अतिथी देवो भव

पूर्वीच्या काळी दुपारी म्हणजेच वैश्वदेवाच्या समयी कोणी घरी आले, मग ते परिचित असोत वा नसोत, जाति-धर्माचे असोत वा नसोत, नातलग असोत वा नसोत त्यांना घरामध्ये बोलावून भोजनादी सोयी उपलब्ध करून, त्यांचा आत्मा शांत होऊ देण्याचा कुलाचार भारतात होता.  पूर्वीच्या काळी वाहतुकीची साधने आतासारखी नव्हती, लोक पायी अथवा घोड्यावरून प्रवास, तीर्थयात्रा करीत, प्रवासात जिथे थांबतील तिथे त्यांचा पाहुणचार होत असे.

एवढेच नव्हे तर, माध्यान्हकाळी घरातील यजमान आणि इतर मंडळी अतिथीची थोडा वेळ वाट पहात असत, कारण अतिथी हा देवासमान मानला जायचा. देवयज्ञ म्हणजे यजमानाने भोजन करण्यापूर्वी वैश्वदेव करणे. आपल्या अन्नातील थोडातरी भाग देव, मानव, पशू, पक्षी, पितर वगैरे सर्वांना अर्पण करणे तसेच घरामध्ये उखळ, जाते, पाणवठा, सूप अशा पाच ठिकाणी किंवा कळ्त नकळत माणसाच्या हातून जीवहिंसा घडते, त्याचे पापक्षालनार्थ वैश्वदेव करण्यावा हिंदू धर्मात रोजचा कुळाचार होता.  वैष्वदेवासाठी चुलीवर शिजवलेल्या भांड्य़ातील भातापैकी थोडा भात घेऊन त्यावर तूप घालून अन्नशूद्धी करतात. मग त्याचे तीन भाग करून एकाभागाची अग्निदेवाला आहुती देतात, दुसर्‍याने भूत यज्ञ म्हणजे बलिहरण करतात आणि तिसर्‍याने पितरांसाठी घराबाहेर जाऊन काकबळी देतात. भारतीय संस्कृतीत अशी वैश्वदेवाची कुळाचार पध्दती होती. परंतु आता कालपरत्वे ही पध्दत नष्ट होत चालली आहे, परंतु ह्यातील फायदा जाणला जात नाही हे दुर्दैव आहे. 

Unknown

No comments: