पुण्याजवळ एका खेडेगावी साधारण पस्तीस वर्षांपूर्वी एका गरीब कुटुंबात एक मुलगा रहात होता. घरची गरिबी असल्याने शिक्षणापेक्षा कामाला जास्त महत्व दिले जायाचे, कारण तो काळच तसा होता, आताच्या सारखी कोणी फुकट पुस्तके वगैरे वाटत नव्हते. त्याकाळी खेडेगावात शाळेची सोय सुद्धा नव्हती, मुलांना तालुक्याला पुढील शिक्षणाला जावे लागायचे, आणि आई वडिल काय म्हणत, शिकून कुठे कुणाचे भले झाले आहे, त्यापेक्षा शेतात काम केल्यास चार पैसे तरी मिळतील. तशाही परिस्थितीत त्याने चवथी पर्यंत शिक्षण पूर्ण केले, आता तालुक्याला पाचवी नंतर शिकायला जाणे म्हणजे अवघडच, मग त्याच्या मित्राच्या घरच्यांनी त्याची जबाबदारी घेतली, कारण त्याची मदत त्यांच्या मुलाला अभ्यासात होत असे, शिवाय सोबत ही होई. अशा प्रकारे तो अकरावी ( त्या काळी दहावी नव्हती, अकरावी नंतर साइड निवडावी लागे ) पहिल्या वर्गात पास झाला. परत गावी, आता काय करणार? गावात सरपंचाच्या हस्ते सत्कार झाला. त्यावेळी भाषणात त्याने पुढील शिक्षणाची इच्छा व्यक्त केली, सर्वांना त्याची घरची परिस्थिती माहित होती. त्याला डॉक्टर व्हायचे होते, कारण त्या गावात डॉक्टर नव्हता, म्हणून आजारी झाल्यास उपचाराविना लोक मृत्यु पावत.लोकांनी मग ग्रामपंचायतीची सभा बोलावून त्याला पुढील शिक्षणासाठी मदत करण्याचे ठरवले, आणि त्याप्रमाणे सर्व गावकर्यांनी यथाशक्ती मदत केली, आणि तो खूप मेहनत घेऊन डॉक्टर झाला. गावात पहिला डॉक्टर म्हणून त्याचा सत्कार केला, तेव्हा त्याने गावाला वचन दिले, गावकरी लोकांची सेवा तो मोफत करील. आणि तो त्याप्रमाणे सेवा करू लागला.
पुढे त्याने पुण्याला रहायला जाऊन घरातच दवाखाना उघडला, पण इथे आठवडाभर दवाखाना चालवून तो दर रविवारी आपल्या गावी जाऊन मोफत औषधपाणी करू लागला.
त्यांना आपण आता डॉक्टर माने म्हणू यात. मान्यांच्या हाताला गुण फार म्हणून लांबलांबून रुग्ण येऊ लागले, खूप गर्दी होऊ लागली, जवळपासचे सर्व दवाखाने बंद झाले. रात्री दोन तीन वाजेपर्यंत रुग्ण येऊ लागले. चांगल्यापैकी पैसा मिळू लागला, पण रविवारी गावाला जाणे चुकत नव्हते. नंतर घरापासून साधारण २५ कि.मी. वर जागा घेऊन मान्यांनी मोठे hospital चालू केले, आणि ते तिकडेच रहायला गेले, इकदे दवाखाना ठेवला, तिकडे hospital चालू केले. आता त्यांचा दिनक्रम पहा - सकाळी तिकडे hospital मध्ये सकाळी ११ ते १ दवाखाना चालवायचा. तेव्हाच hospital मध्ये लक्ष द्यायचे. संध्याकाळी ५ वाजता निघून गणपतीचे दर्शन घेऊन पुण्यातील दवाखान्यात ७ वाजता हजर. तो पर्यंत पन्नासएक पेशंट वाट बघत बसलेले असतात. ते तरी काय करणार, हमखास गुण ना. फार लांबून लांबून पेशंट येतात.आणि फी पण कमी, तीन दिवसांच्या गोळ्या आणि इंजेक्शन मिळून फक्त ५० रूपये. त्यामुळे गर्दी फार. पार रात्री कधीकधी तीन वाजणार. मग दवाखाना बंद करून २५ कि.मी.घरी जायला चार वाजणार. पुन्हा सकाळी ११ वाजता बाबा दवाखान्यात हजर. मागील जवळजवळ २५ वर्षे मी पाहतोय, त्यांनी कोणत्याही दिवशी सुट्टी घेतली नाही, कोणत्याही सणाला, अगदी दिवाळीलाही नाही. त्यात पण आजपर्यंत दर रविवारी गावाला जाण्याचा नेम चुकला नाही, नंतर त्यांनी मोठी गाडी विकत घेतली, रविवारी गावाला जा्णे आणि पेशंट गाडीत घालून आणणे, त्यांच्यावर उपचार करून गावाला परत नेउन सोडणे, हे कार्य अजूनही चालू आहे, ते गाववाल्यांचे उपकार अजूनही विसरले नाहीत. कोणत्याही परिस्थितीत पुण्यात ते रविवारी नसतात, गावालाच जाणार. कारण त्यांच्या मदतीशिवाय शिक्षण शक्य नव्हते.
पेशंटच्या घरून visit साठी call आल्यास ते कोणाच्याही घरी जात नाहीत, पेशंटला दवाखान्यात आणा म्हणतात, त्यांचे म्हणणे नंबराला बसलेल्यांचा न्याय कोण करणार? ते सुद्धा तासन्तास बसलेले असतात ना? मग कोणी कितीही पैसे देऊ देत, घरी जाणे नाही. दवाखान्यात एवढी गर्दी असते तीन तीन तीस नंबर लागत नाही. सतत पेशंट तपासणे, फक्त रात्री १० वाजता १५ मिनीटांच्या विश्रांतीत ग्लासभर दूध घेणे.
एवढे काम, एवढी गाववाल्यांबद्दल कृतज्ञता हे आजकाल पहायला मिळत नाही. कित्येक कुटुंबे त्यांच्यावर आजारपणाआठी अवलंबून आहेत. एक विचार मनात आला की भिती वाटते, त्यांच्या नंतर आमचे कसे होणार?
ही मनगढंत कथा नाही, सत्य आहे. आजपर्यंत दवाखान्याला आणि दर रविवारी गावाला जाण्याला, सणवार सुद्धा आडवा आलेला नाही. सतत ३५-४० वर्षे ही साधना, हे कार्य सोपे नाही, पण चालू आहे.
No comments:
Post a Comment