जादूचा दिवा

होय, तुम्ही फक्त मत द्या आणि विसरुज जा. लोकशाही, आपला उमेदवार, आमदार, त्याचा पक्ष, त्याचा जाहीरनामा, त्याची निशाणी, यातले काही लक्षात ठेवायची गरज नाही. पाच वर्षात एकदा तुम्हाला मताचा अधिकार आहे. द्यायचे असेल मत तर द्या, नाहीतर नका देऊ. जेवढे कोणी मते देतील त्यावर तुमचा आमदार निवडून येणार आहेच. तुम्हाला तो आवडो किंवा नावडो, पुढली पाच वर्षे तो तुमच्या वतीने बोलणार आहे. ही आहे लोकशाही आणि त्यासाठी तुम्ही आपल्याला मतदान करावे ही प्रत्येक पक्षाची, उमेदवाराची, अपक्षाची इच्छा आहे. मग बदल्यात तुम्हाला काय मिळणार ? हा प्रश्न मूर्खपणाचा म्हणायला हवा. काहीही मिळेल. नुसते मागून तर बघा. फुकट घर, स्वस्तात धान्य, मोफत वीज, फुकट शिक्षण, बुडवलेल्या कर्जाची माफी, घरात मोफत रंगीत टीव्ही, रस्त्यावर भूक लागली तर वडापाव किंवा फराळ. नुसते मागायची खोटी आहे. प्रत्येक पक्ष अल्लादिनच्या दिव्यामधला राक्षस झाला आहे. आपण सगळे कर्मदरिद्रीए म्हणून काही मागायचा आळस करत आहोत. शेवटी बिचार्‍या त्या दिव्यातल्या राक्षसांनाच आपले डोके चालवून जाहीरनामे काढणे भाग पडते. सामान्य माणसाला काय हवे त्याचा शोध घ्यावा लागतो, त्याची यादी बनवावी लागते. त्याचे बाजारभाव शोधून स्वस्तात वा फुकट अशी वर्गवारी करावी लागते. अल्लादिनला फक्त त्या जुनाट जादूच्या दिव्यावर बोटातली अंगठी घासावी लागायची. आपल्याला फक्त एक दिवस मतदान केंद्रात जाऊन बोटावर काळ्या शाईचा डाग लावून घ्यायचा आहे तेवढाच. बाकीचे काम उमेदवार नावाचा दिव्यातल राक्षस पार पाडणार आहे. जेवढ्या काही समस्या आहेत ना तेवढ्यांचे समर्पक उत्तर व उपाय त्याच्याकडे सज्ज आहेत. आपण बोटाला शाईचा डाग लावून घेण्याने त्याचे काम अडले आहे तेव्हा तुम्ही फक्त मत द्या इतकेच. अल्लादिन तसा कमनशिबी, त्याच्याकडे त्या दिव्यातला एकच राक्षस असायचा. आपण साधी अंगठी घासली नाही तरी अर्धा डझनहून अधिक राक्षस हात जोडून आपल्यासमोर उभे आहेत. तूरडाळीच्या किमती आभाळाला जाऊन भिडल्या म्हणून आपण रडत बसलेलो आहोत. एक मत देऊन या. बघा, आभाळातून तूरडाळींचा पाऊस पडू लागेल. काय समजता तुम्ही ? पावसाने दगा दिला असेल, आपले नेते दगाबाज नाहीत. ते एक रुपयात किलोभर तूरडाळ विकणारी दुकाने काढतील आणि तुमच्याकडे रुपया नसेल तर स्वस्त व्याजदराने तूरडाळ खरेदी करण्यासाठी बँकांनी कर्ज द्यावे, असाही आदेश काढतील. घाबरु नका कर्ज फेडायला. तूरडाळ खरेदी करा, त्यासाठी कर्ज काढा आणी सर्व विसरुन जा. कारण आपल्यात अजून काही अब्रुदार आहेत. ते तूरडाळीसाठी काढलेले कर्ज फेडता आले नाही मग आत्महत्या करतील. त्यामुळे तूरडाळ आत्महत्येचा नवा विषय तयार होईल आणि तूरडाळीसाठी काढलेले कर्ज माफ करायला सरकार हजारो कोटी रुपयांची अर्थसंकल्पामध्ये तरतूद करील. तुम्ही सन्मानाने जगायला मोकळे. कर्ज काढावे, कर्ज बुडवावे यासारखा सन्मान जगात कुठे मिळणार आहे ? नकारात्मक विचार करणे सोडून द्या. काय नाही त्यापेक्षा काय आहे त्याचा सकारात्मक विचार करा. आज पाऊस नाही, दुष्काळ आहे. खरीपाची पिके बुडाली आहेत ? फिकीर करु नका. शेतात पिकणारा माल नाही पिकला म्हणून बिघडत नाही. दुसर्‍या प्रांतातून, देशातून आयात करता येतो. आयात करायला सरकारच्या तिजोरीत पैसे असले म्हणजे झाले. पैशाची टंचाई अजिबात नसते. तिजोरीत पैसा नसेल तर सरकार कर्ज काढील. टांकसाळीमध्ये अधिक नोटा छापल्या की पैसा तयार झाला. मग कडधान्ये पिकली नाहीत, खरीप पिके बुडाली याची फिकीर कशाला ? निश्चिंत राहा. तुम्ही फक्त मत द्यायचे. बाकी सगळ्या गोष्टी आपले नेते आणि पक्ष पुरवणार आहेत ना ? कुठून हे सर्व करणार ? असे विचारायचे नाही. अल्लादिनने राक्षसाला तो प्रश्न विचारला का ?

दैनिक पुढारी वरून खास वाचक मित्रांसाठी

Unknown

No comments: