सोपे शिक्षण

धडाधड घोषणा करायच्या, परिणामांची पर्वा करायची नाही, योजना नाही, बस फक्त श्रेय लाटायचे, हा तर आपल्या राजकारणी आणि अधिकारी लोकांचा हातचा मळ आहे. आता काय सामान्य गणित, कारण काय तर ज्या विद्यार्थ्यांना गणित घेऊन करियर करायचे नाही त्यांच्यासाठी. मग जर दहावीनंतर इतिहास भूगोलाची सुद्धा गरज लागत नसेल तर त्या विषयांचा अभ्यास करण्यात, आणि त्यावर वेळ वाया घालवण्यात काय अर्थ आहे. ते विषयच पाचवी पासून कमी करावेत. याहि पेक्षा सातवीनंतर विद्यार्थ्यांच्या आवडीप्रमाणे विषय निवडू द्यावेत, कारण त्यांना काय करियर करायचे आहे ते त्यांना ठरवू देत. हा निर्णय ज्यांना माय मराठी बद्दल अभिमान आहे आणि ज्यांना फक्त शेतीच करायची आहे किंवा ज्यांना भविष्यात इंग्रजीचा काहिही उपयोग नाही, त्यांना इंग्रजी शिवाय दहावीला बसण्याची परवानगी असावी, त्यामुळे शाळांचे निकालही सुधारतील. बघा, भूगोलात शिकवतात, टुंड्रा प्रदेशातील लोकजीवन, याचा कधी आयुष्यात संदर्भ आला आहे काय, पण शाळेत नाही समजले तर मार्क नाही मिळणार.

http://www.esakal.com/esakal/07052008/MaharashtraDD1BF5F0A5.htm

सामान्य गणिताबाबत गोंधळात गोंधळ
मुंबई, ता. ४ - माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदापासून नववीसाठी सुरू केलेल्या सामान्य गणित विषयाची अंमलबजावणी कशी करावी, याबाबत अद्याप शाळांमध्ये संभ्रम आहे.
या संदर्भात अनेक शाळांनी पालक व विद्यार्थ्यांना दहावीनंतर करियरच्या दृष्टीने होणाऱ्या परिणामांची माहितीही दिलेली नाही. बहुसंख्य दुकानांमध्ये या विषयाच्या पुस्तकांचाही पत्ता नाही.
बऱ्याच विद्यार्थ्यांना गणिताची भीती वाटते आणि दहावीच्या परीक्षेत ते नापास होतात. त्यामुळे दहावीनंतर ज्या विद्यार्थ्यांना पुढे गणित विषय घेऊन करियर करावयाचे नाही, त्यांना बीजगणित व भूमितीऐवजी सामान्य गणित हा पर्याय यंदा नववीपासून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्याबाबतचे परिपत्रक सर्व शाळांना पाठविण्यात आले आहे. सामान्य गणित घेतल्यास दहावीला पुन्हा बीजगणित व भूमिती घेता येणार नाही. त्यामुळे दहावीनंतर करियरच्या दृष्टीने कोणते अभ्यासक्रम शिकता येणार नाहीत, याची कल्पना विद्यार्थी व त्यांच्या पालकांना शाळांनी देणे अपेक्षित आहे. त्यावर विचार करण्यास थोडा कालावधी देऊन सामान्य गणिताविषयी त्यांची संमतीपत्रे भरून घ्यावयाची आहेत. त्यासाठी अनेक शाळांनी अजून पालक व विद्यार्थ्यांच्या बैठका आयोजित करण्यास सुरुवात केलेली नाही.
या विषयाची पुस्तके अद्याप उपलब्ध न झाल्याने तो विषय कसा आहे, बीजगणित व भूमितीच्या तुलनेत सामान्य गणित अभ्यासक्रमाची काठिण्यपातळी किती आहे, याची माहिती शिक्षक, विद्यार्थी व पालकांना नाही. शाळा सुरू होऊन दोन आठवडे उलटले. सामान्य गणिताचा पर्याय स्वीकारण्यास अजून किती वेळ जाईल आणि त्यानंतर अभ्यासक्रम शिकवून होईल का, याबाबत प्रश्‍नचिन्ह आहे. सामान्य गणितासाठी शाळांनी फारसा रस घेतल्याचे चित्र सध्या तरी नाही. सामान्य गणित घेणे, हे विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक आहे, सक्तीचे नाही. ज्या शाळांचे बरेच विद्यार्थी गणितात अनुत्तीर्ण होतात, अशा शाळा दहावी निकालाची टक्केवारी वाढविण्यासाठी सामान्य गणिताची सक्ती विद्यार्थ्यांवर करण्याची शक्‍यताही वर्तविण्यात येत आहे.

जर एखाद्या मुलीला लग्नानंतर नोकरी करायची नसेल तर तिने एवढे अवजड शिक्षण का घ्यावे. दहावीनंतर ज्याला जे करियर करायचे आहे त्याच प्रमाणे विषय निवडायचा अधिकार या लोकशाहीत असायला हवा, त्याने सरकारने ठरवलेल्या विषयांप्रमाणे अभ्यास करून मनस्ताप का करून घ्यावा, ही त्याच्या विचारस्वातंत्रावर गदा आहे. एखाद्याला पुढे डॉक्टर व्हायचे आहे, आणि केवळ दहावी पास होण्यासाठी पुढे गरज नसलेले विषय असल्यामुळे जर तो दहावी पास होत नसेल, आणि त्याचे करियर होत नसेल तर याला शिक्षणपद्धतीच जबाबदार आहे. शिक्षणमंडळाने ठरवलेले विषयच घ्यावेत, आणि गरज नसताना डोकेफोड करावी, हे लोकशाही राष्ट्रात घडू नये, आणि विद्यार्थांना निवडस्वातंत्र असावे.

मी एवढ्या शाळांतील भिंतीवरील सुविचार वाचले, पण कोठेही रहदारीचे नियम पाळावेत, रस्त्यावर पचापच थुंकू नये, पर्यावरण वाचवावे, असे सुविचारच लिहीलेले नाहीत.

Unknown

No comments: