संस्कार आणि संस्कार

सर्वसाधारणपणे परदेशातील मुलांबद्दल किंवा त्यांच्या आईवडिलांबद्दल बोलताना भारतीय लोक एकच पालुपद लावतात, गळा काढतात- संस्कारांबद्दल. म्हणे परदेशात राहून भारतीय लोक
भारतातील संस्कार विसरता, आणि त्यांना हे  सल्ला देतात मुलांना भारतात परत पाठवा नाहीतर ते भारतीय संस्कार विसरतील पण संस्कार संस्कार म्हणून जे थोडे भारतीय टाहो फोडतात त्यांना तरी संस्कार समजलेत काय? कशाला संस्कार म्हणायचे? आईवडिल मुलांना शिकवतात आणि त्यांच्याकडून म्हातारपणी सांभाळतील म्हणून आशा बाळगतात, म्हणून तर प्रत्येकाला एक तरी मुलगा हवा असतोच, भले मग कितीही मुली होऊ देत. म्हातारपणाची काठी म्हणून मुलाकडे बघतात. ह्यालाच संस्कार म्हणायचे काय? आजही भारतात आपण ऐकतो कि मुलगा सुनेला घेऊन वेगळा झाला किंवा सुन मुलगा त्रास देतात. अगदी इस्टेटीसाठी भाऊ भावाला, मुलगा आईबापाला किंवा वेळप्रसंगी कोणी कोणाचाच विचार करत नाही आणि कोर्टाची दारे ठोठावतात. हेच संस्कार काय?
नुसते रस्त्यावर पाहा, अजिबात रहदारीचे नियम पाळत नाहीत चांगले सुशिक्षित लोक सिग्नल तोडतात, पादचार्‍यांना कुचलतात हेच काय संस्कार? रस्त्यात कुठेही पचापच थुंकायचे हेच संस्कार काय? ही सर्व मंडळी शाळेत नव्हती गेली काय? काय त्यांना शिक्षकांनी शिकवले नसेल काय? पण कोण हे लक्षात ठेवतो. शाळा संपली शाळेतील शिस्त संपली. कॉलेजच्या मुली मुले मिळून रेव्ह पार्टी करतात. आणि घाऊकपणे पोलिसांच्या हाती दारुच्या नशेत सापडतात मग पोलीस मुलींना सोडून देऊन मुलांवर खटले दाखल करतात. हेच संस्कार त्यांना कॉलेज शाळेत शिकवलेत काय?
मग संस्कार संस्कार असे बोजड शब्दांच्या कुबड्या का मिरवायच्या.
गणेश उत्सवाला वर्गणी साठी सक्ती करताना कुठलेच संस्कार बाळगले जात नाहीत. मोठे मोठे स्पीकर लावून, ३०-३० तास मिरवणूक काढून कोणते संस्कार प्रदर्शित केले जातात.
महात्मा गांधीच्या फोटोच्या साक्षीने जेव्हा भ्रष्टाचार चालतो तेव्हा खरोखरच संस्कारांच्या ओझ्याने, गांधी परत जन्माला येणार नाहीत.
शाळेत असताना थोर पुरुषांचे धडे वाचले जातात, सुविचार पाठ केले जातात. ते काय फक्त शाळेतच त्यावेळचे संस्कार व्यवहारात सोईस्करपणे विसरले जातात. हेच संस्कार मिरवण्यासाठी भारतात राहायचे काय? किंबहुना परदेशात गेलेला भारतीय संस्कारांचा बाउ करता, कायद्याच्या, नियमांच्या चौकटीत राहून नीट पद्धतशीर आणि शांत जीवन जगत असतो.इथे संस्कारांच्या रगाड्यात, संस्कारी माणूस सुद्धा शांत जीवन जगू शकत नाही. कारण पाण्यात राहून कोरडे राहता येत नाही.
दुसर्‍याला वेळप्रसंगी मदत करावी, हे संस्कार आहेत, पण आम्हाला विचारा, रस्त्यावर अपघातात सापडलेल्याला दवाखान्यात पोहोचवल्यावर डॉक्टर आणि पोलीस याछ्यापासून काय त्रास होतो ते,
मदत करणारा पुन्हा आयुष्यात कोणाला मदत करणार नाही.
बेभानपणे बिघडलेल्या वाहतुकीत आपण एकटेच वाहतुकीचे नियम पाळून वाहन चालवू शकत नाही, त्याच प्रमाणे असल्या संस्कारात, संस्कारीत जीवन जगूच शकत नाही.
स्त्रिया आपली दारे झाडतात आणि कचरा शेजार्‍याच्या दारात लावतात, बसमध्ये जागा असूनही बस थांबवत नाहीत, मत मागायला येणारे पुढारी पुढील निवडणुकीपर्यंत तोंड दाखवत नाहीत, सुवर्ण पदकामध्ये भेसळ केली जाते, वाहन चालक आणि पोलीस यांच्यात आर्थिक संबंध येतात, सर्व सरकारी कार्यालयांमध्ये माजलेला भ्रष्टाचार, हे सर्वजण शाळा कॉलेजची पायई चढलेत ना?यांच्यावर त्यांच्या आईवडिलांनी शिक्षकांनी काहीच संस्कार केले नसतील काय? एवढे सणवार कामधाम सोडून आपण ते अंगिकारिले आहेत? हे सर्व संस्कार धार्मिकतेचा आव आणून पार पाडायचे. हेच काय संस्कार?
बरोबर आहे परदेशात मुले आईवडिलांना संभाळत नाहीत, पण हे तिथे गृहित असते आणि त्याप्रमाणे आईवडिल स्वतःची व्यवस्था करतात, आणि मुलांनाही तशा पायावर उभे करतात, म्हणजे
अपेक्षा नाहीत आणि अपेक्षाभंगाचे दुःख नाही. देवाधर्माचे नाहीत पण मेहनतीचे संस्कार आहेत. श्रीमंतीचे नाहीत पण प्रामाणिकपणाचे संस्कार आहेत. परदेशात मुले मुली एकदम मोकळेपणाने राहतात, म्हणून त्यांना संस्कार नाहीत, इकडे मुले मुली तेच, फक्त आडोशाला करतात.
आता संस्कारांची व्याख्या आहे, मला वाटेल तसे मी वागणार, पैशांचा माज करणार, आणि संस्कार कवडीमोलाने विकत घेणार.
संस्कार, भारतीयता, आपली माती, मराठीतील जन्म हे सर्व गोंडस शब्द आहेत, पण जर परदेशात राहण्यार्‍या भारतीयांची, परत भारतात येण्याच्या इच्छेविषयी टक्केवारी काढा, मला नाही वाटत कुणी इकडे परत येण्याचा विचार करेल.

Unknown

No comments: