एक धार्मिक चिंतन-१

या जगात फक्त एकच धर्म सनातन आहे तो म्हणजे हिंदू धर्म. याला फार पुरातन परंपरा आहे. हिंदू धर्माला चार वेद, भगवद्‌गीता, रामायण, महाभारत यांची शिकवण आहे.या ग्रंथांनी मनुष्याने आयुष्यात कसे वागावे,मानवधर्म म्हणजे काय,त्याचे पालन कसे करावे याबद्धल सविस्तर सांगितले आहे. संपूर्ण आयुष्याचे, ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, आणि संन्यासाश्रम अशा चार आश्रमात भाग पाडून,त्या त्या वेळेसची आदर्श जीवनपद्धती हिन्दू ऋषी मुनींनी, धर्म शास्त्रकारांनी, थोर मोठ्या संतांनी, जुन्या विचारवंतांनी लिहून ठेवली आहे,आणि ती इतकी परिपूर्ण आहे कि बाकी सर्व त्या समोर गौण आहे. 

फक्त ३००० वर्षांपर्यंत जरी विचार केला तरी भारतात हिन्दू धर्माला एक विचार,आचार,जीवनपद्धती होती. भारताला खूप मोठी संतपरंपरा आहे. भारतात गौतम बुद्ध,गुरुनानक, भगवान महावीर, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम वगरैंसारख्या थोर विभूती झाल्या. शिवाजीमहाराज, राणा प्रताप सारखे थोर लढवय्ये झाले. महात्मा गांधीं सारखे देशभक्त झाले.

आता जर आपण नीट विचार केला तर असे लक्षात येईल की, या सर्वांचे पूर्वज कोण होते. हिंदूच ना? त्यांच्या मागे एक हिंदू संस्कृती, हिंदू विचार होते ना? त्यावेळेस जन्म विधी, लग्नसंस्कार, शिक्षण, पूजा विधी, अंत्यसस्कार किंवा अन्य विधी यांसाठी कोणतीही अडचण आली नाही. सर्वांनी हिंदू धर्माचे पालण केले. हिंदू धर्मीयांची जीवनपद्धती, ईश्वराबद्धलच्या कल्पना, इतर धर्मियांबद्धलचा आपलेपणा, जीवनविषयक तत्वे इतकी स्पष्ट होती कि त्यात कोणीही नवीन भर टाकण्याची गरज नव्हती.चार वेद, भगवद्‌गीता, रामायण, महाभारत यातील आदर्श तत्वे आजही तितकीच प्रभावी आहेत कि याव्यतिरीक्त आदर्श काहीच असू शकत नाही. भारतीय इतिहासात गुप्त, चालुक्य वगैरे मोठ मोठे राजे होउन गेले त्यांची राज्ये हिंदू म्हणूनच लयास गेली.शिवाजी महाराजांनी मोगलांविरूद्ध युद्ध केले हिंदवी साम्राज्याचा पुरस्कार केला.त्यावेळेस भारतातील बहुसंख्य लोक महाराजांच्या पाठीशी उभे होते,त्यांच्या एका शब्दाखातर लोक प्राण द्यायला तयार होते,जर महाराजांनी दुसरा धर्म स्थापन करावयाचे ठरवले असते,तर किती जणांनी तो धर्म स्विकारला असता? सर्वांनीच,होय ना? पण त्यांना दुसरा धर्म स्थापावा असे वाटले नाही, याचे कारण कोणी सांगेल काय? पूर्व हिंदु राजांना नवीन धर्म का स्थापन करावा वाटले नाही? मग त्या काळात नवीन धर्म स्थापण्याची जरूरी का भासावी? बरे सर्व धर्मांची शिकवण एकच आहे ना? मग त्यासाठी नवीन धर्माचे व्यासपीठ कशासाठी?

नवीन धर्म स्थापला कि,त्यांचे अनुयायी तयार होतात, त्यांना धर्माचा अभिमान वाटणे स्वाभाविक आहे.आता जर नीट विचार केला तर असे लक्षात येते कि नवीन धर्मापेक्षा हिन्दू धर्माचाच प्रसार का केला गेला नाही?

जगातील सर्व धर्मांच्या धर्मग्रंथांचा अभ्यास केल्यास असे दिसून येते कि, सर्वांचे अंतिम ध्येय एकच परमेश्वर प्राप्ती आहे.

येशु ख्रिस्ताने ख्रिश्च्न धर्म स्थापन केला, पण त्यानंतर कोणाही संतांना नवीन धर्माची आवश्यकता भासली नाही. सर्वांनी त्या धर्माचाच प्रचार आणि प्रसार केला. त्या धर्माचीच तत्वे लोकांना पटवून दिली आणि तीही एवढ्या प्रभावीपणे कि, लोकांनी धर्म बदलला आणि त्या धर्मात प्रवेश केला.

दरवर्षी महाराष्ट्रातील आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांची तर देहूहून संत तुकाराम महाराजांची पंड्गरपूरला पालखी जाते, त्या पालखीसोबत लाखो वारकरी असतात, ते सर्व वारकरी संप्रदायाचे असतात, त्यांचा धर्म हिंदू आहे. या सोहोळ्यात दर वर्षी हजारो लोकांची भर पडते, का ते सर्व एकत्र येऊन वेगळा संप्रदाय स्थापन करू शकत नाहीत काय? नाही, तशी गरज भासत नाही कारण या धर्मातील तत्वे परिपूर्ण आहेत.

आता असा एक विचार येतो कि मग आर्य लोक जे भारतात आले त्यांचा धर्म हिंदूच ना? तोच धर्म आजपर्यंत सर्वांनी का पाळला नाही? त्यांनीच आपल्याला, म्हणजे पूर्वजांना वेद दिले ना? त्यात असं काय नव्हतं कि, वेगळा धर्म स्थापून ते सांगण्याची गरज भासावी.

आज भारतात हिंदू आहेत, शिख, बौद्ध, जैन, पारशी, मुस्लीम वगैरे अन्य धर्मीय आहेत. फार पूर्वी भारतात फक्त हिंदूच होते. नंतर मोघलांनी भारतावर आक्रमण केले आणि इथल्या लोकांवर राज्य केले आणि इथेच स्थायिक झाले. नंतर इंग्रज आले ते सुद्धा इथेच राहिले, कित्येक हिंदू धर्मियांना त्यांनी धर्मांतर करायला लावले, असे ख्रिश्चन भारतात आहेत, त्यांचे चर्च आहेत तेथे ते लोक आहेत. म्हणजे इसवी सनापूर्वी भारतात फक्त हिंदूच होते. म्हणजेच जसजशी धर्मांची संख्या वाढू लागली, तसतसे  मूळ धर्मातील अनुयायी वेगळे होऊ लागले, धर्माचा अभिमान वाढू लागला. प्रत्येकजण आपलाच धर्म श्रेष्ठ म्हणू लागले. आपापसात तेढ वाढली. मग असे वाटते कि, जगात एकच धर्म असावा काय? निदान भारतात तरी का नसावा? जगाच्या नकाशावर पाहिले असता भारत हा एकच असा देश आहे, कि जेथे धर्मांची संख्या जास्त आहे. इथे असेही काही लोक आहेत कि, ज्यांच्या पूर्वजांचा धर्म हिन्दू होता आणि ते आता दुसर्‍या धर्माचे आहेत.

फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे, एक महापराक्रमी राजा होता.त्याचे राज्य फार मोठे होते.सर्व इतर राजे त्यांना घाबरून असत. राजाने राज्यात एक आचारसंहिता बनवली होती.कायदे बनवले होते. सर्वजण गुण्यागोविंदाने रहात होते. राज्यात अनेक छोटी छोटी राज्ये होती  पण त्यांचा राजा एकच होता. एके दिवशी काय झाले, एका गावातील एका माणसाने सांगितले, या राजाचे कायदे चांगले नाहीत, नियम बदलणे आवश्यक आहे, असे लोकांना पटवून देऊन नवीन राज्य स्थापन केले, लोक अज्ञानी होते, त्यांना समजलेच नाही कि, याने त्याच राजाचे नियम, कायदे फक्त वेगळ्या भाषेत सांगितले आहेत, ते बिचारे त्याच्याच मागे जाऊ लागले. मग अशा प्रकारे अजून काही जणांनी अजून वेगळे समुदाय स्थापन केले.अशा प्रकारे मूळ राज्याचे अनेक भाग पडले आणि त्याच्यात भांडणे होऊ लागली. जर नवीन काही निर्माण करण्यापेक्षा त्या मूळ राजाचेच राज्य वाढविले असते तर? 

ख्र्रिश्चन धर्माची स्थापना येशु ख्रिस्ताने केली,मुस्लीम धर्माची मोहम्मद पैगंबराने केली तशी हिंदू धर्माची स्थापना कोणी केली?

उत्तर अवघड आहे ना? पण तितकेच खरे आहे, हा धर्म पूर्णपणे संपूर्ण आहे. या धर्माचा पाया, तत्वे, परमेश्वराची संकल्पना एवढी भक्कम आहे कि कोणीही या धर्मापासून वेगळा विचार करण्याची गरज नव्हती आणि नाही.

वरील सर्व प्रश्नांची उत्तरे कोणी देऊ शकेल काय? यात कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही,फक्त इतिहास जाणून घेण्याचा हेतू आहे.तरीही कोणाच्या भावना दुखावल्यास आम्ही दिलगीर आहोत.

 भाग२-परत भेटू यात.

Unknown

No comments: