मेरा भारत महान

२८ मे २०१० रोजी रात्री ज्ञानेश्वरी एक्सप्रेसवर हल्ला झाला आणि कित्येक लोकांनी प्राण गमावले हा हल्ला माओवादी संघटनेने केला असे बोलले जाते. या हल्ल्यास जबाबदार असणार्‍या पीसीएपीए या संघटनेचा नेता म्हणतो, “ सॉरी, मला माफ करा, आम्हाला मालगाडी उडवायची होती पण, चुकीने प्रवासी रेल्वे उडवली गेली ”. अरे वा ! काय पण विनयशीलता ! अगदी क्षमा मागून मोकळे झाले, संघटनेचे नेते, बापी महातो. मग ज्यांचे नातेवाईक गेले, ज्यांचे संसार उघड्यावर पडले त्यांचे काय? पीसीएपीए संघटनेचे नेते, कार्यकर्ते याची भरपाई करणार आहेत काय? त्यांना जर कोणी गोळी घातली आणि सॉरी म्हटले तर? त्यांच्या कुटुंबीयांचे कोणी हाल केले आणि त्यांनी क्षमा मागितली तर? फार फार भयंकर आहे या भारतात. तो नेता, क्षमा मागतो पण प्रायश्चित्ताची भाषा करतो काय? प. बंगालचे पोलिस महासंचालक जेव्हा या हल्ल्याचा सूत्रधार बापी महातोच आहे म्हणतात आणि त्याचा शोध घेण्याचे जारी करतात, तेव्हा या बापी महातोला कोलांटी उडी मारण्याची बुध्दी होते, आणि आपले सरकारही त्याने माफी मागितली म्हणून त्याला क्षमा करेल.
रेल्वेमंत्री ममता बॅनर्जीच तर औरच, त्यांनी रात्रीच्या गाड्याच बंद करण्याचे फर्मान सोडले. जर दिवसा हल्ले झाले तर मग काय दिवसाही गाड्या बंद करणार? अहो अशाने या दहशतवाद्यांपुढे गुडघे टेकल्यासारखे होऊन तो भाग त्यांना आंदण दिल्यासारखे होईल? एखाद्या गावावर दहशतवाद्यांनी हल्ला केला तर त्या गावातील लोकांना गाव सोडून द्यायला सांगून तो भाग दहशतवाद्यांच्या हवाली करणार काय? हे सरकारचे धोरण आहे, हेच अतिरेक्यांना धीट करते. जर फाशीचे शिक्षा झाली आणि लगेचच त्या आरोपीला फाशी दिली गेली तरच त्या फाशीला अर्थ आहे, नाहीतर कागदोपत्रीच फाशीचा काय उपयोग. कसा आरोपींना धाक राहणार.
संसदेवर हल्ला झाला तर काय लोकसभेचे कामकाज दुसरीकडे जंगलात चालू करणार का? हा शुध्द पळपुटेपणा आहे आणि हा भारतीय नेत्यांनीच करावा, आणि त्याचे परिणाम भारतीय जनतेने भोगावेत, हेच भारतीयांच्या नशीबाचे भोग आहेत. तेव्हा चला पासपोर्ट व्हिसा काढा आणि परदेशी स्थायिक व्हा. मग तिथे बसून म्हणा ‘ मेरा भारत महान ’.

Unknown

1 comment:

amarjit walake said...

thanks