मी मराठी माणूस

Mi Marathi!

  • Home
  • VismiT

मानवाच्या मूलभूत गरजा काय तर अन्न, वस्त्र, आणि निवारा. निवार्‍यासाठी माणूस घर बांधु लागला. त्या घराने त्याला सुख, शांती, समाधान मिळते. दिवस भराच्या कष्टानंतर घरी आल्यावर मानवाला अति समाधान मिळते.

मय नावाच्या वास्तु शास्त्रज्ञाने रावणाची लंका बांधली, तेव्हा त्याने सांगितले की प्रत्येक वास्तूचा ( घर, दुकान, मंदिर किंवा असेच कांही ) एक गृहपती असतो, त्यालाच वास्तुपुरुष म्हणतात. घर बांधताना कळत नकळत जीव जंतू मारले जातात, त्यांचे पाप नष्ट व्हावे म्हणून सुध्दा वास्तुयज्ञ करतात. वास्तुपुरुषाची सोन्याची प्रतिमा करुन, त्या सोबत पाच रत्न ठेवून, वास्तुपुरुषाची प्रतिमा उलटी, आग्नेय दिशेस छोटासा खड्डा करुन पुरतात. हाच त्या घराचा वास्तुपुरुष होय. प्रत्येक सणावारी त्याला नैवेद्य अर्पण करतात, असा एक कुळाचार आहे. कांहीजण वास्तुपुरुषाच्या वाढदिवशी ( ज्या दिवशी वास्तुपुरुष पुरला तो दिवस ) सुद्धां नैवेद्य समर्पण करतात.

जर वास्तुपुरुषाला नियमीत नैवेद्य अर्पण केला तर, तो संतुष्ट राहून, घरावर कृपा करतो आणि त्याच्या आशीर्वादाने त्या वास्तुत धनधान्य, संपत्ती, समाधान, पुत्र - पौत्र यांची सतत समृद्धी असते. कारण वास्तुपुरुष नेहमी ‘ तथास्तु ’ म्हणत असतो. म्हणून घरात कांहीही वाईट बोलू नये, वाईट आचरण करु नये, अशुभ - अभद्र बोलू नये असा अलिखीत संकेत आहे.

वास्तुपुरुषाला भूक लागल्यास तो घरभर फिरतो, अन्न शोधतो आणि त्याला अन्न न मिळाल्यास तो उपाशी पोटी घराला शाप देतो, म्हणून वेळोवेळी नैवेद्य दाखवावा. घरात कोणीही अगदी अतिथी सुध्दां आले आणि त्यांनी अन्न मागितले असतां अन्न नाही असे सांगण्याची वेळ आली तर वास्तुपुरुष ‘ तथास्तु ’ म्हणतो, आणि मग घरात अन्न नसण्याची परिस्थिती निर्माण होते. म्हणून जेवण झाल्यावर गृहिणींनी थोडे तरी अन्न झाकून ठेवावे.

पुराणात प्रजापती आणि उषा या दांपत्याला चार पुत्र होते. त्यातील सर्वात धाकटया पुत्राचे नाव होते वास्तोष्पती तथा गृहपती. पृथ्वी ही त्याची गृहस्वामिनी होय. स्वाभाविकच पृथ्वीवर निर्माण केलेल्या प्रत्येक वास्तूचा हा ‘ गृहपती ’ अथवा ‘ वास्तुपती ’ असतो, त्यालाच वास्तुपुरुष संबोधतात.

हिंदू पुराणात, महाभारतात पांडवांनी हस्तिनापुरी अश्वमेध यज्ञ केला. त्या वेळी सर्वांना मिष्टान्नाचे भोजन देण्यात आले. त्या समयी श्रीकृष्णाने धर्मराजाला सुचविले, सर्वांचे भोजन झाले आहे, तरी आता त्यांना तृप्तीचा ढेकर देण्यासाठी, हे धर्मराजा सर्वांना सुवासिक असे कांहीतरी खाण्याची व्यवस्था कर. आणि त्याप्रमाणे सर्वांच्या मनात तशी इच्छा उत्पन्न झाली. श्रीकृष्णाचीच इच्छा म्हटल्यावर धर्मराजांनी आणि इतर पांडवांनी वासुकी नागावर ही कामगिरी सोपवली. आता तो वासुकी नागच, जाऊन कोठे जाणार तर तो पोचला थेट पाताळात. आणि काय करावे हे न सुचून त्याने नागराणीची भेट घेतली. यावर नागराणीने लगेच आपल्या करंगळीचा छोटासा तुकडा कापून दिला आणि म्हणाली हेच घेऊन जा. करंगळी कापल्यावर रक्ताची धार लागली आणि काय करावे हे न समजून वासुकीने तो तुकडा पृथ्वीवर आणला आणि जमिनीत पुरला. पुरताना जमिनीवर रक्त सांडले. त्यातून एक वेल उगवली त्यालाच पांडव नागवेल म्हणू लागले. नागाने लावलेली वेल आणि रक्तातून उगवलेली वेल म्हणून या वेलीची पाने खाली असता तोंड सुवासिक होऊन रक्तासारखे लाल रंगू लागले.

विडा शृंगारप्रधान असल्याने ब्रह्मचारी पुरुष अथवा विधवा स्त्रियांनी खाऊ नये.

पूर्वीच्या काळी दुपारी म्हणजेच वैश्वदेवाच्या समयी कोणी घरी आले, मग ते परिचित असोत वा नसोत, जाति-धर्माचे असोत वा नसोत, नातलग असोत वा नसोत त्यांना घरामध्ये बोलावून भोजनादी सोयी उपलब्ध करून, त्यांचा आत्मा शांत होऊ देण्याचा कुलाचार भारतात होता.  पूर्वीच्या काळी वाहतुकीची साधने आतासारखी नव्हती, लोक पायी अथवा घोड्यावरून प्रवास, तीर्थयात्रा करीत, प्रवासात जिथे थांबतील तिथे त्यांचा पाहुणचार होत असे.

एवढेच नव्हे तर, माध्यान्हकाळी घरातील यजमान आणि इतर मंडळी अतिथीची थोडा वेळ वाट पहात असत, कारण अतिथी हा देवासमान मानला जायचा. देवयज्ञ म्हणजे यजमानाने भोजन करण्यापूर्वी वैश्वदेव करणे. आपल्या अन्नातील थोडातरी भाग देव, मानव, पशू, पक्षी, पितर वगैरे सर्वांना अर्पण करणे तसेच घरामध्ये उखळ, जाते, पाणवठा, सूप अशा पाच ठिकाणी किंवा कळ्त नकळत माणसाच्या हातून जीवहिंसा घडते, त्याचे पापक्षालनार्थ वैश्वदेव करण्यावा हिंदू धर्मात रोजचा कुळाचार होता.  वैष्वदेवासाठी चुलीवर शिजवलेल्या भांड्य़ातील भातापैकी थोडा भात घेऊन त्यावर तूप घालून अन्नशूद्धी करतात. मग त्याचे तीन भाग करून एकाभागाची अग्निदेवाला आहुती देतात, दुसर्‍याने भूत यज्ञ म्हणजे बलिहरण करतात आणि तिसर्‍याने पितरांसाठी घराबाहेर जाऊन काकबळी देतात. भारतीय संस्कृतीत अशी वैश्वदेवाची कुळाचार पध्दती होती. परंतु आता कालपरत्वे ही पध्दत नष्ट होत चालली आहे, परंतु ह्यातील फायदा जाणला जात नाही हे दुर्दैव आहे. 

ज्ञानेश्वर म्हणतात

कुळधर्मु चाळी । विधीनिषेध पाळी ।

मग सुखे तुज सरळी । दिधली आहे ॥

आपल्या कुळातील आचारांचे आचरण कर व शास्त्रांनी जी कर्मे करावी असा विधी सांगितला आहे; ती कर्मे कर व जी कर्मे करू नये, असा निषेध केला आहे, ती कर्मे करू नकोस. एवढे तू केलेस म्हणजे सुखाने तुला वाटेल तसे वागावयास मोकळीक दिली आहे.

रामदास म्हणतात – कुळधर्म आणि कुळाचार जसे परंपरेने चालत आले असतील, तसे चालू ठेवावेत. ते उत्तम किंवा मध्यम अथवा मनाला न भावनारे कसेही असले तरी ते पुढील पिढीने चालूच ठेवावेत. आपल्या कुळात कितीही शूद्र देवतांची पूजा असेल तरी ती करावीच.

जो आपल्या कुळातील धर्माचे पालन करतो त्याला ज्ञान व संपत्ती प्राप्त होते शिवाय मानसिक समाधान मिळते.  त्याच्याकडून साधन होते. ज्या घरी कुळाचे आचरण आहे, तेथे कोणतीही अशुभ, अनिष्ट अथवा अघोरी शक्ति आपला प्रभाव दाखवत नाही. कुळधर्म कुळातील लोकांना महत्व व मान प्राप्त करून देतो, आणि इहलोकी व परलोकी पावन करतो. तुकाराम महाराज म्हणतात, जो कोणी शास्त्रात सांगितल्याप्रमाणे कुळधर्म करत असेल तर तो कुळधर्म त्याला देवी देवतांचे दर्शन घडवितो. तुकाराम महाराजांनी कुळधर्माची सांगड समाजाबाबतच्या कर्तव्याशी घातलेली आहे.

मुस्लीम समाजाने पावसासाठी केलेली प्रार्थना

हे अल्लाह, आमच्या हातून गुन्हे घडल्यामुळे तू पाऊस रोखून धरला आहे, याची आम्हाला जाण आहे. आमच्या सर्व चुका, गुन्हे आम्ही कबूल करतो. मात्र या ठिकाणी प्रार्थनेसाठी आलेल्या निरागस मुलांकडे पाहून तरी तू पावसाची कृपा कर.
प्रत्येक व्यक्तीच्या हातून काही ना काही चुका होतच असतात. इतकेच नव्हे, तर आम्ही दान दिले नाही, जकात जमा केली नाही, अल्लाहच्या फर्मानाकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याने पाउस थांबविला असेल, याची आम्हांला जाणीव आहे. आमच्या कडून जे गुन्हे घडले आहेत, ते माफ करून समस्त जातीला पावसाच्या रूपाने दिलासा दे. मानवाबरोबरच या पृथ्वीतलावर असंख्य प्राणी राहतात, निदान त्यांच्याकडे पाहून तरी कृपा कर.

अशी आर्त हाक पुण्यात मंगळवार दिनांक ३ जून रोजी झालेल्या विशेष नमाजाच्या वेळी देण्यात आली. 

अभिनेता अमिरखानने ‘ सत्यमेव जयते ’ कार्यक्रम सुरू केला आहे त्याबद्दल त्याचे प्रथम अभिनंदन.

डॉक्टरांविरूद्ध त्याने आवाज उठवला अशी जी ओरड I.M.A. ने चालविली आहे, त्यात तथ्य नाही, कारण हा आवाज डॉक्टरांविरूद्ध नसून त्यांच्यातील प्रवृत्तींविरूद्ध आहे. आज सर्वत्र हे घडतच आहे. भलेही सर्व डॉक्टर असे नसतील पण काहीतरी आहेतच ना? आजपर्यंत एकाही डॉक्टरचा परवाना I.M.A. ने रद्ध केलेला नाही, म्हणजे भारतात सर्व डॉक्टर धुतल्या तांदळासारखे आहेत काय? भारतातील जनमत घेतल्यास हेच आढळून येईल की, यातून डॉक्टर खूप कमाई करतात.

माझ्या माहितीत अशा कांही केसेस आहेत की, रूग्ण मृत्यु पावल्यावर सुद्धा डॉक्टर नातेवाईकांना न सांगता त्या मेलेल्या रूग्णाचे बिल लावतात. माझ्याच एका भावाची केस आहे. पुण्यातील एका प्रसिद्ध नेत्रतज्ञाकडे तो डोळे तपासण्याकरितां गेला असता त्याला सांगण्यांत आले की तुला मोतीबिंदू झाला  आहे आणि त्याचे लगेच ऑपरेशन करून टाकले, यावर कहर म्हणजे लगेचच दुसर्‍या डोळ्याचेही ऑपरेशन केले काय तर ते केव्हातरी करावेच लागणार ना? मग आताच हातासरशी उरकून घेतले.

शेवटी रूग्ण हतबल असतो म्हणून फसवला जातो.

दुसरे सयाजीराव गायकवाड, बडोदा दरबाराकडून शाहिरांना मिळालेल्या बिदाग्या-

१

तमासगीर सगनभाऊ

सन १८२१-२२

६७५ रू. नगद यापैकी २५ रू. पोषाकाचे

२४६ रू. ४ आणे सोन्याचे कडी

५६६ रू. कापडाबद्दल

२

सगनभाऊ पुणेकर

सन १८२२-२३

४७५ रू. नगदी खुद्द

१७० रू. ८ आणे कडी सोन्याची

३३६ रू. २ आणे सलामी बिदागीसह

३६ रू. राम जोडीदारास पोषाक

९७ रू. ८ आणे कृष्णा नाच्यांस

३२ रू. १० आणे फडकरी यास

३

सगनभाऊ

१८२३-२४

३२ रू. १० आणे फडकरी यास

१९२ रू. कडी सोन्याची

३ रू. फरासास

१८२४-२५

१०३ रू. बिदागी

१८४९-५०

२५ रू. बिदागी

४

परशराम बावीकर

९९ रू. रोख

२६ रू. कापड

५

श्रीपति सवाई फंदी

१८३८-३९

१९९ रू.

१८३९-४०

१९९ रू.  १५ आणे ६ पैसे

१८४०-४१

१९५ रू. १३ आणे ६ पैसे

१८४०-४१

३०० रू. + १०३ रू. २ आणे कापड + १९६ रू. १४ आणे रोख

१८४५-४६

४०० रू. रोख

६

बाळाजी फंदी

१८४९-५०

२० रू.

७

सवाई फंदी

१८४८-४९

४०० रू. रोख

संवत्‍ १८९५-९७ मध्ये श्रीपति सवाई फंदीस जी रक्कम मिळाली तिचा हिशोब लिहीतांना श्रीपति सवाई फंदी रू. ३०० पैकी वजा पोषाक रू. २०० कडे वजन तोळे १० मासे १॥ दर १९-१०-० प्रमाणे असे लिहीले आहे.

गाव मात्र कोणासही इनाम दिला जात नसे आणि शाहिर प्रभाकरला कधीही रोख रक्कम दिली गेली नाही. 

 

शाहिर, भांड, भालदार, भवय्ये, चितारी, गपी, विनोदी, कथाकारी, नकलाकारी वगैरे गुणीजनांना पदरी बाळगण्याची चाल रीत फार पूर्वीपासून राजे महाराजे, पेशवे पाळीत. शाहीरांसंबंधीचा उल्लेख ११व्या शतकाच्या सुमारास सांपडतो. भाटाला, शाहिरांना खूष होऊन पालखी व घोडा देत. शिवाजीराजांच्या पदरी भूषण कवी, परमानंद, जयराम पिंड्ये आदि गुणीजन होते. शिवाजीराजांनी अज्ञानदास ( अफझलखानाचा पोवाडा रचणारा शाहिर ), आणि तुळशीदास ( तानाजीचा पोवाडा रचणारा शाहिर ) यांना शेरभर सोन्याचा तोडा आणि घोडा दिल्याचा उल्लेख त्यांच्यांच पोवाड्यात सापडतो. संभाजी महाराजांच्या पदरी मोहनलाल व मतिराम असे दोन भाट होते.

शाहिरांची खरी चलती शाहू महाराजांच्या कारकीर्दीत सुरू होऊन दुसर्‍या बाजीरावाच्या कारकीर्दीत कळस गाठला. गंगुहैबतीचा फड सवाईमाधवरावांच्या वेळी उदयाला आला. होनाजीबाळाला कोंडणपूरचे कुरण इनाम मिळाले होते, शिवाय सालीना ३०० रूपये मिळत.

बडोद्याचे सयाजीरावही खास आश्रय देत. त्यांनी शाहीर बाकेरावास ६० रू. चा तोडा दिला होता.

१८१८ नंतर पोवाड्यांची चलती संपत आली, कारण इंग्रजी अंमलात पोवाड्यांना आश्रय नव्हता.

ज्यांनी कोणी पोवाडे आजपर्यंत जतन करून ठेवलेत, त्यांचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत.

आमुचा पेला दुःखाचा

डोळे मिटुनी प्यायाचा…

मानवी जीवनाचे हें दुःखांनी कलुषित झालेले स्वरूप आहे त्या अवस्थेत पतकरणे हेंच केशवसुतांच्या वास्तववादाचें प्रमुख अंग होय. जीवन आहे हें असें अपूर्ण व दुःखपूर्ण आहे—हें जीवनाचे यथार्थ स्वरूप स्वीकारण्याशिवाय गत्यंतर नाही. हें मानवी जग अनेक व्यथांनी ओतप्रोत भरलेलें असून तें सर्वस्वी अपूर्ण आहे हें सत्य प्रथम गृहीत धरून, तें पतकरून, मग त्या दुःखपूर्ण व अपूर्ण जगाला शक्य तितकें आनंदमय, सुखमय व पूर्ण करण्यासाठी अपार परिश्रम करणे हें त्यांच्या काव्याचें रहस्य होय.

त्यांना ह्या वास्तव पृथ्वीचा त्याग करावयाचा नसून जमलें तर स्वर्गच खाली आणावयाचा आहे----म्हणजेच ह्या पृथ्वीला स्वर्गाचें स्पृहणीय स्वरूप प्राप्त करून द्यावयाचे आहे, ही महत्वाची गोष्ट त्यांच्या काव्यात दिसतें.

हें जग मनुष्य़ निर्माण हो्ण्यापूर्वी स्वर्गतुल्य होतें पण पुढे मानव निर्माण करण्याची भलतीच कल्पना प्रूथ्वीच्या मनांत आली, आणि तिने मानवाची निर्मिति केली. पण तोच मानव आपली आई जी पृथ्वी तिलाच लाथेनें ढकलून तों स्वर्गात भरारी मारण्यास सज्ज झाला—आणि ही विलक्षण कृतघ्नता पाहिल्याबरोबर स्वर्ग भयंकर संतापला व त्या आवे्गानें तो इतका दूर निघून गेला की पृथ्वीचा व त्याचा संबंधच अशक्य झाला, हे विलक्षण वास्तववादी सत्य केशवसुतांच्या कवितेंत प्रकट होते.

भारतात वास्तुशास्त्राचा विचार १९९० च्या दशकात होऊ लागला. त्यापूर्वी कोणीही वास्तुशास्त्र पाहात नव्हते. काही लोकांनी मग अर्थार्जनाचे साधन म्हणून याचा प्रसार करावयास सुरूवात केली. लोकांना भिती दाखवून पैसे उकळायला सुरूवात केली. १९९० पूर्वी पार आपण ज्ञानेश्वरांच्या काळापर्यंत मागे जाउन पाहिले असता कोणाही संतांच्या अभंगात वास्तुबद्दल उहापोह नाही. मग त्याकाळी वास्तुचे दुष्परिणाम जाणवत होते काय?

कोणताही गड बांधतांना, ताजमहाल बांधतांना, शनिवारवाडा, मंदिरे बांधतांना त्याकाळी वास्तुशास्त्राचा विचार केलेला कोणत्याही दप्तरात उल्लेख आढळत नाही. आजसुद्धां हे तथाकथीत वास्तुशास्त्रज्ञ दावे करतात, त्यामध्ये किती तथ्य आहे हा संशोधनाचाच विषय आहे.

आहे, वास्तुशास्त्रावर मयमतम सार‍खे ग्रंथ आहेत, पण ते नीट समजावून घेऊन कोणीही मार्गदर्शन करीत नाही.

जाणकारांनी मयमतम् ग्रंथ अभासून अवश्य आपल्या वास्तुचा अभ्यास करावा.

 

कजियुगांत  एकंदर सहा शककर्ते होतील असे विद्वान् ऋषींनी लिहून ठेवले आहे. त्या सहातून तीन होऊन गेले आणि तीन अद्यापी व्हावयाचे आहेत. ते शककर्ते खालील प्रमाणे-----

पहिला—इंद्रप्रस्थ म्हणजे दिली येथील युधिष्ठिरशक----३,०४४ वर्षे

दुसरा—उज्जयिनी येथें विक्रमशक संवत्----१३५ वर्षे

तिसरा—पैठन येथें षलिवाहन शक----१८,००० वर्षे‍

चौथा—वैतरणेच्या कांठीं विजयाभिनंदन शक----१०,००० वर्षे

पांचवा—बंगाल देशांत धारातीर्थी नागर्जुन शक----४,००,००० वर्षे

सहावा—कर्नाटकांत करवीरपत्तनी कल्कीशक----८२१ वर्षे

अशी एकंदर कलीयुगांची ४,३२,००० वर्षे होतात.

सांप्रत शालिवाहनाच शक चालू आहे.

हे सर्व असे असतांना २०१२ डिसेंबरमध्ये जगाचा नाश होणार आहे यावर कसा विश्वास ठेवावा?

 

पुण्यास सवाई माधवराव रहावयास आल्यानंतर गणेशोत्सव पेशवे सरकारच्या योग्यतेस साजेशा थाटाने साजरा होत असे.
मल्हार बल्लाळी याने पुरंदरवरून ता. २९-८-१७७८ रोजी लिहीलेले पत्र असे-
पुरंदरी श्रीगणपतीचा उत्सव चतुर्थीपासून काल शुक्रवारपर्यंत यथास्थित जाहला. रात्रौ नित्य श्रीमंत कथेस बसत होते. दीड पावणे दोन प्रहरपर्यंत रात्र कथेस होत असे. काल सहा घटिका दिवस शेष राहिला होता, तेव्हां गणपतीचे प्रस्थान जाहले. स्वारी समागमे श्रीमंत गेले होते. पर्जन्याची झड बसली होती, परंतु स्वारी जातेसमयी चांगला पर्जन्य उघडला होता. स्वारीस शोभा फारच चांगली आली होती. राजहंस बच्चा हती याजवर जरीपटका दिला होता व तेजरावा हत्तीण शिवापुरहून आणिली होती. तिजवर नौबत ठेविली होती. श्रीमंतांची मर्जी बहुतच प्रसन्न होती. आज तेजरावा हत्तीण मागती शिवापुरास रवाना केली. स्वारीचा बंदोबस्त राजश्री बळवंतराव पटवर्धन याणी चांगला केला  होता. आपण श्रीमंतांचे पालखीजवळ होते. स्वामीच्या वाड्यापुढील रस्याने थोरल्या तळ्याकडे स्वारी गेली होती. ( पे. द. ४३ )
या उत्सवाचे वेळी सवाई माधवरावांचे वय अवघे पांच वर्षांचे होते. श्रीमंतांची स्वारी गडावर असल्यामुळें गणेशोत्सव अशा रितीने तेथें होत असता पुण्यांत शनिवारवाड्यांत
उत्सवाची तयारी होत असे. याचा वृत्तांत पुरंदराहून सखारामबापू यांनी ता. ५-९-१७७४ रोजी नारो अप्पाजी खासगीवाले यांस लिहीला. ( पे. द. ३२ ता. ५-९-१७७४ )
यावरून असे समजायला हरकत नाही, गणेशोत्सव पेशवेकाळापासून होता, फक्त त्याला समाजात लोकप्रियता आणली ती लोकमान्य टिळकांनी.

परधर्माची लाट देशावर कित्येक शतकें टिकून ओसरली तरी तिचे दुष्परिणाम खरडून काढून स्वधर्म व खसंस्कृति यांची स्थापना करण्यास किती कष्ट पडतात हें वरील हकीकत वाचून कळण्यासारखे आहे. अर्थात्‍ अशा प्रकारचे झगडे वरचेवर करण्याचे प्रसंग हिंदूवर आल्यामुळें त्यांना आपली घडी मनाजोगी कधींच कधींच बसवितां आली नाहीं. हिंदुसमाजात आगंतुक दोष तसेच कायमचे राहून गेले. तथापि एवढा मोठा हिंदुसमाजात आपली संस्कृति न नीतिमत्ता बर्‍याच प्रमाणात टिकवूं शकला, याचे परकीय राज्यकर्त्यांनाहि आश्चर्य वाटले. ज्या मालकम साहेबाच्या ग्रंथातूनच वरील उतारा घेण्यात आला आहे त्या मालकम साहेबाने या बाबतींते दिलेला अभ्रिप्राय मननीय आहे. तो म्हणतो. ‘हिंदी लोकांत बरेच नैतिक दोष आढळतात. जुलूम व अंदाधुंदीची राज्यपद्धति यांचा तो परिणाम आहे. पण त्यांतून हिंदुस्थान देश आतां बर्‍याच अंशी मुक्त झाला आहे. हिंदुस्थानांत आजवर कित्येक स्थित्यंतरे घडून आली व जुलमी राज्येहि होऊन गेली. इतक्या प्रतिकूल परिस्थितीत हिंदी लोकांतील बर्‍याच मोठया जनसमूहाने इतके सद्‌गुण व नीतिमत्ता कायम राखली, असले उदाहरण जगांत इतरत्र पहावयास सांपडणार नाहीं. त्याचे श्रेय हिंदु लोकांच्य धर्मसंस्थाना, विशेषतः ज्ञातिसंस्थेलाच दिले पाहिजे. ज्या ज्ञातिसंस्थेने त्यांना फार प्राचीन काळीं सांप्रतच्या दर्जास चढविले आहे, त्याच ज्ञातिसंस्थेने त्यांना त्याच ठिकाणीं स्थिर करुन ठेवले हेहि खोटे नव्हे. हिंदूंच्या (धर्म) संस्थापासून त्यांना जे फायदे झाले आहेत त्यांपैकीच चोरी, दारुबाजी व अत्याचार यांचा अभाव हे फायदे असून त्याशिवाय कौटुंबिक बंधने व मायापाश यांचीहि योग्यता कमी नाही. आतां त्यांच्या कांहीं चाली व भोळसरपणा असा आहे कीं, त्याबद्दल कोणीहि खेदच दर्शवील.’
(Instructions by Sir John Malcolm Date 28-8-1821).

दर्भ आणि आभार - पेशवेकालीन महाराष्ट्र, लेखक-वासुदेव कृष्ण भावे, डिसेंबर सन १९३५.

धार येथील एका बावीशे ब्राह्मणाचे घरील १६९ वर्षांचे दोन जुने कागद सांपडले. त्यांत श्रीमंत बाळाजी बाजीराव पेशवे यांचे वेळीं एतद्‌देशीय ब्राह्मणांचे आचारांत शास्त्रविरुद्ध प्रचार चालू होते ते बंद करुन शास्त्रोक्त आचार चालू करण्याबद्दल आज्ञा लिहिल्या आहेत. त्या दोन कागदांपैकी एक निषिद्ध आचारांची यादी असून दुसरे यशवंतराव पवार यांनीं वर्तमान भावी कमाविसदारांचे नावें लिहिलेलें ताकीदपत्र आहे. ते संक्षेपानें येणेंप्रमाणें

श्री. यादी धर्मस्थापना शास्त्रप्रमाण वेदपुरुषाज्ञाप्रमाण नाना धर्म प्रवृत्त होत नाना स्थलीं.

१. गोत्र, प्रवर, शास्त्र, सूत्र, देवमंत्रपूर्वक स्नानसंध्यादि आन्हिक कर्म करावें. पूर्वसंप्रदाय टाकावा.

२. ब्राह्मण जातीनें घरी रहाट न ठेवावा. सूत स्त्रियांनी न काढावें. पूर्व वृत्तें टाकावीं.

३. नवरीचे गळ्यांत जवाळी (माळ खारका बदाम पिस्ते इत्यादिकांची) मुचीची (चांभारानें) केलेली न घालावी. आपले घरीं करुन घालावी. ब्राह्मण जातीनें एकादशाह द्वादशाह भोजन न करावे. तेरावे दिवशी. ब्राह्मण सुखरुप भोजनास घालावे.

४. सौभाग्यवती स्त्रीनें लाखेचा व नरोटीची चुडा न धरावा.

५. सौभाग्यवती ब्राह्मण स्त्रींचे पंगतीमध्यें विधवेनें मधी बसोन भोजन न करावें.

६. सौभाग्यवतीनें विधवेचे पंगतीस भोजनास न बसावे.

७. विधवा स्त्रीनें शेंडी धरुन विष्णु पूजा न करतां ते शेंडी सोडावी. निर्मल मुंडन करावे.

८. ब्राह्मणाही विवाहामध्यें नवर्‍या-नवरीचे पाईमोचे घालून वैदिक कर्म न करावे.

९. विवाहामध्यें षोडश संस्कारामध्यें ब्राह्मण जातीहि स्नान करुन अस्पर्श धौत वस्त्र परिधान करुन संध्या, ब्रह्मयज्ञ, तर्पण, नैवेद्य, वैश्वदेव, भोजन, करावें. पूर्व रीत टाकावीं.

१०. ब्राह्मण जातीनें प्रथम मागणी न करावी, तात्काळ विवाह करावा.

११. सौभाग्यवती ब्राह्मण स्त्रीनें चोळी धरावी, काचोळी टाकावी.

१२. सौ. ब्राह्मण स्त्रीनें काशा-पितळेचें बिच्छवे (पायाच्या बोटांतील भूषणें) न धरावें, रुप्याचे धरावे.

१३. ब्राह्मणादि उदक व स्त्रियांनी खांद्यावरीं व कडेवरी आणावें, मस्तकी जळ न आणावें.

१४. ब्राह्मण जातीने आटासाठा न करावा.

१५. ब्राह्मणास ज्यास जेवावयास सांगितलें त्याणें जावें, पोरास समागमे न न्यावें.

१६ ब्राहण भोजन व स्त्रीसवासीण भोजन यांमध्यें विधवा पंगतीस नसावी.

१७. भांड अपशब्दोउच्चारणपूर्वक ब्राह्मण स्त्रीनें मणी न धरावे, वेदमंत्रोच्चारणपूर्वक सकल कर्म करावीं.

१८. समस्त ब्राह्मणाही षोडशकर्म सांगतासिद्धयर्थ ज्या त्या संस्कारी यथासामर्थ्य ब्राह्मण जेवू घालावे.

१९. समस्त ब्राह्मणाही भोजनकर्माचे ठायीं पवित्र होऊन स्वयंपाक करावा, पक्कान्नें पापड लोणचे आदिकरुन.

२०. समस्त ब्राह्मणांहीं विवाहामध्यें नवर्‍यानवरीचे मस्तकीं पुष्पमाला बांधाव्या. मोचीयाचे घरचे घरमोड न बांधावे.

२१. समस्त ब्राह्मण जातीनें मृत प्राण्यांच्या उत्तरक्रिया शास्त्राप्रमाणें कराव्या.

२२. जो ब्राह्मण मरेल त्याचे स्त्रीचे केस प्रथम अथवा दहावे दिवशीं काढावे तेव्हां शुद्ध.

२३. समस्त ब्राह्मण स्त्रिया याणी प्रत्यही स्नान सवस्त्र करुन वस्त्रे नित्य धुवोन परिधान करावी. चोळी व लुगडी सोवळी धुवोन ठेवावी.

२४. गोत्रप्रवर सापिंड निर्णयपूर्वक स्वसूत्रोक्त वेदमंत्रेकरुन विवाहादिक षोडश संस्कार करावे.पूर्व संप्रदाय टाकावा.

२५. ब्राह्मण जातीच्या समस्त विधवा स्त्रीनें प्रथम रजोदर्शन झाल्यानंतर केस मस्तकीं व आभूषण व चोळी काचोळी लहंगा न धरावी. एक वस्त्र सकच्छ धारण करावें.

२६. सौ. ब्राह्मण स्त्रीनें नाडे मस्तकी न बांधावे.

२७. सौ. ब्राह्मण स्त्रीनें गळ्यापासून मस्तकापर्यत यथासामर्थ्य सुवर्ण आभूषण धरावे, रुप्याचे नग मस्तकीं न धरावे.

२८. सर्व ब्राह्मणाही ब्राह्मणापासून वेदमंत्रांचा उपदेश घ्यावा. त्रिदंडी संन्यासी जटिल गोसावी बैरागी मात्मसाद असे पाखंडी आहेत, त्यांचा मंत्र अथव त्यांचे आज्ञेमध्ये न चालावे. त्यांचा त्याग करावा. ब्राह्मण जातीनें ब्राह्मणापासून उपदेश घ्यावा.

२९. यज्ञोपवीत रहाटाचे सुताची न करावी. आपले स्वहस्ते सूत काढून करावा आणि धारण करावे समंत्रक.

३०. ब्राह्मण जातीनें ब्राह्मणोदकेकरुन सर्वदा स्त्रान करावें. समाराधनादिक करावी, तेथें शूद्रोदक नसावें.

३१. सर्व ब्राह्मण स्त्रीनें सव्य लुगडें नेसून कच्छ धरावा, लहंगा टाकावा.

३२. सर्व ब्राह्मणाही जेवतेसमयीं एकास एका स्पर्श न करावा. सौभाग्यवती स्त्रीनेंहि स्पर्श न करावें.

३३. सकल ब्राह्मण जातीनें साता वर्षांनंतर दहा वर्षपर्यत तत्काळ विवाह करावा.

३४. ब्राह्मण जातीनें ज्या गांवी वधू असेल तेथें सहकुटुंब जाऊन तेथें मंडप घालून देवप्रतिष्ठा करुन लग्न संपादावें.

३५. ब्राह्मणाही ब्राह्मविधीनें विवाह करावा.

३६. ब्राह्मण जातीनें आपली कन्या विक्रय करुन विवाह न करावा.

३७. सकल ब्राह्मण यांचे स्त्रीनें स्वयंपाक करतेवेळेस, भोजन करतेवेळेस दर्याईची (रेशमी) चोळी घालावी किंवा धूत वस्त्र सोवळ्यांत घालावें ते चोळी वस्त्रें धारण करावें.

३८. समस्त ब्राह्मणाही समाराधना व पितृकार्य व विवाहकार्याचे स्वयंपाक करणें तो स्वयंपाक करणार यांनीं उपोषण असतां पाक करावा अथवा पीठ भक्षावयस द्यावें, आणखी न सेवावे.

३९. समस्त ब्राह्मण यांचे पुत्रानें वेदाध्ययन करावें.

४०. जो ब्राह्मण अनाचार न सोडी त्यास वाळीत घालावें. यथोक्त प्रायश्चित्त देऊन शुद्ध करुन घ्यावें.

४१. समस्त ब्राह्मणाचे पितृकार्यी वेदपाठी ब्राह्मण सांगावे भोजनास.

४२. समस्त ब्राह्मणाही पितृकार्याचे ठाईं ब्राह्मण बोलावले असतील तितके जेऊं घालावे.

४३. ब्राह्मणाही शूद्राचे घरीं विवाहादिक कर्म शूद्रकमलाकर ग्रंथप्रमाण करावे. वेदप्रमाण न करावें.

श्री भवीनीचरणें तप्तर
आनंदराव सुत यशवंत पवार
निरंतर संवत् १७९२

संदर्भ आणि आभार - पेशवेकालीन महाराष्ट्र, लेखक-वासुदेव कृष्ण भावे, डिसेंबर सन १९३५.

कोठेहि लग्नसमारंभांत भोजनाची व्यवस्था टीपदार असली म्हणजे त्यास ‘नाना फडणिशी बेत’ असें स्तुतिपर शब्दानी संबोधण्यात येते. सवाई माधवरावाच्या लग्नाचा कार्यक्रम खुद्द नानांचा नजरेखालीच झाला असल्यामुळे त्याची योजना किती नमुनेदार असेल हें सांगावयास नकोच. त्यासंबंधाच्या याद्या काव्येतिहाससंग्रहात छापल्या आहेत त्या वाचल्या असता पाटरांगोळ्यापासून नाचरंगापर्यंत सर्व बंदोबस्त कसा शिस्तींत होता याविषयीं खात्री पटते. पेशवाईतील भोजनाच्या बेताची आजहि ख्याति आहे, ती अगदीं यथार्थ होती हे खालील माहितीवरुन सहज लक्षांत येईल.

“खासे पंगतीस केळीची पाने चांगली थोर मांडावी. फाटकी व डागीळ नयेत. द्रोण दर पानास दहा बारापर्यंत मांडावे. ते चांगले दोहो काडयांचे केळीचे नोकदार असावे. चांगल्या ठशाच्या रुंदाळ रांगोळ्याची रांगोळी घालावी. ती हिरवी, पांढरी, गुलाली वगैरे, तर्‍हतर्‍हेची असावी. पाट एके सुताने सारखे मांडावें. त्यांत खासे पंगतीस रुप्याच्या फुल्यांचे वगैरे चांगले थोर एकसारखे पाहून बसावयास व जागा असेल तसे टेकावयास मांडावे. खासे पंगतीस उदबत्तीची घरे व झाडे रुप्याची असतील ती लावावी. वरकड जागा सोंगटी मांडावी. केशरी गंध अर्काचें व मध्यम असें दोन प्रकारचें करावें. केशरी गंधात केशराची कसर राहू नये. अक्षता उंची कस्तुरीची व मध्यम कस्तुरीची अशा दोन कराव्या. गंध लावणारे चांगले कुशल चौकस माणूस असावे. त्याणी साखळीनें कपाळी लावावें. वाकडे गंध लावू नये. अक्षत लावतेसमयीं नाकास धक्का न लागता कपाळाचा मध्य पाहून लहान. मोठी अक्षत ओघळ न येता वाटोळी लावावी. गंध उभे आडवे ज्यास जसे पाहिजे तसे लावावे. गंध अक्षता लावणार यानी नखे काढून बोटे चांगली करुन लावावे.’

“अंगास लावावयास केशर व अर्गजा वगैरे सुवासिक एक व साधे पांढरे एक व गुलाबी चंदनाचे व कृष्णागराचे याप्रमाणे चांगली उगाळावी. हातास लावण्याचें गंघ देतेसमयी भागीरथीचा गुलाब (पाणी?) वाटीत पुढें ठेवीत जावा.

“भोजनास भात साधा दोन प्रकारचा. खासा व मध्यम. साकरभात व वांग्याचा भात वगैरे सरासरी दोन करीत जावे. वरण तुरीचे. सांबारी दोन प्रकारची. आमटी दोन प्रकारची. लोणचे दहा प्रकारचे चिरुन व साखरेचे लोणचे. कढी सारे दोन प्रकारची. भाजा दहा बारा प्रकारच्या कराव्या. त्यांत एक दोन प्रकार तोंडली पडवळे वगैरे. मागाहून उष्ण व सगळी वांगी वगैरे उष्ण वाढावी. क्षीर वळवटे दोन प्रकारची. दररोज खिरी दोन प्रकारच्या निरनिराळ्या. पूर्ण पोळ्या सपाटीच्या. पक्कान्नें घीवर फेण्या वगैरे तीन चार प्रकार दररोज. वडे साधे व वाटल्या डाळीचे कढिवडे. तूप साजूक फार चांगले व मध्यम. मठ्ठा, चख्खा, श्रीखंड, अंबरस, खिचडी ओले हरभरे यांचे डाळीचे वगैरे प्रत्यहीं एक प्रकाराची. पापड, सांडगे, फेण्या, तिळवडे, चिकवडया, मीरगोंडे बोडे, मेक्यांच्या काचर्‍या, चांगल्या कोशिंबिरी वीस प्रकारच्या. तिखट चटण्या चांगल्या बारीक वाटून रुचिकर कराव्या. निंबे चिरुन पंचामृत, रायतीं व भरते दोन, आदिकरुन पंचवीस तीस प्रकार करावे. एक दुसरी चमत्कारिक कोशिंबिरी करावी. विचारुन वाढावी. मीठ धुवून पांढरे बारीक करावे. हारीनें एकास एक न लागला हिराव्या, पिवळ्या, लाल, काळ्या वगैरे रंगाचे अनुक्रमाने मध्यें थेंब न पडता गलगल न करता वाटोळया वाढाव्या. हात धुवून मग दुसरी कोशिंबीर वाढीत जावी.

“भोजनसमयीं समया खाशाचे पंगतीस दोन पात्राआड एक व वरकड पंगतीस चार पात्रा आड एक याप्रमाणें उजळ समया वाती उजळून चांगल्या कोरडया न रहाता भिजवून तेल निवळ पांढरे असेल ते घालून पात्नावर न पाडता तजविजीनें झार्‍यानी समयावर घालावे. रुप्याच्या समया खासे पंगतीस मांडाव्या. त्याजवर तेल रुप्याचे झार्‍यानी घालावे. गुलदानानी गूल काढावे.

“सदर्हू साहित्य आचारी चांगले शहाणे लावून स्वयंपाक चांगला करावा. पात्रांचा अदमास पुसोन घेऊन दोन प्रहरात भोजने होत अशी तजवीज करावी. लोणची भाज्या वगैरे उष्ण रसाच्या, एक सारख्या हारीने वाटोळ्या वाढाव्या. एकास एक लावू नये. आंबटी, सांबारे, वरण, क्षीर, यांचे थेंबटे मध्यें पडू नयेत. तूप रुप्याचे तोटीच्या कासंडयानी वाढावे. प्यावयाचे पाणी गाळून शीतळ करावे. वाळा कापूर, उदवून ते सिद्ध करावे. सर्वांस भोजनसमयी व फराळसमयी देत जावे. भोजनोत्तर आंचवावयास उष्ण पाणी व हातास लावावयास साखर व दात कोरावयास लवंगा याप्रमाणें देत जावे.

“फराळाचे सामान-लोणची पाच प्रकारची व पापड, सांडगे. कोशिंबिरी दहा प्रकारच्या. पक्कान्ने व लाडू,पोहे आंबेमोहोर बारीक भात व खानदेशातून नवे पोहे आणवून ते व मातबरास लाह्या, खारीक, खोबरे, खजूर, बदाम, पिस्ते, नारळ, मेवा वगैरे. मेवामिठाई. दही,दूध, तूप साजूक व मध्यम, मुरंबे.

“विडे बांधणे ते हिरवे खर्ची पानांचा व बाजूचा सात पानांचा बांधावा, पिकल्या पटटया, बाजूच्या सात पानांच्या,सुपारीचे पानांची गुंडी उभी घालून भरदार चांगल्या बांधाव्या. कुलपी विडे, केळीची पाने लावून, दहा पानांचा एक व बारा पानांचा त्यांत गंगेरी दोन पाने घालीत जावी. त्यस दुकाडीची खूण करावी. सुपारी फुलबर्डा वगैरे चांगली पाहून धुवावी. त्यापैकी तबकात मोकळी घालावयाची त्यास केशराचे पाणी देऊन गुलाब घालून रंगदार करावी. कांहीं रोठा-सुपारीचे फूल पाडून ठेवावे. चिकणी सुपारी नुस्ती व खुषबोईदार करुन ठेवीत जावी. जुना केशरी व साधा पांढरा सफेत खासा सभेंत तबकात ठेवण्या करिता करावा."

अभिरुचीची सूक्ष्मता हीच संस्कृति. ती समाजाच्या सर्व प्रकारच्या व्यवहारात दृष्टीस पडली म्हणजे तो समाज तितक्या प्रमाणात व त्या त्या अंगानी सुसंस्कृत झाला, असें म्हणता येतें. भोजनसमारंभ हे त्यापैकी प्रमुख अंग होय. त्यांत समाजाच्या विविध मनोवृत्तींचे व सभ्याचारांचे प्रतिबिंब पहावयास सापडते. वर वर्ण केले आहे त्यावरुन पेशवेकालीन वरिष्ठ प्रतीचा महाराष्ट्रीयसमाज संस्कृतीचे बाबतीत जगातील कोणत्याहि समाजास हार जाणारा नव्हता, इतकेच नव्हे तर मद्यमांसनिवृत्तीने तो पाश्चात्य देशातील सर्व समाजाहून श्रेष्ठ होता असेच कबूल करावें लागेल. इंग्लंड हे हल्लीप्रमाणें त्याहि काळी दारुबाजीत बुडाले असून खुद्द लंडन शहरांतील गुत्ते दारुबाजानी रात्रंदिवस गजबजलेले असत.

लॉर्ड व्हँलेंटिया पुण्यास १८०३ मध्यें आला होता. त्यावेळीं पुण्याचा रेसिडेंट सर बारी क्लोज हा होता. त्या दोघांना दुसर्‍या बाजीरावानें मेजवानी दिली. तिची हकीकत क्लोज यानें लिहून ठेवली आहे. तो लिहितो, “चार वाजल्यानंतर आम्ही स्वारीसह हिराबागेंत पेशव्याला भेटावयास निघालो. वाटेनें पेशव्याच्या स्वारीतील घोडेस्वार वगैरे गर्दी होती. म्हणून आम्हाला फाटकांतून (Gate) आंत शिरण्यास प्रयास पडले. माझ्याबरोबर आमच्या लायनीतील शिपायांची तुकडी होती म्हणून बरें झाले. ही बाग एका विस्तीर्ण तळयाच्या कांठीं आहे. तळ्याच्या मधील बेटांत एक देवालय आहे. बागेतील घर सामान्य प्रतीचे आहे. बाग सुरेख असून तिच्यांत मोठाली आंब्याची झाडे व पुष्कळ नारळी आहेत. पेशव्यांची गादी पडवीत होती. समोर कारंजी असून त्याभोवती द्राक्षवेळी सोडल्या होत्या.

‘मग आम्ही अरुंद जिन्यातून माडीवर गेलो. माडी कलमदानी होती. तिच्या दोन्ही बाजूला पडव्या होत्या. पलीकडच्या अंगाला पांढरी बैठक असून त्यावर आम्हा इंग्रज गृहस्थाकरितां केळीची पाने मांडली होती. त्यावर ब्राह्मणी पद्धतीचे जेवण वाढले असून त्यांत भात, पापड, पापडया, करंजा इत्यादि पदार्थ होते. एका ओळीला रंगारंगाची पक्कान्ने होती व दुसर्‍या ओळीला सात प्रकारच्या चटण्या कोशिंबिरी होत्या. पानाच्या एका अंगाला खीर, तूप व दुसरे पातळ पदार्थ होते. हे सर्व पदार्थ उत्कृष्ट बनविले होते. आम्ही आपल्याकरितां स्वतःबरोबर काटे, चमचे व सुर्‍या आणिल्या होत्या. त्यांचा आम्हीं हवा तसा उपयोग केला. बाजीरावसाहेब पलीकडे गादीवर बसले होते. पण आमच्यासमोर जेवावयास बसून त्यांनीं आपणांस भ्रष्ट करुन घेतले नाहीं." (पूना इन बायगॉन डेज).

संदर्भ आणि आभार  -  पेशवेकालीन महाराष्ट्र,  लेखक-वासुदेव कृष्ण भावे, डिसेंबर सन १९३५.

“दुसरे दिवसापासून सर्वत्र लोकांस मेजवानीची आमंत्रणें करुन भोजनास बोलाविलें. मंडळी तितकीच आली. वाढावयास सर्व कारकून मंडळी नेमिली. तूप वाढावयास शहरचे सराफ नेमले. एकएका पदार्थास एक एक कारकून नेमला. सारे कारकून पीतांबर नेसून शालजोडया कंबरेस बांधून वाढावयास लागले. चार चार कारकुनांमागें एकेक शिष्या हातीं ओली धोत्रें घेऊन वाढणारांचे घाम पुशीत असे. असा रोज समारंभ होत राहिला. होळकर, गायकवाड, भोसले, व सरकारचे मानकरी घोरपडे, जाधव, निंबाळकर,पाटणकर, दरेकर, मोहिते, शिरके, थोरात, धुळप, खानविलकर अशी मंडळी व पागे पथकेसुद्धां एकांडे अशा अवघ्यास भोजनास घालून वरासनी बसले. वरकड मंडळी मंडपांत दाखल झाली. अगोदरच राघोजी आग्रे व हरिपंत तात्या सोयर्‍याचे मंडपांत तरतुदीस ठेवले होते, त्यांनीं पुढें येऊन सारे मंडळीस आंत घेऊन जाऊन ज्या ज्या ठिकाणी योग्यतेनुरुप बसावयाचे तसे बसविले. श्रीमंत बसले त्या ठिकाणीं आप्पाबळवंत व अमृतराव पेठे व दाजीबा आपटे वगैरे झाडून मंडळी बसली. नंतर मधुपर्कविधि होऊन पाणिग्रहणविधि झाला. त्या समयी वाजंत्र्याचे बाजे, चौघडे व नौबती अशी एकदाच सारी वाजू लागली व तोफांची सरबत्ती झाली. मग विवाहहोम होऊन ब्राह्मणांस दक्षिणा मंडपात वाटली. मंडपात वर्‍हाडी होते त्यास पानसुपारी, हार, गजरे, तुरे वाटले. मग सर्वत्र मंडळी सरकारचा निरोप घेऊन निघाली ती आपआपले ठिकाणी गेली. श्रीमंत मात्र राहिले.

“तेथें चार दिवस समारंभ भोजनाचा झाला. मुत्सद्दी मंडळी व बाहेरचे वर्‍हाडी सरदार वगैरे या अवघ्यास चार दिवस यथासांग सोहाळा झाला. बाहेरची सरदार मंडळी व मराठे मानकरी यांस भोजने सरकारवाड्यांत झाली. मोठी   दक्षणा देकार रमण्यांत झाला. चार दिवस झाल्यावर साडे होऊन वरातेची मिरवणूक निघाली. त्या दिवशीं शहरात सारे रस्ते झाडून सडे टाकून चिराकदानें लावली. सरकारची स्वारीं अंबारीत बसून वाडयांत यावयास निघाली. सारे सरदार, मानकरी, सर्वांस पोशाख योग्यतेनुरुप दिले. तसेच ब्राह्मण सरदार विंचूरकर, पटवर्धन, रास्ते, बेहरे, बहिरो अनंत, राजेबहाद्दर, बारामतीकर, आप्पाबळवंत, बन्या बापू मेहेंदळे, पुरंधरे, पानशे या सर्वास अलंकार, वस्त्रे योग्यतेनुरुप दिली.

“शेवटीं नबाब पोटाजंग यास जाफत करण्याचे बलावणे केले. त्या दिवशी पंधराशे खासा नबाबासमागमे आला. त्यास भोजनास पंधराशे रिकाबा (ताटे) रुप्याच्या नव्या करविल्या. त्या सर्वत्रास भोजनास मांडिल्या. करकून मंडळी अंगांत जामेनिमे घालून पायात विजारी घालून कंबरेस पटके बांधून वाढावयास लागली. सर्वत्रांची भोजने झाली. अवघ्यानी वहावा केली. मग विडे, पानसुपारी, अत्तर गुलाब, हारतुरे, गजरे देऊन सर्वत्रास पोशाख दिले. नबाबास जवाहिर दिले. असे होऊन सर्व आपले गोटांत गेले. सरदार मानकरी व शिलेदार कोणी राहिला नाही. असे सर्वत्रांचे सत्कार झाले. [पेशव्यांची बखर]

त्यांच्यामागे मोठाले सरदार, मानकरी, होळकर, गायकवाड, भोसले, विंचूरकर, पटवर्धन, राजेबहाद्दर, गणेशपंत बेहरे, बहिरो अनंत, घोरपडे, निंबाळकर, जाधव, दरेकर, पाटणकर, थोरात, मोहिते, भोईटे, अक्कलकोटवाले असे अनेक मानकरी निघाले. त्यांच्यामागे सातारकर महाराज अष्टप्रधान समवेत व त्यांच्यामागे नबाब पोलाजंग आणि राजेरजवाडे, संस्थानिक, परराज्यांतील वकील असा समुदाय मिरवत चालला असतां त्यांच्यामागे सरकारची मुत्सद्दी मंडळी नानाफडणीससुद्धां समागमे कारकून मंडळी,  शेटसावकार, उदमी असा पुण्यांतील समुदाय चालला. त्यांच्यामागे पागे सकल व कारखानदार सरकारचे व दरकदार पोतनीस, चिटणीस, मुजुमदार असे मिरवीत असतां त्यांच्यापाठीमागें पागा घोड्यावर स्वार होऊन चालले. उंटावरील नौबती शतावधि वाजतात. अशा थाटानें व अशा समुदायानें मोठ्या सरंजामानें चालत असतां शहरचे लोक दुरस्ता माडीवर व गच्च्यांवर उभे राहून तमाशा पहातात. त्यासमयीं शहरचें लोकांनी सोन्यारूप्याची फुलें श्रीमंतांवर उडवली. अशी स्वारी समारंभानें नवरीचे मंडपात पोहोचली.

त्या समयीं जलकुंभ मस्तकी घेऊन दासी उभ्या. दहीभात वरून ओवाळून टाकिलें. कुळंबिणी  घागरी घेऊन उभ्या होत्या त्यांस देणगी देऊन स्वारी मंडपात दाखल होऊन राजे रजवाडे, सातारकर महाराज, अष्टंप्रधान, व पोलाजंग आपले सरदार लोकसुद्धां जसे जांतेवेळेस लग्नांस गेले, तसेच येते वेळेस त्याच थाटानें मिरवत हवया, नळे, चंद्रज्योती, झाडे नानातर्‍हेची सोडीत सोडीत सुमुहूर्तानें वाड्यांत दाखल झाले. नाचरंग सर्व होऊन ल्क्ष्मीपूजन होऊन सर्वांस पानसुपारी वगैरे अत्तरगुलाब हारतुरे वाटले. मग सर्वांस घरीं जाण्यांस हुकूम झाला.

पुढील वर्णन पुढील भागात.

श्रीमंत देवास नमस्कार करून स्वारी बाहेर निघाली. थोरला हत्ती विनायक गज आणवून त्याजवर रूप्याची अंबारी ठेवली. त्यांत श्रीमंत बसले. पाठीमागे खवासखान्यांत आप्पा बळवंत व अमृतराव पेठे हाती चवर्‍या घेऊन बसले. पुढें खास जिलबीस बोथाटी-बारदार, विटेदार व बाणदार व लगी, त्यांच्यापुढें खास बारदार अशा जिलीब पुढे निघाली. पुढें वाजंत्र्यांचे ताफे ताशे मरफे दोनशे वाजू लागले. त्यापुढे चौघडे वाजतात. त्याचे पुढें जिलबीचे हत्ती शेपन्नास चालिले आहेत. त्यामागे जरीपटक्याचा हत्ती, मागे कोतवाल घोडे, पांचसातशे सोन्याचे गंडे पट्टे व पाठीवर भरगच्च झुली, गळ्यात मोहोरा-पुतळ्यांच्या माळा असे चाललें. जिलबीच्या हत्तीपुढें पाच हजार खासे घोड्यावर स्वार होऊन बंदुकांचे आवाज करीत चालले. त्यांच्यापुढे दहा हजार स्वार चालला. अशी स्वारी लग्नास वाडा डावा घालून निघाली, तेव्हां आघाडी पानशे यांचे वाड्यापाशी होती. श्रीमंतांच्या अंबारीमागे साहेब नौबती वाजत चालल्या. वाड्यापासून तोफखान्यापावेतो एकसारखा फौजेचा थाट उभा राहिला आहे. सरकारचे अंबारीमागे वर्‍हा‍डिणी बायका याणी चालावे. बायकामध्यें पुरूषांची दाटी न होईल अशा बेताने सभोवती शिपाई चालिले. त्यांच्यामागे भिक्षुक मंडळी, शास्त्री, पुताणिक, अग्निहोत्री, ज्योतिषी व वैदिक असा समुदाय चालला.

पुढील वर्णन पुढील भागात.   

सवाई माधवरावांच्या लग्नाचा बेत शके १७०४ म्हणजेच सन १७८२ मध्ये ठरला. बाळाजी बहिराव थत्ते यांची कन्या वधू नेमस्त केली. लग्न माघ मासी व्हावयाचे होते.
लग्नाकरितां सरकारी मंडळी, मामलेदार मंडळी, पुण्यातील नागरिक अशी ब्राह्मण मंडळी, गृहस्थ, भिक्षुक, अग्निहोत्री, दीक्षित, शास्त्री, वैदिक, ज्योतिषी, उदमी व्यापारी, सावकार, सराफ या सर्वांना निमंत्रणे गेली. त्याखेरिज अष्ट प्रधान, लहान थोरे सरदार व हिंदुस्थानातील सर्व राजेरजवाडे यांनाही बोलावण्यांत आले होते. निजामअल्लीकडे पुण्याहून कारकून सरंजाम देऊन पाठवले, तेव्हा नबाब बोलले ‘ बहुत अच्छा है. रावपंडित इनकी शादी होती है. तुमने साथ फौज लेके सरंजाम समेत पुणे शादीके जाना.‘ नबाबाचा हा हुकूम पोलाजंग यास झाल्यावरून पोलाजंग पुण्यास आला.
कृष्णाजी नाईक यांच्या वाड्यांत लग्न समारंभ झाला. लग्नाकरितां सवाई माधवराव निघाले, त्या मिरवणुकीचे वर्णन पुढील भागात.

शनिवारवाडयाचे वर्णन सांगलीचे प्रसिद्ध कवि साधुदास यांनी आपल्या ‘पौर्णिमा’ नामक कादंबरीत केलें आहे. त्यावरुन वाडयाचें समग्र चित्न डोळ्यांसमोर उभे रहातें. ‘सभोवार एक प्रचंड तट राखून वाडयाचें बांधकाम केलें होतें. वाडयाकरितां आणि भोंवतालच्या बागेकरितां मिळून तीन बिघ्याहून अधिक जागा गुंतली होती. वाडा उत्तराभिमुख असून त्याला एकंदर पांच दरवाजे होते. उत्तरेकडेचा दिल्ली दरवाजा, ईशान्येकडचा मस्तानी (अल्लीबहाद्दरा) चा दरवाजा, दक्षिणेकडचा आग्नेय व नैऋत्य या दिशांस असलेले गणेश आणि नारायण या नांवांचे दरवाजे, आणि पूर्वेचा जांभळी दरवाजा, अशा नांवांनी हे दरवाजे प्रसिद्ध होते. सर्व दरवाज्यांवर अष्टौ प्रहर गारद्यांचे टेलता पहारा असे, दिल्ली दरवाजांतून आंत गेल्याबरोबर एक प्रचंड वाटोळा बुरुज लागे. या बुरुजाच्या माथ्यावर तोफांचा गोल रचला होता. आणि त्याच्या मध्यभागीं महाराष्ट्राचें पंचप्राणभूत जरीपटक्याचें भगवें निशाण फडकत होतें. बुरुजाच्या आंत तीन मोठया कमानी असून त्या कमानींवर नगारखान्याची माडी होती. कमानींतून आंत गेल्यावर एक विस्तीर्ण पटांगण लागे. या पटांगणाच्या पूर्व बाजूस व पश्चिम बाजूस दोन दोन लहान चौक असून दक्षिणेच्या बाजूस वाडयाची मुख्य इमारत होती. ही इमारत सहा मजली असून तिचे चार मोठमोठे चौक होते. आग्नेयीकडील चौकास लाल चौक असें नांव होतें, पण तो बाहेरील चौक होते. आग्नेयेकडील चौकास लाल चौक असें नांव होतें, पण तो बाहेरील चौक या नांवानेंहि प्रसिद्ध होता.... नैऋत्येकडील चौकास मोतीचौक असें नांव असून तो बाईंचा (गोपिकाबाई) चौक या नांवानें ओळखला जाई....वायव्येकडील चौकास हिरकणी चौक असें नांव असून तो मधला चौक या नांवानें गणला जात असे... ... शेवटच्या म्हणजे ईशान्येकडील चौकास माणिकचौक ही संज्ञा असून तो हौदाचा चौक या नांवानेंहि महशूर होता. या मोठया चौकांतून फडाचा चौक, ताकचौक, मुदपाकचौक, पक्कान्नचौक इत्यादि अनेक पोटचौक होते. त्यांपैकी फडाचा चौक हा हिरकणी चौकांत असून त्यांत पेशवे सरकारांची कचेरी भरत असे. या सर्व चौकांत मिळून गणपतीचा रंगमहाल, नानांचा दिवाणखाना, नवा आरसेमहाल, जुना आरसेमहाल, दादासाहेबांचा दिवाणखाना, थोरल्या रायांचा जुना दिवाणखाना, खाशांचा दिवाणखाना, हस्तिदंती दिवाणखाना, नारायणरावांचा महाल, अस्मानी महाल इत्यादि अनेक महाल व दिवाणखाने होते. नारायणरावांचे देवघर, रावसाहेबांचे देवघर, दादासाहेबांचे देवघर इत्यादि अनेक देवघरें होती. याशिवाय जामदारखाना, जिन्नसखाना, दप्तरखाना, पुस्तकशाळा, गोशाळा, पीलखाना, उष्टखाना, शिकारखाना, शिलेखाना, वैद्यखाना, कबूतरखाना, कोठी इत्यादि कारखान्यांची योजना वेगवेगळ्या चौकांतून करण्यांत आली होती. कात्रज येथें तलाव बांधून त्यांतून पाणी शहरांत आणून तें वाडयांत सर्वत्र खेळविलें होते.

‘वाड्याचे सर्व चौक उत्तम चिरेबंदी बांधले असून त्यांच्या मध्यभागी अनेक हौद व कारंजी असत. त्यांच्यापैकी हिरकणी चौकांतलें हजारी कारंजें कमलाकृति असून त्याचा घेर सुमारें ऐशी फूट होता. त्यांत सोळा पाकळया असून प्रत्येक पाकळींत सोळा याप्रमाणें सर्व पाकळ्यांत मिळून दोनशें छप्पन्न कारंजी उडण्याची सोय केली होती. वाडयाचे सुतारकाम उत्तम सागवानी लाकडाचें असून त्यांतील दिवाणखान्यांचे व महालांचे नक्षीकाम फारच प्रेक्षणीय केलें होतें. दिवाणखाने कलमदानी आकाराचे असून त्यामध्यें एक मोठा सभामंडप व चारी बाजूंस चार दालनें काढलेलीं असत. सभामंडपाचें काम सुरुदार नक्षीचें असून त्याच्यावर नक्षीदार लाकडी कमानी होत्या. त्यांच्यावरुन पक्षी, फळें, वेलबुट्टी वगैरे चित्नें कोरलेलीं असत. विशेषतः हिरकणी चौकांतल्या गणपतिमहालाचें चित्नकाम फारच प्रेक्षणीय कोरलेलें होतें. आणि त्यांतून रामायण-महाभारतांतील अनेक कथांची चित्रें होतीं. जयपुराहून भोजराज नावाच्या चित्रकारास बोलावून आणून त्याजकडून हें चित्नकाम तयार करुन घेण्यांत आलें होतें. यावरुन हा वाडा सजविण्यासाठीं किती पैसा खर्च करण्यांत आला असेल याचा वाचकांनी अंदाज करावा.’

शनिवारवाड्याबाहेर छबिन्याकरितां प्रातःकाळपासून सायंकाळपर्यंत स्वार असत. त्यांपैकी ५३ दिल्ली दरवाजापुढे व १० गणेश दरवाजापुढें. खुद्द वाड्यांत २२० पायउतार लोक असत. त्यांपैकी १०५ इसमांना प्रातःकाळपासून दोन प्रहरपर्यंत रहावे लागे. त्यांची वाटणी अशी - २१ चाफेखणांत व ८४ सार्‍या दिवाणखाण्यांत मिळून. दोन प्रहरांपुढे पहिले इसमास सुट्टी होऊन नवे ११५ इसम येत; व रात्रीच्या वेळीं आंतल्या व बाहेरच्या लोकांची एकूण संख्या २३९ असे. त्यांतील १२५ वाड्याबाहेरचे स्वार व ११५ वाड्यामधील पायउतार. अशा रितीनें रात्रंदिवस तीन पाळ्या धरतां ५२२ इसम कामावर येत. यावरून वाड्याचा विस्तार, त्यांतील विभाग यांचा अंदाज अधिक स्पष्ट रितीनें बांधता येतो.
हे वर्णन पुण्यांतील शनिवारवाड्यातील पहार्‍याचे आहे.
संदर्भ – पेशवेकालीन महाराष्ट्र
लेखक – वासुदेव कृष्ण भावे, सन १९३५

सन १७१९-२० मधील बाजारभाव पुणे शहरी असे होते. ते स्वस्ताईच्या काळातील होत. या भावात उंट व हत्ती यांच्याही किंमती आल्या आहेत.

सोने – १४ रू. तोळा

ज्वारी – १ रूपयास १४ पायली

बाजरी - १ रूपयास १० पायली

हरबरे - १ रूपयास ६ पायली

तूप - १ रूपयास ३॥ शेर

तांदूळ - १ रूपयास ४॥ पायली

गूळ - १ रूपयास ५ शेर

तेल - १ रूपयास ४ शेर

हळद - १ रूपयास ४॥ शेर

मीठ - १ रूपयास ४ पायली

साखर - १ रूपयास ४ शेर

लाकूड - १ रूपयास ४॥ खंडी

लोखंड - १ रूपयास ७। शेर

दूध - १ रूपयास १२ शेर

पेढे - १ रूपयास २ शेर

दोडके भाजी – २२ शेर

लिंबू - १ रूपयास ६४ नग

उंट – २३० रूपयास एक

हत्ती – ५५०० रूपयास एक

बैल – १३० रूपयांना ८

म्हैस – ३० रूपयांना १

त्याकाळी हत्ती उंट बाजारात विकले जात.

एक खंडी = ४० किलो

१ शेर = साधारण ९०० ग्रॅम

१ पायली = ४ शेर

१७६५ साली मिरज शहरात सर्व भाव एक पैशाने वाढले म्हणून तेथे महागाई आली असे म्हणत.

संदर्भ – पेशवेकालीन महाराष्ट्र

लेखक – वासुदेव कृष्ण भावे

प्रकाशन - सन १९३५

Newer Posts Older Posts Home

Popular Posts

  • १२ जुलै १९६१
    १२ जुलै १९६१, आम्ही ११ वर्षांचे होतो, त्या वेळेची आठवण ठेऊन ’सकाळ’ने आठवणी जाग्या केल्या त्याबद्दल धन्यवाद. खरोखर त्या भयानक पुरापेक्षाही,...
  • आत्मा
    आत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा ...
  • The Fame of the Clock
    Recently a Muslim kid named Ahmed Mohamed from Texas was arrested and suspended from school when he showed his home built "clock&qu...
  • अवतार
    विश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...
  • एका रात्रीची गोष्ट
    कोणत्यातरी कामासाठी मी बायकोला घेऊन मोटरसायकलने बाहेरगावी गेलो होतो. परतायला रात्र झाली, पण सकाळी तातडीचे काम असल्यामुळे घाईने निघालो. मध्ये...
  • पाणी वाचवा
    पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...
  • कूणी तरी पोस्त चोरलं आणि मराठी जगाची बोंबाबोंब
    ************CLARIFICATION******************* बरेच विरोप आल्याने मला हे स्पष्ट करावेसे वाटत आहे की.... मी लिहिल्याप्रमाणे, मी चोराची बाजु अज...
  • कन्यादान
    नुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , "चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी"...
  • आपण भारतात का जातो?
    काही दिवसांपुर्वी एका गोर्‍या मित्राने विचारले की आता तु कायम इथेच राहणार का? मन बावचळले आणि काही वर्षांनी कायमचा परत फिरण्याच्या माझ्या प्र...
  • गंमत
    १ ते ९९ या अंकांच्या स्पेलिंगमध्ये कुठेही ‘A', `B'. `C', अणि ‘D' हे अक्षरे आढळत नाहीत. १०० या अंकाच्या स्पेलिंगमध्ये सर्वप्र...

Labels

मी मराठी अनमोल विचार भारत TV

Blog Archive

  • ►  2016 (1)
    • ►  February (1)
  • ►  2015 (2)
    • ►  July (1)
    • ►  January (1)
  • ►  2014 (2)
    • ►  January (2)
  • ►  2013 (1)
    • ►  October (1)
  • ▼  2012 (22)
    • ▼  November (4)
      • वास्तुपुरुष
      • विडा
      • अतिथी देवो भव
      • कुळधर्म
    • ►  July (1)
      • पावसासाठी प्रार्थना
    • ►  June (1)
      • सत्यमेव जयते
    • ►  February (2)
      • शाहिरांच्या बिदाग्या
      • पोवाडा
    • ►  January (14)
      • कवी केशवसुत
      • वास्तु
      • कलियुग
      • गणेशोत्सव
      • हिंदूंची नीतिमत्ता
      • बाजीराव पेशवे यांचे ताकीदपत्र
      • सवाई माधवराव लग्न - भोजनसमारंभ
      • सवाई माधवरावांचे लग्न - ४
      • सवाई माधवरावांचे लग्न - ३
      • सवाई माधवरावांचे लग्न - २
      • सवाई माधवरावांचे लग्न - १
      • शनिवारवाडा, पुणे
      • शनिवारवाड्यातील पहारा
      • बाजारभाव
  • ►  2011 (15)
    • ►  December (2)
    • ►  November (5)
    • ►  October (8)
  • ►  2010 (64)
    • ►  July (1)
    • ►  June (6)
    • ►  May (6)
    • ►  April (8)
    • ►  March (5)
    • ►  February (13)
    • ►  January (25)
  • ►  2009 (66)
    • ►  October (13)
    • ►  September (4)
    • ►  August (3)
    • ►  July (1)
    • ►  May (3)
    • ►  April (10)
    • ►  February (16)
    • ►  January (16)
  • ►  2008 (63)
    • ►  November (1)
    • ►  October (12)
    • ►  September (2)
    • ►  August (16)
    • ►  July (11)
    • ►  June (13)
    • ►  March (2)
    • ►  February (2)
    • ►  January (4)
  • ►  2007 (52)
    • ►  December (4)
    • ►  September (1)
    • ►  August (6)
    • ►  July (22)
    • ►  June (12)
    • ►  May (5)
    • ►  April (1)
    • ►  March (1)
  • ►  2006 (30)
    • ►  December (2)
    • ►  November (2)
    • ►  October (10)
    • ►  September (4)
    • ►  August (5)
    • ►  July (1)
    • ►  June (6)

Popular Posts

  • पाणी वाचवा
    पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...
  • The Fame of the Clock
    Recently a Muslim kid named Ahmed Mohamed from Texas was arrested and suspended from school when he showed his home built "clock&qu...
  • कन्यादान
    नुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , "चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी"...
  • अवतार
    विश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...
  • मकर संक्रांत
    आज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्‍या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...

Follow us at FB

Tweets by @tlf_org
Copyright © 2015 मी मराठी माणूस

Created By ThemeXpose