडावंदन करत नाहीत ते? चला तयारीला लागलं पाहिजे.

क्लार्कची पत्नी - कित्ती छान! चार दिवस कोकणात. मजा आहे. बरं झालं बाई यांनी दूरदर्शीपणा दाखवला आणि लॉज आधीच बुक करून ठेवले. तसे हे भारी हुशार हं! १५ ऑगस्टला म्हणे महिला महिलामंडळात झेंडावंदन करणार. आम्ही जाणार ट्रिपला, तर बाकी जणी नाराज. मी म्हणते आल्यावर झेंडावंदन केले तर चालणार नाही का? मिळालंय ना स्वातंत्र्य मग त्याचे प्रदर्शन कशासाठी? इंग्रजांशी काय काअर केला होता का, की आम्ही दरवर्षी साजरा करणार म्हणून. उलट त्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या कडू आठवणी नकोत. कसा आनंदाने लोकांना हा दिवस साजरा करू द्यावा. सरकारने आनंदाप्रित्यर्थ गाड्या फुकट ठेवाव्यात. बंड्या म्हणतोय शाळेत जायाचे, पण मग बुकींगचे काय? शाळेत काहीतरी सांगता येईल. १५ ऑगस्ट काय नेहमीच येतो, कोकनात कधी जाणार?

बंड्या - शाळेत जायची खूप इच्छा आहे पण आईबाबा नको म्हणतात. गेलं पाहिजेना? बाइंनी धमकी दिलीय सहामाहीला १० मार्क कापण्याची. कंटाळा येतो. पाऊस असेल तर चिकचिक. मैदानावर उभे करतात, आणि पाऊस असेल तर सर मात्र छत्री घेतात. आमचे काय? सरांचे भाषण ऐकायला कंटाळा येतो, पुन्हा तेच तेच सांगतात, इतिहासाचे सर याच विषयावर बोअर करतात. बाबांनी छान ट्रीप अरेंज केली आहे, मजा आहे. मी तर बाबा ट्रीपलाच जाणारच.

नेता - यावर्षी माझा पहिला झेंडावंदन. घरच्यांना सांगीतलंय चांगलं आवरून घ्या. जायचंय. तर म्हणतात डबे बांधून घ्यायचे का? आता काय कपाळ? खादीचे कपडे चांगले स्टार्च घालून कडक इस्त्री केलेत, टोपी पण कडक केलीय. खादीत कसं एकदम प्रामाणिक असल्यासारखं वाटतं. खादी म्हणजे खा दिवसभर. फोटोवाल्याला सांगीतलंय आपले सगळ्या पोजमधले फोटो घ्यायला. आमच्या ५ वर्षात फक्त पाचच टायमाला १५ ओगस्ट येतो, हे काही बरोबर नाही. धा वीस वेळा तरी पायजेल.

सफाई कर्मचारी - पंधरा अगस्त आला की बास, अजीबात फुरसत नसतीया. मंडळावाले हात धुवून मागं लागत्याय, साफसफाई करायसाठी. एकट्यानं जमत न्हाय म्हणूनशान पोरांलाबी सोबत घेतूया. ते शाळंत जाऊन तरी काय करणार हायेत? मंडळवाले निस्त्या पावडरी मारा म्हणत्यात. मुकादम काय कोटा देत न्हाय? ते आपलं दवाखान्यास्नी कायबाही घिवून पाठवून देत्यात. मागल्या टायमाला लय बोंबाबोंब झालती, म्हणून या वर्षी गिरणीवाल्याला दादा बाबा करून खाली पडलेलं पीठ आणलंया, तेच टाकणार, कोणास्नी काळतंय. सम्दीजणं मजेत मिरवत्यात आनी आमी आपली काढतूया घान. कार्यकरम संपल्यावरबी, खाल्ल्याली घान काढावी लागतीच ना. एक बाकी बरं, दुसर्‍यादिसी झाडताना प्लास्टिकचे झेंडे मिळत्यात ते इकून चार पैसं तरी मिळत्यात.

मंडळाचा कार्यकर्ता - चला लवकर बाकीच्यांना गोळा करायला पाहिजे, वर्गणी काढायची ना! दहीहंडीची पण आत्ताच मागावी, नंतर देत नाहीत. मागच्या वेळेस स्पीकरवाल्यानी कमिशन द्यायला नखरा केला होता आता तो बदलला पाहिजे. स्वातंत्र्यदिनाचा एक फायदा, वर्गणीसाठी एक जादा निमीत्त. या दिवशी खादी कपडे, वर कडक गांधी टोपी घालून इंप्रेशन पाडायला बरे वाटते. गल्लीत जाऊन सर्वांना दम देऊन आलोय. सर्वांनी झेंडावंदनाला हजर राहायचे. फोटो कसा भरलेला आला पाहिजे ना! चला आता मागच्या वर्षीचा झेंडा शोधला पाहिजे, धुवून इस्त्री केला पाहिजे. झेंडा खूप वर लावतात मग फोटोत झेंडा येत नाही, जरा खाली डोक्याजवळ लावा म्हणलं तर चालत नाही म्हणतात. झेंडा असला म्हणजे कसं इंप्रेशन पडतं.

लॉज मालक - वा छान! या वेळेस सगळ्या खोल्या ओव्हरफुल्ल झाल्यात. सगळ्या नोकरांची सुट्टी कॅन्सल. बरं झालं गांधीबाबांनी, १५ तारीख पावसाळ्यात करून घेतली ते. लोकं अगदी गर्दी करतात, पाऊस अनुभवायला.झेंडावंदन करायचं काम पोलीस, मिलीटरीवाल्यांचं बाकीच्यांचं काय! भारतात सुट्ट्या खूप, आमचा धंदा खूप.

स्वातंत्र्यदेवता - या लोकांना काय सांगणार, अरे मला पारतंत्र्यातून सोडवायला, किती लोकांनी प्राण गमावले, आणि मला स्वतंत्र केलं. जर स्वातंत्र मिळालं नसतं तर हा दिवस साजरा करता आला असता काय? रस्त्यावर फिरता आले नसते. अतोनात अन्याय झाला असता. इंग्रज गब्बर झाले असते. १५ ऑगस्ट हा त्यांना आठवण करण्याचा दिवस आहे, पण सहलीच्या आनंदात कोणाला वेळ आहे. स्वातंत्र्याचा स्वैराचार झालेला आहे. असेच चालू राहिले तर मी पुन्हा एकदा पारतंत्र्यात पडणार, मग सुप्रीम कोर्टाने सांगीतल्याप्रमाणे देव सुद्धा मला वाचवू शकणार नाही. असा भारत पाहून गांधी पुन्हा अवतार घेणार नाहीत. साध्या सज्जन मुलाच्या हातात सर्व इस्टेट दिल्यावर, त्याला माज आल्यास त्या इस्टेटीची काय धुळधाण होते ते पाहणेच फक्त बापाच्या नशिबी असते, असे स्वातंत्र्यसैनिकांचे झाले आहे. देव यांना सुबुद्धी देवो.

१५ ऑगस्ट १९६० सालचा. या दिवसाची तयारी शांळांमधून आठ दिवस अगोदरच सुरू व्हायची. त्या साठी कमिटी नेमली जाणार, एक शिक्षकांची आणि एक विद्यार्थ्यांची. प्रत्येकाला कामे नेमून दिली जाणार. कोणाची घाई प्रमुख पाहुणे ठरवून आणण्याची, तर कोणाची बक्षिसे आणण्याची. मुले ज्या उंच  नळीवर  झेंडा  फडकणार आहे तिला रंग लावणार, चौथर्‍याला रंग लावणार, भोवताली शेणाचा सडा घालणार. रांगोळी कुणी काढायची यात चुरस असायची. या दिवशी सकाळी लवकर येऊन फळ्यावर सुंदर झेंड्याचे चित्र काढण्याची स्पर्धा असायची.

आदल्या दिवशीच गणवेश धुवून इस्त्री केला जाणार, शक्यतो मागील वर्षी खरेदी केलेला झेंडाच छातीवर लावला जायचा. मी तर सात आठ वर्षे एकच झेंडा वापरत होतो. सकाळी लवकर उठून शाळेला जायची घाई. अगदी टापटीप. पालक जोडीने मुलांना शाळेत सोडायला येत. शाळा जवळच असायची. आतासारखी चांगली वाईट शाळा नसायची, शक्यतो मुले जवळच्या म्युनिसिपालिटी शाळेतच जात. खाजगी शाळांना अजीबात महत्व नव्हते. शाळेतील वातावरण तर अगदी पवित्र, होय पवित्रच. जिथे झेंडावंदन होणार तेथे सडा घालून रांगोळी काढलेली, सुगंधी उदबत्त्या दरवळणार, सभोवार दोन टेबले चार खुर्च्या. टेबलावर स्वच्छ टेबलक्लॉथ, चकचकीत पितळेचा तांब्या पेला, फुलदाणीत टवटवीत टपोरे बुलाब, गुलाबच कारण ते जवाहरलाल नेहरूंना आवडत, आणि चाचा नेहरूंना मुले अतिशय प्रिय. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झेंडावंदन झाल्यावर, गुणी हुषार विद्यार्थ्यांना बक्षिसाचे वाटप होई. नंतर प्रमुख पाहुण्यांचे भाषण असे, ते तर विद्यार्थी शिक्षक कान देऊन ऐकत, एवढेच काय पालकही भाषण ऐकण्यासाठी गर्दी करत, शिवाय येणारे जाणारेही थांबत.सर्व शिक्षकांचा पांढरा शुभ्र पोशाख, डोक्यावर कडक घडीची गांधी टोपी. विद्यार्थ्यांचा ड्रेस खाकी अर्धी चड्डी, पांढरा हाफ शर्ट, डोक्यावर गांधी टोपी. जर टोपी घातली नाहीतर गुरूजी, त्यावेळी सर नव्हते, बोटातील खास खड्याची लोखंडाची अंगठी मारत, ती अशी लागे की, काय बिशाद आहे, तो मुलगा बिना टोपीने शाळेत येईल, पालक तर अजिबात विचारत नसत, अगदी वेताच्या छडीने मारले तरी. गुरूजी तेवढे प्रेमही करत, आता सारखा व्यवहार नव्हता. मुलींचा ड्रेस हिरवा स्कर्ट, पांढरा झंपर, दोन वेण्या त्यांना लाल रिबन, मुख्य म्हणजे केसांना तेल लावलेले पाहिजेच, अगदी मुलांनी सुद्धा. भाषण झाल्यावर राष्ट्रगीत शाळेचे बॅंडपथक वाजवीत असे, राष्ट्रगीत चालू असताना सर्वांनी जागेवरच सावधान उभे राहायचे, अगदी मान देऊन. मग विद्यार्थ्यांना चॉकलेट आणि पाटीवरच्या रंगीत पेन्सिलचे वाटप होई, मुले अगदी कौतुकाने त्या वस्तू घरी नेत.

घरी श्रीमंत लोक झेंडा उभारत. सर्वांच्या घरी अगदी दिवाळीप्रमाणे पुरणपोळीचा बेत असे.  दुपारी बेत झाल्यावर संध्याकाळी एकमेकांच्या घरी शुभेच्छा द्यायला जात. सांगायचे राहिलेच १४ ऑगस्टला पूर्वसंध्येचे राष्ट्रपतींचे भाषण रेडियोजवळ बसून घोळक्याने कान देऊन ऐकत, नंतर त्यावर चर्चा होत.  मुलेही ऐकत कारण त्यांना त्यावर निबंध लिहावा लागे.

चौकाचौकात झेंडा वंदन होई, स्पीकर अजिबात नाही. गल्लीतले सर्वजण आवर्जून उपस्थित रहात. सबंध गावातले वातावरण अगदी मंगलमय.

परिटाला खूप काम, गांधीटोपी कशी कडक पाहिजे, मग परिट पुन्हा पुन्हा प्रेमाने इस्त्री फिरवे, मग गिर्‍हाईकाने मान डोलावल्यावर त्याची छाती अभिमानाने भरून येई.

उद्या - १५ ऑगस्ट २००८ सालचा स्वगत.

नंतर - १५ ऑगस्ट २०२७ सालचा कल्पनेतील.

दिनांक ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी दूरदर्शनवर ’ झूठा कही का ’ सिरीयल होती, त्यात नायक १५ ओगस्टचे झेंडावंदन करतो पण त्यातील झेंड्याचे रंग विचीत्र होते, म्हणजे वर भगवा रंग नसून dark maroon रंग होता. जे राष्ट्रगीत गायले त्याची चाल तर ऐकवत नव्हती. ज्या पताका लावल्या होत्या त्याही तशाच.

दुसरी एक सिरीयल ’चार दिवस सासूचे’ त्यात पार्थ दुसरे लग्न करतो, असे दाखवले, भले ते स्वप्न असेल पण हे चूकच ना. द्विभार्याप्रतिबंधक कायदा नाही काय? हिन्दी सिरीयलमध्ये तर अनेक लग्ने दाखवतात, अनेक लफडी दाखवतात, का मुलांनी मग रेव्ह पार्टी करू नये? वहिनीसाहेबनी तर वैताग आणलाय, कसले जादुटोणा करतात, शिवाय एकामागून एक खून, पोलीस काय झोपलेत काय? वास्तव अजिबात नाही. असे कितीतरी कार्यक्रम सांगता येतील, पानेच्यापाने भरतील. ’सास भी कभी बहू थी’ मध्ये किती नवर्‍यांच्या किती बायका आणि कितीकांचे नवरे, आणि सगळे बेशरम, कोणालाच लाज लज्जा नाही. मुलांनी काय आदर्श घ्यावा. एका इंग्रजाने जेव्हा शिवाजी महाराजांचे चरित्र वाचले तेव्हा तो एवढा भारावून गेला कि, तो म्हणाला असा शिवाजी इंग्लंडमध्ये पैदा झाला असत्ता तर आम्ही दुसर्‍या कोणावर साहित्यच लिहीले नसते, इतके असामान्य व्यक्तिमत्व भारतात होऊन गेले आहे. पण त्यांच्यावर एकही सिरीयल कोणी काढू नये, हे त्या शिवाजीमहाराजांचे दुर्दैव. टिपू सुलतानवर, बहादूरशाह जफरवर सिरीयल निघतात, पण स्वातंत्र्यवीरांवर नाही.

आता ह्या सर्वांचा गांभीर्याने विचार करून, दूरदर्शनवरील कार्यक्रमांसाठी सेन्सॉर बोर्डाची जरूरी आहे, म्हणजे या सर्वांना् खीळ बसेल. सिनेमात न होणारी हौस इथे भागवली जाते, कारण सगळं  रानच मोकळं आहे ना? कोणत्याही चॅनेलवर देशहितावर, समाज प्रबोधनवर जाहिरात अथवा कार्यक्रम नसतो.

सेन्सॉर बोर्डाची खूप आवश्यकता आहे. ओंगळ गाणी व प्रसंग, बेकायदेशीर कृत्याची चित्रणे, भडक बातम्या हे प्रकार बंद होतील.

अभिनव बिंद्रा अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन. आम्हांला तू सुवर्णपदकांच्या यादीत नेऊन बसवलंस, तुझे किती अभार मानावेत. खरे तर नेमबाजी ही आपली रामायण महाभारतापासूनची परंपरा, पण काही जणांनी क्रिकेटला नावारूपाला आणले, आणि घरच्या खेळाला मागे टाकले. बाहेरच्या मुलाला पदरात घेतले आणि घरच्याला उकिरड्यावर टाकले. बाबा, आता तुझ्यामुळे तरी या क्रिकेटच्या कॅन्सरमधून आम्ही बरे होऊ.

जास्त काय लिहीणार, आजच्या "सकाळ" मधील चिंटू सार्‍या भारताचे प्रतिनीधीत्व करतो आहे. होऊ दे मुलांचा असा गोड गोंधळ.

जास्त लिहीत नाही, कारण नजरेपुढे फक्त सुवर्ण पदकच दिसते आहे, त्यामुळे काही सुचत नाहिये.

श्री. व सौ. मॅगसेसे २००८
डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांना यंदाचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे. भामरागडसारख्या अतिदुर्गम भागात महाराष्ट्रातील  मागास  माडिया आदिवासींच्या जीवनात प्रकाश निर्माण करणारा लोकबिरादरी प्रकल्प या जगावेगळ्या दांपत्याने चालविला. भामरागड म्हणजे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि छत्तीसगड यांना जोडणारा दंडकारण्यातील अती दुर्गम भाग. माडियाचे मन तर शतकानुशतके प्रगत जगापासून "कट ऑफ'च झालेले होते. रेड्या-बोकडांचाच नव्हे; तर प्रसंगी नरबळीही इथे दिला जाई. ९८ टक्के भागात वीज पोचली नव्हती.

अशा या दुर्गम भागात बाबा आमटे यांनी लोकबिरादरी प्रकल्पाचे स्वप्न साकार केले. सुखवस्तू शहरी जीवन सोडून; अनेक जण बायकोमुलांना बरोबर घेऊन  ध्येयासक्तीने आणि धीरोदात्तपणे बाबांच्या लोकबिरादरीच्या कामात सामील झाले. बाबा अक्षरशः प्रवाहाविरूद्ध पोहोले. माडियांना दवाखाना शब्दच माहित नव्हता, त्यांचा आधार म्हणजे पुजारी.त्यांनी बाबांना विरोध केला, कारण त्यांच्या पोटावर पाय आला असता. अशा परिस्थितीत बाबांनी आरोग्यसेवा आणि शेती करून त्यांच्या विश्वास निर्माण केला. जेव्हा पुजार्‍याच्या मुलाला बाबांनी सेरेब्रल मलेरियातून वाचवले, तेव्हा तोच पुजारी बाबांचा प्रमुख बनला. बाबांनी महान ईश्वर सेवा केली. खरे तर हा पुरस्कार बाबांना जिवंत असतांना मिळाला असता तर त्या पुरस्काराचा सन्मान झाला असता.

कोठे लाखो रूपयांच्या सिंहासनावर बसून दूरदर्शनवर प्रवचन कराणारे बाबा  आणि कोठे सेवेत मग्न  झालेले बाबा आमटे. मुळात लोकबिरादरीला प्रारंभापासून आधार लाभला तो आनंदवनातील कुष्टरुग्णांच्या कष्टांचा. एका प्रकल्पातील लाभार्थींनी स्वतःचे पुनर्वसन झाल्यावर दुसरा प्रकल्प उभारावा आणि इतरांचे पुनर्वसन करावे या किमयेला जगात कुठे तोड नसेल! याचे रहस्य म्हणजे बाबा आमट्यांनी कुष्ठरुग्णांच्या मनात केवळ आत्मसन्मानाची प्रेरणाच नाही; तर अन्य पीडितांबद्दलची करुणाही जागवली.

पित्याच्या स्वप्नपूर्तीसाठी...
५६ वर्षांच्या बाबांची लोकबिरादरी प्रकल्पाची साहसी इच्छा ऐकून त्यांचा २३ वर्षांचा मुलगा डॉ. प्रकाश प्रेरित झाला आणि बाबांना त्याने वाढदिवसाची एक जगावेगळी भेट दिली. (योगायोगाने बाबा आणि प्रकाश या दोघांचाही वाढदिवस २६ डिसेंबर हाच!) वाढदिवसाची ही भेट म्हणजे डॉ. प्रकाश स्वतःच! पित्याच्या स्वप्नपूर्तीसाठी पुत्राने हसत हसत वनवास स्वीकारला.

अशा या थोर महात्म्याला सलाम!

http://www.esakal.com/esakal/08102008/SpecialnewsE8C7D53C0C.htm

आसारामबापूंच्या मुलावर एका तरुणीचे गंभीर आरोप
सकाळ न्यूज नेटवर्क
अहमदाबाद, ता. ९ - संत आसारामबापू यांचे पुत्र नारायणसाई यांच्यावर मुंबईतील एका तरुणीने आज येथे पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केले आहेत.
पदवीधर असलेली ही तरुणी विरारमधील नारायणसाई आश्रमात मन:शांतीसाठी दाखल झाली होती, असे तिने सांगितले. ती विरारमधीलच रहिवासी असून, नारायणसाई यांचे शिष्यत्व पत्करल्यानंतर आसारामबापू व नारायणसाई यांच्या देशातील विविध आश्रमांना तिने भेट दिली. गुजरातमधील साबरकंठा जिल्ह्यातील गणभोई गावात नारायणसाईंचा हिंमतनगर महिला आश्रम आहे. या आश्रमालाही आपण भेट दिल्याचे तिने सांगितले.
अविन असे त्या तरुणीचे नाव असून, नारायणसाई महिलांना हिप्नॉटिझम करतात. आश्रमातील तरुणी गर्भवती झाल्यास एखाद्या साधकाबरोबर तिचा जबरदस्तीने विवाह लावण्यात येतो किंवा अशा महिला व तरुणी अचानक गायब होतात. नारायणसाईंचा अंगरक्षक आश्रमात तरुणींचा पुरवठा करतो, असे तिने सांगितले. यापेक्षाही अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप अविनने भरगच्च पत्रकार परिषदेत केले आहेत.
दरम्यान, अहमदाबादमधील आसारामबापू गुरुकुलात मृत्यू झालेल्या मुलांच्या पालकांनी या प्रकरणाची चौकशी केंद्रीय गुप्तचर विभागाकडून करण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल केली आहे.

बोला, असारामबापू आता तरी बोला, अहो आम्ही तुमचे हजारो शिष्य तुमच्या तीन शब्दांची वाट पाहतो आहोत. बोला,   "हे खोटे आहे". पहिल्यांदा खुनाचे प्रकरण, नंतर पुण्यातील मतिमंदाचे प्रकरण, आता तर काय सरळ सरळ प्रत्रकार परिषदेतील आरोप.  तुमचा देव तुम्हांला बुद्धी देवो हीच प्रार्थना. या शिवाय अजून किती गूढ प्रकरणे असतील देव जाणे. तुम्ही गप्प राहिलात तर आमच्या शंका बळावत जातील. म्हणून म्हणतो, बापू मौन सोडा आणि हे सर्व खोटे आहे असे जाहीर करा. मला माहित आहे, जर हे खरे असेल तर आपण प्रायश्चित्त घेताल, आणि जगासमोर एक आदर्श निर्माण करताल. तुम्हाला आठवते बाबा रामदेव महाराजांवर, त्यांच्या औषधांमध्ये हाडांची भुकटी असते असे आरोप झाले होते पण त्यांनी ते आरोप जाहीरपणे खोडून, आरोप करणार्‍यांचे नाक कापले. पाहिजे तर त्यांना विचारा. बापू, काहीही करा पण त्या मातीतील " बापूं"चे नाव लावून ते नाव आणि त्यांना बदनाम करू नका, ही कळकळीची विनंती. पुन्हा एकदा ’ बोला बापू बोला "

http://www.esakal.com/esakal/08062008/SpecialnewsCA26C46156.htm

साक्षात परमेश्वरही या देशाला वाचवू शकत नाही
नवी दिल्ली, ता. ५ - या देशाला आता साक्षात परमेश्वरही वाचवू शकत नाही, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने आपला संताप व्यक्त केला.
सरकारी निवासस्थानात बेकायदा राहणाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्यास सरकारने नकार दिल्याने न्यायालय संतप्त झाले आहे. या प्रकरणी कायद्यात दुरुस्ती न करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असल्याचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अमरिंदर शरण यांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर ""कारकुनाने दिलेल्या मताला आव्हान देण्याचीही धमक या सरकारमध्ये नाही. आम्ही या सरकारला कंटाळलो आहोत'' अशा शब्दांत न्यायमूर्ती बी. एन. आगरवाल व जी. एस. सिंघवी यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, ""साक्षात परमेश्वर जरी या देशात अवतरला, तरी तो या देशाला बदलू शकत नाही. आपल्या देशाचे चारित्र्य संपुष्टात आले आहे. आम्ही आता निराश झालो आहोत. विविध मुद्‌द्‌यांवर सरकारच्या भूमिकेला कंटाळल्यानेच नागरिक जनहितार्थ याचिका दाखल करतात. जेव्हा तुम्ही सत्तेवर असतात, त्या वेळी तुम्ही "न्यायालयीन सक्रियतेची' तक्रार करता. जेव्हा तुम्ही सत्तेवर नसता, त्या वेळी मात्र तुम्ही आमच्याकडे धाव घेता.''
सरकारी निवासस्थानात बेकायदा राहणाऱ्या नागरिकांना हुसकावण्यासाठी सध्याचा कायदा पुरेसा आहे. ९९ हजार १०० सरकारी घरांपैकी केवळ ३०० घरांमध्ये लोक बेकायदा राहत आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे शरण यांनी सांगितले. मात्र न्यायालयाचे त्याने समाधान झाले नाही. गुन्हे करणाऱ्यांना शासन करण्याची धमक सरकारमध्ये नाही, असेही न्यायालयाने फटकारले.

होय, खरंच आहे, साक्षात परमेश्वरही या भारत देशाला वाचवू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायधीशांनी संताप व्यक्त करावा, याबद्दल सरकारला कधी काळी काय वाटेल, शक्यच नाही. सर्वजण आपाआपली घरे भरण्याच्या मागे लागलेली आहेत. सरकारी निवासस्थाने एकदा अधिकार्‍यांनी, मंत्र्यांनी रहाण्यास घेतली  तर त्यांनी ती बळकावलीच समजायची. त्याचे भाडे सुद्धा न भरणारे मंत्री आहेत. या देशाचे जे चारित्र्य महात्मा गांधीं सारख्यांनी घडवले, त्याचा बाजार या राजकारणी लोकांनी भरवला. अगदी वस्त्रहरण करून टाकले. भ्रष्टाचार, बेशिस्त विचारसरणी यांनी देशाचे स्वास्थ्य बिघडवून टाकले. इंग्रजांविरूद्ध लढलो, पण आता कोणाबरोबर लढणार. या अशा राजकारण्यांपासून कसे स्वतंत्र होणार. निवडणूकीत दुसरे कोणीतरी येणारच ना? शिक्षणाचा खेळखंडोबा करून टाकलाय. न्यायधीशांना संताप यावा, तर सामान्य नागरीक जे स्वतः याचा अनुभव घेत आहेत, त्यांच्या संतापाचे काय?

सरकारी निवासस्थाने ही संकल्पनाच काढून टाकली पाहिजे, ती जागा खाली करून तिथे आश्रमशाळा, गुरांचे गोठे बांधावेत. अधिकार्‍यांचा ठेका आता सरकारने घेऊ नये. देशातले वातावरण एवढे नासलेले आहे की, आता इंग्रज बरे होते अशी म्हणण्याची पाळी आलेली आहे.

’वेटलिफ्टर मोनिकादेवी उत्तेजक चाचणीत दोषी ठरली’ ही बातमी आहे, अजून ऑलिंपीक लांब आहे तर आतापासूनच सुरूवात, सांगा कोण वाचवणार या देशाला.

देव सुद्धा आता एवढा कंटाळला आहे की, त्याने पण आता हा सुधरवण्याचा धंदा बंद केला आहे, कारण त्याला दुसरे कामच उरले नव्हते. बहुतेक तो आता दुसर्‍या ग्रहावर आपला नवा संसार थाटेल. भारतीयांच्या देवाधर्मा्चा आधीच त्याला उबग आला आहे. बघा आता आपण पर्यावरणाचा नाश करायचा आणि पाउस पडला नाही म्हणून त्याला पाण्यात बसवायचे, यज्ञ करून त्याच्या डोळ्यात धूर सोडायचा. आता लवकरच गणपती बाप्पा पण कोठेतरी अज्ञातवासात जातील कारण गणेशोत्सवातील राजकारण, आवाज त्यांना सहन होणे शक्य नाही.

झी मराठी चॅनेलवर एक सुरेख कार्यक्रम प्रसारीत होतो आहे, ’एका पेक्षा एक’, ज्यात महागुरू आहेत प्रसिद्ध अभिनेते ’ सचिन पिळगावकर ’. खरंच पाहण्यासारखा आहे. नाच झाल्यावर ’ आदेश बांदेकर ’ ज्या प्रकारे त्या नाचणार्‍या हिर्‍याचा श्रमपिहार करतात, त्यात प्रेक्षकांना सुद्धा रिलॅक्स वाटते. नंतर ज्युरी मत नोंदवतात, आणि त्यावर महागुरू मत सांगतात, त्यात त्या नृत्यातील बारकावे अगदी स्पष्टपणे कलावंताला न दुखावता सांगतात, हेच त्यांचे कौशल्य आहे. पण आपल्या मराठी माणसांना ओरडण्याची सवयच आहे ना!

३१ तारखेला किशोरी गोडबोलेंनी ’ चला जेजुरीला जाऊ ’ लावणी सादर केली. त्यात घोड्यांच्या टापांचा आवाज आहे. पहिल्या अंत‍र्‍यात तिने त्या टापांवर नाच केला पण दुस‌र्‌या कडव्यात टापांचा आवाज नसताना सुद्ध तिने नाच केला, तर हे महागुरूंनी दाखवून दिले.

दुसर्‍या दिवशी पेपर मध्ये लावणीसम्राट कै. ज्ञानोबा उत्पात यांचे पुत्र श्री. प्रसाद यांनी ही लावणी सचिनने चोरून त्यांच्या ’ नवरा माझा नवसाचा ’ या चित्रपटात घेतली असा दावा केला, परंतु सचिन यानी हि लावणी अकलूज येथील लावणी महोत्सवात ऐकली आणि ती लावणी पारंपारिक असल्याची इतर लावणी सम्राटांकडून खात्री केल्यावरच चित्रपटात घेतली असल्याचे सांगितले. मग प्रश्न असा येतो की, हि लावणी कुणालाच माहिती नव्हती काय? बरं ठीक आहे घेतली, पण त्या चित्रपटामुळे तरी लोकांना समजली ना? नाहितर अकलूज सारख्या लावणी पंढरीत तरी कोणाला माहिती होती काय?

सचिनचे पिता शरद पिळगावकर यांची लावणी ’ या रावजी बसा भावजी ’ गाऊन सुरेखा पुणेकर  यांनी उभ्या महाराष्ट्रात नाव कमावले, पण एका अक्षराने पिळगावकरांचे आभार मानले नाहीत, पण सचिनने फक्त ’ एका पेक्षा एक ’ कार्यक्रमातच हा उल्लेख केला, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा. अरे असा मोठेपण दाखवा ना? कशाला पाहिजे मी मी पणा. कुणीतरी आपल्या रचनेला न्याय देतात ना? बस झाले तर?  

का बाबा, महाराष्ट्रातील संत मंडळींना copy right नसते का करता आले? गाडगे महाराज, तुकडोजी महाराज यांनी त्यांच्या रचना copy right केल्यात काय? श्रीशंकराचार्यांनी आपली स्तोत्रे copy right केलीत काय? असे झाले असते तर? जरा विचार करा. इंग्रजांनी त्याचे सगळे कायदे copy right केले असते तर? त्याची royalty परवडली असती काय?

आपली रचना जी लोकांना माहित नव्हती ती कोणीतरी लोकांपर्यंत पोचवली, त्यात आनंद मानायला मनाचा मोठेपणा दाखवा.  त्यात आनंद मिळवा. परंतु एक मात्र आहे, ती रचना हेतुपुरस्सर तर घेतली नाही ना, हे पाहिले पाहिजे, आणि घेणार्‍याने रचनाकाराचा उल्लेख करून त्याचे आभार मानले पाहिजेत.

http://www.esakal.com/esakal/08032008/Saptarang811169578F.htm

कॉफीशॉप - खेळ नव्हे; खूळ!

ऑलिंपिक जवळ आलं, की आपण दोन गोष्टी करून टाकतो. एक तर आपल्यात खिलाडू वृत्ती नाही, हे (खिलाडू वृत्तीनं) मान्य करतो आणि दुसरी, भारताला या स्पर्धेत पदक का मिळत नाही, याची चर्चा करतो. पदक मिळविण्यापेक्षा चर्चा करणं हे खूपच सोपं काम आहे. पण भारत ऑलिंपिकमध्ये मागं का, याचं उत्तर आम्हास नुकतंच मिळालं आहे. .......
भारताची वाढती ताकद, महत्त्वाकांक्षा आणि जागतिक महासत्ता होण्याचं जवळपास पूर्ण होत आलेलं स्वप्न याचा जगातल्या इतर देशांना दुस्वास वाटतो. त्यामुळंच त्यांनी ऑलिंपिकमध्ये लंगडी, चमचा-लिंबू, आंधळी कोशिंबीर, डबडा ऐसपैस आणि क्रिकेट हे खेळ न ठेवता, शंभर मीटर धावणे, चारशे मीटर धावणे, शंभर बाय शंभर, चारशे बाय चारशे मीटर धावणे, जिम्नॅस्टिक्‍स, गोळाफेक, हातोडाफेक, थाळीफेक, भालाफेक, लांब उडी, उंच उडी, पोल व्हॉल्ट, जलतरण, डायव्हिंग, घोडेस्वारी, टेबल- टेनिस, भारोत्तोलन, मुष्टियुद्ध, मॅरेथॉन, हेप्टॅथलॉन (हा तर खेळ नसून, खेचरांना होणारा आजार असावा, अशी एक आपली आमची शंका आहे!) आणि असेच काहीबाही निव्वळ निरर्थक प्रकार "खेळ' म्हणून ऑलिंपिकमध्ये घुसवले आहेत. आता तुम्हीच सांगा, गोळा, हातोडा किंवा थाळ्या या काय फेकायच्या वस्तू आहेत का? उंच उडी, लांब उडी, पोल व्हॉल्ट हे तर डोंबारीकाम. उड्या मारून काय साध्य होतं? जलतरण म्हणजे तर निव्वळ फसवणूक आहे. अरे, मोठमोठ्या पुरांत पुलांवरून बिनदिक्कत उड्या मारणारे मर्द आमच्याकडे आहेत. त्यांना त्या टॅंकरूपी निळ्या डबक्‍यात दोनशे आणि दीडशे मीटरमध्ये बुचकळ्या मारायला सांगता? केवढा घोर अपमान त्या मर्दानगीचा! थॉर्प आणि फेल्प्स वगैरेंचं काही कौतुक सांगू नका. आमच्या मुठेतून वारजे ते खराडी हे अंतर नाक न दाबता पोहून दाखवा म्हणावं. तेच धावण्याचं. जीव खाऊन जोरात पळून दाखवणं यात सोन्याचं पदक देण्यासारखं काय आहे, हेच खरोखर कळत नाही. मुंबईत येऊन पाहा. लोकं आणि लोकल सतत पळतच असतात. तीच गोष्ट डायव्हिंगची! उंचावर टांगलेल्या फळकुटावरून अंग वेडंवाकडं करून पाण्यात उडी मारली, तर त्यात टाळ्या वाजवण्यासारखं काय आहे? जिम्नॅस्टिक्‍सचं केवढं कौतुक! पण खरं सांगू का, घरचं चांगलंचुंगलं असताना उगाच देहाची काडी करायची आणि ती त्या दांडीवरून गरागरा फिरवून दाख
वायची, यात त्या घराण्याची काय अब्रू राहिली? हॉकीत आम्ही ख्रिस्तपूर्व काळात सुवर्णपदकं मिळविली, तर ते सहन न होऊन यांनी आमचा संघ पात्रताफेरीतच गारद केला. भारताविषयीचा दुस्वास! दुसरं काय? मुष्टियुद्ध, भारोत्तोलन (हा शब्दच पेलवत नाहीय; वजन लांबच राहिलं...) किंवा कुस्ती हे तसे जिवावरच बेतणारे प्रकार. गरज नसताना अव्वाच्या सव्वा वजन आधी छाताडावर आणि मग दोन्ही पाय लटपटवत उंच हातांवर उचलून काय मिळतं कुणास ठाऊक! कदाचित पदक वगैरे मिळत असेल; पण चुकून वजन छातीवर पडलं तर केवढ्याला पडायचं? मुष्टियुद्ध म्हणजे तर स्वतःहून मार खाण्याला आमंत्रण देणं. याटिंग, रोईंग, कयाकिंग वगैरे गोष्टींचं नावच काढू नका! पाण्यात पडून मरायचंय का? छे! छे! छे! "डर के आगे जीत है' हे खरं असेल; पण आम्हाला "जीत'चीच "डर' आहे, त्याचं काय?

- मामू

मामू काय हे? आम्हा भारतीय खेळाडूंना कमी लेखता काय? तुम्ही म्हणता चर्चा करणं सोपं आहे, पण ती चर्चा लांबवणं किती अवघड आहे माहित आहे काय? चर्चा पुरी होऊन ’ निकाल’ ( माझ्या मनात तसं नाही ) लागेपर्यंत स्पर्धा संपून जातात तो काय त्यांचा दोष? तुमच्या अशा लेखामुळेच आमचा हिरमोड होतो आणि आमचा मूड ऑफ होतो, आणि पदके आमच्या हातातून अशी भराभरा निसटतात. अहो तुम्ही म्हणता ते तरी खेळ आमच्या साठी ठेवलेत काय? धावण्याचे सर्व खेळ चोर पोलीसांनी केव्हाच ताब्यात घेतलेत. हतोडाफेक थाळीफेक हे तर संसदेत नेहमीच चालतात. जिम्नॅस्टिक्‍स तर रोजच सिनेमातल्या गाण्यात पहायला मिळतं. आता वेटलिफ्टींग, परवाच संसदेत करोडो रूपयांचा भार उचलावा लागलाच ना? जास्त पाल्हाळ लावत नाही.

अहो आमचं कौतुकच राहिलेले नाही! लक्षात ठेवा, आमचे तुम्ही पूर्णपणे खच्चीकरण केलेले आहे, जर पदकं मिळाली नाहीत तर आम्हाला बोलू नका. हा लेख वाचल्यापासून आम्हाला भयानक मरगळ आलेली आहे, सरावात सुद्धा मन लागत नाहीये. घोड्याच्या एका नालेमुळे राज्य गेले म्हणतात. तुमच्या एका लेखामुळे देशाचे किती नुकसान होणार आहे माहीत आहे काय? खेळाडूंची मने नाराज झाली, त्यांच्याकडून सराव होत नाहीये, तसेच ते चीनला जाणार, मन था‌‌‍र्‍यावर नसल्याने आम्ही हॉटेलातच बसून राहणार, मग कशी पदके मिळणार? ह्या वेळेस आम्ही ठरवले होते की, रजत आणि कांस्य पदकांना हातच लावायचा नाही, फक्त पिवळीधमक सुवर्णपदकेच घ्यायची, पहाण्यार्‍यांना काविळ झाल्या सारखं वाटलं पाहिजे, पण कसचे काय,तुम्ही करोडो भारतीयांच्या आशेची वाट लावलीत.  कुठे फेडणार ही पापे? बस, आता मला बोलवतही नाही, घरच्या सर्वांसाठी चीनची तिकीटे आणायला जायचंय, तसं मंडळाने कबूल केलेय ना? काही झाले तरी आम्ही जाणारच कारण कुणी म्हणायला नको, तुम्ही का गेला नाहीत, कदाचित चीन वगैरे देशातही असे ’मामू’ असतील तर आपले काम सोपे होऊन, भराभर पदके मिळतील. खरंतर मामू, तुम्ही सर्व देशांचा दौरा करून तिथल्या वर्तमानपत्रातून असे लेख लिहून तिथल्या खेळाडूंचे खच्चीकरण केले असते  तर आमचे काम किती सोपे झाले असते, नाही का?

http://www.esakal.com/esakal/08032008/SpecialnewsFD9693BDC1.htm

आसारामबापूंच्या आश्रमाला सील
भोपाळ, ता. २ - छिंदवाड्यातील आश्रमात गेल्या काही दिवसांत झालेल्या दोन मुलांच्या मृत्यूनंतर पोलिसांनी आज आसारामबापूंच्या इंदुवती विद्यानिकेतन या आश्रमाला सील ठोकले.
मृत्यू झालेल्या दोन मुलांतील एक पुण्याचा आहे.
या आश्रमात राहणारा वेदांत मानमोडे (वय ५) या मुलाचा गुरुवारी मृत्यू झाला. वसतिगृहाच्या स्वच्छतागृहातील पाण्याने भरलेल्या बादलीत त्याचे डोके बुडाले होते. हा मुलगा पुण्याचा होता. वेदांतचा मृत्यू अनैसर्गिक असल्याचे मत त्याचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्‍टरांनी व्यक्त केले आहे. तत्पूर्वी, मंगळवारी रामकृष्ण यादव हा मुलगा स्वच्छतागृहाच्या फरशीवर मृतावस्थेत आढळला होता; मात्र त्याच्या मृत्यूबद्दल प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले नव्हते. फरशीवरून घसरून पडल्याने गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज छिंदवाड्याचे पोलिस अधीक्षक आर. के. शिवहरे यांनी व्यक्त केला होता. मुलाचा मृत्यू म्हणजे नशिबाचा भाग असल्याचे मान्य करून रामकृष्णची आई मनोरमा आणि वडील मोहनलाल यांनी मुलाच्या मृत्यूचे दुःख स्वीकारले होते.
मात्र, आश्रमात दोन मुलांचा लागोपाठ गूढ मृत्यू झाल्यामुळे लोकक्षोभ निर्माण झाला व तो शमविण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने एक विशेष चौकशी समिती नियुक्त केली. या समितीने आज आश्रमाला सील ठोकले. आश्रमाच्या शाळेतील एक शिक्षक मनोहर जयस्वाल आणि वसतिगृहाचे वॉर्डन ओमप्रकाश प्रजापती यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एकाच जागी दोन मृतदेह आढळल्याने या प्रकरणी संशय निर्माण झाल्याचे राज्याचे पोलिस महासंचालक एस. के. राऊत यांनी नमूद केले. या मुलांच्या पार्थिवांच्या आणखी तपासणीसाठी भोपाळहून विशेष तज्ज्ञांचे पथकही येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
अहमदाबादमध्ये असलेल्या "गुरुकुल' या आसारामबापूंच्या आश्रमात दीपेश आणि अभिषेक वाघेला या चुलतभावांचा नुकताच मृत्यू झाला होता. त्यामुळे संतप्त जमावाने जोरदार निदर्शने केली होती. लाठीमार करून पोलिसांनी स्थिती नियंत्रणात आणली होती. त्या पाठोपाठ छिंदवाड्यात दोन मुलांचा मृत्यू झाला आहे.

बापू, काय हे! रोज रोज तुमचे दूरदर्शन वरील प्रवचन ऐकून आमव्या जीवनमानात फार फरक पडला हो, शिवाय तुमच्या प्रवचनाच्या c.d.चे आम्ही तर पारायण केले. तुमच्या फोटोंचे लॉकेट आम्ही कित्येकांना भेट दिले, पण तुमच्याच आश्रमात हे घडावे. सांगा आम्ही आता लोकांना काय सांगणार. आम्ही दिलेले लॉकेट परत येऊ लागले. आपल्या औषध दुकानातून घेतलेले आणि रोज घेत असलेले चूर्ण आता कडू लागायला लागले हो! झाले तर झाले पण तुमच्या अमोघ वाणीतून काहीच प्रसवत नाहीये. बोला काहीतरी बोला, आम्हालाही कळू द्यात, नक्की काय झाले आहे ते. महात्मा गांधींच्या पवित्र भूमीतील आपण, ज्यांनी जगाला अहिंसेचा मंत्र सांगितला, त्या तुमच्या आश्रमातच अशी घटना घडावी, काय वाटले असेल त्या महात्म्याच्या आत्म्याला. आधीच त्यांनी लोकसभेतील नोटांची पुडकी पाहून, स्वर्गात देवाला सांगितले असेल, बाबारे स्वातंत्र्यासाठी लढून माझी चूक झाली, पुन्हा मला भारतात जन्म नको. ज्या नोटांवर माझे चित्र छापले आहे, त्याच्याच साक्षीने व्यवहार करतात, आणि मला निमूटपणे पहावे लागते. त्या माझ्या जन्मभूमीत हे नवीन काय? बापू या नावाबद्दल लोक काय काय गैरसमज करून घेतील.

आसारामजी आपल्या नावापुढेही आपण बापू नाव लावलेत, त्याचा तरी मान राखून काहीतरी बोला. परवा गुरूपौर्णिमा झाली, आपण पुण्यात किती छान कार्यक्रम केलात, हाच आपला संदेश समजायचा काय? आपल्याकडून जाहीरपणे वरील प्रकारावर प्रवचन अपेक्षित आहे.

काल १ तारखेला सूर्य ग्रहण होते. काळ्या काचेतून पाहिले, मुलांना तर अजिबात अप्रूप वाटले नाही. सर्वांचे व्यवहार अगदी बरोबर चालले होते तेव्हा माझ्या लहानपणीच्या ग्रहणकाळातील आठवणी जाग्या झाल्या.

ग्रहण कधी लागणार त्याचा वेध कधी सुरू होणार याच्या चर्चा सर्वजण चवीने करत असत. ग्रहण लागले की पहिली तयारी असायची दिव्यावर काच काळी करण्याची, चांगला टेंभा पेटवायचा, त्यावर गल्लीतील सर्वांच्या काचा काळ्या होत. स्त्रीयांची लगबग देव पाण्यात ठेवण्याची. प्रत्येकाच्या दारात त्या काळी तुळस असायची, त्याची पाने आधीच तोडून ठेवली जायची, ती मग धान्यात टाकणार. ग्रहण म्हणजे त्या काळी अशुभ घटना समजली जायची, वातावरण अशुद्ध होते असा समज असायचा, शिवाय हा काळ अभद्र समजला जायचा. तुळसी मुळे धान्य अदृश्य शक्तींपासून सुरक्षित रहात असे.

ग्रहण लागल्यावर लोक चौकाचौकात, घराच्या गच्चीवर जाऊन घोळक्याने काळ्या काचेतून ग्रहण पहात, त्याची काजळी लागून तोंड काळे झाले तरी बेहत्तर.

जर कोणा बाईला दिवस गेले असतील तर, तिची धडगत नाही, तिच्यावर मोठ्या बायका काळजीपूर्वक लक्ष ठेवत, तिने एकाच ठिकाणी, शक्यतो अंधार्‍या खोलीत बसून रहायचे, काहीही करायचे नाही. जर तिने काही विळीवर काही कापले तर म्हणे होणार्‍या बाळाचे ओठावर चीर येणार, सुईत दोरा ओवला तर बाळाच्या ओठावर भोके पडत वगैरे वगैरे. ह्या अंधश्रद्धा आहेत पण विषाची परीक्षा कोण घेणार. मग ग्रहण सुटल्यावर घरातील मोठया बाईने प्रथम आंघोळ करायची मग बाकीच्यांनी, ती बाई नंतरच्या सर्वांना आंघोळीला प्रथम दोन तांबे पाणी घालत असे.

लहान मुलांची आंघोळीला अगदी घाई असायची. कारण त्यानंतरचा कार्यक्रम मुलांच्या आवडीचा असायचा. आंघोळ झाल्यावर मुले मग भांड्यात धान्य घेऊन दाराबाहेर बसत, जवळ जुने वापरलेले कपडे असत, शिवाय भोक पाडलेले पैसे जवळ ठेवत, कारण भोक पाडलेले पैसे दान केले तर पीडा नष्ट होते, असा समज होता. ( त्याकाळी भोक पाडलेला पैसा चलनात होता, त्या सोबत ढब्बू पैसा ही होता. ) दारोदार मांग जमातीचे लोक ’ दे दान सुटे गिराण ’ ओरडत मागायला येत, त्यांना धान्य द्यायचे, कपडे द्यायचे, आणि एक पैसा द्यायचा, म्हणजे घराची दरिद्री संपून जाणार आणि ग्रहणाचे पाप नष्ट होणार असा समज होता. घरातील सर्व स्त्रिया स्वयंपाकाला लागत, कारण ग्रहण काळातील अन्न खात नसत ते फेकून देणार कारण ते अशुद्ध समजले जाई. आंघोळीला सर्वाच्या दारात बंब पेटवला जायचा, त्याचा धूर आसमंतात पसरला जाणार. ग्रहण सुटल्यावर बंब दारातच पेटवायचा, घरात नाही.

खरं खोट माहीत नाही, पण म्हणत जादूगार लोक, मंत्र तंत्र करणारे म्हणे पाण्यात पाण्या जाऊन उभारत, अगदी ग्रहण सुटे पर्यंत. कारण असे केले नाहीतर त्यांच्या समव्यवसायिकांकडून त्यांना धोका असे. त्यावेळी म्हणे ते मंत्र सिद्ध करत.

आता वाटते त्याकाळी किती अंधश्रद्धा होत्या, पण जगण्यात, प्रसंग अनुभवण्यात वेगळीच मजा असायची. आता ’अंनिस’ वाले चळवळ उभी करतात पण त्यांच्या सोईने, ते ठरवणार कोणती अंधश्रद्धा आहे ते.

Newer Posts Older Posts Home

Popular Posts

  • आत्मा
    आत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा ...
  • १२ जुलै १९६१
    १२ जुलै १९६१, आम्ही ११ वर्षांचे होतो, त्या वेळेची आठवण ठेऊन ’सकाळ’ने आठवणी जाग्या केल्या त्याबद्दल धन्यवाद. खरोखर त्या भयानक पुरापेक्षाही,...
  • The Fame of the Clock
    Recently a Muslim kid named Ahmed Mohamed from Texas was arrested and suspended from school when he showed his home built "clock&qu...
  • अवतार
    विश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...
  • पाणी वाचवा
    पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...
  • एका रात्रीची गोष्ट
    कोणत्यातरी कामासाठी मी बायकोला घेऊन मोटरसायकलने बाहेरगावी गेलो होतो. परतायला रात्र झाली, पण सकाळी तातडीचे काम असल्यामुळे घाईने निघालो. मध्ये...
  • कन्यादान
    नुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , "चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी"...
  • कूणी तरी पोस्त चोरलं आणि मराठी जगाची बोंबाबोंब
    ************CLARIFICATION******************* बरेच विरोप आल्याने मला हे स्पष्ट करावेसे वाटत आहे की.... मी लिहिल्याप्रमाणे, मी चोराची बाजु अज...
  • आपण भारतात का जातो?
    काही दिवसांपुर्वी एका गोर्‍या मित्राने विचारले की आता तु कायम इथेच राहणार का? मन बावचळले आणि काही वर्षांनी कायमचा परत फिरण्याच्या माझ्या प्र...
  • गंमत
    १ ते ९९ या अंकांच्या स्पेलिंगमध्ये कुठेही ‘A', `B'. `C', अणि ‘D' हे अक्षरे आढळत नाहीत. १०० या अंकाच्या स्पेलिंगमध्ये सर्वप्र...

Labels

मी मराठी अनमोल विचार भारत TV

Blog Archive

  • ►  2016 (1)
    • ►  February (1)
  • ►  2015 (2)
    • ►  July (1)
    • ►  January (1)
  • ►  2014 (2)
    • ►  January (2)
  • ►  2013 (1)
    • ►  October (1)
  • ►  2012 (22)
    • ►  November (4)
    • ►  July (1)
    • ►  June (1)
    • ►  February (2)
    • ►  January (14)
  • ►  2011 (15)
    • ►  December (2)
    • ►  November (5)
    • ►  October (8)
  • ►  2010 (64)
    • ►  July (1)
    • ►  June (6)
    • ►  May (6)
    • ►  April (8)
    • ►  March (5)
    • ►  February (13)
    • ►  January (25)
  • ►  2009 (66)
    • ►  October (13)
    • ►  September (4)
    • ►  August (3)
    • ►  July (1)
    • ►  May (3)
    • ►  April (10)
    • ►  February (16)
    • ►  January (16)
  • ▼  2008 (63)
    • ►  November (1)
    • ►  October (12)
    • ►  September (2)
    • ▼  August (16)
      • नारायण धारप
      • संताप
      • हे माझ्या भारत देशा! जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
      • शाबास भार्गवी
      • १५ ऑगस्ट २०२७ सालचा
      • १५ ऑगस्ट २००८ सालचा
      • १५ ऑगस्ट १९६० सालचा
      • दूरदर्शन व सेन्सॉर बोर्ड
      • अभिनव अभिनंदन,
      • बाबा आमटे
      • आसारामबापू, आता तरी बोला!
      • होय खरं आहे -
      • चला जेजुरीला जाऊ
      • खेळाडूंचे खच्चीकरण
      • बापूंच्या आश्रमात-
      • ग्रहण
    • ►  July (11)
    • ►  June (13)
    • ►  March (2)
    • ►  February (2)
    • ►  January (4)
  • ►  2007 (52)
    • ►  December (4)
    • ►  September (1)
    • ►  August (6)
    • ►  July (22)
    • ►  June (12)
    • ►  May (5)
    • ►  April (1)
    • ►  March (1)
  • ►  2006 (30)
    • ►  December (2)
    • ►  November (2)
    • ►  October (10)
    • ►  September (4)
    • ►  August (5)
    • ►  July (1)
    • ►  June (6)

Popular Posts

  • पाणी वाचवा
    पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...
  • The Fame of the Clock
    Recently a Muslim kid named Ahmed Mohamed from Texas was arrested and suspended from school when he showed his home built "clock&qu...
  • कन्यादान
    नुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , "चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी"...
  • अवतार
    विश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...
  • मकर संक्रांत
    आज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्‍या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...

Follow us at FB

Tweets by @tlf_org
Copyright © 2015 मी मराठी माणूस

Created By ThemeXpose