या वर्षी १५ ऑगस्ट शुक्रवारी आलाय, १६ तारखेला चवथा शनिवार सुट्टी, १७ तारखेला रविवार, १९ तारीख मंगळवारी पतिताची सुट्टी, अशा पर्वणीच्या काळात भारतीयांच्या मनातील विचार समजले तर -
सरकारी ऑफीस मधील क्लार्क - चला एक बरं झालं, वर्षाच्या सुरवातीलाच कॅलेंडर बघून तयारी केली ते. पाच दिवसांचा कोकणात जाण्याचा बेत आखला. आधीच लॉज बुक करून ठेवले. १४ तारखेला संध्याकाळी निघायचे, १८ परत, १९ ला आराम करून २० ला ऑफिसला हजर. १८ चा casual leaveचा टाकलाय झाला पास तर ठीक, नाहितर पगार कट्. कोणी येणार नाही १८ ला तेव्हा मी तरी येउन काय करूना? फक्त अडचण आहे ती बंड्याची, त्याच्या शाळेत कंपलसरी झेंडावंदन आहे, काय हे? घरी केले तर चालत नाही काय? पाहिजे तर डिजीटल फोटो दाखवता आला असता. उघीच सगळ्यांनाच त्रास नाही का! बरं झालं ऑफीसमध्ये झेंडावंदन करत नाहीत ते? चला तयारीला लागलं पाहिजे.
क्लार्कची पत्नी - कित्ती छान! चार दिवस कोकणात. मजा आहे. बरं झालं बाई यांनी दूरदर्शीपणा दाखवला आणि लॉज आधीच बुक करून ठेवले. तसे हे भारी हुशार हं! १५ ऑगस्टला म्हणे महिला महिलामंडळात झेंडावंदन करणार. आम्ही जाणार ट्रिपला, तर बाकी जणी नाराज. मी म्हणते आल्यावर झेंडावंदन केले तर चालणार नाही का? मिळालंय ना स्वातंत्र्य मग त्याचे प्रदर्शन कशासाठी? इंग्रजांशी काय काअर केला होता का, की आम्ही दरवर्षी साजरा करणार म्हणून. उलट त्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या कडू आठवणी नकोत. कसा आनंदाने लोकांना हा दिवस साजरा करू द्यावा. सरकारने आनंदाप्रित्यर्थ गाड्या फुकट ठेवाव्यात. बंड्या म्हणतोय शाळेत जायाचे, पण मग बुकींगचे काय? शाळेत काहीतरी सांगता येईल. १५ ऑगस्ट काय नेहमीच येतो, कोकनात कधी जाणार?
बंड्या - शाळेत जायची खूप इच्छा आहे पण आईबाबा नको म्हणतात. गेलं पाहिजेना? बाइंनी धमकी दिलीय सहामाहीला १० मार्क कापण्याची. कंटाळा येतो. पाऊस असेल तर चिकचिक. मैदानावर उभे करतात, आणि पाऊस असेल तर सर मात्र छत्री घेतात. आमचे काय? सरांचे भाषण ऐकायला कंटाळा येतो, पुन्हा तेच तेच सांगतात, इतिहासाचे सर याच विषयावर बोअर करतात. बाबांनी छान ट्रीप अरेंज केली आहे, मजा आहे. मी तर बाबा ट्रीपलाच जाणारच.
नेता - यावर्षी माझा पहिला झेंडावंदन. घरच्यांना सांगीतलंय चांगलं आवरून घ्या. जायचंय. तर म्हणतात डबे बांधून घ्यायचे का? आता काय कपाळ? खादीचे कपडे चांगले स्टार्च घालून कडक इस्त्री केलेत, टोपी पण कडक केलीय. खादीत कसं एकदम प्रामाणिक असल्यासारखं वाटतं. खादी म्हणजे खा दिवसभर. फोटोवाल्याला सांगीतलंय आपले सगळ्या पोजमधले फोटो घ्यायला. आमच्या ५ वर्षात फक्त पाचच टायमाला १५ ओगस्ट येतो, हे काही बरोबर नाही. धा वीस वेळा तरी पायजेल.
सफाई कर्मचारी - पंधरा अगस्त आला की बास, अजीबात फुरसत नसतीया. मंडळावाले हात धुवून मागं लागत्याय, साफसफाई करायसाठी. एकट्यानं जमत न्हाय म्हणूनशान पोरांलाबी सोबत घेतूया. ते शाळंत जाऊन तरी काय करणार हायेत? मंडळवाले निस्त्या पावडरी मारा म्हणत्यात. मुकादम काय कोटा देत न्हाय? ते आपलं दवाखान्यास्नी कायबाही घिवून पाठवून देत्यात. मागल्या टायमाला लय बोंबाबोंब झालती, म्हणून या वर्षी गिरणीवाल्याला दादा बाबा करून खाली पडलेलं पीठ आणलंया, तेच टाकणार, कोणास्नी काळतंय. सम्दीजणं मजेत मिरवत्यात आनी आमी आपली काढतूया घान. कार्यकरम संपल्यावरबी, खाल्ल्याली घान काढावी लागतीच ना. एक बाकी बरं, दुसर्यादिसी झाडताना प्लास्टिकचे झेंडे मिळत्यात ते इकून चार पैसं तरी मिळत्यात.
मंडळाचा कार्यकर्ता - चला लवकर बाकीच्यांना गोळा करायला पाहिजे, वर्गणी काढायची ना! दहीहंडीची पण आत्ताच मागावी, नंतर देत नाहीत. मागच्या वेळेस स्पीकरवाल्यानी कमिशन द्यायला नखरा केला होता आता तो बदलला पाहिजे. स्वातंत्र्यदिनाचा एक फायदा, वर्गणीसाठी एक जादा निमीत्त. या दिवशी खादी कपडे, वर कडक गांधी टोपी घालून इंप्रेशन पाडायला बरे वाटते. गल्लीत जाऊन सर्वांना दम देऊन आलोय. सर्वांनी झेंडावंदनाला हजर राहायचे. फोटो कसा भरलेला आला पाहिजे ना! चला आता मागच्या वर्षीचा झेंडा शोधला पाहिजे, धुवून इस्त्री केला पाहिजे. झेंडा खूप वर लावतात मग फोटोत झेंडा येत नाही, जरा खाली डोक्याजवळ लावा म्हणलं तर चालत नाही म्हणतात. झेंडा असला म्हणजे कसं इंप्रेशन पडतं.
लॉज मालक - वा छान! या वेळेस सगळ्या खोल्या ओव्हरफुल्ल झाल्यात. सगळ्या नोकरांची सुट्टी कॅन्सल. बरं झालं गांधीबाबांनी, १५ तारीख पावसाळ्यात करून घेतली ते. लोकं अगदी गर्दी करतात, पाऊस अनुभवायला.झेंडावंदन करायचं काम पोलीस, मिलीटरीवाल्यांचं बाकीच्यांचं काय! भारतात सुट्ट्या खूप, आमचा धंदा खूप.
स्वातंत्र्यदेवता - या लोकांना काय सांगणार, अरे मला पारतंत्र्यातून सोडवायला, किती लोकांनी प्राण गमावले, आणि मला स्वतंत्र केलं. जर स्वातंत्र मिळालं नसतं तर हा दिवस साजरा करता आला असता काय? रस्त्यावर फिरता आले नसते. अतोनात अन्याय झाला असता. इंग्रज गब्बर झाले असते. १५ ऑगस्ट हा त्यांना आठवण करण्याचा दिवस आहे, पण सहलीच्या आनंदात कोणाला वेळ आहे. स्वातंत्र्याचा स्वैराचार झालेला आहे. असेच चालू राहिले तर मी पुन्हा एकदा पारतंत्र्यात पडणार, मग सुप्रीम कोर्टाने सांगीतल्याप्रमाणे देव सुद्धा मला वाचवू शकणार नाही. असा भारत पाहून गांधी पुन्हा अवतार घेणार नाहीत. साध्या सज्जन मुलाच्या हातात सर्व इस्टेट दिल्यावर, त्याला माज आल्यास त्या इस्टेटीची काय धुळधाण होते ते पाहणेच फक्त बापाच्या नशिबी असते, असे स्वातंत्र्यसैनिकांचे झाले आहे. देव यांना सुबुद्धी देवो.
No comments:
Post a Comment