धार येथील एका बावीशे ब्राह्मणाचे घरील १६९ वर्षांचे दोन जुने कागद सांपडले. त्यांत श्रीमंत बाळाजी बाजीराव पेशवे यांचे वेळीं एतद्देशीय ब्राह्मणांचे आचारांत शास्त्रविरुद्ध प्रचार चालू होते ते बंद करुन शास्त्रोक्त आचार चालू करण्याबद्दल आज्ञा लिहिल्या आहेत. त्या दोन कागदांपैकी एक निषिद्ध आचारांची यादी असून दुसरे यशवंतराव पवार यांनीं वर्तमान भावी कमाविसदारांचे नावें लिहिलेलें ताकीदपत्र आहे. ते संक्षेपानें येणेंप्रमाणें
श्री. यादी धर्मस्थापना शास्त्रप्रमाण वेदपुरुषाज्ञाप्रमाण नाना धर्म प्रवृत्त होत नाना स्थलीं.
१. गोत्र, प्रवर, शास्त्र, सूत्र, देवमंत्रपूर्वक स्नानसंध्यादि आन्हिक कर्म करावें. पूर्वसंप्रदाय टाकावा.
२. ब्राह्मण जातीनें घरी रहाट न ठेवावा. सूत स्त्रियांनी न काढावें. पूर्व वृत्तें टाकावीं.
३. नवरीचे गळ्यांत जवाळी (माळ खारका बदाम पिस्ते इत्यादिकांची) मुचीची (चांभारानें) केलेली न घालावी. आपले घरीं करुन घालावी. ब्राह्मण जातीनें एकादशाह द्वादशाह भोजन न करावे. तेरावे दिवशी. ब्राह्मण सुखरुप भोजनास घालावे.
४. सौभाग्यवती स्त्रीनें लाखेचा व नरोटीची चुडा न धरावा.
५. सौभाग्यवती ब्राह्मण स्त्रींचे पंगतीमध्यें विधवेनें मधी बसोन भोजन न करावें.
६. सौभाग्यवतीनें विधवेचे पंगतीस भोजनास न बसावे.
७. विधवा स्त्रीनें शेंडी धरुन विष्णु पूजा न करतां ते शेंडी सोडावी. निर्मल मुंडन करावे.
८. ब्राह्मणाही विवाहामध्यें नवर्या-नवरीचे पाईमोचे घालून वैदिक कर्म न करावे.
९. विवाहामध्यें षोडश संस्कारामध्यें ब्राह्मण जातीहि स्नान करुन अस्पर्श धौत वस्त्र परिधान करुन संध्या, ब्रह्मयज्ञ, तर्पण, नैवेद्य, वैश्वदेव, भोजन, करावें. पूर्व रीत टाकावीं.
१०. ब्राह्मण जातीनें प्रथम मागणी न करावी, तात्काळ विवाह करावा.
११. सौभाग्यवती ब्राह्मण स्त्रीनें चोळी धरावी, काचोळी टाकावी.
१२. सौ. ब्राह्मण स्त्रीनें काशा-पितळेचें बिच्छवे (पायाच्या बोटांतील भूषणें) न धरावें, रुप्याचे धरावे.
१३. ब्राह्मणादि उदक व स्त्रियांनी खांद्यावरीं व कडेवरी आणावें, मस्तकी जळ न आणावें.
१४. ब्राह्मण जातीने आटासाठा न करावा.
१५. ब्राह्मणास ज्यास जेवावयास सांगितलें त्याणें जावें, पोरास समागमे न न्यावें.
१६ ब्राहण भोजन व स्त्रीसवासीण भोजन यांमध्यें विधवा पंगतीस नसावी.
१७. भांड अपशब्दोउच्चारणपूर्वक ब्राह्मण स्त्रीनें मणी न धरावे, वेदमंत्रोच्चारणपूर्वक सकल कर्म करावीं.
१८. समस्त ब्राह्मणाही षोडशकर्म सांगतासिद्धयर्थ ज्या त्या संस्कारी यथासामर्थ्य ब्राह्मण जेवू घालावे.
१९. समस्त ब्राह्मणाही भोजनकर्माचे ठायीं पवित्र होऊन स्वयंपाक करावा, पक्कान्नें पापड लोणचे आदिकरुन.
२०. समस्त ब्राह्मणांहीं विवाहामध्यें नवर्यानवरीचे मस्तकीं पुष्पमाला बांधाव्या. मोचीयाचे घरचे घरमोड न बांधावे.
२१. समस्त ब्राह्मण जातीनें मृत प्राण्यांच्या उत्तरक्रिया शास्त्राप्रमाणें कराव्या.
२२. जो ब्राह्मण मरेल त्याचे स्त्रीचे केस प्रथम अथवा दहावे दिवशीं काढावे तेव्हां शुद्ध.
२३. समस्त ब्राह्मण स्त्रिया याणी प्रत्यही स्नान सवस्त्र करुन वस्त्रे नित्य धुवोन परिधान करावी. चोळी व लुगडी सोवळी धुवोन ठेवावी.
२४. गोत्रप्रवर सापिंड निर्णयपूर्वक स्वसूत्रोक्त वेदमंत्रेकरुन विवाहादिक षोडश संस्कार करावे.पूर्व संप्रदाय टाकावा.
२५. ब्राह्मण जातीच्या समस्त विधवा स्त्रीनें प्रथम रजोदर्शन झाल्यानंतर केस मस्तकीं व आभूषण व चोळी काचोळी लहंगा न धरावी. एक वस्त्र सकच्छ धारण करावें.
२६. सौ. ब्राह्मण स्त्रीनें नाडे मस्तकी न बांधावे.
२७. सौ. ब्राह्मण स्त्रीनें गळ्यापासून मस्तकापर्यत यथासामर्थ्य सुवर्ण आभूषण धरावे, रुप्याचे नग मस्तकीं न धरावे.
२८. सर्व ब्राह्मणाही ब्राह्मणापासून वेदमंत्रांचा उपदेश घ्यावा. त्रिदंडी संन्यासी जटिल गोसावी बैरागी मात्मसाद असे पाखंडी आहेत, त्यांचा मंत्र अथव त्यांचे आज्ञेमध्ये न चालावे. त्यांचा त्याग करावा. ब्राह्मण जातीनें ब्राह्मणापासून उपदेश घ्यावा.
२९. यज्ञोपवीत रहाटाचे सुताची न करावी. आपले स्वहस्ते सूत काढून करावा आणि धारण करावे समंत्रक.
३०. ब्राह्मण जातीनें ब्राह्मणोदकेकरुन सर्वदा स्त्रान करावें. समाराधनादिक करावी, तेथें शूद्रोदक नसावें.
३१. सर्व ब्राह्मण स्त्रीनें सव्य लुगडें नेसून कच्छ धरावा, लहंगा टाकावा.
३२. सर्व ब्राह्मणाही जेवतेसमयीं एकास एका स्पर्श न करावा. सौभाग्यवती स्त्रीनेंहि स्पर्श न करावें.
३३. सकल ब्राह्मण जातीनें साता वर्षांनंतर दहा वर्षपर्यत तत्काळ विवाह करावा.
३४. ब्राह्मण जातीनें ज्या गांवी वधू असेल तेथें सहकुटुंब जाऊन तेथें मंडप घालून देवप्रतिष्ठा करुन लग्न संपादावें.
३५. ब्राह्मणाही ब्राह्मविधीनें विवाह करावा.
३६. ब्राह्मण जातीनें आपली कन्या विक्रय करुन विवाह न करावा.
३७. सकल ब्राह्मण यांचे स्त्रीनें स्वयंपाक करतेवेळेस, भोजन करतेवेळेस दर्याईची (रेशमी) चोळी घालावी किंवा धूत वस्त्र सोवळ्यांत घालावें ते चोळी वस्त्रें धारण करावें.
३८. समस्त ब्राह्मणाही समाराधना व पितृकार्य व विवाहकार्याचे स्वयंपाक करणें तो स्वयंपाक करणार यांनीं उपोषण असतां पाक करावा अथवा पीठ भक्षावयस द्यावें, आणखी न सेवावे.
३९. समस्त ब्राह्मण यांचे पुत्रानें वेदाध्ययन करावें.
४०. जो ब्राह्मण अनाचार न सोडी त्यास वाळीत घालावें. यथोक्त प्रायश्चित्त देऊन शुद्ध करुन घ्यावें.
४१. समस्त ब्राह्मणाचे पितृकार्यी वेदपाठी ब्राह्मण सांगावे भोजनास.
४२. समस्त ब्राह्मणाही पितृकार्याचे ठाईं ब्राह्मण बोलावले असतील तितके जेऊं घालावे.
४३. ब्राह्मणाही शूद्राचे घरीं विवाहादिक कर्म शूद्रकमलाकर ग्रंथप्रमाण करावे. वेदप्रमाण न करावें.
श्री भवीनीचरणें तप्तर
आनंदराव सुत यशवंत पवार
निरंतर संवत् १७९२
संदर्भ आणि आभार - पेशवेकालीन महाराष्ट्र, लेखक-वासुदेव कृष्ण भावे, डिसेंबर सन १९३५.
No comments:
Post a Comment