बाबा आमटे

श्री. व सौ. मॅगसेसे २००८
डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांना यंदाचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे. भामरागडसारख्या अतिदुर्गम भागात महाराष्ट्रातील  मागास  माडिया आदिवासींच्या जीवनात प्रकाश निर्माण करणारा लोकबिरादरी प्रकल्प या जगावेगळ्या दांपत्याने चालविला. भामरागड म्हणजे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि छत्तीसगड यांना जोडणारा दंडकारण्यातील अती दुर्गम भाग. माडियाचे मन तर शतकानुशतके प्रगत जगापासून "कट ऑफ'च झालेले होते. रेड्या-बोकडांचाच नव्हे; तर प्रसंगी नरबळीही इथे दिला जाई. ९८ टक्के भागात वीज पोचली नव्हती.

अशा या दुर्गम भागात बाबा आमटे यांनी लोकबिरादरी प्रकल्पाचे स्वप्न साकार केले. सुखवस्तू शहरी जीवन सोडून; अनेक जण बायकोमुलांना बरोबर घेऊन  ध्येयासक्तीने आणि धीरोदात्तपणे बाबांच्या लोकबिरादरीच्या कामात सामील झाले. बाबा अक्षरशः प्रवाहाविरूद्ध पोहोले. माडियांना दवाखाना शब्दच माहित नव्हता, त्यांचा आधार म्हणजे पुजारी.त्यांनी बाबांना विरोध केला, कारण त्यांच्या पोटावर पाय आला असता. अशा परिस्थितीत बाबांनी आरोग्यसेवा आणि शेती करून त्यांच्या विश्वास निर्माण केला. जेव्हा पुजार्‍याच्या मुलाला बाबांनी सेरेब्रल मलेरियातून वाचवले, तेव्हा तोच पुजारी बाबांचा प्रमुख बनला. बाबांनी महान ईश्वर सेवा केली. खरे तर हा पुरस्कार बाबांना जिवंत असतांना मिळाला असता तर त्या पुरस्काराचा सन्मान झाला असता.

कोठे लाखो रूपयांच्या सिंहासनावर बसून दूरदर्शनवर प्रवचन कराणारे बाबा  आणि कोठे सेवेत मग्न  झालेले बाबा आमटे. मुळात लोकबिरादरीला प्रारंभापासून आधार लाभला तो आनंदवनातील कुष्टरुग्णांच्या कष्टांचा. एका प्रकल्पातील लाभार्थींनी स्वतःचे पुनर्वसन झाल्यावर दुसरा प्रकल्प उभारावा आणि इतरांचे पुनर्वसन करावे या किमयेला जगात कुठे तोड नसेल! याचे रहस्य म्हणजे बाबा आमट्यांनी कुष्ठरुग्णांच्या मनात केवळ आत्मसन्मानाची प्रेरणाच नाही; तर अन्य पीडितांबद्दलची करुणाही जागवली.

पित्याच्या स्वप्नपूर्तीसाठी...
५६ वर्षांच्या बाबांची लोकबिरादरी प्रकल्पाची साहसी इच्छा ऐकून त्यांचा २३ वर्षांचा मुलगा डॉ. प्रकाश प्रेरित झाला आणि बाबांना त्याने वाढदिवसाची एक जगावेगळी भेट दिली. (योगायोगाने बाबा आणि प्रकाश या दोघांचाही वाढदिवस २६ डिसेंबर हाच!) वाढदिवसाची ही भेट म्हणजे डॉ. प्रकाश स्वतःच! पित्याच्या स्वप्नपूर्तीसाठी पुत्राने हसत हसत वनवास स्वीकारला.

अशा या थोर महात्म्याला सलाम!

Dilip Khapre

No comments: