कवी केशवसुत

आमुचा पेला दुःखाचा

डोळे मिटुनी प्यायाचा…

मानवी जीवनाचे हें दुःखांनी कलुषित झालेले स्वरूप आहे त्या अवस्थेत पतकरणे हेंच केशवसुतांच्या वास्तववादाचें प्रमुख अंग होय. जीवन आहे हें असें अपूर्ण व दुःखपूर्ण आहे—हें जीवनाचे यथार्थ स्वरूप स्वीकारण्याशिवाय गत्यंतर नाही. हें मानवी जग अनेक व्यथांनी ओतप्रोत भरलेलें असून तें सर्वस्वी अपूर्ण आहे हें सत्य प्रथम गृहीत धरून, तें पतकरून, मग त्या दुःखपूर्ण व अपूर्ण जगाला शक्य तितकें आनंदमय, सुखमय व पूर्ण करण्यासाठी अपार परिश्रम करणे हें त्यांच्या काव्याचें रहस्य होय.

त्यांना ह्या वास्तव पृथ्वीचा त्याग करावयाचा नसून जमलें तर स्वर्गच खाली आणावयाचा आहे----म्हणजेच ह्या पृथ्वीला स्वर्गाचें स्पृहणीय स्वरूप प्राप्त करून द्यावयाचे आहे, ही महत्वाची गोष्ट त्यांच्या काव्यात दिसतें.

हें जग मनुष्य़ निर्माण हो्ण्यापूर्वी स्वर्गतुल्य होतें पण पुढे मानव निर्माण करण्याची भलतीच कल्पना प्रूथ्वीच्या मनांत आली, आणि तिने मानवाची निर्मिति केली. पण तोच मानव आपली आई जी पृथ्वी तिलाच लाथेनें ढकलून तों स्वर्गात भरारी मारण्यास सज्ज झाला—आणि ही विलक्षण कृतघ्नता पाहिल्याबरोबर स्वर्ग भयंकर संतापला व त्या आवे्गानें तो इतका दूर निघून गेला की पृथ्वीचा व त्याचा संबंधच अशक्य झाला, हे विलक्षण वास्तववादी सत्य केशवसुतांच्या कवितेंत प्रकट होते.

Dilip Khapre

No comments: