सवाई गंधर्व महोत्सव - पहिला दिवस

पुण्यात सत्तावन्नाव्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवास काल गुरूवारी सुरूवात झाली. देशभरातील सर्व प्रतिभावंत गायन वादनकारांना इथे हजेरी लावणे म्हणजे एक अभिमानाची गोष्ट वाटते. आणि रसिकांनाही ही संगीतची मेजवानीच वाटते. या महोत्सवाची तिकीटे विक्री सुरू झाल्या बरोबर एका तासात संपली. एक रसिक तर पहिली रांग मिळावी म्हणून त्या दुकानासमोर आदल्या दिवसाच्या रात्री दहा पासूनच बसला होता.

या कार्यक्रमाचे सुरूवात सनईवादनकार प्रमोद गायकवाड यांच्या सनईवादनाने झाली. प्रमोद गायकवाड म्हणजे सनईसम्राट शंकरराव गायकवाड आणि प्रभाशंकर यांची तिसरी पिढी होय. तेव्हापासून यांचीच हजेरी असते सनईवादनाने.त्यांनी पहिल्या दिवशी ’राग गवती’ ने सुरूवात केली. या रागातील अनेक सौंदर्यस्थळे त्यांनी अगदी अलगदपणे उलगडून दाखवली, आणि रसिक मंत्रमुग्ध झाले. त्यांना प्रेरणा गायकवाड आणि प्रविण तुपे यांनी स्वरपेटीची साथ केली. त्यांच्या मैफलीची सांगता अत्यंत मधूर राग ’पिलू’ ने झाली. या वेळेस जुन्या रसिकांना ’उडन खटोला’ या चित्रपटातील ’मोरे सैयाजी’ या गाण्याची आठवण झाली.

प्रसिद्ध गायिका गंगुबाई हनगळ याचे शिष्य नागनाथ वडियार याछे आगमन स्वरमंचावर झाले आणि एकच टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यांनी प्रथम ’राग मुलतानी’ गायला. यात त्यांनी ’गोकुल गाव का छोरा’ आणि ’आज बाजत बधाई बरसानी रे’ ही द्रुत त्रितालातील बदिश गायली. त्यांना हार्मोनियमवर अविनाश दिघे तर तानपुर्‍यावर मेधा वडियार आणि वासुदेव कारेकर यांने समर्थपणे साथ केली. शेवटी वडियार त्यांनी ’आज सखी सद्‌गुरू घर आये’ हे भजन सादर केले आणि रसिक भक्तिरसात बुडून गेले.

देवकी पंडीत, हे नाव समोर आले तरी अंग कसे स्वरांनी डोलायमान होते. त्या स्वरमंचावर आल्या आणि साक्षात स्वरदेवताच आल्याचा भास झाला. टाळ्यांचा नुसता कडकडाट. त्यांनी म्हिमपलास रागातील विलंबित त्रितालाची बंदिश ’नाद समुद्र तोहे महाकठीण’ सादर केली. नंतर त्यांनी ’धानी रागा’तील ’लंगरवा छांड मोरी बैया’ ही द्रुत त्रितालातील बंदिश गायली. पेटीवर त्यांना सुयोग कुंडलकर, तबल्यावर रामदास पळसुले तर तानपुर्‍यावर मनीषा जोशी यांनी साथ केली. नंतर त्यांनी पं.जितेंद्र अभिषेकी यांची आठवण करून दिली कशी? तर त्यांनी निर्मिलेला ’अमृतवर्षिनी’ राग आळवून. या रागातील ’नाद अनाद अनामय अचल अमर’ ही विलंबित रूपक तालाची बंदिश सादर केली. शिवाय ’का संग किनी प्रीत’ ही द्रुत एकतालाची बंदिश सादर केली. नंतर रसिक स्वरात न्हालेच हो, जेव्हा देवकी पंडितांनी ’किरवानी’ रागातील ’ आली पिया बिन’ हा दादरा गायला. संत चोखामेळा यांचा ’आम्हा न  कळे’ हा अभंग गाऊन  देवकी पंडीत यांनी समारंभाची सांगता केली.

या समारंभात गेल्या वर्षात दिवंगत झालेल्या ज्येष्ठ कलाकारांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यात मंडळाच्या अध्यक्षा, सवाई गंधर्वांच्या शिष्या आणि किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका गंगोबाई हनगळ, विश्वस्त अरविंद मुळगुंद, सरोद वादक उस्ताद अली अकबर खा, सतारवादक आणि संगीतकार पं. भास्कर चंदावरकर, कवी गीतकार गंगाधर महांबरे, शांताराम नांदगावकर, अशोक जी परांजपे, ज्येष्ठ गायक पं रामरंग, ज्येष्ठ अभिनेते   मा. अविनाश उर्फ गणपतराव मोहिते, निळू फुले, ज्येष्ठ भावगीत गायक गजाननराव वाटवे, कर्नाटकीग गायिका डी.खे. पट्टमाल, बासरीवादक अजित सोमण , तबलावादक केशवा बडगे, पेटीवादक आप्पा जळगावकर, रंजना गोडसे, लेखिका सुनीताबाई देशपांडे, गायिका मोहना खरे, विमल दंडवते आणि छायाचित्रकार नितीन दाबक यांना आदरांजली  वाहण्यात आली. 

Dilip Khapre

No comments: