खेळाडूंचे खच्चीकरण

http://www.esakal.com/esakal/08032008/Saptarang811169578F.htm

कॉफीशॉप - खेळ नव्हे; खूळ!

ऑलिंपिक जवळ आलं, की आपण दोन गोष्टी करून टाकतो. एक तर आपल्यात खिलाडू वृत्ती नाही, हे (खिलाडू वृत्तीनं) मान्य करतो आणि दुसरी, भारताला या स्पर्धेत पदक का मिळत नाही, याची चर्चा करतो. पदक मिळविण्यापेक्षा चर्चा करणं हे खूपच सोपं काम आहे. पण भारत ऑलिंपिकमध्ये मागं का, याचं उत्तर आम्हास नुकतंच मिळालं आहे. .......
भारताची वाढती ताकद, महत्त्वाकांक्षा आणि जागतिक महासत्ता होण्याचं जवळपास पूर्ण होत आलेलं स्वप्न याचा जगातल्या इतर देशांना दुस्वास वाटतो. त्यामुळंच त्यांनी ऑलिंपिकमध्ये लंगडी, चमचा-लिंबू, आंधळी कोशिंबीर, डबडा ऐसपैस आणि क्रिकेट हे खेळ न ठेवता, शंभर मीटर धावणे, चारशे मीटर धावणे, शंभर बाय शंभर, चारशे बाय चारशे मीटर धावणे, जिम्नॅस्टिक्‍स, गोळाफेक, हातोडाफेक, थाळीफेक, भालाफेक, लांब उडी, उंच उडी, पोल व्हॉल्ट, जलतरण, डायव्हिंग, घोडेस्वारी, टेबल- टेनिस, भारोत्तोलन, मुष्टियुद्ध, मॅरेथॉन, हेप्टॅथलॉन (हा तर खेळ नसून, खेचरांना होणारा आजार असावा, अशी एक आपली आमची शंका आहे!) आणि असेच काहीबाही निव्वळ निरर्थक प्रकार "खेळ' म्हणून ऑलिंपिकमध्ये घुसवले आहेत. आता तुम्हीच सांगा, गोळा, हातोडा किंवा थाळ्या या काय फेकायच्या वस्तू आहेत का? उंच उडी, लांब उडी, पोल व्हॉल्ट हे तर डोंबारीकाम. उड्या मारून काय साध्य होतं? जलतरण म्हणजे तर निव्वळ फसवणूक आहे. अरे, मोठमोठ्या पुरांत पुलांवरून बिनदिक्कत उड्या मारणारे मर्द आमच्याकडे आहेत. त्यांना त्या टॅंकरूपी निळ्या डबक्‍यात दोनशे आणि दीडशे मीटरमध्ये बुचकळ्या मारायला सांगता? केवढा घोर अपमान त्या मर्दानगीचा! थॉर्प आणि फेल्प्स वगैरेंचं काही कौतुक सांगू नका. आमच्या मुठेतून वारजे ते खराडी हे अंतर नाक न दाबता पोहून दाखवा म्हणावं. तेच धावण्याचं. जीव खाऊन जोरात पळून दाखवणं यात सोन्याचं पदक देण्यासारखं काय आहे, हेच खरोखर कळत नाही. मुंबईत येऊन पाहा. लोकं आणि लोकल सतत पळतच असतात. तीच गोष्ट डायव्हिंगची! उंचावर टांगलेल्या फळकुटावरून अंग वेडंवाकडं करून पाण्यात उडी मारली, तर त्यात टाळ्या वाजवण्यासारखं काय आहे? जिम्नॅस्टिक्‍सचं केवढं कौतुक! पण खरं सांगू का, घरचं चांगलंचुंगलं असताना उगाच देहाची काडी करायची आणि ती त्या दांडीवरून गरागरा फिरवून दाख
वायची, यात त्या घराण्याची काय अब्रू राहिली? हॉकीत आम्ही ख्रिस्तपूर्व काळात सुवर्णपदकं मिळविली, तर ते सहन न होऊन यांनी आमचा संघ पात्रताफेरीतच गारद केला. भारताविषयीचा दुस्वास! दुसरं काय? मुष्टियुद्ध, भारोत्तोलन (हा शब्दच पेलवत नाहीय; वजन लांबच राहिलं...) किंवा कुस्ती हे तसे जिवावरच बेतणारे प्रकार. गरज नसताना अव्वाच्या सव्वा वजन आधी छाताडावर आणि मग दोन्ही पाय लटपटवत उंच हातांवर उचलून काय मिळतं कुणास ठाऊक! कदाचित पदक वगैरे मिळत असेल; पण चुकून वजन छातीवर पडलं तर केवढ्याला पडायचं? मुष्टियुद्ध म्हणजे तर स्वतःहून मार खाण्याला आमंत्रण देणं. याटिंग, रोईंग, कयाकिंग वगैरे गोष्टींचं नावच काढू नका! पाण्यात पडून मरायचंय का? छे! छे! छे! "डर के आगे जीत है' हे खरं असेल; पण आम्हाला "जीत'चीच "डर' आहे, त्याचं काय?

- मामू

मामू काय हे? आम्हा भारतीय खेळाडूंना कमी लेखता काय? तुम्ही म्हणता चर्चा करणं सोपं आहे, पण ती चर्चा लांबवणं किती अवघड आहे माहित आहे काय? चर्चा पुरी होऊन ’ निकाल’ ( माझ्या मनात तसं नाही ) लागेपर्यंत स्पर्धा संपून जातात तो काय त्यांचा दोष? तुमच्या अशा लेखामुळेच आमचा हिरमोड होतो आणि आमचा मूड ऑफ होतो, आणि पदके आमच्या हातातून अशी भराभरा निसटतात. अहो तुम्ही म्हणता ते तरी खेळ आमच्या साठी ठेवलेत काय? धावण्याचे सर्व खेळ चोर पोलीसांनी केव्हाच ताब्यात घेतलेत. हतोडाफेक थाळीफेक हे तर संसदेत नेहमीच चालतात. जिम्नॅस्टिक्‍स तर रोजच सिनेमातल्या गाण्यात पहायला मिळतं. आता वेटलिफ्टींग, परवाच संसदेत करोडो रूपयांचा भार उचलावा लागलाच ना? जास्त पाल्हाळ लावत नाही.

अहो आमचं कौतुकच राहिलेले नाही! लक्षात ठेवा, आमचे तुम्ही पूर्णपणे खच्चीकरण केलेले आहे, जर पदकं मिळाली नाहीत तर आम्हाला बोलू नका. हा लेख वाचल्यापासून आम्हाला भयानक मरगळ आलेली आहे, सरावात सुद्धा मन लागत नाहीये. घोड्याच्या एका नालेमुळे राज्य गेले म्हणतात. तुमच्या एका लेखामुळे देशाचे किती नुकसान होणार आहे माहीत आहे काय? खेळाडूंची मने नाराज झाली, त्यांच्याकडून सराव होत नाहीये, तसेच ते चीनला जाणार, मन था‌‌‍र्‍यावर नसल्याने आम्ही हॉटेलातच बसून राहणार, मग कशी पदके मिळणार? ह्या वेळेस आम्ही ठरवले होते की, रजत आणि कांस्य पदकांना हातच लावायचा नाही, फक्त पिवळीधमक सुवर्णपदकेच घ्यायची, पहाण्यार्‍यांना काविळ झाल्या सारखं वाटलं पाहिजे, पण कसचे काय,तुम्ही करोडो भारतीयांच्या आशेची वाट लावलीत.  कुठे फेडणार ही पापे? बस, आता मला बोलवतही नाही, घरच्या सर्वांसाठी चीनची तिकीटे आणायला जायचंय, तसं मंडळाने कबूल केलेय ना? काही झाले तरी आम्ही जाणारच कारण कुणी म्हणायला नको, तुम्ही का गेला नाहीत, कदाचित चीन वगैरे देशातही असे ’मामू’ असतील तर आपले काम सोपे होऊन, भराभर पदके मिळतील. खरंतर मामू, तुम्ही सर्व देशांचा दौरा करून तिथल्या वर्तमानपत्रातून असे लेख लिहून तिथल्या खेळाडूंचे खच्चीकरण केले असते  तर आमचे काम किती सोपे झाले असते, नाही का?

Unknown

No comments: