का मतदान करावं?

दिवाळी आली, आनंदाचा सण, पण या महागाईच्या दिचसात आनंद कुठे आहे. भारतात जगणं मुष्कील झालंय. आता हे दिवस सणासुदीचे आहेत तसेच निवडणुकीचे, उमेदवारांच्या दिवाळीचे आहेत. या काळात अनेक, प्रत्येक पक्ष आपापले जाहीरनामे प्रसिद्ध करीत आहेत, पण ते सोईस्कररित्या आपला मागील निवडणुकीतला जाहीरनामा, आश्वासने विसरली आहेत. कोणीतरी मागील जाहीरनामा सभेत मांडून आपण काय पुर्तता केली आहे ते सांगतो काय? प्रत्येक जण सामान्य जनतेला खुष करण्यासाठी चढाओढ करीत आहे. पण सर्व पोकळ आहे. माणसाला रोजची भ्रांत पडली आहे.

अन्नधान्य, वीज, भाजीपाला, शिक्षण, पेट्रोल, घर, कपडे या सर्व आवश्यक गोष्टी आहेत पण यांचे भाव गगनाला भिडले आहेत. त्या मानाने प्राप्ती काही  नाही. वीजेची बाब तर काही औरच, त्या दरवाढीला कोणी चाबूक लाऊ शकत नाही. आणि त्याला पर्याय नाही. काही दिवसापूर्वी टेलीफोन खात्याची मनमानी होती, त्यांना माज होता, पण मोबाईल फोन आला आणि त्यांची मस्ती उतरली. तसेच प्रायव्हेट ब्यॅंका आल्या आणि बाकीच्या ब्यॅंकांना आपली पायरी कळाली. काही वर्षांपूर्वी कर्ज मागायला गेले तर कर्जदाराला चोरच समजत होते आणि भिकार्‍याची वागणूक देत आणि आता कर्ज पाहिजे असे नुसते म्हणाले तरी, अगदी स्वप्नात सुद्धा, तरी ब्यॅंकवाले हात धुऊन मागे लागतात, पाया पडत्तात, कसेही करून कर्ज घ्या म्हणून. असो.

अन्नधान्न्याच्या किमती तर काळजाचा ठोका चुकवतात. तुरडाळ, साखर, चहा, तेल या रोज लागणार्‍या वस्तू पण तोलून मापून वापराव्या लागतात. फक्त तोच माणूस श्रीमंत ज्याच्या घरातील डबे या वस्तूंनी भरलेले असतील. कांदा त्याच्या गुणाने आणि भावाने, दोन्ही प्रकारे डोळ्यात पाणी आणतो. दूध रोजच लागते, काळा चहा पिऊ शकत नाही, मग चढ्या भावाने घ्यावेच लागते.

तिकडे शेतकर्‍याची दुःखे वेगळीच. खतांचा बियाण्यांचा भरोसा नाही. भेसळीची असतील तरी लगेच लक्षात येत नाही, दोन चार महिनांनंतर कळ्ते तो पर्यंत वेळ निघून गेलेली असते. त्यात परत पावसाचा प्रॉब्लेम. काय करावं? आता तर परतीच्या मान्सूनने वैताग आणलाय, सर्वत्र पूर आलेत.

यात स्वाईन फ्लूने आपला जोर दाखवून घेतला. अगदी आला आणि मानगुटीवरच बसला. दंगली तर पाचवीलाच पुजल्या आहेत. संप करणारे कशाचाच विचार करत नाहीत, फक्त आपला स्वार्थ बघतात.

रोज पेपर मध्ये काय तर सर्व उमेदवार एकमेकांवर चिखलफेक करताहेत. त्यांना कुठे वेळ आहे, मतदारला काय पाहिजे याचा विचार करायला.

या सर्वांचा विचार केल्यास मनात येते, का मतदान करावं?

Unknown

No comments: