घटस्फोट

"चार दिवस सासूचे" नावे serial ई-मराठीवर चालू आहे, त्यातील एका भागाने मात्र विचार करायला भाग पाडले आहे, मलाच नाही तर सर्वांनी विचार करावा.

त्यात ’पार्थ’ ला आपली बायको ’रिया’ पासून घटस्फोट हवा असतो, आणि तो सारखा घटस्फोटांच्या कागदांवर रियाची सही मागत असतो. तो काही केल्या ऐकत नाही, कारण त्याला दुसर्‍या ’अंजू’ नावाच्या मुलीशी लग्न करायचे असते. तो प्रसंग असा आहे, त्याची आई म्हणते, जर तू देवा ब्राम्हाणांच्या साक्षीने सप्तपदी, होम, मंगळसूत्र बांधण्याचा विधी देवांना साक्ष ठेउन केला होतास तर, तेच विधी तू आता उलट कर, म्हणजे लग्नाची सर्व तयारी करायची अगदी मुंडावळ्या बांधायच्या आणि होमाला उलटे फेरे मारायचे, मंगळसूत्र तोडायचे, कुंकू पुसायचे, म्हणजेच सर्व विधी उलट करून पुन्हा जसे लग्नाआधी हो्ती तशीच परिस्थिती आणायची, म्हणजे ते पती-पत्नी असणार नाहीत, मग मी ’रिया’ला घटस्फोटाच्या कागदांवर सह्या करायला सांगते.

आता ती तयारी होते, पार्थ तयार होतो,ब्राम्हण येतो, आणि त्याला जेव्हा हे सगळं सांगतात तेव्हा तो याला तयार होत नाही. त्याचे म्हणणे’,"हे शक्य नाही, कारण हिंदू धर्मात असे कोणतेही लग्न तोडायचे मंत्र नाहीत. या लग्नगाठी देवाने स्वर्गातच बांधलेल्या असतात, तेव्हा त्या तोडायचा अधिकार कोणालाच नाही, म्हणून असे कोणतेही विधी नाहीत, की ज्या द्वारे लग्न मोडता येईल." आणि तो ब्राम्हण उठून जातो.

खरे आहे हा विचार मनात आलाच नव्हता की, जर असे कोणतेच धार्मिक विधी नाहीत तर, मग काय अयोग्य संसार आयुष्यभर करायचा? ऋषीमुनींनी हा विचारच केला नाही काय? की असे मंत्र आहेत पण कोणी ते जगासमोर आणले नाहीत. शिवाजीमहाराजांच्या काळात नेताजी पालकरला त्याने धर्म बदलला असताना, त्याला पुन्हा धर्मात घेतले, म्हणजे ती उलट प्रक्रीया झालीचना ?

आपल्या  हिंदू धर्मात असे विधी का बरे नसतील? धर्मशास्त्राप्रमाणे लावलेले लग्न धर्मशास्त्राप्रमाणेच का तोडता येत नाही, त्याला कायद्याचा आधार कशासाठी? का पूर्वी पती-पत्नी विभक्त होतच नव्हते. कोणीतरी यावर संशोधन करून मला कळवेल काय?

समजा मंत्र न म्हणता ते सर्व विधी उलट केले तर काडीमॊड होईल काय? शास्त्र काहीतरी अपूर्ण वाटतेय.

यावर गांभीर्याने चर्चा झाली पाहिजे.

Unknown

No comments: