जगातील सर्वाधिक भूकग्रस्त लोक भारतात आहेत. भारतात रोज ३४ कोटी लोक रात्री न जेवताच झोपतात. १० हजारापेक्षा अधिक भारतीय भुकेपायी मरतात. जगातील उपाशी व्यक्तींमध्ये भारतीयांची संख्या १/३ (तिसरा हिस्सा) भरते. एका आकडेवारी नुसार ग्रामीण भारतातील ३७% जनता दारिद्र्य रेषेखाली आहे. त्यातील ८०% लोक कुपोषित आहेत. आहार, कँलरीज, सकस अन्न इ. बाबत झालेल्या संशोधनाच्या अधिकृत आकडेवारीवरुन ही दीर्घकालीन उपासमारीचे दर्शन घडते. याला भूकबळी म्हणायचं की अदृश्य नरसंहार? (परशुराम रे, निर्देशक - सेंटर फॉर एन्हार्यमेंट अँड फूड सिक्युरिटी)
दुसर्या बाजूला भारतात १९९० ते २००६ या काळात अन्नधान्य शेतीखालची जमीन ६० लाख हेक्टर्सनी घटली आहे आणि याच काळात सरासरी प्रतिमाणसी दैनिक अन्नग्रहण ४६८ ग्रँमवरुन ४१२ ग्रँमवर आले आहे. (जागतिक खाद्य परिषद, राष्ट्रीय आरोग्य सर्व्हेक्षण)
महाराष्ट्रात (सडलेल्या) अन्नधान्यापासून दारु बनवण्याची परवानगी ३६ कारखान्यांना देण्यात आली आहे.
एवढे सडलेले धान्य त्यांना कुठून मिळणार? शेतकरी त्याचे धान्य सडू नये यासाठी आटोकाट प्रयत्न करतो. अवकाळी पावसाने एखादे वेळी होते नुकसान, ते ही २० ते ३० टक्के. पण दर वर्षी असे कुठे असते? शिवाय त्यातील बरेचसे धान्य पशुखाद्य म्हणून वापरता येते.
अगदीच जर सडले असेल तर मग त्या धान्याला परत सडवून दारु बनवणे तरी कसे शक्य होईल? (एका शेतकरी बाईचा आश्चर्याने विचारलेला प्रश्न)
अहो बाई, भूक लागली म्हणजे दोन भाकरी जेवता तुम्ही, दारु काय, एक पौवा मारला की भूक गायब, सरळ झोपच लागते. अन्नधान्य टंचाईवर नामी उपाय आहे हा ! पण अशी रोज भूक मारल्याने शरीर टिकेल का?
शरीर कशाला टिकायला पाहिजे? भारतात गरीबांचीच तर लोकसंख्या जास्त आहे. हळूहळू ते कमी झाले तर चांगलेच होईल. पॄथ्वीवरचा भार कमी होईल.
पण दारुची टंचाई आहे, शौकिनांना पुरेशी मिळत नाही असे तर काही ऐकू आले नाही, मग ह्या नवीन कारखान्यांना परवानगी देऊन दारुचा महापूर वाहवायची गरज काय?
ऊसाच्या मळीपासून जे अल्कोहोल बनते ते पेट्रोल, डिझेल मध्ये मिसळता येते. धान्याची दारु पिण्यासाठी चांगली असते. ते मोठे शास्त्र आहे. तुला नाही कळायचे.
मला नकोच आहे ते .... दारु पिऊन माणूस कसा हैवान बनतो ते मी रोजच पाहते. पोरगा मायबापाला ओळखत नाही, नवरा बायकोचा जीव घ्यायला धावतो. बाप-पोरं, शेजारी-पाजारी सगळ्यांची भांडणच भांडणं सुरु असतात. ह्या सर्वांच्या मुळाशी दारुच असते. फ़क्त गरीबांचेच संसार दारुने उध्द्वस्त होतात असेही नाही. आपल्या शेजारचे गाव पाहा ना ! तिथे तर वर्षी १५-२० जीव दारुपायी जातात. त्यातील अर्ध्यापेक्षा जास्त मध्यमवर्गीय असतात. मरणार्यांचे वय ४०-४५ च्या आत असते. अशांची मुलं मग मोकाट सुटतात अ गुंडागर्दीकडे वळतात. आमच्या लहानश्या रवाळा गावात २५ मुलं अशी आहेत किंवा अति मद्यपानाने लिव्हर निकामी होऊन अथवा अपघातात बापच मरुन गेले आहेत. काहींचे तर त्याच कारणाने आई-बाप दोघेही नाहीत. हे सर्व सरकारला कळत नाही का?
सगळे कळते. आताच्या मुख्यमंत्र्यांनी मागील वर्षी मद्य नियंत्रण नीती ठवविण्यासाठी समिती नेमली. त्या समितीच्या शिफ़ारसी आम्ही स्वीकारु असे सांगितले. बेकायदा दारुचे पूर्ण उच्चाटन व वैध दारुचे प्रभावी नियंत्रण अशी ह्या समितीने एकमताने शिफ़ारस केली. तशी ग्वाही सरकारने द्यावी असे समितीने सुचविले आहे. पण हा अहवाल मंत्री मंडळासमोर आणण्याऐवजी सरकार तर उलटच पावले टाकत आहे. येत्या दोन वर्षात धान्यापासून दारु बनवण्याचे २३ कारखाने पूर्ण क्षमतेनिशी काम करु लागतील. प्रत्येकी रोज ३० हजार ते सव्वा लाख लिटर दारु ते बनवतील. ही दारु बनवतांना तोटा होणार आहे. म्हणून दयाळू मायबाप सरकार प्रत्येक लिटरमागे १० रुपये अनुदान देणार आहे. एका उद्योजकाला ५० कोटी इतके कमाल अनुदान देण्यात येईल. हे सर्व मद्य महाराष्ट्रातच विकणे बंधनकारक आहे.
‘बापा बापा,एवढी दारु बनवाले धान्य किती लागेल?’
‘दरवर्षी ८ लाख टन धान्य या कारखान्यांना लागणार आहे. ३६ कारखान्यांना पूर्ण परवानगी मिळाल्यास १४ लक्ष टन धान्य लागेल. एवढे सडके धान्य कुठून मिळणार? हा प्रश्न त्यामुळे खराच आहे. सगळ्यांनाच कळते की सडक्या धान्याच्या नावाखाली चांगलेच धान्य वापरले जाणार आहे.’
‘ह्याच्या विरोधात कोणी बोलत नाही का?’ कोण बोलणार? विरोधी पक्ष नेत्यांच्या अ सत्ताधारी नेत्यांच्याही मुलामुलींना ह्या प्रकल्पासाठी मंजुरी देण्यात आली आहे. तेरी भी चुप अन मेरी भी चुप असा हा मामला आहे. सर्वांचेच कल्याण ह्यातून साधणार आहे.
सर्वांचे म्हणजे राजकारणी व त्यांचे पोरं-पोरी व नातेवाईकांचेच न ?’
‘आम्हाला हे असे कल्याणकारी राज्य नको. आमची भाकर तेवढी आमच्यासाठी राहू द्या, अन दारु नियंत्रणात आणा. एवढे झाले की आमचे कल्याण आम्ही करतो.’
‘तुमचं म्हणणं सोळा आणे खरं, पण राजकारणी पुढार्यांना त्यांचं, त्यांच्या पोरांच, चेल्याचपाट्यांचं भलं करायचं आहे. निवडणुका जिंकायच्या आहेत, त्यासाठी पैसा लागतो तो कसा मिळवायचा मग?
म्हणजे आमच्या कल्याणाच्या नावाखाली हे पुढारी स्वत:चे कल्याण करुन घेत आहेत. सामान्य माणूस दारुच्या पुरात वाहून गेला तरी चालते, नव्हे तो तसा वाहून गेलाच पाहिजे, दारुत त्याची सदविवेक बुध्दी बुडाली म्हणजे पुढार्यांना रान मोकळे. हे नेते काही करु देत, भ्रष्टाचार वाढू देत, सामान्यांच्या मुलांना उच्चशिक्षण अप्राप्य होऊ दे, रोगराईनी सर्व जण ग्रासू देत, शेतकर्यांच्या आत्महत्या वेगाने घडू दे, अन्नधान्याची टंचाई तीव्रतर होऊ दे...... त्याला कशाचेच काही वाटणार नाही. दारुचा प्याला मिळाला म्हणजे सर्व दुखांचा अंत .....हिशोब सांगतोच की आता जेवढी दारु बनणार आहे ती महाराष्ट्रातील सर्व पुरुषांना ‘एकच प्याल’ पुरवणार आहे.
उद्याचा महाराष्ट्र दारुत लोळत पडलेला बघणे आपल्याला परवडणार नाही. आपले अन आपल्या मुलांचे कल्याण,पर्यायाने उभ्या महाराष्ट्राचे कल्याण आपल्याच हाती आहे. आपल्या परिसरात सुरु होणार्या धान्यापासून दारुच्या कारखान्याला पूर्ण ताकदीनिशी विरोध करु या.
सर्वोदय प्रेस सर्विस (मराठी)
No comments:
Post a Comment