पर्यायी माता

’पर्यायी माता’ ( surrogate mother), भारतात हा पर्याय मान्य होऊ शकेल काय? ज्या ठिकाणी अनाथ मुलांनी अनाथालये भरून जातात, पण त्या निष्पाप जीवांना कोणीही दत्तक घेत नाही. काही काही कुटुंबात चार चार पाच पाच मुले असतात, त्यांची आबाळ होते पण त्यांना कोणी मदतीचा हात देत नाही. स्त्रीयांच्या चारित्र्याबद्दलच्या संकल्पना दृढ आहेत, त्या समाजात ही पर्यायी म्हणा  किंवा भाडोत्री माता चालेल?

Surrogate Mother म्हणजे काय तर, पहिल्या प्रकारात ज्या जोडप्याला मूल होय नाही, त्यातील पतीचे शुक्रजंतू आणि पत्नीच्या बीजांडाचे फलन, तिसर्‍याच स्त्रीच्या गर्भाशयात केले जाते. मग त्या स्त्रीला मूल झाल्यावर, ते त्या जोडप्याच्या स्वाधीन केले जाते. दुसर्‍या प्रकारात पतीपत्नी व्यतिरीक्त दुसर्‍या अन्य पुरूषाचे शुक्रजंतू आणि या जोडप्यातील पत्नीच्या बीजांडाच्या सहाय्याने, तिसर्‍याच स्त्रीच्या गर्भाशयात गर्भ तयार केला जातो, आणि त्यातून जन्मलेले मूल त्या दांपत्यास दिले जाते. या अवस्थेत त्या बाळाला पाच पालक असू शकतात.

आता यात स्त्रीने किती जणांना आपले गर्भाशय वापरू द्यायचे हा प्रश्न आहेच ना? पुरूषाने किती वेळा शुक्रजंतू दान करावयाचे. यासाठी काही मार्गदर्शक तत्वे तयार करण्याचा विचार भारतात चालू आहे म्हणे. म्हणजेच याला कायदेशीर मान्यता मिळणार. मग याला धंदेवाईक स्वरूप येणार. पैशांचे व्यवहार होणार.

यातून काही नवीन प्रश्न उपस्थित होतात.

१) नवीन आईने बाळ देण्यास नकार दिला तर? कारण तिचे मातृत्व आड आले तर? मग कोर्ट कचेरी आली.

२) मालमत्ता वादात सापडली, तर  ज्याने शुक्रजंतू दान केले, त्याच्या मालमत्तेवर हा मुलगा किंवा मुलगी हक्क सांगू शकतो काय? कारण ह्या प्रकारात डॉक्टर पैशासाठी फुटला तर? आणि D.N.A. test  केली तर?

३) मरणानंतर अग्नि देताना हा मुलगा, दुसर्‍याच्या शुक्रजंतूंपासून निर्माण झाल्यामुळे, अस्तित्वातल्या बापाला अग्नि देऊ शकतो काय?

४) दत्तक मुलापेक्षा हे बरे, कारण कमीतकमी आईच्या बीजांडाचा तरी वापर झालेला असतो, त्यामुळे जिव्हाळा राहतो.

५) मुलाची खरी आई कोणती हा प्रश्न उरतोच ना?

६) ज्या दांपत्याने अशाप्रकारे मूल प्राप्त केले, आणि नंतर या दांपत्याला मूल झालेत तर? या मूलाचा इस्टेटीवर काय हक्क असेल? लग्न कार्यात काय अडचणी येतील?

७) दांपत्यातील पुरूषाला वंध्यत्व असेल तर पर्यायी बापाचा विचार होऊ शकतो काय?

यातून कोणाच्या भावना दुखावल्या गेल्यास माफी असावी. तसा कोणताही हेतू नाही.

Unknown

No comments: