“दुसरे दिवसापासून सर्वत्र लोकांस मेजवानीची आमंत्रणें करुन भोजनास बोलाविलें. मंडळी तितकीच आली. वाढावयास सर्व कारकून मंडळी नेमिली. तूप वाढावयास शहरचे सराफ नेमले. एकएका पदार्थास एक एक कारकून नेमला. सारे कारकून पीतांबर नेसून शालजोडया कंबरेस बांधून वाढावयास लागले. चार चार कारकुनांमागें एकेक शिष्या हातीं ओली धोत्रें घेऊन वाढणारांचे घाम पुशीत असे. असा रोज समारंभ होत राहिला. होळकर, गायकवाड, भोसले, व सरकारचे मानकरी घोरपडे, जाधव, निंबाळकर,पाटणकर, दरेकर, मोहिते, शिरके, थोरात, धुळप, खानविलकर अशी मंडळी व पागे पथकेसुद्धां एकांडे अशा अवघ्यास भोजनास घालून वरासनी बसले. वरकड मंडळी मंडपांत दाखल झाली. अगोदरच राघोजी आग्रे व हरिपंत तात्या सोयर्याचे मंडपांत तरतुदीस ठेवले होते, त्यांनीं पुढें येऊन सारे मंडळीस आंत घेऊन जाऊन ज्या ज्या ठिकाणी योग्यतेनुरुप बसावयाचे तसे बसविले. श्रीमंत बसले त्या ठिकाणीं आप्पाबळवंत व अमृतराव पेठे व दाजीबा आपटे वगैरे झाडून मंडळी बसली. नंतर मधुपर्कविधि होऊन पाणिग्रहणविधि झाला. त्या समयी वाजंत्र्याचे बाजे, चौघडे व नौबती अशी एकदाच सारी वाजू लागली व तोफांची सरबत्ती झाली. मग विवाहहोम होऊन ब्राह्मणांस दक्षिणा मंडपात वाटली. मंडपात वर्हाडी होते त्यास पानसुपारी, हार, गजरे, तुरे वाटले. मग सर्वत्र मंडळी सरकारचा निरोप घेऊन निघाली ती आपआपले ठिकाणी गेली. श्रीमंत मात्र राहिले.
“तेथें चार दिवस समारंभ भोजनाचा झाला. मुत्सद्दी मंडळी व बाहेरचे वर्हाडी सरदार वगैरे या अवघ्यास चार दिवस यथासांग सोहाळा झाला. बाहेरची सरदार मंडळी व मराठे मानकरी यांस भोजने सरकारवाड्यांत झाली. मोठी दक्षणा देकार रमण्यांत झाला. चार दिवस झाल्यावर साडे होऊन वरातेची मिरवणूक निघाली. त्या दिवशीं शहरात सारे रस्ते झाडून सडे टाकून चिराकदानें लावली. सरकारची स्वारीं अंबारीत बसून वाडयांत यावयास निघाली. सारे सरदार, मानकरी, सर्वांस पोशाख योग्यतेनुरुप दिले. तसेच ब्राह्मण सरदार विंचूरकर, पटवर्धन, रास्ते, बेहरे, बहिरो अनंत, राजेबहाद्दर, बारामतीकर, आप्पाबळवंत, बन्या बापू मेहेंदळे, पुरंधरे, पानशे या सर्वास अलंकार, वस्त्रे योग्यतेनुरुप दिली.
“शेवटीं नबाब पोटाजंग यास जाफत करण्याचे बलावणे केले. त्या दिवशी पंधराशे खासा नबाबासमागमे आला. त्यास भोजनास पंधराशे रिकाबा (ताटे) रुप्याच्या नव्या करविल्या. त्या सर्वत्रास भोजनास मांडिल्या. करकून मंडळी अंगांत जामेनिमे घालून पायात विजारी घालून कंबरेस पटके बांधून वाढावयास लागली. सर्वत्रांची भोजने झाली. अवघ्यानी वहावा केली. मग विडे, पानसुपारी, अत्तर गुलाब, हारतुरे, गजरे देऊन सर्वत्रास पोशाख दिले. नबाबास जवाहिर दिले. असे होऊन सर्व आपले गोटांत गेले. सरदार मानकरी व शिलेदार कोणी राहिला नाही. असे सर्वत्रांचे सत्कार झाले. [पेशव्यांची बखर]
No comments:
Post a Comment