१२ जुलै १९६१

१२ जुलै १९६१, आम्ही ११ वर्षांचे होतो, त्या वेळेची आठवण ठेऊन ’सकाळ’ने आठवणी जाग्या केल्या त्याबद्दल धन्यवाद. खरोखर त्या भयानक पुरापेक्षाही, ज्यांनी ज्यांनी मदतीचा पूर लोटला, त्यापुढे या पुरानेही लाजेने मान खाली घातली.

http://www.esakal.com/esakal/07122008/SpecialnewsB6BC46A2F9.htm

तडाखा आणि उभारी

पानशेत धरण फुटून मुठेला आलेल्या महापुरात पुण्याची वाताहत झाली. या महाप्रलयाला आज ४७ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त "सकाळ'चे वाचक भास्कर दाते यांनी कळविलेला अनुभव.

व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा

मल्टिमीडिया विभागामध्ये आणखी व्हिडीओ
बारा जुलैचा तो दिवस माझ्या अजून स्मरणात आहे. "सकाळ'च्या पहिल्याच पानावर "पानशेत धरणाच्या एका भिंतीचा भाग खचत चालला आहे. दुरुस्तीचे काम तेथील कर्मचारी जीव तोडून करीत आहेत,' ही छायाचित्रासह बातमी आली होती. परंतु येणाऱ्या गंभीर प्रसंगाची कल्पना त्या वेळी पुणेकरांना आली नसावी.
सकाळी वर्गमित्राबरोबर गरवारे महाविद्यालयात जाताना संभाजी पुलावर बरीच गर्दी दिसली. सर्व जण पुलाखालून वाहणाऱ्या पुराचे लोंढे बघत होते. हा पूर नेहमीपेक्षा वेगळा वाटत होता. पाण्याचा रंग गढूळ पाण्यासारखा काळा- प्रवाहाबरोबर मोठी झाडेझुडपे वाहत होती. पाणी पुलाच्या खाली पाच फुटांवर होते. कर्वे रस्त्याला जाईपर्यंत पाणी रस्त्याला लागले होते. मी माघारी फिरलो.
अलका टॉकीज चौकापर्यंत पाणी येऊ लागले होते. थोड्याच वेळात ते पुलावरून वाहू लागले, तेव्हा पानशेत धरण फुटल्याची कल्पना लोकांना आली. सर्वांची धावपळ सुरू झाली. दुपारी बाराच्या सुमारास नदीजवळील रस्त्यांवर पाणी जोरात घुसले. बायकामुलांना घेऊन लोक सुरक्षित जागी पळू लागले. पाण्याच्या तडाख्याने मातीची घरे धडाधड कोसळत होती. घरातील चीजवस्तू, मुकी जनावरे लोकांच्या डोळ्यासमोर वाहून जात होती. दुपारी चारपर्यंत पुण्यातील नदीजवळचा सखल भाग दीड मजला पाण्याखाली होता. शनिवार, नारायण, कसबा, शिवाजीनगर, सोमवार, रास्ता आणि मंगळवार या पेठा पाण्याखाली होत्या. अलका, डेक्कन, हिंदविजय, विजय, भानुविलास ही सिनेमागृहे पाण्यात होती. खडकी, पिंपरी, चिंचवड भागात गेलेली कामगार मंडळी नदीच्या एका बाजूस अडकली. संध्याकाळनंतर पाणी ओसरू लागले.
दुसऱ्या दिवशी पिण्याचे पाणी नाही, वीज नाही. त्यामुळे पुणेकरांचे हाल झाले. त्या वेळी मदतीसाठी सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्ते धावून आले. अनेक शाळा, मंगल कार्यालयांमध्ये पूरग्रस्तांना दोन-तीन आठवडे आसरा दिला. त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली. पुराने नव्या-जुन्या अनेक घरांना तडाखा बसला. संभाजी पुलाच्या फक्त कमानी शिल्लक राहिल्या होत्या. सगळीकडे दलदल आणि कुजलेल्या धान्याचा वास.
यातून पुण्याची घडी बसण्यास सहा महिने लागले. त्या वेळचे पंतप्रधान पंडित नेहरूंनी पुण्याला धावती भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. महाराष्ट्राच्या अनेक भागांतून मदतीचा ओघ येऊ लागला. पुण्याने फिनिक्‍स पक्ष्याप्रमाणे भरारी घेतली. देवाची एवढीच कृपा म्हणायची, की हा महाप्रलय रात्री न येता दिवसा येऊन गेला.

पण त्यातसुद्धा काही लुटारू होतेच, ती आठवण सुद्धा ताजी आहे.

१२ जुलैला पूर आला, लोक कसे सावरणार, रात्री पुणं नीट झोपलं सुद्धा नाही, सकाळी १३ जुलैला बाहेर सगळा आरडाओरडा सुरू झाला, खडकवासला धरण फुटल्याबद्दल. लोक आधीच घाबरलेले त्यात ही बातमी, सगळेजण जे हातात मिळेल ते घेऊन पळू लागले, कोणी पर्वतीवर गेले, कोणी लहान मुलांना घेऊन उंच इमारतीवर गेले, घराला कुलूप सुद्धा लावण्यासाठी लोक थांबले नाहीत. त्यावेळेस फोनची इतकी सुविधा नव्हती, म्हणून काही कळत नसे. सर्वजण आपला जीव वाचविण्यासाठी सैरावैरा धावत होता. पण जसजसा वेळ जाऊ लागला, पाणी कोठे दिसेना, कारण लोकांत चर्चा असे इथपर्यंत पाणी आलंय, तिथपर्यंत पाणी आलंय, पण दुपार झाली तरी पाणी  कोठे दिसेना, हळूहळू लक्षात यायला लागले की, ही अफवा होती, म्हणून लोक घरी परतू लागले, तर काय पाहतात. त्यांची घरे चोर, दरोडेखोरांनी लुटली होती, पुरापेक्षाही हा महाभयंकर हाहाःकार होता, लोकांच्या भावनांशी चोरांनी अफवा उठवून खेळ केला होता.

ही आठवण आली की वाटते, माणसातल्या माणूसकीचा असाही पैलू परमेश्वरानी का निर्माण केला असावा कळत नाही.

अजून एक आठवण, त्याच वेळेस राजकपूरचा ’जिस देशमे गंगा बहती है’ हा चित्रपट श्रीकृष्ण टॉकीज मध्ये लागला होता, लोक नंतर म्हणू लागले, या सिनेमामुळेच पुण्यात गंगा वाहिली.

Unknown

2 comments:

Vasuki GS said...

Well recollected Sir.

Vasuki GS said...

Well recollected Sir. I experienced the day again.