नशा शराब मे होता तो नाचती बोतल!!

लग्नानंतर बदलणाऱ्या सवयींमधली सर्वात महत्वाची म्हणजे दारुची सवय. हवी तेव्हा हवी तशी पिणारे, बरेचदा पासधारक बनतात. काही महिन्याचे असतात, काही आठवड्यावाले होतात, मला अजुन वार लावुन पास मिळवणारे भेटायचे आहेत. ऐकुन आहे की लग्नाला वर्षे उलटल्यावर पासाची मुदत वाढते, आणि बसमध्ये जशी "जेष्ठ नागरीक" सुट मिळते तशी मिळु लागते. कितीही झाले तरी जुन्या मित्रांबरोबर ढाब्यावर बसण्याची (अर्थातच प्यायला) मजा वेगळीच.

"सुखमे पियो, दुःख मे पियो, दोनोभी नही इस लिये पियो" असे असणाऱ्यांना दारुडा/बेवडा/पेताड असे अनेक शब्द आहेत. त्यांच्याविषयी मी बोलत नाहीये.

मला म्हणायची आहे सर्वसामान्य जनता, जी मित्रांबरोबर सामाजीक बांधीलकी अशा आदरजन्य नावासाठी पिते. दारु पिणे वाईट आहे हे माहीत असुनही फक्त मित्रांबरोबर चांगला वेळ घालवताना उर्जाद्रव्य (Energy Drink) म्हणुन पिते. असे लोक दारुच्या आहारी कधीच जात नाहीत. यांना फार कमी गोष्टीची चिंता करावी लागते, आज बील कोण देणार? आणि आज रात्री झोपायची व्यवस्था कोठे आहे? घर वर्ज असते, मग मित्राची गच्ची, रिकामा फ्लॅट, होस्टेलचा बंक असा सारासार विचार करुन प्लान बनायचा. काहीजण असतात जे फक्त सावरकर म्हणुनच जन्माला आलेले असतात, डोलकर होण्यात त्यांना अजिबात रस नसतो. माझे काही मित्र तर असे आहेत की चेहऱ्यावरुन पक्के लावाडी कामगार दिसतात, पण त्यांनी दारु कधीही प्यायलेली नसते. कॊणालाही सांगा ते पीत नाहीत, विश्वास बसणे अशक्य, आरश्यात बघता त्यांचा पण बसत नाही. म्हणजे असे लोक जे जन्मजात काळे ओठ घेऊन आले, आणि विना धुरकांडीचे धुराडे झाले. अशा सर्व बांधवांना साष्टांग दंडवत. ह्यानी फक्त धुंदी ठेवायची आणि वाईट सवयी न लाऊन घेता मजा घ्यायची...

अर्थात जर शिकत असाल तर असे प्लान फक्त होस्टेल मध्येच होतात आणि होस्टेल मध्ये अमलात येतात, बाटलीसाठी वर्गणी असते आणि फुकटे जीव एकदम निषिद्ध असतात. कधीतरी बकरा असेल तर, आमंत्रणे "आईजीच्या जीवावर... " या नियमाने वाटली जातात. पण जर थोडे फार कमवत असाल तर बाहेरची चंगळ असते. कितीही कमवत असला तरी ज्याला वर्गणीची पुर्ण चिंता असते, पुर्ण प्यायल्यावर ज्याला जुनी उधार पण आठवते, ज्याला बारमधुन बाहेर पडताना बील चेक करता येते, असे मित्र जगात फक्त मलाच आहेत का? अगोदर दारु न पिणारे पण मजेसाठी येणारे मित्र यायचे, चकणा खाण्यासाठी सगळ्यात पुढे असायचे, मग नियम आले, शिस्त आली, टेबलावर असणाऱ्या साऱ्यांनी समान वर्गणी द्यावी असे ठरल्यावर नेहमीचे चकणे सुधारले. चीज, शेंगदाणे, किंवा बारमध्ये मिळ्णारे फुकटचा चकणा आता आवडेनासा झाला. मग चीज-पाईनॅपल किंवा शेझवान सॉस-नान असे येऊ लागले. कारण न पिता वर्गणी द्यावी लागत असेल तर चकण्यात वसुली करावी हा भोळाभाबडा विचार हे सावरकर करू लागतात.त्यात भारतात शराबी गाणी न पिता पाजतात. अशी अनेक गाणी आहेत जी दारू बरोबर चकण्यासारखी जातात. महाविद्यालयीन दिवसात मिळेल ते पिणारे लोक हळुहळु "ब्रॅन्ड" धारक होतात. मग रॉयल स्टॅग, जोहनी वोकर परवडु लागते. काहीजण अजुनही बीअरच चाखत असतात. फक्त त्याचे नंबर वाढु लागतात, Cannon 5000, 10000....

जीन, रम, व्हिस्की आणि बीअर यातच लोक अदलाबदल करतात. इतर ग्लासांच्या गर्दीत आपला ग्लास ओळखणे हे पण एक कौशल्य असते. ते फक्त सरावाने जमते. टेबलावरचा एखादा पोटातले पाणी कमी करायला गेला की त्याच्या ग्लासात इतर प्रकारची दारु मिसळली जाते, तुम्हाला काय मी सांगणार की याला कॉकटेल म्हणतात. सराईत असणाऱ्याला ग्लासातला फरक समजतो, पण नवा मात्र मित्रविश्वासावर हे नवे सरबत घशाखाली उतरवतो, आणि भसाभस ओकतो. त्याला सावरकर प्रेमात सांभाळतात. पाठीवरुन हात फिरवताना आपण जगातले सर्वात प्रेमळ पात्र असल्याचा भाव तोंडावर असतो. असे सावरकर ही कथा स्वतःच्या प्रेमकथेपेक्षा जास्त चवीने ओकतात, म्हणजे कथन करतात. जमले तर लिंबु सरबत, कॉफी असे घरगुती उपचार पण होतात. ओकणारा परत कधी पिणार नाही असे ठरवतो. असे कधीच होत नाही, एकंदरीत दारु प्यायल्यावर तुमची स्मरणशक्ती कमी होते, दुसऱ्या दिवशीच तो हा प्रण विसरतो आणि लवकरच अशा स्नेह-संमेलनात हौशी कलाकार म्हणुन सामील होतो.

अमेरीकेत जर आल्यावर तर मात्र सगळे बदलते. बाटलीतल्या पाण्यापेक्षा कुपन लावुन मिळालेली कॅनवाली बीअर स्वस्त असते. नेहमीच्या जेवणाखाण्यातच मदिरा असते, येथे सामाजीक जीवनात दारुचे फार महत्व आहे. अगदी रुळलेली "Pick-up line" म्हणजे, "Can I buy you a Drink?" अशी आहे. शॅम्पेनचे नाव घेताच सुखाची भावना येते.... किंवा तकीला म्हणतात जल्लोष आठवतो कारण येथे दारुला चवीचा अंतरा आहे, निरनिराळ्या ग्लासांचा मुखडा आहे, प्रत्येकीला जन्मगांव आहे, आणि गांवावर तीचे नाव आहे. येथे दारु आणि प्रसंग यांचे नाते आहे, त्यात प्रत्येक प्रकाराची आपली आपली ओळख आहे. बाटलीतुन ग्लासात येण्या अगोदर तीला नटवण्याची प्रथा आहे. त्यात वेगवेगळ्याप्रकारे चढवण्याची लकब आहे. काही ठिकाणी जर ती मनोरंजनाचे साधन असेल तर, काही थंड ठिकाणी ती जीवनावश्यक पण आहे. सर्वात महत्वाचे येथे पिण्याच्या प्रमाणाला पण चवी एवढीच किम्मत आहे आणि येथे दारुच्या आहारी जाणाऱ्याला जगात इतर ठिकाणी मिळते तेवढीच किम्मत आहे.

शॅम्पेन, रम, व्हिस्की, ब्रॅन्डी, तकीला, व्होडका, बीअर अशा अनेक प्रकारच्या दारुंपासुन बनवलेले हजारो कॉकटेलस मिळतात. दारु बरोबर दुध, मध, फळांचे रस, फळे, मलाई, काही मसाले, सोडापाणी, काही फुले अशा नानाप्रकारच्या साधनांपासुन बनवली जातात. ती नुसती प्यायला नव्हे तर दिसयला पण मोहक असावीत यावर भर असतो. त्याशिवाय काही लोकांची आवडती कॉकटेलस, शॉट्स म्हटली जातात. मार्टीनी, यीगर बाम, स्क्रु-ड्रायव्हर अशा अनेक प्रकारांनी अमेरीका वेडी आहे. बरेचदा काय प्यावे हा प्रश्न पडावा अशी मायानगरी म्हणजे बार. अमेरीकेत सलान-हाऊस हा प्रकार कित्येक पिढ्या करत आहेत. Jack-Daniels, Johney Walker, Chiva's Regal अशा अनेक कंपन्या जगप्रसिध्द आहेतच.

सर्वात महत्वाची शौकीन दारू म्हणजे, वाईन, लाल-पांढरी, बनवण्याची पद्धत, चव, रंग, द्राक्षाचे प्रकार, द्राक्षे होणारी जागा, वय आणि बनवणारी वाईनरी अशा अनेक प्रकारे हीचे वर्गीकरण होते. वाईनच्या बाटल्या जमा करणे हा अनेकांचा छंद असतो. लोक वाईन मुरवुन पितात, त्यासाठी त्यांच्या पोटमाळ्यावर साठवण्याची सोय करुन ठेवतात. वाईन-चाखण्याचे वेगळे कार्यक्रम होतात, फक्त वाईनचे बार असतात.

देसी भारतात जाताना प्रियजनांसाठी येथुन दारु अवश्य घेऊन जातात. जमली तर युरोपात खरेदी करतात. पण फार कमी देसी बायकोच्या संमतीने पितात. भारतीय स्त्रीजनांमध्ये दारू शौकीन फार कमी आहेत, पण ते प्रमाण नक्कीच वाढते आहे. त्यांना पण समजते आहे की, "नशा शराब मे होता तो नाचती बोतल!!" अमिताभचा शराबी बघताना हे वाक्य कोणीच विसरु शकणार नाही, जे अगदी खरे आहे, नशा दारुत नसते, मित्रांच्या संगतीत असते, प्रसंगाच्या महत्वात असते, पाजणाऱ्याच्या डोळ्यात असते, पिणाऱ्याच्या मनात असते, चकण्याच्या थाळीत असते, बील देणाऱ्याच्या पाकीटात नसेल तर फुकट पिणाऱ्याच्या समाधानात असते, फक्त टेबलावर बसला म्हणुन बीलाची वर्गणी देणाऱ्या मित्राच्या चिडचिडीत असते. ज्यांना ही आंतरीक नशा कमी पडते ते दारू पिऊन त्याची गोडी चाखतात, धुंद होऊन वेळेची किम्मत राखतात. प्यावी, मी म्हणतो पिण्यात काही गैर नाही, त्याचा अतिरेक वाईट आहे. उगाच न पचेल एव्हढी पिऊन इतरांच्या नशेत कमी आणणारे पेताड/बेवाडे ही धुंदी कधी समजलेच नाहीत .. आणि त्यांना ती कधी समजणारही नाही....

Vishal Khapre

2 comments:

Rahul Dekate said...

Hats off !!!

Last paragraph is true..
I am being "Sawarkar" most of my life couldn't understand this before.

Anonymous said...

sahi aahe .... mastach lihilay


-yogesh