समजा फक्त समजा बरं का, जास्त विचार करू नका, पण जर केलात तर माझा नाईलाज आहे.
एका रम्य संध्याकाळी तुम्ही बाजारात काही खरेदी करायला गेलात. दोन चार दुकाने फिरलात पण काही तुमच्या मनासारखे मिळत नाही, काही ठिकाणी भाव जास्त तर काही ठिकाणी वस्तुच चांगल्या नाहीत. चालता चालता तुमच्या ध्यानात यायला लागते की खूप वेळेपासून एक स्त्री आपल्या मुलाला कडेवर घेऊन तुमच्या बाजूबाजूने चालत आहे. ज्या दुकानात तुम्ही जाताल त्यात्या ठिकाणी ती तुमच्या मागेमागेच आहे. अगदी तुम्ही विचारपूस करीत असलेल्या वस्तूतही नाक खुपसत आहे. तुम्ही म्हणता जाऊ दे बायकांचा स्वभावच असा असतो, तुम्ही विरोध करीत नाही.
अचानक त्या बाईला तुमचा धक्का लागतो. आणि ती बाई आरडाओरडा करू लागते. हा माणूस माझी छेड काढत आहे म्हणून. तुम्हाला काही कळतच नाही अचानक असे काय झाले. मघापासून तुम्ही या बाईला पाहताय पण दुर्लक्ष करताय. मग असे अचानक काय झाले? लागला असेल गर्दीत धक्का म्हणून एवढा आरडाओरडा? लोक जमा होतात, ते त्या बाईलाच विचारतात, काय झाले, तुम्हाला कोणीच काही विचारत नाहीत. बघताबघता पाच पन्नास लोक जमा होतात . तरूण, म्हातारे, स्त्रिया, मुली सर्वजण जमतात. सर्वजण आता तुमच्याकडे संशयित नजरेने बघतात. काही जण म्हणतात, अरे अरे काय कलियुग आले आहे, एका लेकुरवाळी बाईला दिवसाढवळ्या छेडतात. काहीजण म्हणतात याला बदडा. आता मात्र तुमची पाचावर धारण बसते. ती बाई काहीच बोलत नाहिये, आणि बोलायचा प्रयत्न करीत असेल तरी तिचे आता कोणीच ऐकून घेत नाही, सर्वांच्या नजरा तुमच्या कडेच. आता मात्र प्रकरण फारच सिरीयस झालेय. तुम्ही त्या बाईला विनवणी करताय ती काही बोलायचा प्रयत्न करतेय पण तिचे कोणी ऐकूनच घेत नाहिये. तुम्ही म्हणताय अरे ही माझी बायको आहे, झाले मग तर असा भडका उडतो की लोकं म्हणतात, अरे काय निर्लज्ज माणूस आहे आता ह्या बाईला आपली बायको म्हणतोय, द्या याला पोलिसांच्या ताब्यात. पोलीसय येतात आणि तुम्हाला घेऊन जाऊ लागतात, ती बाईही पाठोपाठ येते, पण काही उपयोग नसतो. ती तुम्हाला नंतर सोडवून घरी घेऊन जाते. कारण ती त्याची बायको असते.
अरे मी सुरूवातीसच म्हणालो ना की समजा म्हणून, काय टेन्शन घेऊ नका, पण भर रस्त्यात आपलीच बायको अशी वागली तर? फक्त कल्पना करा.
No comments:
Post a Comment