स्पंज

दिनांक २८ जानेवारी रोजी अमेरिकेतील ख्यातनाम सामरिक तज्ञ अश्ले जे टेलीस, ज्यांच्या शब्दाला परराष्ट्र घोरणात मोठी किंमत आहे, म्हणाले’," बहुतांश दहशतवादी हल्ले भारताने सहन केल्यामुळे दुर्दैवाने भारत हा दहशतवादी हल्ले झेलणारा ’ स्पंज’ बनला आहे. आणि भारताच्या सहनशक्तीमुळे अमेरिका आदी देश बचावत आहेत."

श्री. टेलीस साहेब, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. आमची ह्ल्ले सहन करण्याची परंपरा आजची नाही. अगदी महाभारतापासून चालत आलेली आहे. युधिष्टीराने द्युत खेळताना सहन शक्ती दाखवून, द्रौपदीचे वस्त्रहरण उघड्या डोळ्यानी पाहिले ना. अल्लाउद्दीन खिलजीने भारतावर २१ वेळा स्वारी करून लूट केली, कोणीही यावं आणि भारतावर स्वारी करून, मजा करावी. आम्ही दबणार आणि पुन्हा सावरणार, दु‍सर्‍या हल्ल्यासाठी. 

एवढे दहशतवादी हल्ले झाले, पण त्यातून कोणाला सजा झाली काय? आणि झाली असल्यास सजेची अंबलबजावणी झाली काय? जिथे प्रत्युत्तर दिले जात नाही, प्रतिहल्ले होत नाहीत, तिथेच पुन्हा पुन्हा हल्ले होत राहतात. दोन शेजार्‍यांच्या मुलांत भांडण असते. एक दुसर्‍याला नेहमी मारत असतो, मार खाल्लेल्या मुलाचे आईवडिल, दुसर्‍या मुलाच्या पालकांना वेळेवेळी समजावून सांगतात, पण हा प्रकार काही कमी होत नाही. मग एके दिवशी, हा मुलगा तिसर्‍याच मुलाला शिवी देतो, तर तो मुलगा त्याच्या अशी कानफटात लगावतो, की तो कायमचा बहिरा होतो. आणि त्या खोडकर मुलाची संवय कायमची सुटते. म्हणजेच कोणीतरी कानफटात लगावणारा पाहिजे.

साहेब, अमेरिकेवर ९११ चा हल्ल झाला, त्यावर अफगाणिस्तानात जी प्रतिक्रीया अमेरिकेने दाखवली, काय बिशाद आहे, पुन्हा अमेरिकेवर हल्ला होईल. भारताला आतापर्यंत खूप जणांनी ओरबाडले आहे, त्यातलाच एक भाग म्हणजे काश्मीर. मुंबईवर हल्ला झाला, सरकार काय करतंय, फक्त कागदी घोडे नाचवतंय. पलीकडच्याला काय फिकीर आहे. त्याने आपले पाणी जोखले आहे. त्याला पूर्वीचा अनुभव आहे ना. घरात साप शिरल्यावर सापाला ठेचायचे सोडून आपण आपल्या घराची सुरक्षितता वाढवीण्यावर वेळ आणि पैसा खर्च करीत आहोत.

साहेब, ह्या सर्वाला मूळ कारण भारत पाकिस्तान फाळ्णी. स्वातंत्र्ययुद्धात हिंदू मुस्लीमांनी खांद्याला खांदा लाउन इंग्रजांशी लढा दिला, पण नंतर ते एकमेकांचे कट्टर शत्रू का बनले?  त्याला कारण त्या वेळच्या नेत्यांचा खुर्ची बद्दलचा हव्यास. कदाचित्‌, कोण पंतप्रधान होणार या वरून झालेला वाद असेल. मग जीनांनी वेगळे पाकिस्तान मागितले, आणि सूडाचा प्रवास सुरू झाला.  म. गांधींनी अहिंसा गळी मारली आणि तिचा कसा आणि कोठे उपयोग करावा हे कळत नसल्याने भारताचा स्पंज झालेला आहे.

खरे दुःख तर पुढेच आहे, भारतीय जनताच आता राजकारणी आणि सत्ताधार्‍यांचा ’ स्पंज’ बनलेली आहे. सर्व बाजूंनी सर्व क्षेत्रात सामान्य जनतेला स्पंज बनवले आहे. वाटेल तसे दाबतात आणि आम्ही बिचारी सामान्य भारतीय जनता, दबून दबून परत मूळ अवस्थेला येतो, दुसर्‍याने दाबावे म्हणून.

शिक्षण क्षेत्रात, वैद्यकीय क्षेत्रात, सरकार दरबारी, न्यायालयात, गुंडांमार्फत अनेक ठिकाणी, एवढेच काय, रिक्षावाले, भाजीवाले, बसवाले सुद्धा वाटेल तसे ’स्पंज’ बनवतात.  

भविष्यात भारतीय जनतेच्या नशीबात काय वाढून ठेवले आहे,ते  ३३ कोटी देवच जाणोत, आणि त्यातील एकाने तरी येऊन आमचे रक्षण करावे, हीच प्रार्थना.

Unknown

1 comment:

Unknown said...

Agadi mazya manaatala manaajoga mallach kaaya paNa sarvanaach ruchela Asa aahe.