आम्ही मागील ६ महिन्यात जवळपास ८००० पाने संकेस्थळावरुन लोकांपर्यंत पोहोचविली आहेत. त्यात सुमारे १५०० अभंग, १४०० भजने, १०००+ गोष्टी, २०००+ कविता-गाणी-रचनांचा समावेश आहे. यासाठी आम्ही अनेक ग्रंथालयांची मदत घेत आहोत त्यातील महत्वाचा वाटा पुण्याच्या शासकीय विभागीय ग्रंथालयाचा आहे. आम्ही शासनाच्या या ग्रंथालयाला जगभरात उपलब्ध करुन देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
या प्रयत्नात आम्ही अनेक नव्या सुविधा देण्याव्यतिरिक्त देशातील सामान्य वाचकांमध्ये मराठी साहित्यावर नवा संवाद सुरु करणार आहोत. ज्याद्वारे त्यांना त्यांचे विचार दुरवर पोचवता येणार आहेत.
विश्रामबागवाडा ग्रंथालयाचे संकेतस्थळ लवकरच
(दै. सकाळ बातमी दि. ३० मार्च २००८)
पुणे, ता. २९ - विश्रामबागवाडा येथील शासकीय ग्रंथालयाचे संकेतस्थळ लवकरच विकसित करण्यात येणार आहे. अशा पद्धतीने स्वतःचे संकेतस्थळ असणारे हे राज्यातील पहिलेच ग्रंथालय ठरणार आहे.
संतसाहित्याचा अमूल्य ठेवा इंटरनेटवर नेण्याचे काम करणारे "ट्रान्सलिटरल टेक्नॉलॉजीज"चे दिलीप खापरे यांनी शासकीय ग्रंथालयाचे संकेतस्थळ विकसित करण्यासंबंधीची इच्छा प्रदर्शित केली आहे. त्यांनी याबाबतचा प्रस्तावदेखील दिला आहे. यासंदर्भात शासनाची मंजुरी मिळाल्यावर संकेतस्थळ विकसित करण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरवात होईल, अशी माहिती प्रमुख ग्रंथपाल गणेश तायडे यांनी दिली.
प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऍक्ट आणि डिलिव्हरी ऑफ बुक्स ऍक्टनुसार नव्याने प्रकाशित होणाऱ्या पुस्तकाच्या प्रती मुद्रक-प्रकाशक यांनी शासकीय ग्रंथालयास देणे बंधनकारक आहे. ही पुस्तके वाचकांना उपलब्ध करून दिली जात नाहीत. त्यामुळे ही पुस्तके संकेतस्थळाच्या माध्यमातून वाचकांसाठी खुले करता येणे शक्य होईल, असे तायडे यांनी सांगितले.
ग्रंथालयात सध्या चार लाख पुस्तकांचा संग्रह आहे. ग्रंथ देवघेव व्यवहार ऑनलाइन करण्याचा प्रस्ताव असून त्यासाठी सॉफ्टवेअर घेण्याबाबतची विनंती शासनाला करण्यात आली आहे. वाचकांकडून अभिप्राय मागवून त्यानुसार पुस्तकांच्या खरेदीचे धोरण स्वीकारण्यात आले आहे. भविष्यात पुस्तकांसाठी बारकोडिंग पद्धती राबविण्यात येणार आहे, अशी माहिती तायडे यांनी दिली. ग्रंथालयाचे सध्या दहा हजार सभासद आहेत. सभासद नूतनीकरण प्रक्रिया सुरू करण्यात आली असून मे महिन्यापासून प्रत्येक इच्छुकास ग्रंथालयाचे सभासदत्व मिळू शकेल, असे तायडे यांनी सांगितले.
या प्रयत्नात आम्ही अनेक नव्या सुविधा देण्याव्यतिरिक्त देशातील सामान्य वाचकांमध्ये मराठी साहित्यावर नवा संवाद सुरु करणार आहोत. ज्याद्वारे त्यांना त्यांचे विचार दुरवर पोचवता येणार आहेत.