बाबा आणि अम्मा

आपल्याला या भारतात एक कर्तबगार बाबा, महाराज, अम्मा, ताई वगैरे बनून नाव, प्रसिद्धी, पैसा मिळवायचा असेल तर खालीलप्रमाणे कमीतकमी पात्रता (qualification) पाहिजे.

१) आकर्षक व्यक्तिमत्व पाहिजे.

२) नावापुढे किंवा नावाआधी पुरूषांनी परमपूज्य, कृपालू, दास, महाराज, नाथ, बाबा, ह.भ.प., राधा, स्वामी, योगी, बालयोगी, सिद्धयोगी आणि स्त्रीयांनी अम्मा, अक्का, मा, माता, बाई, देवी, बहेना अशा उपाध्या लावण्याची तयारी ठेवावी.

३) स्वतःच्या जयंत्या साजर्‍या करताना लाज बाळगू नये.

४) लाज, शरम, मान, अभिमान सर्व गहाण टाकावे.

५) धर्माचा अभ्यास चांगला असावा, शिवाय लोकांना न समजेल अशा भाषेत धर्म, अध्यात्म समजावून देता आले पाहिजे.

६) छोटेमोठे जादूचे प्रयोग शिकून घ्यावेत.

७) शिष्यगण भरपूर असावा, त्यात महिलांना प्राधान्य द्यावे.

८) स्वतःचे माहात्म्य सांगणारी पुस्तके, हॅंडबिले छापून वाटण्याची तयारी ठेवावी.

९) कोणतीही तक्रार आल्यास तक्रार निवारण न करता, तक्रारदारालाच निवारण करता आले पाहिजे.

१०) कमितकमी बोलावे, शक्यतो शिष्यगणांनाच बोलू द्यावे.

११) नकली गिर्‍हाईक ओळखण्याची क्षमता पाहिजे.

१२) खालील वस्तु जवळ बाळगाव्यात - लिंबू, सुई, टाचण्या, भगवी कफणी, पांढरे कपडे, कमंडलू, रूद्राक्ष, शंख, बिब्बा, कवड्या, उडीद काळे आणि पांढरे, काळे दोरे, अंगारा, पाणी,जानवे, लाल दोरा, भंडारा, नारळ, देवांच्या मूर्ती, हळदीकुंकू, त्रिशूल, तावीज वगैरे.( हे सर्व साहित्य विकण्याचे दुकान नातेवाईकालाच द्यावे.)

आमचे असे ऐकिवात आहे की,या देशातील सर्व बाबा आणि अम्मा लोक एकत्र येऊन एक अधिवेशन भरवणार आहेत आणि त्यात खालील ठराव पास करून घेणार आहेत.(अगदी संस्कार आणि आस्था चॅनेलवरील सुद्धा)

युनियन करणे, अभ्यासक्रम ठरवून विद्यापीठाची स्थापना करणे, सरकारकडे अनुदान मागणे, मठ आश्रमासाठी आरक्षण मागणे, लोकसभेत जागा राखीव, झेड सिक्युरिटी. 

Unknown

No comments: