१५ ऑगस्ट १९६० सालचा

१५ ऑगस्ट १९६० सालचा. या दिवसाची तयारी शांळांमधून आठ दिवस अगोदरच सुरू व्हायची. त्या साठी कमिटी नेमली जाणार, एक शिक्षकांची आणि एक विद्यार्थ्यांची. प्रत्येकाला कामे नेमून दिली जाणार. कोणाची घाई प्रमुख पाहुणे ठरवून आणण्याची, तर कोणाची बक्षिसे आणण्याची. मुले ज्या उंच  नळीवर  झेंडा  फडकणार आहे तिला रंग लावणार, चौथर्‍याला रंग लावणार, भोवताली शेणाचा सडा घालणार. रांगोळी कुणी काढायची यात चुरस असायची. या दिवशी सकाळी लवकर येऊन फळ्यावर सुंदर झेंड्याचे चित्र काढण्याची स्पर्धा असायची.

आदल्या दिवशीच गणवेश धुवून इस्त्री केला जाणार, शक्यतो मागील वर्षी खरेदी केलेला झेंडाच छातीवर लावला जायचा. मी तर सात आठ वर्षे एकच झेंडा वापरत होतो. सकाळी लवकर उठून शाळेला जायची घाई. अगदी टापटीप. पालक जोडीने मुलांना शाळेत सोडायला येत. शाळा जवळच असायची. आतासारखी चांगली वाईट शाळा नसायची, शक्यतो मुले जवळच्या म्युनिसिपालिटी शाळेतच जात. खाजगी शाळांना अजीबात महत्व नव्हते. शाळेतील वातावरण तर अगदी पवित्र, होय पवित्रच. जिथे झेंडावंदन होणार तेथे सडा घालून रांगोळी काढलेली, सुगंधी उदबत्त्या दरवळणार, सभोवार दोन टेबले चार खुर्च्या. टेबलावर स्वच्छ टेबलक्लॉथ, चकचकीत पितळेचा तांब्या पेला, फुलदाणीत टवटवीत टपोरे बुलाब, गुलाबच कारण ते जवाहरलाल नेहरूंना आवडत, आणि चाचा नेहरूंना मुले अतिशय प्रिय. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झेंडावंदन झाल्यावर, गुणी हुषार विद्यार्थ्यांना बक्षिसाचे वाटप होई. नंतर प्रमुख पाहुण्यांचे भाषण असे, ते तर विद्यार्थी शिक्षक कान देऊन ऐकत, एवढेच काय पालकही भाषण ऐकण्यासाठी गर्दी करत, शिवाय येणारे जाणारेही थांबत.सर्व शिक्षकांचा पांढरा शुभ्र पोशाख, डोक्यावर कडक घडीची गांधी टोपी. विद्यार्थ्यांचा ड्रेस खाकी अर्धी चड्डी, पांढरा हाफ शर्ट, डोक्यावर गांधी टोपी. जर टोपी घातली नाहीतर गुरूजी, त्यावेळी सर नव्हते, बोटातील खास खड्याची लोखंडाची अंगठी मारत, ती अशी लागे की, काय बिशाद आहे, तो मुलगा बिना टोपीने शाळेत येईल, पालक तर अजिबात विचारत नसत, अगदी वेताच्या छडीने मारले तरी. गुरूजी तेवढे प्रेमही करत, आता सारखा व्यवहार नव्हता. मुलींचा ड्रेस हिरवा स्कर्ट, पांढरा झंपर, दोन वेण्या त्यांना लाल रिबन, मुख्य म्हणजे केसांना तेल लावलेले पाहिजेच, अगदी मुलांनी सुद्धा. भाषण झाल्यावर राष्ट्रगीत शाळेचे बॅंडपथक वाजवीत असे, राष्ट्रगीत चालू असताना सर्वांनी जागेवरच सावधान उभे राहायचे, अगदी मान देऊन. मग विद्यार्थ्यांना चॉकलेट आणि पाटीवरच्या रंगीत पेन्सिलचे वाटप होई, मुले अगदी कौतुकाने त्या वस्तू घरी नेत.

घरी श्रीमंत लोक झेंडा उभारत. सर्वांच्या घरी अगदी दिवाळीप्रमाणे पुरणपोळीचा बेत असे.  दुपारी बेत झाल्यावर संध्याकाळी एकमेकांच्या घरी शुभेच्छा द्यायला जात. सांगायचे राहिलेच १४ ऑगस्टला पूर्वसंध्येचे राष्ट्रपतींचे भाषण रेडियोजवळ बसून घोळक्याने कान देऊन ऐकत, नंतर त्यावर चर्चा होत.  मुलेही ऐकत कारण त्यांना त्यावर निबंध लिहावा लागे.

चौकाचौकात झेंडा वंदन होई, स्पीकर अजिबात नाही. गल्लीतले सर्वजण आवर्जून उपस्थित रहात. सबंध गावातले वातावरण अगदी मंगलमय.

परिटाला खूप काम, गांधीटोपी कशी कडक पाहिजे, मग परिट पुन्हा पुन्हा प्रेमाने इस्त्री फिरवे, मग गिर्‍हाईकाने मान डोलावल्यावर त्याची छाती अभिमानाने भरून येई.

उद्या - १५ ऑगस्ट २००८ सालचा स्वगत.

नंतर - १५ ऑगस्ट २०२७ सालचा कल्पनेतील.

Unknown

1 comment:

Anonymous said...

name is me marathi manus and home page showing pooja of dollors !