शनिवारवाडा, पुणे

शनिवारवाडयाचे वर्णन सांगलीचे प्रसिद्ध कवि साधुदास यांनी आपल्या ‘पौर्णिमा’ नामक कादंबरीत केलें आहे. त्यावरुन वाडयाचें समग्र चित्न डोळ्यांसमोर उभे रहातें. ‘सभोवार एक प्रचंड तट राखून वाडयाचें बांधकाम केलें होतें. वाडयाकरितां आणि भोंवतालच्या बागेकरितां मिळून तीन बिघ्याहून अधिक जागा गुंतली होती. वाडा उत्तराभिमुख असून त्याला एकंदर पांच दरवाजे होते. उत्तरेकडेचा दिल्ली दरवाजा, ईशान्येकडचा मस्तानी (अल्लीबहाद्दरा) चा दरवाजा, दक्षिणेकडचा आग्नेय व नैऋत्य या दिशांस असलेले गणेश आणि नारायण या नांवांचे दरवाजे, आणि पूर्वेचा जांभळी दरवाजा, अशा नांवांनी हे दरवाजे प्रसिद्ध होते. सर्व दरवाज्यांवर अष्टौ प्रहर गारद्यांचे टेलता पहारा असे, दिल्ली दरवाजांतून आंत गेल्याबरोबर एक प्रचंड वाटोळा बुरुज लागे. या बुरुजाच्या माथ्यावर तोफांचा गोल रचला होता. आणि त्याच्या मध्यभागीं महाराष्ट्राचें पंचप्राणभूत जरीपटक्याचें भगवें निशाण फडकत होतें. बुरुजाच्या आंत तीन मोठया कमानी असून त्या कमानींवर नगारखान्याची माडी होती. कमानींतून आंत गेल्यावर एक विस्तीर्ण पटांगण लागे. या पटांगणाच्या पूर्व बाजूस व पश्चिम बाजूस दोन दोन लहान चौक असून दक्षिणेच्या बाजूस वाडयाची मुख्य इमारत होती. ही इमारत सहा मजली असून तिचे चार मोठमोठे चौक होते. आग्नेयीकडील चौकास लाल चौक असें नांव होतें, पण तो बाहेरील चौक होते. आग्नेयेकडील चौकास लाल चौक असें नांव होतें, पण तो बाहेरील चौक या नांवानेंहि प्रसिद्ध होता.... नैऋत्येकडील चौकास मोतीचौक असें नांव असून तो बाईंचा (गोपिकाबाई) चौक या नांवानें ओळखला जाई....वायव्येकडील चौकास हिरकणी चौक असें नांव असून तो मधला चौक या नांवानें गणला जात असे... ... शेवटच्या म्हणजे ईशान्येकडील चौकास माणिकचौक ही संज्ञा असून तो हौदाचा चौक या नांवानेंहि महशूर होता. या मोठया चौकांतून फडाचा चौक, ताकचौक, मुदपाकचौक, पक्कान्नचौक इत्यादि अनेक पोटचौक होते. त्यांपैकी फडाचा चौक हा हिरकणी चौकांत असून त्यांत पेशवे सरकारांची कचेरी भरत असे. या सर्व चौकांत मिळून गणपतीचा रंगमहाल, नानांचा दिवाणखाना, नवा आरसेमहाल, जुना आरसेमहाल, दादासाहेबांचा दिवाणखाना, थोरल्या रायांचा जुना दिवाणखाना, खाशांचा दिवाणखाना, हस्तिदंती दिवाणखाना, नारायणरावांचा महाल, अस्मानी महाल इत्यादि अनेक महाल व दिवाणखाने होते. नारायणरावांचे देवघर, रावसाहेबांचे देवघर, दादासाहेबांचे देवघर इत्यादि अनेक देवघरें होती. याशिवाय जामदारखाना, जिन्नसखाना, दप्तरखाना, पुस्तकशाळा, गोशाळा, पीलखाना, उष्टखाना, शिकारखाना, शिलेखाना, वैद्यखाना, कबूतरखाना, कोठी इत्यादि कारखान्यांची योजना वेगवेगळ्या चौकांतून करण्यांत आली होती. कात्रज येथें तलाव बांधून त्यांतून पाणी शहरांत आणून तें वाडयांत सर्वत्र खेळविलें होते.

‘वाड्याचे सर्व चौक उत्तम चिरेबंदी बांधले असून त्यांच्या मध्यभागी अनेक हौद व कारंजी असत. त्यांच्यापैकी हिरकणी चौकांतलें हजारी कारंजें कमलाकृति असून त्याचा घेर सुमारें ऐशी फूट होता. त्यांत सोळा पाकळया असून प्रत्येक पाकळींत सोळा याप्रमाणें सर्व पाकळ्यांत मिळून दोनशें छप्पन्न कारंजी उडण्याची सोय केली होती. वाडयाचे सुतारकाम उत्तम सागवानी लाकडाचें असून त्यांतील दिवाणखान्यांचे व महालांचे नक्षीकाम फारच प्रेक्षणीय केलें होतें. दिवाणखाने कलमदानी आकाराचे असून त्यामध्यें एक मोठा सभामंडप व चारी बाजूंस चार दालनें काढलेलीं असत. सभामंडपाचें काम सुरुदार नक्षीचें असून त्याच्यावर नक्षीदार लाकडी कमानी होत्या. त्यांच्यावरुन पक्षी, फळें, वेलबुट्टी वगैरे चित्नें कोरलेलीं असत. विशेषतः हिरकणी चौकांतल्या गणपतिमहालाचें चित्नकाम फारच प्रेक्षणीय कोरलेलें होतें. आणि त्यांतून रामायण-महाभारतांतील अनेक कथांची चित्रें होतीं. जयपुराहून भोजराज नावाच्या चित्रकारास बोलावून आणून त्याजकडून हें चित्नकाम तयार करुन घेण्यांत आलें होतें. यावरुन हा वाडा सजविण्यासाठीं किती पैसा खर्च करण्यांत आला असेल याचा वाचकांनी अंदाज करावा.’

Unknown

No comments: