आपल्याला जर सुखी आणि आनंदी जीवन जगायचे असेल तर सकारात्मक विचार करा. याचे फायदे अनेक आहेत. या सृष्टीत दोन प्रकारच्या उर्जा सतत निर्माण होत असतात. चांगल्या आणि वाईट, सुखी आणि दु:खी, सकारात्मक आणि नकारात्मक, सुगंधी आणि दुर्गंधी, योग्य आणि अयोग्य पण यातून आपण कुठल्या आकर्षित करायच्या ते आपल्याच हातात आहे. यात महत्त्वाचे भूमिका बजावते ते आपले मन. मनच सर्वांचा कर्ता करविता आहे. हे मनच आत्म्याचे एक रुप आहे. आत्मा दिसत नाही, मन दिसत नाही पण त्याला अखिल ब्रह्मांडाची जाणीव आहे. ते क्षणार्धात करोडो मैलांचा पल्ला पार करु शकते. अक्षरश: ईश्वराला समोर उभे करु शकते. म्हणजेच मनाद्वारे आपण शरीरावर नियंत्रण, सभोवतालच्या परिस्थितीवर नियंत्रण आणू शकतो. बघा मन प्रसन्न असेल तर आजूबाजूचा परिसर, सजीव, निर्जीव सर्व गोष्टी प्रसन्न वाटू लागतात. अक्षरश: बाभळीला गुलाब दिसू लागतात. सुगंधी वातावरण जाणवते. आता ह्या सृष्टीतल्या सकारात्मक, उर्जा जर आपण मनाद्वारे ग्रहण केल्या तर जीवन सकारात्मक ( positive) च असेल. मग म्हणा,“ माझा शुध्द आत्मा सृष्टीतलील सर्व शुध्द आणि पवित्र उर्जा ग्रहण करण्यास समर्थ आहे आणि त्या मी ग्रहण करीत आहे.”
असे दिवसातून ५ ते १० वेळा आकाशाकडे तोंड करुन, मोठ्याने, हात वर करुन म्हणा बघा काही दिवसातच काय फरक जाणवू लागतो.
सकरात्मक विचारात प्रचंड शक्ती दडलेली आहे. अगदी इंजिनमधल्या वाफेच्या दाबाइतकी, अणुबाँबमधल्या शक्ती इतकी. सकारात्मक विचाराने मानसिक त्रास होत नाही. विचारच करायचा ना?. तर मग सकारात्मक करुयात ना?
एखाद्याचे ह्रदयाचे ऑपरेशन आहे आणि त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यासाठी नेले जात आहे. जर त्याने विचार केला कि, माझे ऑपरेशन ठीक पार पडून मी लवकरच बरा होइन. तर मग इथेच विचार थांबतात. पण त्याने नकारात्मक विचार केला तर काय होईल? मग मला भूल नीट दिली जाईल काय? डॉक्टर निष्णात असतील का? ऑपरेशन जर यशस्वी झाले नाही तर? काय होईल? मग माझ्या बायका मुलांचे काय होईल? वगैरे वगैरे. या विचारांना अंतच नाही. शिवाय सर्व लोकांवर संशय येऊ लागतो. मला नीट बघतील का? डाँक्टर नीट आँपरेशन करतील ना? वगैरे वगैरे. आता बघा, असा विचार करुन काही उपयोग आहे का? आपण डॉक्टर मंडळी बदलू शकतो का? ऑपरेशन टाळणे आपल्या हातात आहे का? मग नकारात्मक विचार करुन आपले मानसिक खच्चीकरण कशासाठी?
दुसरे उदाहरण सांगतो. मला कोणाचे मोबाइलवर मिसकॉल आले तर मी खूपच चिडायचो. खूपच चिडचिड व्हायची हे लोक कशासाठी फोन घेतात वगैरे. मग मी काय करु लागलो. कुणाचा मिसकॉल आला ना?, त्याला परत उलट मिसकॉल देऊ लागलो. विचार करु लागलो अरे कदाचित त्याला मिसकॉल देऊन हे पहायचे असेल की आपल्याला वेळ आहे की नाही? मग मी उलट मिसकॉल देऊन गप्प राहू लागलो तर मग माझी चिडचिड कमी झाली. कारण मी त्याला सांगू लागलो, कि बाबारे मला वेळ आहे तू फोन कर. त्या दिवसापासून मी शांत राहू लागलो.
जी गोष्ट आपण टाळू शकत नाही, बदलू शकत नाही, पण त्यावर विचार करु शकतो तर मग सकारात्मक विचार का नको?
खाली काही प्रश्न मी देतो बघा त्यांची नकारात्मक उत्तरे तयार करुन. खूप त्रास होईल.
१) परिक्षेत जाणार्या विद्यार्थ्यांना विचारा- बाबारे नीट अभ्यास केलास ना?. नाहीतर नापास झालास तर काय करणार?.
२) रुग्णाला विचारा- औषधे वेळेवर घेत जा बरे का? औषधे नाही घेतली तर आजार बळावतो आणि मग त्यातच त्याचा अंत होतो.
३) प्रवासाला निघालेल्या माणसाला विचारा- अरे लवकर जा, नाहीतर गाडी चुकली तर काय करशील?.
४) कोर्टात निकालाच्या वेळेआधी विचारा- आपल्या बाजूने निकाल लागला तर उत्तम नाहीतर विरुध्द गेला तर काय करायचे?.
म्हणून म्हणतो , नेहमी सकारात्मक चिंतन करा. बघा निर्णय चांगलेच मिळतात.
१) कामाला बाहेर जाताना- मी ह्या कामाला जात आहे ते काम होणारच तो माणूस मला भेटणारच. आणि माझे काम होणार?.
२) परिक्षेला जाताना- मी अभ्यास चांगला केला आहे, मग मला पेपर सोपा जाणारच, मला चांगले मार्क मिळणार.
३) कोणाकडची उधारी वसूल करताना- मी पैसे देताना शुध्द मनाने दिलेत तरी तो मला पैसे परत देईन.
४) डाँक्टरकडे जाताना- मला बरे वाटत नाही पण मी मनाची खात्री करतो की मला बरे वाटेल आणि मी ठणठणीत बरा होईन. प्रत्येक वेळेस असे सकारात्मक विचार करा आणि परिणाम पहा.
शेवटी अजून एक मंत्र देतो.
“ रात्री झोपताना, दोन्ही हात जोडून म्हणा-
“ माझ्या शुध्द आत्म्याने, मी जगातील सर्व आत्म्यांची माफी मागत आहे. माझे हातून दिवसभरात काही अपराध झाल्यास, कोणी आत्मा दुखावला गेल्यास, त्यांनी माझ्या आत्म्याला क्षमा करावी ”.
जगात देव आहे की नाही? आतापर्यंत या विषयावर अनेकांनी आयुष्य खर्ची पाडलीत मग आता आपण नव्याने त्या विषयात बोलण्यात काहीच अर्थ नाही. मग हा विषय आता का? तर आमचे असे मत, नाही खात्री आहे की, आता जगात जो हिंसाचार चालला आहे, त्यामागे देवाबद्दल श्रद्धाच असावी. बघा, प्राचीन इतिहास बघा, माणसात जाती संस्था, धर्म होता काय? नाही मग असे काय घडले की, धर्म निर्माण झाले. धर्म प्रथम कोणी निर्माण केला, ही संकल्पना कोणाच्या डोक्यात आली, आणि त्याला धर्माची काय जरूरी भासू लागली. हिंदू कसे निर्माण झाले, यांनी हे आपले देव आहेत हे कशाच्या आधारावर मानले? नंतर ख्रिश्चन धर्माचा उदय झाला, तेव्हा त्यांच्या धर्मसंस्थापकाला अशी काय जरूरी भासली की, नवा धर्म स्थापन करावा त्यांच्यासाठी वेगळी नियमावली म्हणजेच धर्मग्रंथ प्रमाण ठेवावा. मुस्लिमांनी तरी विशीष्ट धर्म का पाळावा. काय झाले यामुळे लोक धर्मांध होऊ लागले, धर्म प्रसार करून आपल्या देवांच्या संकल्पना दुसर्याच्या माथी मारू लागले. जर जगात प्रथम धर्माची गरज निर्माण नसती झाली तर आज ही परिस्थिती आली असती का?
देव कोणी पाहिलाय का? नाही, मग हे पुतळे, मुर्त्या, चित्रे काय आहेत तर ते असतील, फक्त कल्पनाशक्तीव्या भरार्या. नाहीतर एकेका देवा्चे अनेक प्रकारचे फोटो का मिळाले असते. वेगवेगळ्या मुर्त्या का पूजील्या असत्या.प्रत्येकजण आपापल्या विचाराप्रमाणे देव शोधत असतो. इतर देवांबरोबर आपल्या देवाची तुलना करत असतो. मग श्रेष्ठत्वा बद्दल वाद निर्माण होतात. आदिमानवाला देव माहीत नव्हता पण तो या पंचमहाभूतांमध्येच देव शोधत होता. पंचमहाभूते कोणातही कसलाही फरक नाहीत. कोणत्याही देशातला माणूस असो हवा त्याला प्राणवायू देणारच, तो जे पेरेल तेच उगवणार. साखर सर्वांना गोडच लागणार, भले नाव वेगळे असू देत. म्हणून पंचमहाभूतेच सत्य आहेत.
आज जगातील सर्व लोकांची भाषा एकच असती तर. कोणीही मोठेपणा साठी नवा धर्म, नवा पंथ न स्थापता याच धर्मातून कार्य केले असते तर? तत्वज्ञान सांगण्यासाठी वेगळ्या भाषेच्या कुबड्या कशासाठी? वेगवेगळे धर्म, जाती, पंथ, धर्मग्रंथच आज या सर्व दहशतवादाला कारणीभूत आहेत. सर्व एकाच धर्माचे असते तर धर्मांधता असती काय? धर्मात अतंर्गत कलह झाला असता काय? कधी कधी वाटते हे धर्मसंस्थापकच निर्माण झाले नसते तर?
पुण्यात १३ फेब्रुवारीला जर्मन बेकरीत स्फोट झाला. आख्खे पुणे शहर हादरले. मुंबईच्या आठवणी जाग्या झाल्या पण त्याच बरोबर न्यायालयात जो खेळखंडोबा चाललाय, ते पाहून या पुण्यातील तपासातून काय निष्पन्न होणार आहे आणि पोलीसांनी अथक प्रयत्न केल्यावर ते आरोपी न्यायालयात काय गोंधळ घालणार आहेत हे आता स्पष्ट आहे. कितीतरी अतिरेकी फाशीची सजा होऊनही तुरूंगात मेजवानी झोडत आहेत. खटल्यावर खर्च, शिवाय त्यांच्या सुरक्षिततेवर खर्च, नंतर त्यांचा तुरूंगातील खर्च, म्हणजे कोणीकडून सगळा त्रासदायकच प्रकार.
आज पुण्यातील बॉम्ब स्फोटाला दहा दिवस झालेत पण अजूनही पोलीस चाचपडतच आहेत, त्यांना काहीही सुगावा लागत नाही, काय म्हणावे या प्रकाराला. कोणीही गंभीर नाहीच. जसा वेळ जातो, दिवस जातात तसा लोकांचा त्यातील सहभाग कमीकमी होत जातो. स्फोट झाला सगळे जागे झाले, भरपूर बंदोबस्त वाढवला, सगळीकडे डोळ्यात तेल घालून तपासणी, जणू काय आता अतिरेकी लगेचच हल्ला करणार. साधी गोष्ट आहे सगळे वातावरण थंड झाले, लोक शांततेत जीवन जगू लागले तेव्हाच अतिरेक्यांना जोर येणार ना? म्हणजेच सर्वांनी सतत जागरूक राहिले पाहिजे, सतर्क पाहिजे. आणि पोलीसांनी आपली सुरक्षितता पाहण्याऐवजी नागरिकांची सुरक्षिततापाहिली पाहिजे.
आला ’शिमगा’ आला. नुसती बोंबाबोंब. पण या सणालाच काय मारायची बोंब. अरे बाबा एथे तर रोजच बोंबाबोंब आहे, त्यामुळे खास शिमग्यासाठी बोंब मारण्यासाठी कुठे अंगात त्राण आहे.
साखरेचे भव वाढले, अन्नधान्याचे भाव गगनाला भिडलेले आहेत संसार कसा हाकायचा हा मोठा प्रश्न आहे, संसारात बोंबाबोंब. वीज वितरण कार्याल्यात गोंधळ, त्यांचे काम फक्त वीज दरवाढ करण्याचे, वीजेचे दर हाताबाहेर गेलेत, पण काय करणार त्यांची मोनोपॉली आहे, बाजारात दुसरीकडे वीज मिळत नाही, आहे ना बोंबबोंब. आर.टी.ओ. कार्यालयात तर एजंटांचा सुळसुळाट आहे त्यांच्या शिवाय लायसेंस मिळतच नाही, अगदी कोणताही वशिला लावा. दररोज नवीनवी बोंब कानावर येते, वर्तमानपत्रात छापून येते, राजकारण्यांबद्दलची. त्यांनी तर भारताची होळीच केली आहे, सर्वसामान्यांच्या जीवनाची होळी करून, त्यांच्या पोळ्या चांगल्या भाजल्या जाताहेत. शिक्षणात तर एवढ्या मोठा प्रमाणावर बोंबाबोंब आहे की, आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या, त्यांच्या पालकांच्या आर्त वेदना कोणालाच ऐकू जात नाहीत. जे आता जिवंत आहेत त्यांया भवितव्याचे काय, ती पण मूक बोंबाबोंबच ना? सार्वजनिक बससेवा, महानगरपालिका, महाराष्ट्र सरकार, गावपातळीवरील राजकारण, काय चाललंय?......च. ना!
या सर्वांवरची सर्वात मोठी होळी अतिरेकी करतायत, आपण होळीत लाकडे, गोवर्या जाळतो, हे अतिरेकी जिवंत माणचेच जाळतायत, आणि सापडतच सुद्धा नाहीत, सापडले तरी भारत सरकारकडे न्यायालयात सुरक्षित असतात. त्यांना माहिती आहे, आपाण कितीही मोठी होळी केली तरी, आपल्या नावाची बोंबाबोंब होत नाही.
आम्ही भारतीय रोजच होळी, शिमगा अनुभवतो आहोत, पण आता बोंब मारण्यासाठी फुरसतच नाही, अंगात त्राण नाही. रंगपंचमीचे रांग उधळायला मनात उमेद नाही , आम्ही रंगांधळे झालोत, अतिरेक्यांनी आम्हांला रक्ताचा लाल रंगच दाखवलाय, पण सरकार त्यांना आपला रंग दाखवत नाही.
भारतात मनुष्यबळ विकास मंत्री कपिल सिब्बल यांनी सर्व भारतात दहावीचा आणि बारावीचा अभ्यासक्रम एकच असण्याची घोषणा केली. खूप वर्षांनंतर एक चांगला निर्णय होणार आहे. असा निर्णय घ्यायची पाळी का आली तर त्याला विद्यार्थ्यांव्या आत्महत्या कारणीभूत आहेत. बरोबर आहे, सर्व राज्यातून अभ्यासक्रम वेगळा असेल तर, जेव्हा विध्यर्थी उच्च शिक्षणासाठी परराज्यात जातात तेव्हा त्यांना तेथील अभ्यासक्रमाशी जुळवून घ्यावे लागते. तसं पाहिलं तर पदविकेचा अभ्यासक्रमही सर्व भारतातून एकच पाहिजे. परदेशात ही पद्धत आहे, त्यामुळे शिक्षणपद्धतीत आमुलाग्र बदल झालेला आहे, मुलांना ही त्या विषयात अभ्यास करण्यापेक्षा ती आपली भविष्ये घडवता येतात.
एक समान शिक्षणपद्धती असल्यास सबंध भारतातून हुशारीचा कस लागला जाईल. कोणी कोठेही करियर घडवू शकेल. कोणा एका विद्यापीठाची मक्तेदारी संपुष्टात येईल. मग फी वाढीलाही आळा बसेल. अजून एक करता येईल, नव्हे करावे, अभिमत विद्यापीठाचा दर्जा काढून टाकावा.
मागे आम्ही सांगितल्याप्रमाणे पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे, आपलीच मातृभाषा शिकण्याची गरज आहे का? फक्त लिहायवाचायला आले तर बस नाही का? अलंकार, वृत्त, व्याकरणाचा काय उपयोग आहे रोजच्या जीवनात? ज्याला आवाड असेल त्याने अभ्यास करावा ना? सर्वांना का त्रास? संस्कृत भाषा शिकवतात, मुले अतोनात कष्ट घेतात, परिक्षा झाल्यावर दुसर्या दिवशी सगळं विसरून जातात. बाबांनो प्रॅक्टिकल विचार करायला शिका.
आपली भारतीय शिक्षण पद्धती म्हणजे काय तर गुजराथी, मारवाडी, जैन, ब्राम्हण अशा शाकाहारी समाजाला मांसाहारी पदार्थ जबरदस्तीने शिकवण्यासारखे आहे, ज्याचा त्यांना भविष्यात काडीमात्र उपयोग नाही.
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला खाण्यापिण्यापेक्षा मानसिक ताणच जास्त आहे. माणसाने कुठे कुठे मनावर ताण घ्यायचा. घ्यायला कशाला पाहिजे, आजूबाजूचे वातावरणच एवढे गंभीर आहे की आपोआप न मागताही मानसिक ताण आपल्याला सहन करावा लागतो. आता पहा आपण दर महिन्याला वीज बिल वेळेवर भरत असतो. कसं समाधानकारक चाललेले असते. पण एखाद्या महिन्यात काय होते, बिलच येत नाही. आपण वाट पाहतो, मग दुसर्या महिन्तात बिल येते भरमसाठ, कारण काय तर मिटर बंद असल्याने, सरासरी बिल पाठविलेले असते, आला का ताण? मग आपण म्हणतो जाऊ वीज बिल कार्यालयात आणि आपली बाजू मांडून बिल कमी करून आणू आणि भरू बिल. पण कय होते, वीज पुरवठा बंद करणारा येतो आणि सुनावतो, साहेब आपण दोन महिन्यांपासून बिल भरलेले नाही, तेव्हा आम्ही वीज कापणार. आपल्याला प्रचंड ताण येतो, आणि चिडचिड होतो, सांगा आता काय करणार? झक मारत आपण सगळं बिल भरतो, आणि त्या महिन्याचे बजेट कोलमडते.
दुसरा प्रसंग घाईघाईत आपल्याला तातडीच्या कामासाठी जायचे असते आणि पुढच्याच चौकात ट्रॅफिक जाम असते, धड पुढे जाता येत नाही धड मागे येता येत नाही. वरून ऊन लागत असते, असा राग येतो, नंतर कळते की, सिग्नलचे दिवे बंद असल्याने ट्रॅफिक जाम झालेय काय करणार? असो, तर असे खूप प्रसंग असतात, मग काय करणार? उपाय शोधणे.
आम्ही एक उपाय सांगतो पहा, आता आपली गाडी गर्दीत अडकलीयना ह्म एक काम करा, आपले आवडते गाणे थोड्या मोठ्याने म्हणा, आणि मध्येच त्याच गाण्यावर शिटी वाजवा,बघा कसा ताण नाहिसा होतो ते. अजून एक सांगतो, शेजारी उभा असलेलाही वैतागलेलाच असणार ना? एक तर त्याला नकळत तुमच्या गाण्यात इंटरेस्ट वाटू लागतो आणि त्याचाही ताण कमी होतो. किंवा काय करायचे, त्या माणसाशी बोलायचे, अरे मी तुम्हाला कुठेतरी पाहिलेय आपण साने ना? तो म्हणतो नाही, मी दाते. ओके ओके काय करता आपण? बस झाले संभाषण सुरू. तो सुद्धा सगळा ताण विसरतो. शिवाय आजुबाजूचे लोकं सुद्धा कळत नकळत आपल्या कडे बघू लागतात. आणि आपण मानसिक ताणाची साथ कमी करण्यास मदत करीत असतो.
काही उपाय बघू यात.
आपल्या काही आजार झालाय का? डॉक्टरकडे गेलात ना? औषधे आणलीत ना? बरं आपण काही करू शकतो का? नाही ना? मग चिंता कशाला करता?डॉक्टरवर विश्वास ठेऊन गप्प बसा. ताण नका वाढवू.
सतत काहीतरी वाचा, विचार करा, नाहीतर कोरे कागद घेऊन काहीतरी लिहीत बसा. रिकामं मन सैतानाचं घर.
जवळपास एखादा मॉल असेल तर छान ए.सी.त फिरून या. असं थोडंच आहे काहीतरी खरेदी केलीच पाहिजे?
जे काही आहे ते आपण स्वतःच आहोत प्रथम आपल्यावर प्रेम करा. आपल्याला मनाच्या आरशात बघा. समजून घ्या. भगवान रजनीश नेहमी म्हणायचे एकदाच सर्व कपडे काढून, नग्न अवस्थेत आरशासमोर उभे रहा आणि आपल्याला ओळखा.
समाजात लोक कोर्टाची पायरी का चढतात, त्यांना काय हौस असते काय? पण नाही जे कायदे आपण बनवलेत तेच राबविण्यासाठी न्यायालये उघडली, कायद्याचे शिक्षण घेऊन वकील तयार झाले, लोकांना कायद्याचा अर्थ समजावून देण्यासाठी. जेव्हा न्यायाधीश न्याय सुनावतात, तेव्हा ते जगातील परिस्थितीचा विचार करत माहीत, कारण त्या चार भिंतींपलिकडेही समाजाचे जग असते, पण न्यायाधीश मात्र समोर आलेल्या पुराव्यावरून न्यायदान करतात. हे किती योग्य आहे. कायदा राबविणारे कितीही चतुर असले तरी, सामाजिक सभ्यता ही समाजाच्या वळणावरच अवलंबून असते ना? नुसता कायदा राबवून शांतता प्रस्थापित होत नसते, कारणा कायदा समाज, समाजातील माणसे जन्माला घालत नसतो. मासांचे आचार विचार बदलू शकत नाही, उलट अशी कित्येक उदाहरणे आहेत की, थोड्याशा शिक्षेने मोठमोठे गुन्हेगार तयार झालेत. लक्षात घ्या कायदा राबविण्यासाठी प्रत्येक वेळॆस पोलीसांची फौज उभी राहू शकत नाही, त्यालाही मर्यादा आहेत. नाहीतर माय नेम आणि जर्मन बेकरी असा प्रकार घडतो.
काश्मीरमध्ये दर दोन तीन माणसांमागे एक पोलीस किंवा जवान आहे, मग तिथे तर कायदा चांगलाच राबवला गेला पाहिजे, मग मागील दोन दशकांमध्ये तिथे शांतता का प्रस्थापित झाली नाही? आसाममध्ये बोडो किंवा उल्फा दहशतवाद्यांना आळा बसला काय? त्यामानाने महाराष्ट्र खूप सुरक्षित आहे.
कायद्याचे राज्य होण्यासाठी, न्याय मिळण्यासाठी आज वृत्तपत्रे आणि प्रसार माध्यमे महत्वाची भूमिका बजावत आहेत हे आपल्याला विसरून चालणार नाही.
पुण्यात बॉम्बस्फोट झाला आणि पुणे दहशतवादाखाली आले. याला कोण जबाबदार याबद्दल आता उलटसुलट चर्चा होतील. पण ज्यांचे प्राण गेले आणि जे कायमस्वरूपी अधू झाले, त्यांचे काय? पुणॆ शहरातील सर्व पोलीसदल शाहरूखखानाच्या माय नेम इज खान चित्रपटाला संरक्षण देण्यात मोठेपणा समजत होते आणि याच ढिलाईचा अतिरेक्यांनी फायदा घेतला. कोण तो शाहरूखखान त्याच्या चित्रपटाला एवढी सुरक्षित?ता कमाल आहे. बरं यात पोलीसांची तरी चूक म्हणता येईल का, नाही कारणे फायद्याचे राजकारण हे राजकारणीच करतात. म्हणाला असेल शाहरूखखान काहीतरी, पणा त्याकडे दुर्लक्ष करायचे हे या राजकारण्यांना कोण सांगणार. महागाई वाढते आहे याबद्दल कोणी आवाज उठवत नाही. असले चाळे मात्र चांगले जमतात. पोलीसही साधा विचार करत नाहीतकी काय बरोबर आहे ते. नसता प्रदर्शित झाला असता त्याचा सिनेमा तर काय बिघडले असते? किती खर्च झाला असेल, पोलीसांवर. तो काय शाहरूखखान देणार आहे.
पण या मानसिकतेचाच फायदा अतिरेक्यांनी घेतला. आता सर्वत्र नाकाबंदी करतात. सर्वांच्या झडत्या चालू आहेत. अरे काय आता लगेच अतिरेकी येणार आहेत काय? आणि ते काय शस्त्रे घेऊन रांगेत उभारून झडती देणार आहेत? पण झाले ते अतिशय गंभीर झाले. सर्वांनी आपल्या जीविताची काळजी स्वतःच घेतली पाहिजे, कारण सामान्य माणसांना कोणीही वाली राहिलेला नाही.
समजा फक्त समजा बरं का, जास्त विचार करू नका, पण जर केलात तर माझा नाईलाज आहे.
एका रम्य संध्याकाळी तुम्ही बाजारात काही खरेदी करायला गेलात. दोन चार दुकाने फिरलात पण काही तुमच्या मनासारखे मिळत नाही, काही ठिकाणी भाव जास्त तर काही ठिकाणी वस्तुच चांगल्या नाहीत. चालता चालता तुमच्या ध्यानात यायला लागते की खूप वेळेपासून एक स्त्री आपल्या मुलाला कडेवर घेऊन तुमच्या बाजूबाजूने चालत आहे. ज्या दुकानात तुम्ही जाताल त्यात्या ठिकाणी ती तुमच्या मागेमागेच आहे. अगदी तुम्ही विचारपूस करीत असलेल्या वस्तूतही नाक खुपसत आहे. तुम्ही म्हणता जाऊ दे बायकांचा स्वभावच असा असतो, तुम्ही विरोध करीत नाही.
अचानक त्या बाईला तुमचा धक्का लागतो. आणि ती बाई आरडाओरडा करू लागते. हा माणूस माझी छेड काढत आहे म्हणून. तुम्हाला काही कळतच नाही अचानक असे काय झाले. मघापासून तुम्ही या बाईला पाहताय पण दुर्लक्ष करताय. मग असे अचानक काय झाले? लागला असेल गर्दीत धक्का म्हणून एवढा आरडाओरडा? लोक जमा होतात, ते त्या बाईलाच विचारतात, काय झाले, तुम्हाला कोणीच काही विचारत नाहीत. बघताबघता पाच पन्नास लोक जमा होतात . तरूण, म्हातारे, स्त्रिया, मुली सर्वजण जमतात. सर्वजण आता तुमच्याकडे संशयित नजरेने बघतात. काही जण म्हणतात, अरे अरे काय कलियुग आले आहे, एका लेकुरवाळी बाईला दिवसाढवळ्या छेडतात. काहीजण म्हणतात याला बदडा. आता मात्र तुमची पाचावर धारण बसते. ती बाई काहीच बोलत नाहिये, आणि बोलायचा प्रयत्न करीत असेल तरी तिचे आता कोणीच ऐकून घेत नाही, सर्वांच्या नजरा तुमच्या कडेच. आता मात्र प्रकरण फारच सिरीयस झालेय. तुम्ही त्या बाईला विनवणी करताय ती काही बोलायचा प्रयत्न करतेय पण तिचे कोणी ऐकूनच घेत नाहिये. तुम्ही म्हणताय अरे ही माझी बायको आहे, झाले मग तर असा भडका उडतो की लोकं म्हणतात, अरे काय निर्लज्ज माणूस आहे आता ह्या बाईला आपली बायको म्हणतोय, द्या याला पोलिसांच्या ताब्यात. पोलीसय येतात आणि तुम्हाला घेऊन जाऊ लागतात, ती बाईही पाठोपाठ येते, पण काही उपयोग नसतो. ती तुम्हाला नंतर सोडवून घरी घेऊन जाते. कारण ती त्याची बायको असते.
अरे मी सुरूवातीसच म्हणालो ना की समजा म्हणून, काय टेन्शन घेऊ नका, पण भर रस्त्यात आपलीच बायको अशी वागली तर? फक्त कल्पना करा.
जगातील सर्वाधिक भूकग्रस्त लोक भारतात आहेत. भारतात रोज ३४ कोटी लोक रात्री न जेवताच झोपतात. १० हजारापेक्षा अधिक भारतीय भुकेपायी मरतात. जगातील उपाशी व्यक्तींमध्ये भारतीयांची संख्या १/३ (तिसरा हिस्सा) भरते. एका आकडेवारी नुसार ग्रामीण भारतातील ३७% जनता दारिद्र्य रेषेखाली आहे. त्यातील ८०% लोक कुपोषित आहेत. आहार, कँलरीज, सकस अन्न इ. बाबत झालेल्या संशोधनाच्या अधिकृत आकडेवारीवरुन ही दीर्घकालीन उपासमारीचे दर्शन घडते. याला भूकबळी म्हणायचं की अदृश्य नरसंहार? (परशुराम रे, निर्देशक - सेंटर फॉर एन्हार्यमेंट अँड फूड सिक्युरिटी)
दुसर्या बाजूला भारतात १९९० ते २००६ या काळात अन्नधान्य शेतीखालची जमीन ६० लाख हेक्टर्सनी घटली आहे आणि याच काळात सरासरी प्रतिमाणसी दैनिक अन्नग्रहण ४६८ ग्रँमवरुन ४१२ ग्रँमवर आले आहे. (जागतिक खाद्य परिषद, राष्ट्रीय आरोग्य सर्व्हेक्षण)
महाराष्ट्रात (सडलेल्या) अन्नधान्यापासून दारु बनवण्याची परवानगी ३६ कारखान्यांना देण्यात आली आहे.
एवढे सडलेले धान्य त्यांना कुठून मिळणार? शेतकरी त्याचे धान्य सडू नये यासाठी आटोकाट प्रयत्न करतो. अवकाळी पावसाने एखादे वेळी होते नुकसान, ते ही २० ते ३० टक्के. पण दर वर्षी असे कुठे असते? शिवाय त्यातील बरेचसे धान्य पशुखाद्य म्हणून वापरता येते.
अगदीच जर सडले असेल तर मग त्या धान्याला परत सडवून दारु बनवणे तरी कसे शक्य होईल? (एका शेतकरी बाईचा आश्चर्याने विचारलेला प्रश्न)
अहो बाई, भूक लागली म्हणजे दोन भाकरी जेवता तुम्ही, दारु काय, एक पौवा मारला की भूक गायब, सरळ झोपच लागते. अन्नधान्य टंचाईवर नामी उपाय आहे हा ! पण अशी रोज भूक मारल्याने शरीर टिकेल का?
शरीर कशाला टिकायला पाहिजे? भारतात गरीबांचीच तर लोकसंख्या जास्त आहे. हळूहळू ते कमी झाले तर चांगलेच होईल. पॄथ्वीवरचा भार कमी होईल.
पण दारुची टंचाई आहे, शौकिनांना पुरेशी मिळत नाही असे तर काही ऐकू आले नाही, मग ह्या नवीन कारखान्यांना परवानगी देऊन दारुचा महापूर वाहवायची गरज काय?
ऊसाच्या मळीपासून जे अल्कोहोल बनते ते पेट्रोल, डिझेल मध्ये मिसळता येते. धान्याची दारु पिण्यासाठी चांगली असते. ते मोठे शास्त्र आहे. तुला नाही कळायचे.
मला नकोच आहे ते .... दारु पिऊन माणूस कसा हैवान बनतो ते मी रोजच पाहते. पोरगा मायबापाला ओळखत नाही, नवरा बायकोचा जीव घ्यायला धावतो. बाप-पोरं, शेजारी-पाजारी सगळ्यांची भांडणच भांडणं सुरु असतात. ह्या सर्वांच्या मुळाशी दारुच असते. फ़क्त गरीबांचेच संसार दारुने उध्द्वस्त होतात असेही नाही. आपल्या शेजारचे गाव पाहा ना ! तिथे तर वर्षी १५-२० जीव दारुपायी जातात. त्यातील अर्ध्यापेक्षा जास्त मध्यमवर्गीय असतात. मरणार्यांचे वय ४०-४५ च्या आत असते. अशांची मुलं मग मोकाट सुटतात अ गुंडागर्दीकडे वळतात. आमच्या लहानश्या रवाळा गावात २५ मुलं अशी आहेत किंवा अति मद्यपानाने लिव्हर निकामी होऊन अथवा अपघातात बापच मरुन गेले आहेत. काहींचे तर त्याच कारणाने आई-बाप दोघेही नाहीत. हे सर्व सरकारला कळत नाही का?
सगळे कळते. आताच्या मुख्यमंत्र्यांनी मागील वर्षी मद्य नियंत्रण नीती ठवविण्यासाठी समिती नेमली. त्या समितीच्या शिफ़ारसी आम्ही स्वीकारु असे सांगितले. बेकायदा दारुचे पूर्ण उच्चाटन व वैध दारुचे प्रभावी नियंत्रण अशी ह्या समितीने एकमताने शिफ़ारस केली. तशी ग्वाही सरकारने द्यावी असे समितीने सुचविले आहे. पण हा अहवाल मंत्री मंडळासमोर आणण्याऐवजी सरकार तर उलटच पावले टाकत आहे. येत्या दोन वर्षात धान्यापासून दारु बनवण्याचे २३ कारखाने पूर्ण क्षमतेनिशी काम करु लागतील. प्रत्येकी रोज ३० हजार ते सव्वा लाख लिटर दारु ते बनवतील. ही दारु बनवतांना तोटा होणार आहे. म्हणून दयाळू मायबाप सरकार प्रत्येक लिटरमागे १० रुपये अनुदान देणार आहे. एका उद्योजकाला ५० कोटी इतके कमाल अनुदान देण्यात येईल. हे सर्व मद्य महाराष्ट्रातच विकणे बंधनकारक आहे.
‘बापा बापा,एवढी दारु बनवाले धान्य किती लागेल?’
‘दरवर्षी ८ लाख टन धान्य या कारखान्यांना लागणार आहे. ३६ कारखान्यांना पूर्ण परवानगी मिळाल्यास १४ लक्ष टन धान्य लागेल. एवढे सडके धान्य कुठून मिळणार? हा प्रश्न त्यामुळे खराच आहे. सगळ्यांनाच कळते की सडक्या धान्याच्या नावाखाली चांगलेच धान्य वापरले जाणार आहे.’
‘ह्याच्या विरोधात कोणी बोलत नाही का?’ कोण बोलणार? विरोधी पक्ष नेत्यांच्या अ सत्ताधारी नेत्यांच्याही मुलामुलींना ह्या प्रकल्पासाठी मंजुरी देण्यात आली आहे. तेरी भी चुप अन मेरी भी चुप असा हा मामला आहे. सर्वांचेच कल्याण ह्यातून साधणार आहे.
सर्वांचे म्हणजे राजकारणी व त्यांचे पोरं-पोरी व नातेवाईकांचेच न ?’
‘आम्हाला हे असे कल्याणकारी राज्य नको. आमची भाकर तेवढी आमच्यासाठी राहू द्या, अन दारु नियंत्रणात आणा. एवढे झाले की आमचे कल्याण आम्ही करतो.’
‘तुमचं म्हणणं सोळा आणे खरं, पण राजकारणी पुढार्यांना त्यांचं, त्यांच्या पोरांच, चेल्याचपाट्यांचं भलं करायचं आहे. निवडणुका जिंकायच्या आहेत, त्यासाठी पैसा लागतो तो कसा मिळवायचा मग?
म्हणजे आमच्या कल्याणाच्या नावाखाली हे पुढारी स्वत:चे कल्याण करुन घेत आहेत. सामान्य माणूस दारुच्या पुरात वाहून गेला तरी चालते, नव्हे तो तसा वाहून गेलाच पाहिजे, दारुत त्याची सदविवेक बुध्दी बुडाली म्हणजे पुढार्यांना रान मोकळे. हे नेते काही करु देत, भ्रष्टाचार वाढू देत, सामान्यांच्या मुलांना उच्चशिक्षण अप्राप्य होऊ दे, रोगराईनी सर्व जण ग्रासू देत, शेतकर्यांच्या आत्महत्या वेगाने घडू दे, अन्नधान्याची टंचाई तीव्रतर होऊ दे...... त्याला कशाचेच काही वाटणार नाही. दारुचा प्याला मिळाला म्हणजे सर्व दुखांचा अंत .....हिशोब सांगतोच की आता जेवढी दारु बनणार आहे ती महाराष्ट्रातील सर्व पुरुषांना ‘एकच प्याल’ पुरवणार आहे.
उद्याचा महाराष्ट्र दारुत लोळत पडलेला बघणे आपल्याला परवडणार नाही. आपले अन आपल्या मुलांचे कल्याण,पर्यायाने उभ्या महाराष्ट्राचे कल्याण आपल्याच हाती आहे. आपल्या परिसरात सुरु होणार्या धान्यापासून दारुच्या कारखान्याला पूर्ण ताकदीनिशी विरोध करु या.
सर्वोदय प्रेस सर्विस (मराठी)
महाराष्ट्रात महागाई उतू चाललीय आणि लोकप्रतिनिधी मात्र याकडे कानाडोळा करून बाकी वाद करण्यातच गुंतले आहेत, आणि निवडणुकीच्या वेळेस दिलेली आश्वासने विसरून गेलीत. त्यांना महागाईची झळ पोचत नाहीये कारण अधिकृतरित्या त्यांना सरकारकडून सवलती मिळतात, शिवाय वरकमाई आहेच.
पहा त्यांना मिळणारे भत्ते - मासिक वेतन १२००० रूपये, वेगवेगळ्या कामकाजासाठी १०००० रूपये, कार्यालयीन खर्चासाठी १४००० रूपये, प्रवासभत्ता ४८००० रूपये, अधिवेशन काळातील हजेरी भत्ता रोज ५०० रूपये, देशभरात रेल्वेतून देशभर कुठेही पहिल्या वर्गातून प्रवास, विमानप्रवास बिझनेस क्लासमधून पत्नी अथवा पी.ए. सोबत ४० वेळा मोफत प्रवास, घरगुती वापरासाठी ५०००० युनिट पर्यंत मोफत वीज म्हणजेच साधारण ४००००० रूपये जमा, दूरध्वनीचे १ लाख ७० हजार मोफत कॉल्स, म्हणजेच प्रत्येक खासदारावर वर्षाला अंदाजे ३२ लाख रूपये खर्च सरकारी तिजोरीतून, आणि असे ५३४ खासदार आहेत म्हणजे आपल्या कराच्या पैशातून हे लोकप्रतिनिधी ८५५ कोटी रूपये खातात. कोण काय करू शकते, कारण आपणच त्यांना निवडून दिले आहे ना? आता आम्हाला सांगा कशी यांना समजणार महागाई म्हणजे काय ते? एवढे असूनही हे आपापसातच भांडत बसलेत. अगदी मराठी अमराठी वाद, शाहरूख खान काय म्हणाला, कोणी म्हणतो मी ज्योतिषी नाही, कोणी चित्रपटाचे राजकारण करतोय, कोणी लोकलमधून प्रवास करून स्टंटबाजी करतो पण यांना विद्यार्थ्यांच्या आत्महत्त्या दिसत नाहीत, साखरेचे भाव समजत नाहीत.
दुर्दैव आपले आपल्याला अशा देशात रहावे लागते ते.
जगात अनेक देशांमध्ये एक विकार समस्या बनून राहिला आहे, तो म्हणजे अल्झेमर्स डीसीज किंवा विस्मरणाचा विकार. यावर बरेच संशोधन झाले, पण सा विकार एक समस्या बनूनच राहिला आहे. इंग्लंड मध्ये तर सुमारे नऊ लाख लोक या विकाराने ग्रासले आहेत आणि हा विकार सर्व जगभर पसरण्याची भिती शास्त्रज्ञ व्यक्त करीत आहेत. भारतात भिती बाळगण्याचे कारण नाही कारण या देशात अनेक रोगांनी पाय रोवला आहे.
पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशा भारतात, उत्तरेला बल्लभगड नावाचे एक खेडेगाव आहे, तिथे मात्र विस्मरणाचा विकार वृद्ध मंडळीत अजिबात आढळत नाही. बहुतेक म्हातारी माणसे सकाळ्ची कामे उरकली की एका ठराविक ठिकाणी जमतात आणि प्रसन्न गप्पा मारतात. इंग्लंडमधील पीतसबर्ग विद्यापीठातील शास्त्रज्ञ या गावी ठाण मांडून या लोकांचा अभ्यास करीत आहेत. यांनी पाच हजारांहून अधिक लोकांची अल्झेमर्सची चाचणी घेतली आहे. आणि यावर निरनिराळ्या प्रक्रिया राबवत आहेत. हा मागासलेला भाग आहे, परंतु या लोकांची स्थानिक संस्कॄतीच यासाठी कारणीभूत असावी असे शात्रज्ञांचे मत आहे. या भागातील लोकांचे सरासरी आयुष्यमान तुलनेने प्रगत देशांपेक्षा खूप कमी आहे,पण यांना हा विकार नाही. जगात सर्वत्र हा रोग पसरलेला असताना सुद्धा या भागात लागण नाही, याचेच आश्चर्य डॉ. विजय चंद्रा यांना वाटते. त्यांच्या मते अल्झेमर्स विकारासाठी ’एपीओ ४ इ’ हे जनुक कारणीभूत असते, पण बल्लभगडच्या लोकांत हे जनुक आढळतच नाही, याचेच शात्रज्ञांना नवल वाटते.
बल्लभगडचे लोक शाकाहारी आहेत , ते खूप कष्ट करतात, शेतीवाडी चांगली पिकत असल्याने मानसिक ताण तणाव नाही, एकत्र आणि सुदृढ कुटुंब पद्धती ही प्रमुख कारणे, अल्झायमर विकार न होण्यासाठी असावीत. ह्या विचाराने असाच कार्यक्रम जगभर राबवावा असे जागतिक पातळीवर ठरत आहे.
बल्लभगडच्या लोकांकडून एक चांगला धडा शिकण्यासारखा आहे.
झी मराठी वरील सारेगमप कर्यक्रमाची अंतीम फेरी ३१ जानेवारीला झाली त्यात उर्मिला धनगर, अभिलाषा चेल्लम आणि राहुल सक्सेना यांनी अप्रतीम गाणी सादर केली. या गायकांना आणि अशा हजारो गायकांना झी मराठी जे प्रोत्साहन देते आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. शिवाय आम्हा रसिकांनाही काही तरी वेगळे ऐकायला मिळते, हा सुवर्णयोग आहे.
सारेगमपच्या कार्यक्रमामुळे महाराष्ट्रातील आणि देश, जगभरातील प्रेक्षकांना संगीतातील खाचाखोचा, त्यातील लय समजली आणि संगीताचा निखळ आनंद लुटता आला. राहुल सक्सेना आणि अभिलाषा चेल्लम हे दोघेही अमराठी असताना सुद्धा, त्यांच्याकडून अवधूत गुप्ते आणि सलिल कुलकर्णी याणी जी मेहनत करून घेतली, त्यास तोडच नाही. हे दोघेही गाताना अजिबात अमराठी वाटत नव्हते. शिवाय त्यांनी जी क्षमता सिद्ध केली ती कौतुकास्पदच आहे.
उर्मिला धनगर ही महागायिका बनली, तिला मायबाप प्रेक्षकांनी जी दाद दिली, ती तिच्यातील गायिकेला. तिची कौटुंबिक पार्श्वभूमी लक्षात घेता, तिचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. सुलोचना चव्हाण यांनी गायलेल्या लावण्या पेश करणे म्हणजे शिवधनुष्य पेलण्या सारखे आहे असे म्हणत पण उर्मिला धनगरने ते लीलया पेलले. एका कार्यक्रमात लावणी सादर केली तेव्हा सुलोचनाबाईंनी तिला भरभरून दाद दिली, हीच तिच्या यशाची पावती ठरली. लावणीतील तो नखरा, अदा, मादक सौंदर्य, अर्थवाहीपण फक्त उर्मिला धनगरनेच पेश करावे, तिच्यासारखी तीच.
अजय अतुल सारखे महान संगीतकार सुद्धा म्हणाले, उर्मिलाला कोणाचीही दृष्ट लागू नये. बस आणखी काय पाहिजे!
मराठी रसिकांनी उर्मिला धनगरची जी निवड केली, त्याबद्दल आम्ही सर्वांचे ऋणी आहोत.
Popular Posts
-
आत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा ...
-
************CLARIFICATION******************* बरेच विरोप आल्याने मला हे स्पष्ट करावेसे वाटत आहे की.... मी लिहिल्याप्रमाणे, मी चोराची बाजु अज...
-
१२ जुलै १९६१, आम्ही ११ वर्षांचे होतो, त्या वेळेची आठवण ठेऊन ’सकाळ’ने आठवणी जाग्या केल्या त्याबद्दल धन्यवाद. खरोखर त्या भयानक पुरापेक्षाही,...
-
Recently a Muslim kid named Ahmed Mohamed from Texas was arrested and suspended from school when he showed his home built "clock&qu...
-
नुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , "चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी"...
-
मानवाच्या मूलभूत गरजा काय तर अन्न, वस्त्र, आणि निवारा. निवार्यासाठी माणूस घर बांधु लागला. त्या घराने त्याला सुख, शांती, समाधान मिळते. दिवस ...
-
कोणत्यातरी कामासाठी मी बायकोला घेऊन मोटरसायकलने बाहेरगावी गेलो होतो. परतायला रात्र झाली, पण सकाळी तातडीचे काम असल्यामुळे घाईने निघालो. मध्ये...
-
पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...
-
विश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...
-
मुस्लीम समाजाने पावसासाठी केलेली प्रार्थना हे अल्लाह, आमच्या हातून गुन्हे घडल्यामुळे तू पाऊस रोखून धरला आहे, याची आम्हाला जाण आहे. आमच्या ...