हिंदूंची नीतिमत्ता

परधर्माची लाट देशावर कित्येक शतकें टिकून ओसरली तरी तिचे दुष्परिणाम खरडून काढून स्वधर्म व खसंस्कृति यांची स्थापना करण्यास किती कष्ट पडतात हें वरील हकीकत वाचून कळण्यासारखे आहे. अर्थात्‍ अशा प्रकारचे झगडे वरचेवर करण्याचे प्रसंग हिंदूवर आल्यामुळें त्यांना आपली घडी मनाजोगी कधींच कधींच बसवितां आली नाहीं. हिंदुसमाजात आगंतुक दोष तसेच कायमचे राहून गेले. तथापि एवढा मोठा हिंदुसमाजात आपली संस्कृति न नीतिमत्ता बर्‍याच प्रमाणात टिकवूं शकला, याचे परकीय राज्यकर्त्यांनाहि आश्चर्य वाटले. ज्या मालकम साहेबाच्या ग्रंथातूनच वरील उतारा घेण्यात आला आहे त्या मालकम साहेबाने या बाबतींते दिलेला अभ्रिप्राय मननीय आहे. तो म्हणतो. ‘हिंदी लोकांत बरेच नैतिक दोष आढळतात. जुलूम व अंदाधुंदीची राज्यपद्धति यांचा तो परिणाम आहे. पण त्यांतून हिंदुस्थान देश आतां बर्‍याच अंशी मुक्त झाला आहे. हिंदुस्थानांत आजवर कित्येक स्थित्यंतरे घडून आली व जुलमी राज्येहि होऊन गेली. इतक्या प्रतिकूल परिस्थितीत हिंदी लोकांतील बर्‍याच मोठया जनसमूहाने इतके सद्‌गुण व नीतिमत्ता कायम राखली, असले उदाहरण जगांत इतरत्र पहावयास सांपडणार नाहीं. त्याचे श्रेय हिंदु लोकांच्य धर्मसंस्थाना, विशेषतः ज्ञातिसंस्थेलाच दिले पाहिजे. ज्या ज्ञातिसंस्थेने त्यांना फार प्राचीन काळीं सांप्रतच्या दर्जास चढविले आहे, त्याच ज्ञातिसंस्थेने त्यांना त्याच ठिकाणीं स्थिर करुन ठेवले हेहि खोटे नव्हे. हिंदूंच्या (धर्म) संस्थापासून त्यांना जे फायदे झाले आहेत त्यांपैकीच चोरी, दारुबाजी व अत्याचार यांचा अभाव हे फायदे असून त्याशिवाय कौटुंबिक बंधने व मायापाश यांचीहि योग्यता कमी नाही. आतां त्यांच्या कांहीं चाली व भोळसरपणा असा आहे कीं, त्याबद्दल कोणीहि खेदच दर्शवील.’
(Instructions by Sir John Malcolm Date 28-8-1821).

दर्भ आणि आभार - पेशवेकालीन महाराष्ट्र, लेखक-वासुदेव कृष्ण भावे, डिसेंबर सन १९३५.

Unknown

No comments: