कन्यादान

नुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , "चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी"अमेरिकेत वाढलेली, शिकलेली, आपल्या पायवर उभी असलेली. मुलगा अमेरिकन, हिंदु संस्कृतीची जाण असणारा. लग्नाच्या पद्धतीत थोडा फ़रक केला होता, जर अमेरिकेत होणार लग्न तर रिती बदलणारच ना! सप्तपदी आणि कन्यादान होणार नाही, पण बाकी सारे आणि "Wedding Vows" होणार असे समजले.
सुकन्या पण म्हणाली, "मला कोणीही दान करणार नाही, मी काही वस्तू नव्हे मालकी हक्क द्यायला. मी जीवनभर माय-बापाची लेक असणार आहे". विचार बरोबर आहे, पण मला वाटते, विचारकोन चुकला. (विचारकोन = Perspective, आजकाल मराठीपेक्षा इंग्रजी शब्द लवकर समजतात ना!). स्वतःचे लग्न कसे करावे हा आपापला प्रश्न आहे. पण आपण कधी हे जाणुन घेतलेच नाही की कन्यादान म्हणजे काय? पण त्याला चुकीचे ठरवुन मोकळे झालो. पण महित नसेल तर आपण काय करतो, विचारा की कोणाला तरी. हे आपण मान्य केले की जुनी प्रथा आहे म्हणजे ती नव्याकाळासाठी चालणारच नाही. कन्यादानामागची भावना तर सोडाच, कन्यादान ह्या शब्दाचा अर्थपण कळला नाही. दान म्हणजे काय? भीक नव्हे, देणगी नव्हे, बक्षीस नव्हे, उपहार नव्हे, खुप फरक आहे. इंग्रजाला पुण्यही कधी समजले नाही त्याला "Good deeds; moral or religious merit" असे ठरवले, आणि सद्‌कर्म आणि पुण्य एकच झाले. इंग्रजीत दानाला शब्दच नाही, ते त्याला "Gift, Giving or Donation" ठरवुन मोकळे झाले. (Ref: http://www.transliteral.org/dictionary/दान/word). नवे शिक्षण सारे झाले इंग्रजीत, गुण मिळवण्याच्या गडबडीत, ज्ञान मिळवायचे ते काही राहुनच गेले.

कन्या कोणी दान करतो काय? अरे कन्यारत्न हे अमुल्य असते ना? अगदी खरे.

लग्नापुर्वी वडिल-भाऊ मुलीची-बहिणीची काळजी घेतात, आणि मुलगी त्यांच्या घरची शान-आण-बाण असते. आपण पितृसंस्कृतीत आहोत, त्यामुळे, मुली लग्न झाल्यावर नवऱ्याच्या घरी जातात. त्या नवऱ्याचे घर स्वतःचे करतात. ज्या घरात मोठी झाली ते घर सोडुन जाणे किती अवघड असते हे मला कधी समजणार नाही, त्यासाठी मुलीचा जन्म घ्यावा लागेल. मुलीला समाजात फार महत्वाचे स्थान असावे असे शास्त्र सांगते. सुसंस्कृत घरात मुलीना मुलापेक्षा जास्त प्रेम आणि लळा लावला जातो कारण तीला साऱ्या जन्माचे प्रेम लग्नागोदर देऊन सासुरवाशीण  करावे. तीने सासरी जाऊन आपल्या माहेराचे संस्कार पुढे न्यावेत अशी अपेक्षा असते. ती दोन घरांना एकत्र आणते.माहेराचा वसा आणि सासरचा वारसा ती पुढच्या पिढीला देणार असते. तीने लग्नानंतर माहेराची काळजी विसरुन, सासरच्या माणसांची आणि त्या घराची काळजी करावी अशी अपेक्षा असते. आई-बाप-बहीण-भाऊ ह्यांना विसरुन नव्हे तर, त्यांना त्यांच्या काळजीतुन जर तीला मुक्त केले तर ती सासरची चिंता करु शकेल अशी अपेक्षा असते. लग्नापुर्वी ज्याप्रकारे ती माहेराचे हित बघत होती, तीने आता लग्नानंतर तिच्या सासरचे हित बघावे असा मानस असे. तीला माहेराच्या जवाबदारीतुन मुक्त करणे असा विचार असे. शिवाय, मुलीचे सासर दुसऱ्या गावी असेल तर ह्याला अजुन महत्व आहे.

मुली एका घरात जन्म घेतात पण दोन घरांना उजवतात. आयुष्यभर माहेरचा अभिमान बाळगून सासरचा मान वाढवतात. जन्मताना एका गोत्रात असतात पण लग्नानंतर त्यांचे गोत्र बदलते, कन्यादानात ती नवर्याचे गोत्र घेते. नवरा तिच्या सुखःदुखाची काळजी घेण्याची ग्वाही देतो. आता हि वडिलांची जवाबदारी नवऱ्याची होते.  तिच्यापासून होणारे अपत्य नवऱ्याचा वंश वाढवणार असते त्यासाठी तिचे गोत्र पण बदलते. धार्मिक नियमातून मुलीला तो आपल्या घरची बनवतो. पितृसत्ताक समाजात लग्नाने मुली खुप सारे गमावतात पण खुप सारे मिळवतात पण.

जग बदलले, लोक पण बदलले पण आपण प्रथा बदलल्या नाहीत, पण त्यांचा अर्थ मात्र विसरलो. प्रथांचे शास्त्रीय नसले तरी  त्यांचे प्रतिकात्मक महत्व आहे. कोणत्याही धर्मात प्रतीकात्मक प्रथा आणि रुढी काही संदेश देतात त्यांचा अर्थ समजून त्या कराव्यात. प्रथा जीवनातल्या महत्वांच्या बदलांना समजून घेऊन त्या प्रमाणे आपल्या विचारसरणीत बदल करण्याचा संदेश देतात, त्यासाठी  रीती सांगतात, ज्यामुळे बदलणाऱ्या जवाबदाऱ्या आपल्या मनावर बिंबवायचा एक प्रामाणिक प्रयत्न करातात. कन्यादान केल्याने नवरे जवाबदार होतात असे नाही पण या रिती समजुन घेऊन केल्यातर दोन्ही घरातील सदस्यांना  (सासर आणि माहेर) बदलणाऱ्या जवाबदाऱ्यांची  जाणीव करून द्यायला मदत नक्कीच होईल.




Vishal Khapre

No comments: