जात

भारतात पहिली जनगणना १८७१ इंग्रजांच्या राजवटीत झाली. त्या जनगणनेत सर्व जातींची गणना करुन मुस्लिमांच्या पोट जातींचीही, पंथांचीही गणना करण्यात आली होती. नंतरच्या १९०१ च्या जनगणनेत भारतात एकंदर १६४६ विविध जाती आढळून आल्या, आणि त्याच जातींची संख्या १९३१ च्या जनगणनेत ४१५० पर्यंत वाढल्या म्हणजे हा फरक काय असावा? १९०१ च्या गणनेत लोकांनी आपली जातच लपविली का? पण ते कसे शक्य आहे.?
एकेकाळी आपण उच्च जातीचे आहोत हे सांगण्यासाठी लोक पुढे सरसावत. उदा०. १९२१ च्या जनगणनेत एकाने हलकी जात सांगितली असेल तर तोच मनुष्य १९३१ च्या जनगणनेत ब्राह्मण जात सांगत असे. कारण त्या काळी जातीवरुन राजकारण होत नव्हते तर, सामाजिक वर्तनात फरक पडत होता. १९५३ मध्ये शेवटची जातीनिहाय जनगणना झाली. त्यानंतर सरकारने हि पध्दत बंद केली.
काय जमाना बदलतो बघा, लग्न करताना लोक उच्च जात बघतात तर सरकारी नोकरी,शैक्षणिक फायदे, आरक्षण मिळविण्यासाठी आपण अनुसूचित जमातीचे कसे आहोत हे सांगण्याची स्पर्धा होते. उच्च जातीचे लोकही आज सरकारकडे अर्ज करत आहेत, त्यांना ओ. बी. सी. मध्ये समावेश हवा आहे. त्यासाठी समाजकल्याण मंत्रालयात कोटींनी लाच देण्यासाठी वर्गणी काढायला समाजातील घटक तयार आहेत. मुस्लिम, ख्रिश्चन धर्मीयही जातीची नोंद करण्याचा आग्रह धरतात. हा सर्व खेळ राजकारण्यांचा आहे. सर्व गणना झाल्यावर प्रदेशाप्रमाणे जातींची संख्या लक्षात घेऊन, निवडणूक लढवताना त्याप्रमाणे आराखडे आखता येतील, हे उघड आहे. विशिष्ट नेत्यांची पोळी भाजली जाणार हे उघड सत्य आहे.
या जातीनिहाय जनगणनेस शिवसेनेने आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विरोध केला आहे. या नोंदणीतून जातीजातीतील युध्द भडकणार हे निश्चित आहे. संसदेत आणि विधानसभेत ओबीसींना आरक्षण हवे आहे, त्यामुळे जातीव्यवस्था आणखी संवेदनशील होणार यात शंका नाही. आत्ताच नक्की आकडेवारी नसताना टोकाचे राजकारण खेळले जाते तर जातगणना झाल्यावर ठराविक प्रदेशांवर, वस्त्यांवर किती अत्याचार होतील, याचा कोणी विचार केला आहे काय?
उदा. मुंबईतील परळ भागात कोणत्या जातीचे लोक, काय संख्येने आहेत हे समजल्यावर नेते मंडळी त्या भागासाठी काय भूमिका घेतील हे देवच जाणो. जर प्रेमविवाह जातीपातीच्या पुढे जाऊन होतात तर जात गणना काय कामाची? स्त्री आणि पुरुष, हे सध्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाने वागतात तर ते आपली जात आता कोणती सांगणार. आत्ताच्या जमान्यात आंतरजातीय विवाह होतायेत त्याबद्दल कोणालाही काहीही आक्षेप येत नाही तर उद्या आंतरधर्मीय विवाह होऊ लागले तर, जात हा शब्द जातच राहील आणि हातात काय उरेल? भली मोठी पोकळी.

Unknown

No comments: