गणेशोत्सव

पुण्यास सवाई माधवराव रहावयास आल्यानंतर गणेशोत्सव पेशवे सरकारच्या योग्यतेस साजेशा थाटाने साजरा होत असे.
मल्हार बल्लाळी याने पुरंदरवरून ता. २९-८-१७७८ रोजी लिहीलेले पत्र असे-
पुरंदरी श्रीगणपतीचा उत्सव चतुर्थीपासून काल शुक्रवारपर्यंत यथास्थित जाहला. रात्रौ नित्य श्रीमंत कथेस बसत होते. दीड पावणे दोन प्रहरपर्यंत रात्र कथेस होत असे. काल सहा घटिका दिवस शेष राहिला होता, तेव्हां गणपतीचे प्रस्थान जाहले. स्वारी समागमे श्रीमंत गेले होते. पर्जन्याची झड बसली होती, परंतु स्वारी जातेसमयी चांगला पर्जन्य उघडला होता. स्वारीस शोभा फारच चांगली आली होती. राजहंस बच्चा हती याजवर जरीपटका दिला होता व तेजरावा हत्तीण शिवापुरहून आणिली होती. तिजवर नौबत ठेविली होती. श्रीमंतांची मर्जी बहुतच प्रसन्न होती. आज तेजरावा हत्तीण मागती शिवापुरास रवाना केली. स्वारीचा बंदोबस्त राजश्री बळवंतराव पटवर्धन याणी चांगला केला  होता. आपण श्रीमंतांचे पालखीजवळ होते. स्वामीच्या वाड्यापुढील रस्याने थोरल्या तळ्याकडे स्वारी गेली होती. ( पे. द. ४३ )
या उत्सवाचे वेळी सवाई माधवरावांचे वय अवघे पांच वर्षांचे होते. श्रीमंतांची स्वारी गडावर असल्यामुळें गणेशोत्सव अशा रितीने तेथें होत असता पुण्यांत शनिवारवाड्यांत
उत्सवाची तयारी होत असे. याचा वृत्तांत पुरंदराहून सखारामबापू यांनी ता. ५-९-१७७४ रोजी नारो अप्पाजी खासगीवाले यांस लिहीला. ( पे. द. ३२ ता. ५-९-१७७४ )
यावरून असे समजायला हरकत नाही, गणेशोत्सव पेशवेकाळापासून होता, फक्त त्याला समाजात लोकप्रियता आणली ती लोकमान्य टिळकांनी.

Unknown

No comments: