’सारेगामा इंडिया’ कंपनीतर्फे स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजातील दुर्मिळ गायनाच्या सी.डी. प्रकाशीत करून कंपनी आम्हां गानरसिकांना धन्य केले आहे. पंडितजींना जेव्हा भारतरत्न पुरस्कार मिळाला, तेव्हाच खर्या अर्थाने भारतीय संगीताचा गौरव झाला. आणि आता ’सारेगाम”ने यावर कळस चढविला. नव्याने उभारी धरणार्या स्वरसाधकांना हे पडितजींचे गायन म्हणजे, आकाशातील अढळ धृवतार्याप्रमाणे मार्ग दाखवत राहील.
पंडितजींच्या, त्यांच्या वयाच्या २४ व्या वर्षी गायलेल्या बंदिशी ऐकायला मिळाव्यात, हे खरोखरच आमचे भाग्य. पुण्याच्या सवाई गंधर्व महोत्सवात शेवटच्या दिवशी जेव्हा पंडितजींच्या गायनाने सांगत होत असे, तेव्हा ज्यांनी हा अनुभव घेतला त्यांचे भाग्यच काही थोर.
पंडितजींनी जवळजवळ सर्व रागांमध्ये गायन केले आहे.
आठवते, पुण्यात भिकारदास मारूतीसमोर ’आनंद निकेतन’ नावाचे ( अजूनही त्या दुकानावर पाटी आहे )दुकान होते, तेथे दुर्मिळ रेकॉर्ड, ७८ आरपीएम च्या मिळायच्या, त्या गृहस्थाकडॆ अनमोल संग्रह होता. गोहरजान, रसूलनबाई, निर्मलादेवी किती नावं सांगावीत. त्याकाळात टेप, सी.डी. नव्हत्या, फक्त ग्रामोफोनच. पण त्याचाही थाट काय सांगावा. त्याचा भोंगा असा चकचकीत पितळेचा पिवळा पॉलीश केलेला, अगदी थाटात तो घरात मिरवत असे.
असो, पुन्हा एकदा ’ सारेगामा इंडिया ’चे आभार. अशाच प्रकारच्या सी.डी. त्यांनी अजूनही प्रकाशीत कराव्यात, आणि आम्हां रसिकांना तृप्त करावे.
No comments:
Post a Comment