जागा

जन्माला आल्याआल्या आपल्याला माणसांची ओळख सुरू होते. कळत नसते पण तोंडओळख होते. आजूबाजूचे लोक येऊन हसत बोलत असतात. सर्व जण गोडच बोलतात कारण त्यांना पक्के माहित असते कि, या बालकापासून काहिही फायदा तोटा नाही. पण त्याच लहान बाळाने अंगावर ’सू’ केली, कि लगेच त्याला त्याच्या आईकडे दिले जाते. जसजसे आपण मोठे होतो तसतसे आपल्याला जग कळते आणि आपल्यालाही जग ओळखते. शिक्षण पूर्ण होते, कामधंदा सुरू होतो, आणि संपर्कातील माणसांची संख्या वाढते.

जन्माला येताना काही नातेवाईक अपरिहार्य असतात, टाळता येत नाहीत, नातेवाईकांनाही आपले नाते टाळता येत नाही. मग होतात मित्र, ते जोडणे, मात्र आपल्या हातात असते, पण पन्नास टक्केच बरे का, कारण त्यालाही चॉइस असतोच ना? जो प्रकार मुलांच्या बाबतीत तोच मुलींच्या बाबतीतही. बालपणातले मित्र तरूणपणात, तरूणपणातले नंतर कमीकमी होत जातात, तर काही संगतीत राहतात. कधी नातेवाईक जवळचे तर कधी मित्र जवळचे असतात. किती प्रकार ना? नातेवाईक, जवळचे लांबचे, मित्र, शेजारीपाजारी, कधितरी कुठेतरी ओळख झालेले, शाळेतील मित्र, घराजवळचे मित्र, ऑफिसातले मित्र, व्यवहारातील ओळख झालेले, रस्त्यात भेटल्यावर पत्ता शोधत घरी येणारे, नुसतेच हाय करणारे, प्रवासात भेटणारे, किती प्रकार. 

घर असते, येणारे घरीच येणार, कधीतर बळेच घरी येणार. आता आपण हे ठरवायचे कि, कोणाला घरी आणायचे कोणाला नाही, नंतर पस्तावण्यापेक्षा आधीच विचार केलेला बरा नाही का?

रस्ता, गल्ली, घराचे अंगण, दरवाजा बाहेर, दरवाजाच्या आत, हॉलमध्ये, आपल्या समोर, आपल्या शेजारी, फक्त बोलण्यापुरते, चहापुरते, चहासोबत काही खायला देण्या पुरते, काही सोबत जेऊ शकतात, तर काही पार स्वैपाकघरात सुद्धा येऊ शकतात. आता एवढ्या प्रकारात कोणाला कशी वागणूक द्यायची ते आपण ठरवायचे असते,  काय? काही माणसे रस्त्यात भेटल्यावर तिथेच सोडून द्यायचे असतात, तर काही पार स्वैपाक घरात न्यायच्या लायकीचे असतात, मग तिथे नातेवाईक का मित्र हा विचार नसतो. रस्याच्या लायकीचा जर स्वैपाकघरापर्यंत पोहोचलातर काय अनर्थ होईल कल्पनाच न केलेली बरी. तेव्हा प्रत्येकाची जागा आपणच ठरवायची असते, एवढेच नाहीतर त्यांच्या जागासुद्धा प्रसंगाप्रमाणे, त्याच्या वागणूकीप्रमाणे बदलायच्या असतात, तिथे कोणाचीही भिडभाड ठेऊ नये, नंतर जड जाते, आयुष्य बदलून जाते, संसार उधळून जातो. दारावरच्या कोणालाही त्याच्या वागणूकीप्रमाणेच हळूहळू आत येऊ द्यावे, आणि तसेच बाहेरही ढकलण्याची मानसिक तयारी ठेवावी. आपणही दुसर्‍याच्या घरी जाताना विचार करावा कि आपली तिथे कोणती जागा आहे.

मात्र घरातील देवाचे स्थान अशा ठिकाणी असावे कि त्या ठिकाणी कोणीही पोहोचता कामा नये, कोणालाही तेथपर्यंत नेऊ नये.

शेवटी काय तर माणसाची प्रसिद्धी, प्रतिष्ठा कशावरून ओळखायची तर, त्याच्या अंत्ययात्रेला किती लोक जमतात, त्यावरच ना?       

Unknown

No comments: