वास्तुपुरुष

मानवाच्या मूलभूत गरजा काय तर अन्न, वस्त्र, आणि निवारा. निवार्‍यासाठी माणूस घर बांधु लागला. त्या घराने त्याला सुख, शांती, समाधान मिळते. दिवस भराच्या कष्टानंतर घरी आल्यावर मानवाला अति समाधान मिळते.

मय नावाच्या वास्तु शास्त्रज्ञाने रावणाची लंका बांधली, तेव्हा त्याने सांगितले की प्रत्येक वास्तूचा ( घर, दुकान, मंदिर किंवा असेच कांही ) एक गृहपती असतो, त्यालाच वास्तुपुरुष म्हणतात. घर बांधताना कळत नकळत जीव जंतू मारले जातात, त्यांचे पाप नष्ट व्हावे म्हणून सुध्दा वास्तुयज्ञ करतात. वास्तुपुरुषाची सोन्याची प्रतिमा करुन, त्या सोबत पाच रत्न ठेवून, वास्तुपुरुषाची प्रतिमा उलटी, आग्नेय दिशेस छोटासा खड्डा करुन पुरतात. हाच त्या घराचा वास्तुपुरुष होय. प्रत्येक सणावारी त्याला नैवेद्य अर्पण करतात, असा एक कुळाचार आहे. कांहीजण वास्तुपुरुषाच्या वाढदिवशी ( ज्या दिवशी वास्तुपुरुष पुरला तो दिवस ) सुद्धां नैवेद्य समर्पण करतात.

जर वास्तुपुरुषाला नियमीत नैवेद्य अर्पण केला तर, तो संतुष्ट राहून, घरावर कृपा करतो आणि त्याच्या आशीर्वादाने त्या वास्तुत धनधान्य, संपत्ती, समाधान, पुत्र - पौत्र यांची सतत समृद्धी असते. कारण वास्तुपुरुष नेहमी ‘ तथास्तु ’ म्हणत असतो. म्हणून घरात कांहीही वाईट बोलू नये, वाईट आचरण करु नये, अशुभ - अभद्र बोलू नये असा अलिखीत संकेत आहे.

वास्तुपुरुषाला भूक लागल्यास तो घरभर फिरतो, अन्न शोधतो आणि त्याला अन्न न मिळाल्यास तो उपाशी पोटी घराला शाप देतो, म्हणून वेळोवेळी नैवेद्य दाखवावा. घरात कोणीही अगदी अतिथी सुध्दां आले आणि त्यांनी अन्न मागितले असतां अन्न नाही असे सांगण्याची वेळ आली तर वास्तुपुरुष ‘ तथास्तु ’ म्हणतो, आणि मग घरात अन्न नसण्याची परिस्थिती निर्माण होते. म्हणून जेवण झाल्यावर गृहिणींनी थोडे तरी अन्न झाकून ठेवावे.

पुराणात प्रजापती आणि उषा या दांपत्याला चार पुत्र होते. त्यातील सर्वात धाकटया पुत्राचे नाव होते वास्तोष्पती तथा गृहपती. पृथ्वी ही त्याची गृहस्वामिनी होय. स्वाभाविकच पृथ्वीवर निर्माण केलेल्या प्रत्येक वास्तूचा हा ‘ गृहपती ’ अथवा ‘ वास्तुपती ’ असतो, त्यालाच वास्तुपुरुष संबोधतात.

Unknown

No comments: