ग्रहण

काल १ तारखेला सूर्य ग्रहण होते. काळ्या काचेतून पाहिले, मुलांना तर अजिबात अप्रूप वाटले नाही. सर्वांचे व्यवहार अगदी बरोबर चालले होते तेव्हा माझ्या लहानपणीच्या ग्रहणकाळातील आठवणी जाग्या झाल्या.

ग्रहण कधी लागणार त्याचा वेध कधी सुरू होणार याच्या चर्चा सर्वजण चवीने करत असत. ग्रहण लागले की पहिली तयारी असायची दिव्यावर काच काळी करण्याची, चांगला टेंभा पेटवायचा, त्यावर गल्लीतील सर्वांच्या काचा काळ्या होत. स्त्रीयांची लगबग देव पाण्यात ठेवण्याची. प्रत्येकाच्या दारात त्या काळी तुळस असायची, त्याची पाने आधीच तोडून ठेवली जायची, ती मग धान्यात टाकणार. ग्रहण म्हणजे त्या काळी अशुभ घटना समजली जायची, वातावरण अशुद्ध होते असा समज असायचा, शिवाय हा काळ अभद्र समजला जायचा. तुळसी मुळे धान्य अदृश्य शक्तींपासून सुरक्षित रहात असे.

ग्रहण लागल्यावर लोक चौकाचौकात, घराच्या गच्चीवर जाऊन घोळक्याने काळ्या काचेतून ग्रहण पहात, त्याची काजळी लागून तोंड काळे झाले तरी बेहत्तर.

जर कोणा बाईला दिवस गेले असतील तर, तिची धडगत नाही, तिच्यावर मोठ्या बायका काळजीपूर्वक लक्ष ठेवत, तिने एकाच ठिकाणी, शक्यतो अंधार्‍या खोलीत बसून रहायचे, काहीही करायचे नाही. जर तिने काही विळीवर काही कापले तर म्हणे होणार्‍या बाळाचे ओठावर चीर येणार, सुईत दोरा ओवला तर बाळाच्या ओठावर भोके पडत वगैरे वगैरे. ह्या अंधश्रद्धा आहेत पण विषाची परीक्षा कोण घेणार. मग ग्रहण सुटल्यावर घरातील मोठया बाईने प्रथम आंघोळ करायची मग बाकीच्यांनी, ती बाई नंतरच्या सर्वांना आंघोळीला प्रथम दोन तांबे पाणी घालत असे.

लहान मुलांची आंघोळीला अगदी घाई असायची. कारण त्यानंतरचा कार्यक्रम मुलांच्या आवडीचा असायचा. आंघोळ झाल्यावर मुले मग भांड्यात धान्य घेऊन दाराबाहेर बसत, जवळ जुने वापरलेले कपडे असत, शिवाय भोक पाडलेले पैसे जवळ ठेवत, कारण भोक पाडलेले पैसे दान केले तर पीडा नष्ट होते, असा समज होता. ( त्याकाळी भोक पाडलेला पैसा चलनात होता, त्या सोबत ढब्बू पैसा ही होता. ) दारोदार मांग जमातीचे लोक ’ दे दान सुटे गिराण ’ ओरडत मागायला येत, त्यांना धान्य द्यायचे, कपडे द्यायचे, आणि एक पैसा द्यायचा, म्हणजे घराची दरिद्री संपून जाणार आणि ग्रहणाचे पाप नष्ट होणार असा समज होता. घरातील सर्व स्त्रिया स्वयंपाकाला लागत, कारण ग्रहण काळातील अन्न खात नसत ते फेकून देणार कारण ते अशुद्ध समजले जाई. आंघोळीला सर्वाच्या दारात बंब पेटवला जायचा, त्याचा धूर आसमंतात पसरला जाणार. ग्रहण सुटल्यावर बंब दारातच पेटवायचा, घरात नाही.

खरं खोट माहीत नाही, पण म्हणत जादूगार लोक, मंत्र तंत्र करणारे म्हणे पाण्यात पाण्या जाऊन उभारत, अगदी ग्रहण सुटे पर्यंत. कारण असे केले नाहीतर त्यांच्या समव्यवसायिकांकडून त्यांना धोका असे. त्यावेळी म्हणे ते मंत्र सिद्ध करत.

आता वाटते त्याकाळी किती अंधश्रद्धा होत्या, पण जगण्यात, प्रसंग अनुभवण्यात वेगळीच मजा असायची. आता ’अंनिस’ वाले चळवळ उभी करतात पण त्यांच्या सोईने, ते ठरवणार कोणती अंधश्रद्धा आहे ते.

Unknown

No comments: