एका अमेरीकन मित्राने जेवायला घरी बोलवले होते, तो, त्याची "बायको", "बायको" असे लिहिलंय कारण अमेरीकेत तुम्ही सखी किंवा सखा यापैकी कोणाबरोबरही संसार थाटु शकता, असो आणि "त्याची आणि तीची" तीन मुले. अमेरीकेत घरातली मुले त्याच दोघांची असतील अशी हमी कधीच देता येत नाही, येथे सोडचिठ्ठी झालेले मुलांसहित नवा संसार मांडतात. "छोटा परिवार सुखी परिवार". तीघांपैकी जुळी त्यांची पण एक मुलगी ग्वांटामाला य देशातुन दत्तक घेतलेली. अमेरीकन यजमान नेहमीच चांगला म्हणतात. सारे घर दाखवले, राहण्याच्या खोल्या, उठबस करायच्या खोल्या, त्याच्या गोंडस जुळ्या मुलांच्या खोल्या. मी मुलांना गोंडस हा शेरा द्यायला विसरलो नाही, पण बोलताना "आईवर गेली आहेत" अशी पुणेरी धार त्याला होतीच. त्याबरोबर त्याच्या ४ वर्षाच्या मुलीची अप्रतिम सजवलेली खोली बघताना, मन हरखले आणि विचार सुरु झाले....
इथे सगळेच वेगळे, वयाचे काही महीने झाल्यावर तुमच्यासाठी वेगळी खोली असते. वाढदिवसाला किंवा काही महत्वाच्या दिवशी आजी-आजोबा पण दिसतात. तुमचे जीवशास्त्रीय जन्मदाते, जन्मदाते आणि पालनकर्ते यात फरक असु शकतो. कदाचित तुमच्या नशीबाला यापैकी एकच काही तरी असते. माझ्या देशी मात्र हे सगळे एकच असतात. अमेरीकन मुलांना त्यांच्या आयुष्यात फार लवकर "PRIVACY" नावची सखी आलेली असते. जीची त्यांचे पालनकर्ते मुलांपेक्षा जास्त काळजी घेतात. मला अजुन असे काही माहीत नाहीये पण इंग्रजी सिनेमात बघितले आहे की मुले वडलांना "Mind your business" असे काहीतरी म्हणतात. माझे आज २८ वर्षे वय आहे, पण जर असे काही मी माझ्या तीर्थरुपांपाशी म्हटले तर ते आजही कानफाटाखाली गणेशोत्सव साजरा करतील. येथे जर बापाने, बऱ्याच अमेरीकन मुलांना बाप असतात वडिल असण्यासाठी वडलांनी आयुष्यात पुण्य करावे लागते, असो जर बापाने जर तुमच्यावर हात उगारला तर तुम्ही ९११ (म्हणजे भारतातला १००) फिरवु शकता. हे ९११ चे धडे अमेरीकन शाळेत पहील्या दिवशी देतात म्हणे, आणि त्याला "Child Harassment" म्हणतात. मला शाळेत उपासनी नावाचे मास्तर होते, त्यांनी पोरांना बडवले नाही असा एकही दिवस मला आठवत नाही आणि घरी हे सांगायची सोयच नाही. नूमविच्या प्रत्येक विद्यार्थ्याला ते माहीत आहेत, पण आज एकालाही त्यांनी बडवल्याचे वाईट वाटत नाही. ते शिक्षक आमच्यावर पालकांसारखे प्रेम करतात याची आम्हाला खात्री आहे. अमेरीकेत वयाची काही वर्षे झाल्यावर तुम्ही लहान मोठी कमाई करू लागता, तुमचे स्वतःचे पैसे असे काही काही असते. मला फक्त गल्ल्यात साठवलेले पैसे माहीत आहेत, जे कोणी घरी आलेल्याने हातात ठेवलेले असत. गरज नसेल तर भारतीय आईवडील शालेय जीवनात तुम्हाला कमाई करु देत नाहीत, वाईट सवयी लागतात म्हणे. अमेरीकेत तुम्हाला हवे ते कपडे घालायचे स्वातंत्र्य असते, येथे रस्त्यावर काही मुले जे कपडे घालतात ते बघून लहानपणच्या हडळीची आठवण येते. ओठाला काजळी रंग, काळे कपडे, बापरे. हे नसेल तर जास्तीत जास्त अंगप्रदर्शनीय कपडे, आतली अंतर्वस्त्रे दिसवीत अशी फॅशन आहे म्हणे. मग त्यांना अंतर्वस्त्रे का म्हणायची कोण जाणे? माझ्या लेखनात काही चुक नाहिये पुन्हा सांगतो की असे कपडे शाळेतली मुले घालतात म्हणुन. अहो, मी अजुनही पांढरा शर्ट आणि खाकी पॅंट घालत नाही, शाळेत चाललॊय असे वाटते. लहानपणी स्वातंत्र्य म्हणजे जे फक्त देशाला मिळते हे माहीत होते, इथे ते सगळ्यांना असते. वयाची अठरा वर्षे झाल्यावर आईबाप तुम्हाला घराबाहेर काढतात आणि त्यावयानंतर पालकांबरोबर राहणाऱ्याला येथे विचित्र नजरेने बघतात. मीच काय माझे वडील पण अजुन त्यांच्या पालकांबरोबर राहतात, बहुतेक त्यांनापण हे स्वातंत्र्य अजुन माहीतच नाहीये . "आयुष्यातले बरेच निर्णय आई वडीलांच्या संमतीने घेणे याचा अर्थ तुम्ही स्वतंत्र नाही" हे अमेरीकन तत्वज्ञान १०० टक्के चुक आहे.
येथे लोक आपापली लग्ने आपणच ठरवतात आणि उरकतात. हो!!, उरकतात ५० लोकात लग्न करण्याला पुण्यात अजुनही "लग्न घाईत उरकणे" असाच वाक्यप्रचार आहे. फार कमी लोक तीशी अगोदर विवाहबद्ध होऊ शकतात. त्या अगोदर बरेचदा त्यांना मुले पण झालेली असतात. अहो मुले झाल्यावर पण त्यांच्या तोंडी "I am not sure if she or he is the ONE" असे असते. माझ्या बहीणीचे जेव्हा पुण्यात लग्न झाले तेव्हा दोन्ही बाजुची मिळुन जवळपास १००० पाने उठली. हे आता मी अमेरीकेत कॊणाला सांगतच नाही, त्यांचा पहीला प्रश्न, तुम्ही एतक्या लोकांना ओळखता? अरे हो ओळखतो. आईवडील यापेक्षा जास्त लोकांना नावानेच नव्हे तर, पत्ता, शिक्षण, त्यांचे नातेवाईक, त्यांच्या मागच्या कमीत कमी दोन पिढ्यांसहीत ओळखतात. आजी, आजोबा, नात, नातु, नातसुन, नातजावई, पणती, पणतु, काका-काकु, मामा-माम्या, आत्या-मामा, मावशा-काका, त्या सगळ्यांची मुले, त्यांच्या बायका-मुले, त्यांच्या नणदा, दीर, सुना, जावई, व्याही, विहीण, सासु, सासरे, साडु, मेव्हणे, मेव्हण्या, बहीणी, भाऊ, भावजय, शेजारी, परत मानलेले भाऊ-बहीण, मित्रमंडळी, तुम्हीच मोजत बसा, १००० नक्की पार होणार. मला आश्चर्य वाटते, अमेरीकेत तर प्रत्येकाला खुप नातेवाईक असायला हवेत, कारण येथे नात्यात बऱ्याच जणांची एकापेक्षा अधिक लग्ने झालेली असतात, त्यामुळे सगळे गणित "Exponentially" बदलते. तरीसुद्धा इथल्या लग्नात नातेवाईक सोडुन मित्रमंडळीच जास्त असतात कारण जवळचे नातेवाईक कॊण आणि कुठे आहेत हेच माहीत नसते किंवा त्यांना बोलवायची इच्छा नसते म्हणुनच म्हटले उरकतात.
अशी ही अमेरीका जेथे घराला घर पण नाही, माणसाला माणूस नाही, नाते म्हणजे कळत नाही, म्हातारपणी आईवडील वेगळे राहतात त्यांच्या यातना तेच भोगतात, अशात तुम्ही पण म्हातारे होता, आणि तुमच्या यातना तुम्हीच भोगता. हे एक चक्र आहे. तुमचे कायम तुमच्यापाठी येते. तरूणपणी, उमेदीत कोणाचीच गरज लागत नाही, जसजसे वय सरते तसे याची नक्की आठवण येते. चांगल्या आठवणीच्या देशात कुठेतरी बालपण आठवते.. आणि बालपण म्हणताच मी पुण्यात शिरलो...
मी पुण्यातल्या शुक्रवार पेठेत दोन खोल्यांच्या घरात वाढलो, दोन कसल्या दीडच खोल्या त्या. घरात माणसे सात, आईवडील, तीन भावंडे, आजी-आजोबा. कसे राहात होतो हे आम्हालाच माहीत आहे. त्यात आमचे कौतुक असे काही नाही, आमच्याप्रमाणे भारतात अनेक कुटुंबे जगतात. मुंबई-पुण्याच्या मानाने मी अगदी सर्वसामान्य घरात वाढलो कारण या शहरात सरासरी लोक याच आकाराच्या घरात राहतात. आईच्या मायेत, वडलांच्या शिस्तीत, आजोबांच्या लाडात आणि सुगरण आजीच्या हातचे खाऊन आम्ही भाऊ-बहीण मोठे झालो, घरच्या परिस्थितीत जमेल तेवढे शिकलो आणि कामधंद्याला लागलो, देशाबाहेर आलो. चांगल्या पगाराच्या जीवावर घराचा आकार वाढवला. आईवडील आता बऱ्याच मोठ्या घरात राहायला आले, नाना प्रकारच्या सुखसुविधेच्या चीजवस्तु घरात आल्या, आराम वाढला, समाजात स्थान वाढले. दोनवर्षात एकदा पुण्याला जाणारा "माझा मी" परवा "स्वप्नात" पुण्यात गेलो होतो, सुखाची चादर मनावर पांघरून घरच्या मायेची ऊब घेणारे ते स्वप्न. घर दिसले ते शुक्रवार पेठेतले घर, छोटे का असे ना. एक समजले की नवे घर मोठे असले तरी ते माझे कधी झालेच नव्हते, मी अजुन लहानच होतो, जुन्या वाड्याच्या त्या इवल्याशा भाड्याच्या घरातच अजुन माझे सारे सुख अडकले होते. घर म्हटले की मला फक्त तेच घर का दिसते? हा प्रश्न इतिहासाच्या परीक्षेतला "पहील्या महायुद्धाची कारणे सांगा" सारखा अवघड दिसणारा पण पाठांतराने सहज जमणारा नाही. या प्रश्नाला महायुद्धाचे महत्व नाही की पहीला-दुसरा असा क्रमही नाही, ह्याला गुण पण मिळणार नाहीत. पण जर नवीन घर मोठे होते, सोयीचे होते, पण ते माझे झाले नसेल तर वाटते की मी या परीक्षेत नक्की नापास झालो. कारण शोधायची गरजच पडली नाही. नवीन घर घेतले पण त्या घरी मी फक्त महीनाभर राहीलो असेन. सुट्टीवर जातो आणि पाहुण्यासारखा राहतो. जुन्या घराची त्याला सर नाही, आधी शाळेतुन मी परत यायची वाट बघणारी आई आता मला सुटी मिळण्याची वाट पहाते आहे. मला प्रगतीपुस्तकावर झापणारे वडील आता माझ्याशी ईमेलवर/चॅटवर बोलतात. अगदी पाककृतीचे पेटंट घ्यावेत असा स्वयंपाक करणारी आजी आज मला तीच चव मिळावी म्हणुन तीच्या नातसुनेला (माझ्या बायकोला) फोनवर "Tips & Tricks" देते. ते घर आता आहे कुठे? बहुतेक माझ्या मनात, कुठेतरी खुप खोल दडलंय.... त्याला आजी-आजोबांच्या लळ्याचा पाया आहे, त्याला वडलांच्या धाकाच्या भिंती आहेत, आईच्या मायेचे छत आहे, काका-मामा-आत्या-मावशा नावाच्या खिडक्या आहेत, समाजाचे कुंपण आहे, मास्तरांची दारे आहेत, त्यात भावाबहीणींचे झरोके आहेत... प्रत्येक भारतीयाच्या घराची "Recipe" सेम नसली तरी त्याची चव मात्र सेम आहे... आणि जाताजाता अमेरीकन मित्राच्या घराचे कौतुक करत म्हटले,
घर म्हणजे घर असतं,
तुमचं आणि आमचं सेम नसतं....
तुमचं आणि आमचं सेम नसतं ....
Popular Posts
-
आत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा ...
-
************CLARIFICATION******************* बरेच विरोप आल्याने मला हे स्पष्ट करावेसे वाटत आहे की.... मी लिहिल्याप्रमाणे, मी चोराची बाजु अज...
-
१२ जुलै १९६१, आम्ही ११ वर्षांचे होतो, त्या वेळेची आठवण ठेऊन ’सकाळ’ने आठवणी जाग्या केल्या त्याबद्दल धन्यवाद. खरोखर त्या भयानक पुरापेक्षाही,...
-
पाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...
-
नुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , "चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी...
-
विश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...
-
कोणत्यातरी कामासाठी मी बायकोला घेऊन मोटरसायकलने बाहेरगावी गेलो होतो. परतायला रात्र झाली, पण सकाळी तातडीचे काम असल्यामुळे घाईने निघालो. मध्ये...
-
मानवाच्या मूलभूत गरजा काय तर अन्न, वस्त्र, आणि निवारा. निवार्यासाठी माणूस घर बांधु लागला. त्या घराने त्याला सुख, शांती, समाधान मिळते. दिवस ...
-
मुस्लीम समाजाने पावसासाठी केलेली प्रार्थना हे अल्लाह, आमच्या हातून गुन्हे घडल्यामुळे तू पाऊस रोखून धरला आहे, याची आम्हाला जाण आहे. आमच्या ...
-
Recently a Muslim kid named Ahmed Mohamed from Texas was arrested and suspended from school when he showed his home built "clock...
5 comments:
waaah!!!!!
ekdam zakkas... now waiting for your next blog :-))
जगणे ही विक्रुती आहे. एकाचे अम्रुत ते दुसर्याचे वीष. एकच माणूस, घरे दोन. एकच मन प्रतिक्रीया दोन. लेख चांगला याबद्दल मत्र काहीही दुमत नाही.
हेमंत_सूरत
अतिशय सुंदर पोस्ट! शेवटी आयुष्यात यश आणि पैसा असला म्हणजे समाधान असतंच असं नाही. समाधान दुसरीकडेच कुठे असू शकतं. आणि ते मिळवायचं असेल, तर यश आणि पैशाचा ध्यास जरा कमी करावा लागतो.. तरीही परवडतंच.. परदेशातून कायमस्वरूपी भारतात परतण्याविषयीचा माझ्या एका मित्राचा हा पोस्ट जरूर वाचा =>
http://himan8pd.blogspot.com/2006/08/indias-brain-drain-different-views.html
Vaa....
mast...Mala pan amchya kolhapurchi pahr atavan ye ....
Gadya pala gav shevati bara astao...
parantu aplyakade sudha gharala ghar pan urale nahi
SANJEEVANI Lucknow
Post a Comment