परदेशातून नकार

सर्व भारतीय साहित्यीकांचा विरोध पत्करून अमेरिकेत संमेलन घ्यायचा ज्या मंडळींचा हट्ट होता त्यांना अमेरिकेतून चपराक मिळाली हे एक प्रकारे बरेच झाले. नाहितर हे एक पेवच फुटले असते. अगदी हळदीकुंकूसाठी सुद्धा आमंत्रणे येतील आणि इकडे  लगीनघाई उडणार. खरे तर त्या परदेशी लोकांना असले उद्योग सुचत नसतात. ज्यातून काहीच फायदा नाही, असले धम्दे ते लोक करत नाहीत. आपल्या लोकांना भरपूर वेळ असतो. आठवत असेल, काही वर्षांपूर्वी T.V. वर "रामायण" मालिका प्रसारित होत असे, तेव्हा सबंध भारतात रस्ते ओस पडत, लोक कामावर उशीरा जात म्हणून कामाच्या वेळा बदललेल्या होत्या.

 

http://www.esakal.com/esakal/07032008/SpecialnewsD5DFD586A8.htm

मराठी साहित्य संमेलनास अमेरिकेतूनच विरोध
पुणे, ता. २ - मराठी साहित्य अमेरिकेत रुजवण्याचा, साहित्यिक चळवळ उभी करण्याचा शाश्‍वत प्रयत्न अमेरिकेतील कोणत्याही मराठी मंडळाने केलेला नाही.
साहित्यिक कार्यक्रमांना संख्यात्मकदृष्ट्याही यापूर्वी अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे, हे मान्य करत अमेरिकेतील "कॅलिफोर्निया आर्टस फाउंडेशन'ने साहित्य महामंडळास आपल्या निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती केली आहे.
८२ वे साहित्य संमेलन अमेरिकेत सॅन होजे येथे आयोजित करण्याचा निर्णय साहित्य महामंडळाने घेतल्यानंतर उलट-सुलट प्रतिक्रिया सातत्याने व्यक्त होत आहेत. अमेरिकेतील बे एरियामध्ये गेली सात वर्षे कार्यरत असलेल्या "कॅलिफोर्निया आर्टस असोसिएशन' संस्थेतर्फे अध्यक्ष मुकुंद मराठे यांनी वरील आवाहन केले आहे.
""संमेलन अमेरिकेत घेतल्यास नेमके काय साध्य होईल, याचा बारकाईने विचार होणे गरजेचे आहे,'' असे सांगून बहुतांश मराठी साहित्यप्रेमींना संमेलनास हजर राहता येणार नसल्याचे स्पष्ट आहे, असेही मराठे यांनी म्हटले आहे. ""संमेलनाचा जिवंत अनुभव टेलिकास्ट वा इंटरनेटवरून पोचू शकणार नाही. संमेलनासारखा मोठा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी साहित्यिक लेखनाची, आस्वादाची सशक्‍त परंपरा महत्त्वाची असते. अशी परंपरा घडवण्याचा प्रयत्न कोणत्याही महाराष्ट्र मंडळाने येथे केलेला नाही. आस्वाद घेऊ शकणाऱ्या, स्वयंसेवक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींची संख्या बे एरियामध्ये अत्यल्प आहे. विखुरलेली मंडळी असल्याने हे अवघड आहे. केवळ संमेलने भरवून स्टॅनफर्ड किंवा बर्कलीतील प्राध्यापकांना; तसेच मराठी जनांना पुढच्या पिढ्यांना मराठी साहित्याची ओळख करून देणे अशक्‍य आहे. त्यासाठी व्यासंग, संस्कृतीची जाण या अत्यावश्‍यक गोष्टी आहेत. तीन दिवसांच्या संमेलनाने मराठी एकदम जागतिक पातळीवर पोचेल, ही अपेक्षा हास्यास्पद आहे. अशा संमेलनासाठीची योग्यता कमविण्यासाठी प्रदीर्घ काळ योजनाबद्ध प्रयत्न करणे आवश्‍यक आहे; अन्यथा संमेलन म्हणजे केवळ मनोरंजनाचा एक खेळ होईल,'' असे मराठे यांनी म्हटले आहे.

हे संमेलन भारतात होते, तर त्याची काय फलनिष्पत्ती होते, हा संशोधनाचाच विषय व्हावा. खरा फायदा होतो तो प्रकाशकांचा आणि तिथे खाद्यपदार्थांचे स्टॉल लावणा‍र्‍यांचा.

Unknown

No comments: