अवतार

विश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व थरांतील प्राणिसृष्टीचा आधार घेतो आणि धर्मतत्त्वाचे रक्षण करण्याचा प्रयत्न करून पाहातो, परंतु तो अयशस्वी होतो. म्हणून शेवटी तोच भगवंत चौथ्या अवतारात पूर्ण माणूस नाही आणि पूर्ण पशू नाही असा नृसिंहाचे रुद्रभीषण रूप घेतो. एवढे जगावेगळे भयानक रूप घेऊन त्याने केले काय तर हिरण्यकश्यपूला त्याचे पोट फाडून ठार केले ! झाले, लागलीच धर्माचे रक्षण झाले, धर्मोत्सव, विजयोत्सव सुरू झाले, नृसिहाचे देव्हारे सजू लागले ! कर्तुमकर्तुम्‍ सामर्थ्य असलेल्या नृसिंहाला त्याच्या दृष्टीने य: कश्चित असलेल्या एका राक्षसाला आमनेसामने आव्हान देऊन ठार करता येऊ नये ? आणि त्याऐवजी तो नृसिंह त्या राक्षसाचे पोट फाडून त्याला ठार करून त्यात स्वत:चे कर्तव्य केल्याचे समाधान मानतो ? हा कोणी एक राक्षस मनात आणताच उघड उघड धर्माला पायदळी तुडवतो ह्याचा अर्थ काय ? ईशनिर्मित धर्मतत्त्व कोणाही बलबंताने पायदळी तुडवण्याच्या योग्यतेचेच होते की काय ? पुराणे तर असे सांगतात. मग ईशप्रणित धर्मतत्त्वाचा उदोउदो कशासाठी ?
यापुढील पाचव्या अवतारात भगवंताने माध्यम म्हणून मनुष्यरूप घेण्याचा प्रथमच प्रयत्न केला ! हा प्रयत्न एका नराधम राक्षसासाठी, त्याच्या संहारासाठी नव्हता तर एका पुण्यवंत, धर्मशील, आचारनिष्ठ अशा बळीराजासाठी होता ! अहर्निश चाललेल्या दानधर्माने म्हणे बळीराजाची पुण्यसंपदा इतकी वाढली की, तो कोणत्याही क्षणी देवांचा राज होण्याची शक्यता निर्माण झाली. आता सन्मार्गाने जाऊन जर एखादा भूलोकीचा राजा स्वपराक्रमाने स्वर्गलोकी गेला तर त्याचा आवर्जून सत्कार करावयाचा की त्याला फसवून, शब्दात बांधून घेऊन पाताळात गाडून टाकावयाचा ? भगवंताच्या पाचव्या अवताराचे नाव आहे वामन. वामन म्हणजे लहान रूप. वामन हे नाव ठेवण्यात पुराणांना जरी कौतुक वाटत असले किंवा भगवंत रवरोरवरीच बटुरूपाने अवतीर्ण झाले म्हणून त्यांना वामन म्हणत असले तरी, बळीराजाची महात्मता एवढी विशाल होती की, त्याच्या तोडीस तोड रूप घेण्याचे भगवंताला धैर्य झाले नाही, आणि म्हणूनच त्याने बळीराजाच्या धर्मतेजाने दिपून जाऊन स्वत: वामन रूप घेतले असावे ! ह्या पाचव्या अवताराचे कार्य काय तर बळीराजाला नामशेष करणे ! तीन पावले भूमी मागण्याचे निमित्त करून वामनाने शेवटी बळीला फसवून पाताळात लोटले असले तरी त्या प्रकारणी दिलेला शब्द पाळण्यात विजय झाला तो बळीराजाचाच. वामनाचा नव्हे ! वामनाने याचना केली आहे ती तीन पावले भूमीची ! बळी आपली भूमी देण्यासाठी वामनाला शोधत त्रैलोक्यात हिंडत नव्हता. जो याचना करतो तो भगवंत कसला आणि जो याचक आहे तो अवतार घेऊन साधणार काय ? ज्याच्याजवळ तीन पावले भूमीही नाही, असली तरी मागितल्याशिवाय ज्याला ती मिळत नाही तो धर्मसंस्थापन ते काय करणार ? बरे तीन पावले म्हणून ज्याने बळीराजाजवळ भूमी मागितली ती तरी खर्‍या अर्थाने त्याने घेतली का ? तर तसे पुराण सांगत नाही. वामन आकाराने जरी लहान असला तरी त्याचे एक पाऊल म्हणे एका लोकाला व्यापून उरले ! ज्याला एका पावलात सर्व भूमी पादाक्रांत करणे सहज शक्य होते त्याने मग बळीराजाकडे याचना करावीच का ? आणि केलीच तर मग मनुष्य रूपला शोभेल अशीच पावले का टाकू नयेत ? ती वामनाची पावले इतकी विस्तीर्ण का ? तर तो म्हणे भगवंताचा अवतार ! असे हे अचाट सामर्थ्य फक्त भगवंताचेच असावयाचे ! आणि इतके करूनही ह्या वामनाने बळीला पाताळात लोटून धर्मस्थापना केली का ? तर त्याचे नाव नको ! आजही वामनाची मुद्रा समाजमनावर मुद्रांकित होण्याऐवजी बलीराजाचीच मुद्रांकित होऊन राहिली आहे. आम्हाला तर असे वाटते की, युगानयुगे माणूस क्वचितच उदात्त भूमिकेवरून वागतो, पण फार करून क्षुद्रपणानेच वागतो, त्याचे कारण भगवंताने मनुष्यरूपाने घेतलेल्या वामनावतारात त्याच्या हातून झालेली ही महत्त्वाची पहिली चूक तर नसावी ? बळीसारखा पुण्यश्लोक सम्राटाच्या बलवत्तर अस्तित्वाला खो देण्यासाठी भगवंताने वाममार्गाचा आश्रय घेण्याचा निर्णय वामन अवतार घेण्यापूर्वीच घेतला, आणि ही क्रिया करण्यासाठी माध्यम म्हणून वापर केला मात्र माणसाचा ! का ? आपण मनुष्यरूपात अवतीर्ण झालो तर बळीचा तर काटा काढता येईलच, शिवाय आपल्या सदभुत लीलांमुळे आपण मानवातही पूजनीय होऊ असा मोह तर भगवंताला झाला नाही ? साक्षात भगवंत मनुष्यरूपात अवतीर्ण झाल्याबरोबर ईश्वराच्या अपेक्षेप्रमाणे निष्क्रिय माणूस त्याच्या नादी लागला, बळीराजासारखा सक्रिय माणूस फसवला गेला आणि उघड पडला तो भगवंत !
महाभारत-एक सूडाचा प्रवास मधून,
ब्लॉगरच्या वाचकांसाठे

Dilip Khapre

No comments: