काही दिवसांपुर्वी एका गोर्या मित्राने विचारले की आता तु कायम इथेच राहणार का? मन बावचळले आणि काही वर्षांनी कायमचा परत फिरण्याच्या माझ्या प्रतिज्ञेची आठवण झाली. पुढच्या वर्षी, पुढच्या वर्षी असे म्हणत आम्ही फक्त सुटीलाच जात राहीलो, आणि जीवनातील प्रत्येक घडामोड माझ्या प्रतिज्ञेला बोथट करत राहिली. मी दरवर्षी भारतात जायचा विचार करतो. दरवेळी जमतेच असे नाही. मात्र जेव्हा जातो तेव्हा हाच प्रश्न, आपण भ्रारतात का जातो?
जवळपास ४० वर्षांपुर्वी मुंबईचे गिरणी कामगार दरवर्षी सुटीला कोकणात जाणारे आणि मागील काही वर्षात अमेरीकन देसी संगणकी पेशेधारी भारतात जाणारे - दोन्ही सारखेच. दोघाच्या पिशव्यांची तपासणी करता लक्षात येईल की काळ बदलला पण जेमतेम जिन्नस तेच. आई वडीलांची खरेदी, नवीन उपकरणे आणि आपल्या गावी करायला गुंतवणुकीची रक्कम. आजकाल रक्कम महाजालावरुन जात असल्याने ती नसेल कदाचित. मागे राहीलेल्या नात्यांची ओढ ह्यांचा प्रवासाचा ताण कमी करते, पण ह्यांची ओढाताण मात्र इतके वर्ष तेवढीच आहे. वर्षभर अजिबात सुटी न घेता तीळ तीळ सुटी साठवतात, ती २-३ आठवडे भारतात घालवण्यासाठी. वेळ कमी आणि नातेवाईक जास्त. सुटी कसली ती तर वेळेवरची कसरतच म्हणायची. परतल्यावर सर्वातोंडी एकच "सुटी पुरेशी नाही".
मी "संगणकी" या भटक्या जमातीत (Nomadic Tribes, N.T. you know) मोडतो. माझ्या या जमातीविषयी बोलु तेवढे थोडे. पोटासाठी जगभर फिरणार्या या जमातीतील लोक आता कायमचे परत जावे असा विचार करत आहेत, माझ्या काही जातीबांधवांनी प्रस्थान सुद्धा केले आहे. सध्या भारतात बरीच कामे मिळु लागल्याचे मी पण ऐकुन आहे, आणि इतर देशातील काम कमी होऊ लागले आहे. थोडक्यात काय तर माझ्या मते ही भटकी जमात आता भारतीय राहीली नसुन जागतिक भटकी झाली आहे. कारण ते आता भारतात माझा देश म्हणुन जात नसुन पोटासाठी जात आहेत. का जाऊ नये, कशासाठी? पोटासाठी?
काही वर्षे अशीच उडून जातात, आणि या वार्षिक स्थलांतर करणार्या पक्षांचे सारे गुण दाखवणार्या या भारतीयांच्या घरी नवी पिले जन्म घेतात. सुशिक्षीत आईबाप आपल्या पाखरांची चांगलीच काळजी घेत असताना त्यांना जाणवते की ही पिले काही भारतीय नाहीत. यांनी जर अभारतीय गुण दाखवले तर पंचाईत होणार हे जेव्हा मनी भरते त्यावेळी मात्र यांचे इतक्या वर्षांचे भारतपरतीचे स्वप्न परत उभारी घेते. मुलांना भारतीय बनवायची इच्छा ह्यांना खुपच लुभावते. पण ह्याचा कोणीच विचार करत नाही की आता भारतात सगळेच अमेरिकन ह्वायची मनोकामना बाळगुन आहेत. अनिवासी भारतीयांनी बघितलेला भारत सरासरी ५-६ वर्षे जुना आहे. आता सुटीवर जाणार्यांना भारतात सगळे सुंदर दिसत असते कारण ते बर्याच अवधीने भारतात फिरायला जातात. ज्यावेळी राहायची वेळ येईल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की अमेरीका बरी पण भारत आवरा.
परत जाणारे हुशार आणि खुपसा अनुभव पाठीशी बांधुन जातात. त्यांना मिळणारे काम पण खुप सारा पैसा देते, पण ते काम तुमचा जास्तीत जास्त वेळ मागते. पण अजुन हे कळत नाही की भारतात आता सारे काही मिळते, पण अमेरीकेत तुम्ही मुलांना जेव्हढा वेळ देऊ शकता, तेव्हढा भारतात देणे शक्य होत नाही. आता यांची मुले भारतातल्या साध्या शाळांमध्ये शिकण्यास अपात्र असतात, ती फक्त आंतरराष्टीय शाळांमध्येच शिकु शकतात. शेवटी काय तुम्ही अमेरिकेत वाढणार्या मुलांप्रमाणे आपल्या मुलांना शिकवता, आणि त्यांना वेळही देऊ शकत नाही. भारतातले मागील काही वर्षातले बदल बघता, धक्का बसतो. मुंबई-पुणे सारख्या शहरात तुम्हाला अमेरिकेचे आभास होतात पण सामाजिक विषमता अमर्याद वाढली आहे, त्याकडे तुमचे लक्ष कधीच जात नाही. लहानपणी "Cartoon Network" बघणारी मुले थोडी वयात आली की "M-TV" बघतात. भारतात जाण्या अगोदर एकदा M-TV वर "Rodies" हा कार्यक्रम बघा, किंवा "Date - Meet or Delete" बघा, तुम्हाला सामाजिक विषमतेचा धक्का नक्की बसेल. आज जर ही अवस्था असेल तर विचार करा, तुमची मुले वयात येताना काय असेल.
मुलांच्या भवितव्याचा विचार करणार्या पालकांनो, कदाचित आज तुम्ही चांगला निर्णय घेत असाल, पण जरा भविष्याचा विचार करा. तरीही तुम्हाला मान्य असेल तर खुशाल जा. भारतातील मोठ्या शहरातील घटस्फोटाचे प्रमाण अपार वाढले आहे. अल्पवयीन समागम हे अगदी नित्य झाले आहे. आपल्या लाडक्यांना कसे मोठे करावे हा प्रत्येक पालकाचा आपपला प्रश्न आहे. मुलांचे आजी आजोबा जर मदत करणार असतील तर अगदी उत्तम. पण त्या वृद्धापकालीनांना हे नवे आंतरराष्टीय शाळांचे शिष्टाचार समजणे अवघड आहे हे ध्यानी ठेवा. वाढत्या धकाधकी जर तुम्ही मुलांना सुविधा देणार असाल आणि वेळेची जर टंचाई असेल तर तुम्ही भारतात जाऊन काय मिळवणार आहात? माझे अनेक मित्र सध्या त्यांच्या कुटुंबाबरोबर भारतात गेले आहेत. सुरवातीला सगळे छान असते, कारण नवे घर, नवीन तरतरी, ह्यातुन तुमचे डोळे उघडताना वर्ष उलटते. स्वतःची उलट तपासणी करता त्यांना पण लक्षात येत आहे की आता काय? भविष्यात बघण्याचे वरदान मला नाही, परिस्थितीचा अंदाज नक्की आहे. तुम्ही पण तो घेऊ शकता फक्त डोळे आणि मन उघडे ठेवा.
भारत चांगला नाही मला असे अजिबात म्हणायचे नाहीये, मात्र तो आता तुमच्या परिचयाचा राहीला नाहीये. तुम्हाला हव्या असणार्या सुखसुविधा तेथे आहेत, मात्र तुमचे बालपण जे तुम्ही तुमच्या मुलांना देऊ इच्छीता ते आता तेथे नाहिये, हे ध्यानी ठेवणे आवश्यक आहे. जे तेथे नाही ते तुमच्या मुलांना देण्याचा हट्ट धरू नका आणि जे खरोखर तुम्हाला द्यावेसे वाटते, शिकवावे वाटते ते तुम्ही मुलांना कुठेही शिकवु शकता. त्यासाठी तुम्हाला भारताची गरज नाही, भारतीय संस्कारांची गरज आहे, जे तुमच्याकडे आहेत हे लक्षात ठेवा.
इतकी वर्षे भारतीय संस्कार जपुन अमेरिकेत भारत वसवणार्यांनो, तुम्ही तुमच्या मुलांच्या मनात भारत कोठेही बसवु शकता. स्वतःवर आणि तुमच्या भारतीय मुळांवर तेवढा तरी विश्वास ठेवणे आवश्यक आहे. ह्या विचारातुन माघारी फिरत गोर्या मित्राला म्हटले, माझी पिढी फारच कमनशिबी आहे. उमेदीच्या दिवसात आईवडिल भारतात होते, म्हणुन स्वावलंबी म्हणा अथवा एकटे म्हणा, असे अमेरिकेत आहोत. आणि आयुष्याच्या उत्तरार्धात कुठे असेन माहित नाही, आणि मुले मनाने माझ्या देशात असतील याची शाश्वती नाही. कसे ही असो माझे भाषण त्याला समजले का नाही कोण जाणे, पण मला मात्र समजले की मी काय करायला हवे.
4 comments:
सगळा लेख पटला. पण काय करायला हवे - म्हणजे तुमचा निर्णय काय ते कळलं नाही!
kharokhar vichar karnya satkhi goshta ahe...me pan hach aagdi hach vichar karun bhartat jato ahe.. pan tumhi je vichar mandle ahet te aagdi javalun me anubhavle ahet.. aani ya goshticha me nakki vichar karin...
राव. . .नाय पटलं. . .आम्ही तुमच्या मानाने हल्लीच भारतातून इकडे आलोय. . तिकडे फरक नाही फारसा. हा आता मोबाईल, गाड्या, फॅशन असे किरकोळ बदल आहेत पण तितकेच.
आंतराष्ट्रीय शाळा काय पुर्वी नव्हत्या? मॉडर्न हायस्कूल, गरवारे, भावे स्कूल, नुमवि, न्यू इंग्लिश स्कूल अजूनही आहेत. बदललीये फक्त तुमची दृष्टी. तिकडे गेल्यावर कुतरओढ मुलांची नाही होणार, तुमची होईल. आपल्या मुलाने गणपतीत वर्गणी मागायला किंवा ढोल वाजवायला जाणे जर तुम्हाला कमीपणाचे वाटत असेल तर दोष तुमचा. जाऊन तर बघा, तुमची मुले अजूनही शनिवारवाडा आपला मानतील. महाराजांच्या पाऊलखुणा शोधत सह्याद्रीत भटकतील. भाषेवर आणि आपल्या दगडांच्या देशावर मनापासुन प्रेम करतील. फक्त तुम्ही पहिलं पाऊल टाका.
अमित
xetropulsar उर्फ़ अमितशी पूर्ण सहमत. आणि फ़क्त मुलं आणि आपण हाच फ़क्त विचार का? आपल्या आधीची पिढी - भारतात माघारी सोडून आलोये ते आई-वडील - हे ही या निर्णयात विचारात घेतले पाहिजेत. त्यांनी त्यांचं आयुष्य तिथे घालवलेलं असल्याने त्यांनी अमेरिकेत येवून स्थायिक व्हावं अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. आणि त्यांना आपली अधिकाधिक गरज पडत जात असताना आपण फ़क्त अधूनमधून ६ महिन्यांचा टूरिस्ट व्हिसा आणि तिकिटांचे पैसे पाठवून कर्तव्य पार पाडल्याचं समाधान नाही मानू शकत.
आणि बरं भारतात न परतण्याचा निर्णय घेऊन, अमेरिकेत जर राजेशाही आणि सुखासमाधानात आनंदाने रहाता आलं तर मान्यही होतं. पण अमेरिकेत राहूनही वेगळ्या पण तितक्याच त्रासदायक लेव्हलच्या चिंता, दु:ख, अवहेलना, बोच आयुष्याचा भाग रहाणार असेल, तर काय उपयोग?
भारतात गेल्यावर निरखून पाहिलं तर दिसेल की आपली चुलत, मावस, मामे, आत्ये भावंडं तिथेच नोकऱ्या करत असूनही जास्त आनंदात रहातात. गेल्या ६ महिन्यांत ते आपल्यापेक्षा जास्त वेळा खळखळून हसले असतील. सणवार त्यांनी आपल्यापेक्षा कैक पटीने जास्त उत्साहात साजरे केले असतील. आणि आजूबाजूच्यांना जास्त माया, प्रेम, मैत्री दिली घेतली असेल - तर कुणाचं आयुष्य चांगल्या क्वालिटीचं? त्यांचं का आपण अमेरिकावासियांचं?
माझं मत - परदेशात मेहनत करून खूप पैसे कमवावेत. आणि मुलांच्या शिक्षणाच्या वयात भारतात मोठ्या कुटुंबात त्यांना घेऊन जावं. आणि तिथेच स्थायिक व्हावं. प्लॅन तर असाच आहे, तो कार्यान्वित करण्याचं बळ उपरवाला मला देवो!
Post a Comment